चहा आणि बरंच काही भाग ३९

Story of love and friendship

आपण मागील भागात बघितलं, शिवानीने अचानक US मधून येऊन घरच्यांना आणि मेघनाला सरप्राईज दिले तसेच तिने मेघनाला सांगितले की आदित्यचा पुन्हा विचार कर.

आता बघूया पुढे काय घडते...

मेघना भेटून गेल्यापासून शिवानीच्या मनात सारखा मेघनाचाच विचार येत होता, मेघनाचा उदास चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जाता जात नव्हता. मेघनासाठी काहीतरी करायला हवे हा विचार तिच्या डोक्यात सारखा येत होता, मेघनाच्या काळजीने शिवानीला झोपही नीट लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी शिवानीच्या डोक्यात काहीतरी कल्पना आली, त्यावर बराच विचार करून तिने ती कल्पना अमलात आणण्याची ठरवली. सकाळी पटपट आवरून आईला सांगून घराबाहेर पडली. शिवानी थेट मेघनाच्या घरी गेली. दरवाजा मेघनाच्या आईने उघडला.

मेघनाची आई--- अरे शिवानी, बाळा ये ना. मेघना तर यावेळी कंपनीत गेलेली आहे. 

शिवानी--- काकू मी तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही का?

मेघनाची आई--- अग येऊ शकते ना. मेघनाने तु दिलेल्या सरप्राईज बद्दल सांगितले.US काय म्हणतंय? सगळं ठीक चालू आहे ना?

तेवढ्यात मेघनाचे बाबा तिथे येतात.

मेघनाचे बाबा--- कशी आहेस शिवानी? आमचे जावई बापू काय म्हणतात?

शिवानी--- काका मी मजेत, जावई बापू पण मजेत आहेत, तुम्ही कसे आहात?

मेघनाचे बाबा--- मी पण मस्त आहे. मेघना घरी नसताना तु घरी कशी काय आलीस?

शिवानी--- काका मला तुमच्याशी व काकूंशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. मेघना घरी असली असती तर तिने मला बोलूच दिले नसते.

मेघनाचे बाबा--- आमच्याशी तुला काय बोलायचे आहे?

शिवानी--- काका एक वर्ष झालय, मेघनाच्या लग्नाची काही हालचाल चालू आहे की नाही? काका मला मेघनाचा उदास चेहरा बघवला गेला नाही म्हणून खूप हिम्मत करून तुमच्याशी बोलायला मी आले आहे.

मेघनाचे बाबा--- शिवानी आम्ही तिचे आई वडील आहोत, आम्हाला तिच्या लग्नाची काळजी आहे, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अस कोणाच्याही गळ्यात तिला कसं बांधून द्यायचे. मेघनाचे लग्न होत नाही म्हणून ती उदास आहे हे तुला कोणी सांगितले?

मेघनाची आई--- शिवानी तु ह्या विषयावर ह्यांच्याशी बोललेलं मेघनाला आवडणार नाही.

शिवानी--- काकू मला चांगलंच माहीत आहे की मी ह्या विषयावर काकांशी बोललेलं मेघनाला आवडणार नाही. काका मेघना माझी लहानपणीची मैत्रीण आहे. आम्ही एकमेकींना काही नाही सांगितलं तरी आमच्या चेहऱ्यावरुन आमच्या मनात काय चालू आहे हे कळतं. मेघनाला तुम्ही कोणाच्याही गळ्यात बांधून द्या अस म्हणतच नाहीये. आदित्य सरांचं स्थळ काय वाईट होते? मेघनासाठी एकदम साजेसे स्थळ आहे. मुलगा चांगला आहे, त्याचे शिक्षण, नोकरी सर्व उत्तम आहे.

मेघनाचे बाबा--- शिवानी तुला मेघनाची काळजी वाटते हे मी समजू शकतो. आदित्य मुलगा जरी चांगला असेल पण मला त्या घरात माझी मुलगी द्यायची नाही.

शिवानी--- काका तुम्हाला माझा राग येईल पण जरा स्पष्टच बोलते, तुम्ही तुमचा अहंकार जपण्याच्या नादात मेघनाचा आनंद हिरावून घेत आहात. स्वतःचा अहंकार बाजूला ठेऊन तिच्या सुखाचा विचार कराल तर बरे होईल.

मेघनाचे बाबा--- म्हणजे मला कळलं नाही.

शिवानी--- काका तुमच्यात आणि आदित्य सरांच्या बाबांमध्ये जे काही भूतकाळात घडून गेले त्यात आदित्य सर व मेघनाचा काय दोष? काका आदित्य सर व मेघना एकमेकांवर खूप प्रेम करायचे. मेघनाला आदित्य सरांशीच लग्न करायचे होते पण फक्त तुम्हाला त्रास होऊ नये, वाईट वाटू नये म्हणून मेघनाने आदित्य सरांशी लग्न करणे नाकारले. काका मनोज दादा डायरेक्ट लग्न करून तुमच्यासमोर आला, तुम्ही त्याचे काय करून घेतले? त्याने तुमच्या मनाचा थोडाही विचार केला नाही.मेघनाने मात्र तुमचा विचार करून आदित्य सरांना आयुष्यातून काढून टाकले. काका मेघना जरी बोलत नसली तरी एक विचार करून बघा मागच्या वर्षी मेघनाच्या चेहऱ्यावर असलेली स्माईल आणि आता असलेली स्माईल यात किती फरक आहे. ती सांगत नसली तरी ती खूप जास्त दुःखी आहे.

मेघनाचे बाबा--- काय? मेघनाचे आदित्यवर प्रेम होते?

मेघनाची आई--- हो शिवानी बोलते ते खरे आहे. मला हे माहीत होते पण तुम्हाला लव्ह मॅरेज केलेले आवडत नाही म्हणून मेघनाने ही गोष्ट तुमच्यापासून स्वतः लपवली आणि मलाही लपवायला सांगितली.

शिवानी--- काका सर्वच प्रेम करणारे वाईट नसतात. प्रेम करणे सोपे असते पण ते निभावणे वाईट असते. मेघना नाही म्हणाल्यावर आदित्य सरांनी तिचा निर्णय खुशी खुशी स्विकारला,कारण त्यांचे तिच्यावर मनापासून प्रेम होते, त्यांनी तिच्या निर्णयाचा आदर केला. आदित्य सरांच्या बाबांनी तुमच्या बहिणीसोबत लग्न केले असते तर त्यांनी तीन लोकांचे आयुष्य उध्वस्त केले असते. मनोज दादाने जुलिया सोबत लग्न नसते केले तर ती जुलियाची फसवणूक झाली असती. काका लव्ह मॅरेज करणारे लोक वाईट नसतात. तुम्ही तुमच्या मनातला हा गैरसमज काढून टाका.

मेघनाचे बाबा--- शिवानी बेटा मी तुझा खूप आभारी आहे. तु माझे डोळे उघडलेस. मला माझी चुक सुधारायला हवी.तु मेघनाला काहीच सांगू नकोस. आपण मेघनाला अनपेक्षित सरप्राईज देऊया. मी अविनाशला फोन करून त्याची माफी मागतो आणि आदित्य सोबत मेघनाच्या लग्नाची बोलणी करून घेतो.

मेघनाची आई--- अहो ही बोलणी फोनवर नको करायला, आपण प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन बोलूयात.

मेघनाचे बाबा--- हो तु म्हणते ते खरे आहे, आपण आजच त्यांच्या घरी जाऊ.

शिवानी--- थँक्स काका. तुमचे सरप्राईज बघून मेघना खूपच खुश होईल. तिला हवा असलेला, मनासारखा जोडीदार भेटेल. मी निघते. माझी काही मदत लागली तर सांगा.

शिवानी निघून गेल्यावर मेघनाचे आई बाबा तयारी करून आदित्यच्या घरी जातात. आदित्यची आई दरवाजा उघडते. समोर मेघनाच्या आई बाबांना बघून आश्चर्यचकीत होते.

आदित्यची आई--- शालिनी ताई तुम्ही दोघे आणि इथे!

मेघनाची आई--- सुलभा ताई आम्हाला घरात घेणार की दारातूनच काढून देणार?

आदित्यची आई--- या ना आत या.

मेघनाचे बाबा--- अविनाश आहे का?

आदित्यची आई--- हो आहे ना, मी त्यांना बोलावते, तुम्ही बसा.

आदित्यची आई त्याच्या बाबांना बोलावते.

आदित्यचे बाबा--- आमचा काही अपमान करायचा बाकी राहिला आहे का? म्हणून आमच्या घरी आला आहात का?

मेघनाचे बाबा--- अविनाश अस नको बोलूस, मी आजवर तुझ्याशी खूप वाईट वागत आलो, माफी मागायला खूप उशीर झाला आहे पण मला माफ कर. मला माझी चुक उमगली आहे. मी सर्व एवढे खेचायला नको होते.

आदित्यचे बाबा--- दीपक मी तुला माफ करेल पण माझी एक अट आहे, ती मान्य केली तरच मी तुला माफ करेल.

मेघनाचे बाबा--- कुठली अट? तुझ्या सर्व अटी मला मान्य आहेत.

आदित्यचे बाबा--- अरे पहिले अट तर ऐकून घे. माझी अशी अट आहे की मला तुझी मुलगी सून म्हणून हवी आहे. बोल मान्य आहे का?

मेघनाच्या बाबांच्या डोळ्यात पाणी आले.

मेघनाचे बाबा--- अरे बाबा त्यासाठी तर तुझ्या घरी आलो आहे.

आदित्यचे बाबा--- मेघना आयुष्यातून गेल्यापासून माझ्या आदित्यच्या चेहऱ्यावरचे हसूच निघून गेले आहे. मला माहित होतं की तु ह्याच साठी माझ्या घरी आला असशील. तु जरी मला मित्र मानत नसशील तरी मी मात्र तुला माझा अजूनही मित्र मानतो. मित्राच्या मनातील गोष्टी ओळखायला आपल्याला वेळ नाही लागत.

आदित्यची आई--- मी काहीतरी गोड खायला करते.

आदित्यचे बाबा--- ते तु करशीलच पण ही आनंदाची बातमी आपल्या मुलांना कशी सांगायची? त्यांना छान सरप्राईज मिळेल असे काहीतरी करायला हवे.

आदित्यचे आई बाबा आणि मेघनाचे आई बाबा मिळून मेघना व आदित्यला कसे सरप्राईज देता येईल ते ठरवतात. ते बघूया पुढील भागात.....

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all