चहा आणि बरंच काही भाग ६

Aditya had met with an accident, he is admitted in hospital, meghna goes to the hospital.

    आपण मागील भागात बघितलं, मेघनाचा रिझल्ट लागलेला असतो, तिला आदित्यला पेढे द्यायचे असतात व रिझल्ट सांगायचा असतो पण आदित्य त्या दिवशी कंपनीत येत नाही. मेघनाला नंतर समजते की आदित्यचा अपघात झाला असल्याने आदित्य आज कंपनीत येऊ शकला नाही. मेघनाला आदित्यची काळजी वाटू लागते, मेघनाला आदित्यला फोन करावा का नाही हा प्रश्न पडतो?

      संध्याकाळ होते, मेघनाच्या डोक्यात आदित्य बद्दल टकटक चालूच असते, आदित्यला खूप लागले तर नसेल ना हा विचार सारखा सारखा मेघनाच्या डोक्यात येत असतो. मेघना कंपनी सुटल्यावर शिवानी सोबत बसने घरी जाते. बस स्टॉप वर उतरल्यावर शिवानी तिच्या घराच्या दिशेने जाते व मेघना आपल्या घराच्या दिशेने निघते, मेघना लगेच आदित्यला फोन लावते. तीन ते चार रिंग गेल्यावर फोन उचलला जातो, समोरून स्त्रीचा आवाज ऐकू येतो, तो आवाज ऐकून मेघनाला पुढे बोलावे की नाही हा प्रश्न पडतो, फोन आदित्यच्या आईने उचललेला असतो.

आदित्यची आई--- हॅलो कोण बोलतंय?

मेघना--- हॅलो मी मेघना बोलतेय

आदित्यची आई--- कोण मेघना?

मेघना--- हा फोन नंबर आदित्य सरांचाच आहे ना.

आदित्यची आई--- हो आदित्यचाच आहे, मी आदित्यची आई बोलतेय, काल आदित्यला अपघात झाला त्यावेळी त्याचा फोन खराब झाला म्हणून त्याचे सिम दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकले, त्यात कोणाचेच फोन नंबर सेव्ह नाहीयेत.

मेघना--- काकू मी आदित्य सरांसोबत कंपनीत काम करते, सरांची तब्येत कशी आहे? खुप लागलंय का त्यांना?

आदित्यची आई--- बरच लागलंय ग,स्वतःची अजिबात काळजी घेत नाही, आज बळजबरी हॉस्पिटलमध्ये ठेवलंय नाहीतर लहान मुलाप्रमाणे केव्हापासून घरी जायची री लावून धरलीय.

मेघना--- कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे? मी भेटायला आलं तर चालेल ना?

आदित्यची आई--- अगं ये ना, काहीच हरकत नाही, मी तुला हॉस्पिटलचा पत्ता मॅसेज करते.

  आदित्यची आई मेघनाला हॉस्पिटलचा पत्ता मॅसेज करते. मेघना घरी जाऊन फ्रेश होते व आईला आदित्यचा अपघात झाल्याचे सांगते व तो जवळच्या हॉस्पिटलमध्ये admit असल्याचे सांगते. हॉस्पिटल घराजवळ असल्याने मेघनाला तिथे जाण्याची परवानगी देते. मेघना घरातून निघताना शिवानीला फोन करते पण शिवानीच्या घरी पाहुणे आले असल्याने शिवानीला मेघनासोबत जायला जमत नाही. मेघना हॉस्पिटलमध्ये जाताना पेढे व सफरचंद घेऊन जाते.

      मेघना हॉस्पिटलमध्ये गेल्यावर रिसेप्शनवर जाऊन आदित्य कोणत्या रुममध्ये आहे हे विचारून तिकडे पोहोचते, तिथे आदित्यची आई रुमच्या बाहेर बसलेली असते, मेघना अंदाज लावते की ह्या आदित्यच्या आई असतील.

मेघना--- काकू तुम्ही आदित्य सरांच्या आईच ना.

आदित्यची आई--- हो पण मी तुला ओळखलं नाही.

मेघना--- काकू मी मेघना, काही वेळापूर्वी आपलं फोनवर बोलणं झालं होतं.

आदित्यची आई--- अरे हो आठवलं, ये बस ना

मेघना--- आदित्य सर कुठे आहेत?

आदित्यची आई--- डॉक्टर आदित्यला तपासत आहे म्हणून मी बाहेर थांबलेय.

मेघना आदित्यच्या आई शेजारी रुमच्या बाहेर बसते. आदित्यची आई मेघनाची पूर्ण चौकशी करते. थोडयाच वेळात डॉक्टर आदित्यची तपासणी करून बाहेर येतात मग मेघना व आदित्यची आई रुम मध्ये जातात.

आदित्यची आई--- आदित्य तुला भेटायला कोण आलंय, बघितलं का?

आदित्य--- अरे मेघना, तुम्ही इकडे कश्या काय? तुम्हाला हॉस्पिटलचा पत्ता कोणी दिला?

आदित्यची आई--- अरे मीच दिला, तुझ्या फोनवर तिने फोन केला होता.

आदित्य--- ओके, मेघना उभ्या का आहात, बसा ना.

मेघना आदित्यच्या हातावर पेढा देते.

आदित्य--- मेघना आमच्याकडे पेशंट ला भेटायला जाताना फळं घेऊन जायची पद्धत आहे, तुमच्याकडे पेढे घेऊन जातात का?

मेघना--- नाही हो सर, मी सफरचंद आणले आहेत. माझा रिझल्ट लागला त्याचे पेढे आहेत.

मेघना आदित्यच्या आईकडे पेढ्याचा बॉक्स व सफरचंद देते. 

आदित्यची आई--- मेघना तु थोड्यावेळ इथे आहेस ना, मी जरा कँटीन मध्ये जाऊन चहा पिऊन येते, खूप कंटाळा आला आहे.

मेघना--- हो काकू, तुम्ही जा, मी थोड्यावेळ थांबते.

आदित्य--- congratulations मेघना, फक्त पेढ्यांवर कटवणार आहात की पार्टी पण देणार.

मेघना--- सर आधी तुम्ही बरे व्हा मग पार्टी देते.

आदित्य--- चला तुमच्या पार्टीसाठी मला लवकर बरे व्हावे लागेल.

मेघना--- सर खूप लागलंय का? अपघात कसा आणि केव्हा झाला?

आदित्य--- काल कंपनीतून घरी जात होतो, कुत्रा आडवा आला, कुत्र्याला वाचवायला गेलो आणि मीच पडलो, मुक्का मार लागला आहे आणि थोडंफार खरचटलं आहे पण अशक्तपणा आला असल्याने डॉक्टर घरी जाण्याची परवानगी देत नाही.

मेघना--- नशीब fracture झालं नाही.

आदित्य--- हो ना, नाहीतर खूप दिवस घरी राहावे लागले असते, मला माझ्या कामाशिवाय करमत नाही, अजून दोन दिवस आराम करतो आणि सोमवारपासून कंपनीत येईल.

मेघना--- सर बरे वाटत नसेल तर अजून थोड्या दिवस आराम करा.

आदित्य--- मला घरी जाम बोअर होतं. तुम्हाला माझ्या अपघाता बद्दल कोणी सांगितलं?

मेघना--- विशाल सरांनी सांगितलं.

आदित्य--- ओके, शिवानी तुमच्या सोबत नाही आली?

मेघना--- ती येणार होती पण अचानक तिच्या घरी पाहुणे आले.

आदित्य--- ओके, बर झालं तुम्ही मला भेटायला आलात, मला खुप बोअर होत होतं, आई तर मला फोनला हात पण लावू देत नाही आणि शिवाय पहिला फोन फुटलाय, आत नवीन फोन मध्ये काहीच डेटा नाहीये.

आदित्यच्या व मेघनाच्या गप्पा मस्त रंगल्या होत्या, तेवढ्यात आदित्यची आई परत रुम मध्ये येते.

आदित्यची आई--- मेघना आदित्यला थोडं समजून सांग, आराम करायला नाहीच म्हणतोय, अजिबात स्वतःची काळजी घेत नाही, मी किती दिवस याची काळजी घेणार, त्याला म्हटलं की तुझी काळजी घ्यायला तुझं हक्काच माणूस घेऊन ये ते पण नाही.

आदित्य--- आई सगळ्या गोष्टींना पर्याय लग्न हेच आहे का? 

मेघना--- काकू बरोबर बोलत आहेत सर, लग्न करा म्हणजे काकूंच्या डोक्यावरचा भार हलका होईल.

आदित्य--- तुम्ही पण आईच्याच बाजूने बोला.

मेघना--- चला काकू मी निघते, आई घरी वाट पाहत असेल.

आदित्यची आई--- हो चालेल, तुला भेटून छान वाटलं. आदित्य मेघनाला कधीतरी घरी घेऊन ये.

मेघना--- मलाही तुम्हाला भेटून छान वाटलं, मी तुमच्या घरी नक्की येईल, सर काळजी घ्या तब्येतीची, मी निघते.

मेघना आदित्यचा व त्याच्या आईचा निरोप घेऊन हॉस्पिटलबाहेर पडते.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all