Login

चहा आणि बरंच काही भाग ३६

Story of love and friendship

आपण मागील भागात बघितलं, मेघनाचे बाबा व आदित्यचे बाबा एकमेकांना कसे ओळखतात हे समजले तसेच आदित्यच्या बाबांबद्दल मेघनाच्या बाबांच्या डोक्यात एवढा राग का? हेही आपल्याला समजले.

आता बघूया पुढे...

दुसऱ्या दिवशी सकाळी रोजच्या सवयीप्रमाणे मेघना उठली आणि कंपनीत जाण्यासाठी तयारी करू लागली. मेघनाची आई तिच्या रुममध्ये आली.

मेघनाची आई--- मेघना बाळा तयारी झाली का?

मेघना--- हो आई, होतच आहे.आई बाबा बरे आहेत ना.

आई--- हो बाबा बरे आहेत. मेघना आपल्यापुढे हे काय वाढून ठेवले आहे, आता यातून मार्ग कसा आणि काय काढायचा?

मेघना--- आई जी परिस्थिती आली आहे तिला धीराने सामोरे जायचे, बाकी आपल्या हातात काही नाही. आदित्यचा काल मॅसेज आला होता की उद्या संध्याकाळी कंपनी सुटल्यावर थांब, थोडे बोलायचे आहे. सो आज त्याच्याशी बोलून काही मार्ग निघतो का ते बघूया.

आई--- मेघना आदित्यसोबत बोलताना डोकं शांत ठेऊन बोल कारण त्याला तुझ्या बाबांच्या वागण्याचा राग आलेला असू शकतो.

मेघना--- हो आई आदित्यला राग आलाच असेल आणि त्याला राग येणे स्वाभाविकच आहे. संध्याकाळी भेटल्यावर आदित्यशी बोलते मग बघू पुढे काय करायचं.

मेघना तयारी करून बसची वाट बघत बस स्टॉप वर उभी असते, थोड्याच वेळात शिवानी तिथे येते. शिवानी मेघनाच्या पाठीवर जोरात थाप मारते.

शिवानी--- ओ मॅडम काल किती फोन केलेत? एकही उचलला नाहीस. लग्नाची तारीख काढण्यात एवढी व्यस्त झालीस की मैत्रिणीलाही विसरलीस.

मेघनाने शिवानीकडे एक कटाक्ष टाकला

मेघना--- शिवानी मी आत्ता तुझ्याशी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. आज रात्री मी तुझ्याशी सविस्तर बोलेल तोपर्यंत प्लिज मला काय झाले किंवा आदित्यचा विषय घेऊ नकोस. एकतर आधीच माझं डोकं सुन्न पडले आहे.

तेवढ्यात बस आली, दोघी बसमध्ये बसल्या. शिवानी मेघनाशी काहीच बोलली नाही. कंपनीत गेल्यावर आदित्य आधीच आलेला होता पण नाही त्याच्या चेहऱ्यावर स्माईल होती नाही मेघनाच्या, दोघांनी एकमेकांकडे पाहिलेही नाही.

संध्याकाळी ठरल्याप्रमाणे आदित्य मेघनाची वाट बघत गाडीजवळ उभा होता, मेघना येते व त्याच्याशी काही न बोलता गाडीत बसते. मेघना गाडीत बसल्यावर आदित्य गाडी स्टार्ट करतो व नेहमीच्या ठिकाणी गाडी घेऊन जातो, वाटेत दोघेही एकमेकांशी काहीच बोलत नाही. 

आदित्य--- मेघना तुला तुझ्या बाबांकडून सर्व कळलंच असेल. आता पुढे काय करायचे ठरवले आहे?

मेघना--- आदित्य माझं डोकच बंद पडल आहे, मला तरी वाटतंय की बाबांना थोडा वेळ द्यायला हवा.

आदित्य--- किती? आणि कशासाठी? वेळ देण्याची काय गरज आहे? तुझ्या आत्याने आत्महत्त्या केली यात माझ्या बाबांचा काय दोष होता? ठीक आहे तुझ्या बाबांना वाटत असेल की माझ्या बाबांची चुक होती तर होती. पण या सगळ्यात आपला काय दोष? या सगळ्याची आपण शिक्षा का भोगायची? मेघना एवढी वर्षे उलटून गेलीत तरीही तुझे बाबा तेच लावून धरत आहेत. माझ्या बाबांना दोषी धरून त्यांना त्यांची बहीण परत भेटणार आहे का किंवा तिचा गेलेला जीव परत येणार आहे का? मला तुझ्या बाबांचे कालच वागणं पटलेले नाही.

मेघना--- आदित्य बाबांचा तुला राग येणे स्वाभाविकच आहे, अरे माझ्या बाबांनी तुझ्या बाबांना बघितल्यावर त्यांच्या मनावरच्या सर्व जखमा ताज्या झाल्यात म्हणून त्यांची प्रतिक्रिया अशी होती.

आदित्य--- मेघना तुला शेवटच विचारतो, तुला माझ्याशी लग्न करायचे आहे का?

मेघना--- आदित्य मी तुला सोडून दुसऱ्या कोणाशी लग्न करायचा विचारही करू शकत नाही. पण तु असं का विचारत आहेस?

आदित्य--- मग एक काम कर, घरी जा, तुझ्या बाबांना सांग की आपले एकमेकांवर प्रेम आहे आणि आपल्याला लग्न करायचे आहे, तुम्ही तुमचे हेवेदावे सोडून द्या आणि आमच्या लग्नाला परवानगी द्या.

मेघना--- आदित्य मी बाबांसोबत हे कसं बोलू शकेल? बाबांना खूप मोठा धक्का बसेल.

आदित्य--- मेघना तु बोलू शकली नाही तर आपलं लग्न होणे अशक्य आहे.

मेघना--- आदित्य अस नाहीये, तु असा निगेटिव्ह विचार का करत आहेस? आदित्य आपण एवढ्या दिवस थांबलोत अजून थोडे दिवस थांबूयात ना. मनोज दादाने दिलेल्या धक्क्यातून बाबा आता कुठे सावरले आहेत आणि लगेच मी जर अस काही सांगितले तर बाबांना खूप त्रास होईल.

आदित्य--- मेघना प्रॉब्लेम काय आहे ना, मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो आणि मी तुझ्याशिवाय राहू शकत नाहीये, आधीच खूप वाट बघितली आहे, आता मला काही क्षण पण वाट बघायची नाही. एकतर तु तुझ्या बाबांशी बोल नाहीतर मी बोलतो.

मेघना--- नाही आदित्य तु बाबांशी काहीच बोलणार नाहीयेस.

आदित्य--- ठीक आहे मेघना, तुला बाबांशी बोलायचे नाही, मीही बोलायचे नाही मग काय करायचे हे तुच सांग.

मेघना--- आदित्य थोडे दिवस थांबूयात.

आदित्य--- मग त्याने काय होईल?

मेघना--- बाबांचा राग निवळेल.

आदित्य--- जे इतक्या वर्षात झालं नाही ते आता होईल?

मेघना--- आदित्य मला विचार करायला वेळ हवा आहे.

आदित्य--- मेघना माझा संयमाचा बांध फुटला आहे. तुझा जो काही निर्णय आहे तो मला आत्ताच हवा आहे.

मेघना--- आदित्य मला आता सध्या बाबांना काहीच सांगता येणार नाही, तुला माझ्याशी लग्न करायचे असेल तर थोडं थांब नाहीतर तु दुसरी मुलगी बघून लग्न करू शकतो. आजपासून मी तुला माझ्या प्रेमाच्या बंधनातून मुक्त करत आहे.( हे बोलताना मेघनाला अश्रू अनावर झाले होते)

आदित्यने मेघनाकडे बघितले पण यावेळी मेघनाच्या डोळ्यातील पाण्याचा त्याच्या रागावर काहीच परिणाम झाला नाही.

आदित्य--- जशी तुझी इच्छा. गाडीत बस मी तुला घरी सोडतो.

मेघना--- आदित्य घरी जाण्याआधी शेवटचा एक चहा सोबत घेऊया?

आदित्य--- हम्मम

आदित्यने गाडी चहाच्या टपरीकडे वळवली, दोघांनी एकमेकांशी काही न बोलता एक एक कप चहा पिला. चहा पिल्यावर गाडी मेघनाच्या घराच्या दिशेने निघाली होती. आदित्यने गाणे चालू केले, ते असे

"जब रूलाना ही था तुझे

तो फिर हसायां क्यों

साथ रहकर भी है जुदा

तो पास आया क्यों"

आदित्यने मेघनाच्या घराजवळ गाडी उभी केली. मेघना आदित्यला बाय न म्हणताच निघून गेली. आदित्य तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कितीतरी वेळ बघत राहिला व तेथून निघून गेला.

©®Dr Supriya Dighe