चहा आणि बरंच काही भाग ३५

Story of love and friendship

आपण मागील भागात बघितलं, मेघनाच्या घरी कांदेपोहे कार्यक्रम ठरलेला असतो. आदित्यच्या बाबांना मेघनाच्या बाबांनी बघितल्यावर त्यांनी सांगितले की मेघनाचे आदित्य सोबत लग्न होऊ शकणार नाही.

आता बघूया पुढे काय होते....

मेघनाचे बाबा हॉलमधून निघून गेल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर असे भाव होते की यांना अचानक काय झाले? हे असे बोलून का निघून गेले?

आदित्य--- बाबा तुम्ही मेघनाच्या बाबांना ओळखतात का? ते तुम्हाला बघून असे का रिऍक्ट झाले?

आदित्यचे बाबा--- हो आम्ही एकमेकांना आधीपासूनच ओळखत आहोत, बराच काळ लोटून गेला, मी सर्व काही विसरलो आहे पण दीपक मात्र काहीच विसरला नाही असंच दिसत आहे. आदित्य चल आपण निघूया, आपण इथे कितीही वेळ थांबलो तरी काही बदलेल असे मला वाटत नाही.समोरच्याचे काही ऐकूनच घ्यायचे नाही असं दिपकने ठरवलेले आहे.

एवढे बोलून आदित्यचे बाबा घराबाहेर निघून गेले त्यांच्या पाठोपाठ आदित्य व त्याची आईही घराबाहेर पडले. आता हॉल मध्ये मेघना, तिची आई, विद्या आणि वैभव होते.

विद्या--- मावशी काकांना अचानक काय झाले? त्यांनी आदित्यच्या बाबांसोबत अस बोलायला नको होते. काकांचं बोलणं खूप जास्त रूढ वाटलं.

मेघनाची आई--- मलाही काहीच कळत नाहीये, हे अस का बोलले असतील. त्यांना आदित्य मनापासून आवडला होता.

वैभव--- मावशी आपण तर्क वितर्क काढण्यापेक्षा तुम्ही थोड्या वेळाने काकांसोबत बोलून घ्या म्हणजे सर्वांच्याच मनातील सर्व शंका मिटतील. आम्ही आता निघतो, काका काय म्हणतात ते आम्हाला कळवा.

वैभव आणि विद्याही त्यांच्या घरी निघून जातात. मेघना तिच्या रुम मध्ये जाऊन खूप रडत बसते.बराच वेळ रडून झाल्यावर मेघना मनाशी काहीतरी ठरवून बाबांच्या रुममध्ये जाते. आई तिला बाबांकडे जाताना बघून तीही तिच्या पाठोपाठ रुम मध्ये जाते.बाबा बेडवर विचार करत शांत बसलेले असतात.

मेघना--- ( रागात) बाबा तुम्ही जे थोड्या वेळापूर्वी आदित्यच्या बाबांसोबत वागलात ते काय होते म्हणजे त्याचा आम्ही काय अर्थ घ्यायचा?

मेघनाचे बाबा--- बाळा तुला सत्य परिस्थिती माहीत नसल्याने तुला माझा राग येणे स्वाभाविकच आहे. मेघना आपण तुझ्यासाठी आदित्य पेक्षा चांगला मुलगा शोधुयात.

मेघना--- बाबा आदित्य पेक्षा चांगला मुलगा तुम्ही शोधालंच, पण कुठली सत्य परिस्थिती मला माहित नाही. जरा सविस्तरपणे सगळं सांगाल का?

मेघनाचे बाबा जरा विचारात पडले हे बघून मेघनाची आई पुढे बोलू लागली.

मेघनाची आई--- अहो मेघना काय बोलत आहे, कोणती सत्य परिस्थिती आम्हाला माहीत नाही.

मेघनाचे बाबा--- तुम्हाला माहीतच आहे की मला लव्ह मॅरेज करणाऱ्या लोकांची चीड येते किंवा मला लव्ह मॅरेज केलेले आवडत नाही यामागे ठोस काही तरी कारण असू शकते याचा कदाचित तुम्ही विचारही केलेला नसेल. मी पहिले असा नव्हतो मला लव्ह मॅरेज केलेल्या लोकांचा राग यायचा नाही. माझ्या आयुष्यात घडून गेलेल्या काही घटना मला तुम्हाला सांगाव्याश्या नाही वाटल्या कारण मला त्या आठवणी नको होत्या, ते दिवस मला आठवायचेच नव्हते. पण आता तुम्हाला सगळं खरं कळायला हवे.

मी आणि अविनाश एकाच कॉलेजात होतो. अविनाशची व माझी ओळख कॉलेजच्या पहिल्या दिवशीच झाली. आमच्यात घट्ट मैत्री झाली होती. आम्ही एकाच एरियात रहायला होतो त्यामुळे एकमेकांच्या घरी नेहमी येणे जाणे होते. कधी अभ्यासाच्या निमित्ताने किंवा खेळायच्या निमित्ताने अविनाश आमच्या घरी यायचा. तुम्हाला माहीत नाहीये पण मला एक लहान बहीण होती सुधा. सुधा माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होती. अविनाशचे गणित चांगले असल्याने तो सुधाला गणितं सोडवायला मदत करायचा. सुधाला अविनाश आवडू लागला होता, ती हळूहळू त्याच्या प्रेमात पडली होती. मला ह्या सर्वाची कल्पना नव्हती. आमचे कॉलेज संपल्यावर अविनाशचे आमच्या घरी येणे जाणे कमी झाले होते. सुधा माझ्याकडे अविनाशची आस्थेने चौकशी करायची. एक दिवस बाबांनी सुधासाठी एक चांगल्या मुलाचे स्थळ आणले त्यावेळी सुधाने मला सांगितले की तिचे अविनाशवर प्रेम आहे आणि तिला त्याच्या सोबत लग्न करायचे आहे. अविनाश चांगला मुलगा असल्याने मलाही त्यात काही गैर वाटले नाही. मी स्वतः अविनाशकडे सुधाशी लग्न कर म्हणून सांगायला गेलो तर त्यावेळी त्याने सांगितले की त्याचे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे म्हणून तो सुधासोबत लग्न करू शकणार नाही. मी अविनाशला समजावले की सुधाचे त्याच्यावर खूप प्रेम आहे प्लिज तिला नाही म्हणू नको पण अविनाश त्याच्या निर्णयावर ठाम राहिला. हे सर्व सुधाला कळल्यावर ती खचली, तिला वाटले की ज्या मुलावर आपण प्रेम करतो तो मुलगा दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो हा धक्का सुधा पचवू शकली नाही आणि दोन दिवसांनी तिने आत्महत्या केली. अविनाश मुळे मला माझ्या एकुलत्या एक बहिणीला गमवावे लागले. माझ्या सुधात काय कमी होती? ती सुंदर होती, तिचा स्वभावही शांत होता. आयुष्यात एक गोष्ट तिने ह्या भावाकडे मागितली आणि ते सुद्धा मी तिला देऊ शकलो नाही ही खंत माझ्या मनाला कायमची लागून राहिली आहे. आज एवढ्या वर्षांनी त्याला बघितल्यावर माझ्या मनावरच्या सर्व जखमा पुन्हा ताज्या झाल्या.

मेघनाची आई--- मला तुमचे दुःख समजू शकते पण ह्या सर्वात आदित्यचा दोष काय? तो तर खूप चांगला मुलगा आहे.

मेघनाचे बाबा--- आदित्य हा एक चांगला मुलगा आहे यात काही वादच नाहीये पण आदित्य सोबत मेघनाचे लग्न झाल्यावर अविनाश माझ्या डोळ्यासमोर सतत येत राहील व मला सुधाची सारखी आठवण येत राहील आणि मला हे सर्व नको आहे. मला कोणीही समजावण्याचा प्रयत्न करू नका. मेघनाचे आदित्य सोबत लग्न होणार नाही म्हणजे नाही.

मेघना बाबांचा निर्णय ऐकून आपल्या रुममध्ये निघून जाते.

आदित्य त्याचे आई बाबा मेघनाच्या घरून निघाल्यावर थेट आपल्या घरी जातात. घरी गेल्यावर आदित्य त्याच्या बाबांना विचारतो की तुम्ही मेघनाच्या बाबांना कसे ओळखतात? आणि ते असे का बोलले? यावर आदित्यच्या बाबांनी त्याला सर्व घडलेली हकीकत सांगितली.

आदित्यचे बाबा--- आदित्य मी सुधाकडे नेहमी माझी लहान बहीण म्हणूनच बघत आलो होतो. माझे प्रेम सुलभावर होते आणि मला सुलभा सोबत लग्न करायचे होते. दिपकचे म्हणणे होते की सुधाचे माझ्यावर खूप प्रेम आहे, मी तिला खूप आवडतो म्हणून मी तिच्यासोबत लग्न करायला हवे. अरे पण माझे तिच्यावर कधीच प्रेम नव्हते मग मी तिच्याशी लग्न कसे करणार? मी तिच्यासोबत लग्नाला नकार दिला म्हणून सुधाने आत्महत्या केली आणि याचा अपराधी मी आहे असे दिपकला वाटते म्हणून त्याने माझ्याशी मैत्री तोडली. आणि आजही त्याच कारणामुळे तो असा वागला. मी झालेगेले सर्व विसरलो आहे पण दीपक काही विसरायला तयार नाही असंच दिसत आहे.

आदित्यची आई--- हे बघ आदित्य तुझे मेघनावर प्रेम आहे, तुला तिच्याशी लग्न करायचे आहे हे मला मान्य आहे. पण तिच्या बाबांनी तुझ्या बाबांचा दरवेळी अपमान केलेला मला चालणार नाही. तु सर्व काही मेघनाशी क्लीअर करून घे आणि मगच पुढील निर्णय घे.

आदित्य--- आई बाबांचा अपमान होणे हे मलाही मान्य नाहीये. मी उद्याच मेघनासोबत सविस्तर बोलून घेतो.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all