चहा आणि बरंच काही भाग ३७

Story of love and friendship

आपण मागील भागात बघितलं, मेघनाच्या वडिलांनी लग्नाला नकार दिल्यावर पुढे काय करायचे हे ठरवण्यासाठी मेघना व आदित्य भेटले होते, त्यांच्या चर्चेतून शेवटी मेघनाने निर्णय दिला की मला एवढ्यात आपल्या लग्नाचा विषय बाबांकडे काढता येणार नाही आणि आदित्य अजून थांबण्यास तयार नसल्याने मेघनाने त्याला सांगितले, तु हव्या त्या मुलीशी लग्न करू शकतोस, मी तुला ह्या क्षणापासून माझ्या प्रेमातून मुक्त करते.

आता बघूया पुढे काय घडते...

मेघना घरी गेल्यावर तिच्या रुममध्ये जाऊन खूप रडते व ती शिवानीला फोन करून बाहेर भेटायला बोलावते. मेघना फ्रेश होते आणि आईला सांगून शिवानीला भेटायला जाणार असल्याचे सांगते.

आई--- मेघना तु आदित्यशी भेटली ना, तुमच्यात काय बोलणे झाले?

मेघना--- आई मी बाहेरून आल्यावर तुला सर्व काही सांगते.

मेघना तिच्या घराजवळच्या गार्डनमध्ये शिवानीला बोलावून घेते. शिवानी आल्यावर मेघना तिच्या गळ्यात पडून खूप रडते. शिवानीला कळतच नाही की मेघना एवढी का रडत आहे?

शिवानी--- मेघना तु रडतच राहणार आहेस की काय झालं ते सांगणार आहेस?

मेघना शांत होण्याचा प्रयत्न करत होती पण तिला खूप भरून आले होते.

मेघना--- शिवानी सगळं संपलय ग, सर्व स्वप्ने धुळीत मिळाली. मी माझ्या हातानेच माझ्या स्वप्नांची चिता पेटवली आहे.

शिवानी--- मेघना तु कोड्यात का बोलत आहेस? माझ्या पोटात भीतीने गोळा उठला आहे, प्लिज सांग काय झाले आहे?

मेघनाने घडलेली सर्व हकीकत शिवानीला सांगितली.

शिवानी--- मेघना तु आदित्यला नकार का दिलास? तु त्याच्या शिवाय जगू शकणार आहेस का? तु आदित्य शिवाय दुसऱ्या कोणाशी लग्न करुन सुखी राहू शकतेस का?तु का केलंस अस?

मेघना--- शिवानी मी आदित्य शिवाय राहू शकणार नाही हे खरे आहे, पण मनोज दादाच्या प्रकरणानंतर बाबा ज्या त्रासातून गेले आहे ते मी स्वतः पाहिले आहे आणि माझी इच्छा नाहीये की बाबांनी परत त्याच त्रासातून माझ्यामुळे जावे.बाबांना जर खरं काय कळले असते तर ते आतून पूर्ण तुटून गेले असते आणि मला ते नको आहे.

शिवानी--- मेघना तुझ्या त्रासाचं काय? आदित्यच्या त्रासाचं काय? मेघना तु खुप चुकीचा निर्णय घेतला आहेस.

मेघना--- माझा निर्णय तुला काय किंवा कुणालाही पटला नसेल पण हा निर्णय मी माझ्या बाबांसाठी घेतला आहे.

शिवानी--- मेघना तुला पुढे जाऊन तुझ्या या निर्णयाचा खूप त्रास होईल. 

मेघना--- शिवानी माझ्यासाठी मला आदित्यला अडकवून ठेवायचे नव्हते म्हणून मी त्याला माझा निर्णय सांगून टाकला. माझ्या निर्णयाने मला किती त्रास होईल याची मला कल्पना आहे पण माझ्या हातात काहीच उरलं नाही. मी माझ्या बाबांना दुखवू शकत नाही.

शिवानी--- ठीक आहे जशी तुझी इच्छा. आजपर्यंत तुझ्या प्रत्येक निर्णयाला मी सपोर्ट केला आहे, तुला समजून घेतले आहे. यापुढे मी जरी तुझ्या सोबत नसेल तरी तु मला केव्हाही फोन करू शकतेस.

मेघना--- थँक्स शिवानी.मला माहित होतं की मला कोणी नाही समजून घेतले तरी तु नक्कीच समजून घेशील. तुझ्यासोबत बोलल्याने जरा मन हलके झाले आहे.चल मी निघते, आई वाट बघत असेल.

मेघना शिवानीसोबत बोलणे झाल्यावर घरी जाते. आई बाबा हॉल मध्ये बसलेले असतात.

बाबा--- मेघना शिवानीला इतक्या लवकर भेटून आलीस पण, तुझ्या डोळ्यात पाणी का?ये बस इथे तुझ्याशी काही बोलायचे आहे.

मेघना--- शिवानीचे लग्न पुढच्या महिन्यात US ला होणार आहे ना, जुन्या आठवणी आठवता आठवता डोळ्यात पाणी आले बाकी काही नाही. तुम्हाला माझ्याशी काय बोलायचे आहे?

बाबा--- वधुवर सूचक केंद्रात तुझे नाव नोंदवावे अस म्हणतोय. तुझी काय इच्छा काय आहे?

मेघना--- बाबा तुम्हाला जे योग्य वाटत आहे ते करा, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही.

मेघना अस बोलल्यावर आई मेघनाकडे बघत होती पण त्यावेळी मेघनाने आईकडे बघणे टाळले.

बाबा--- मला तुझे साडीमधील फोटो पाठव, मी उद्याच नाव नोंदणी करतो.

बोलताना बाबांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता तर आईच्या चेहऱ्यावर मात्र आनंद दिसत नव्हता. आईला मेघनाच्या अश्या वागण्याचा अर्थच उमगत नव्हता.मेघना तिच्या रुममध्ये गेल्यावर आई तिच्या पाठोपाठ रूममध्ये गेली.

आई--- मेघना काय झालंय? तु बाबांना वधू वर सूचक केंद्रात नाव नोंदणी करायला होकार का दिलास? आदित्यसोबत तुझे काय बोलणे झाले?

मेघना--- आई आदित्य सोबत लग्न होणे हे माझ्या नशीबातच नाहीये. आज मी आदित्यला माझ्या प्रेमातून मुक्त केले आहे. बाबा म्हणतील त्या मुलाशी लग्न करायला मी तयार आहे. आई मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे.

आई--- बाळा मला हे ऐकताना एवढा त्रास होतो आहे तर तुला निर्णय घेताना किती त्रास झाला असेल. तु माझी मुलगी असल्याचा मला अभिमान वाटत आहे.

मेघना--- आई आजपासून आदित्यचा विषय आपल्या घरात घ्यायचा नाही.

आईने मेघनाच्या डोक्यावरून कौतुकाने हात फिरवला व ती आपल्या कामाला निघून गेली.

मेघनाने तिचा निर्णय ऐकवल्यावर काय झाले हे आपण बघितले. आता आदित्यकडे काय घडले हे आपण बघूयात....

आदित्य मेघनाला सोडून आपल्या घराच्या दिशेने निघाला, वाटेत एका ठिकाणी साईडला गाडी थांबवून तो खूप रडायला लागला, त्याला मेघना सोबत घालवलेले सर्व क्षण आठवत होते. आता मेघना आपली कधीच होऊ शकत नाही हे त्याच्या मनाला पटत नव्हते. आईचा फोन आल्यावर आदित्य भूतकाळातून वर्तमानकाळात परत आला, आदित्यने डोळे पुसले आणि तो घराच्या दिशेने निघाला. घरी आई बाबा त्याची वाटच पाहत होते.

आई--- आदित्य बाळा किती उशीर? आम्ही किती वेळेपासून तुझी वाट बघत आहोत. मेघना काय म्हणाली?

आदित्य--- आई मेघनाने लग्न करायला नकार दिला आहे, ती तिच्या बाबांना दुखावू शकत नाही. 

आई--- मी मेघना सोबत किंवा तिच्या आईशी बोलून बघू का?

आदित्य--- नाही आई तु अस काही करणार नाहीयेस. मला माहित आहे की मेघनाला हा निर्णय घेताना खूप त्रास झाला असेल आणि आपण तिच्या या निर्णयाचा आदर करायला हवा. आई माझ्यासाठी मुली बघायला सुरुवात कर. तुला जी मुलगी योग्य वाटेल तिच्याशी मी लग्न करायला तयार आहे.

आदित्यच्या मनाला मान्य नसेल तरी त्याने मेघनाचा निर्णय स्विकारला.

मेघना व आदित्यच्या आयुष्यात पुढे काय घडेल बघूया पुढील भागात...

©®Dr Supriya Dighe