चहा आणि बरंच काही भाग ३४

Story of love and friendship

    आपण मागील भागात बघितलं, मेघना आणि आदित्यचा कांदेपोहे कार्यक्रम घरच्यांच्या संमतीने रविवारी मेघनाच्या घरी करण्याचे ठरते.

   शनिवारी सकाळपासून मेघनाची आई घर आवरण्याच्या तयारीला लागली होती. मेघनाचे बाबा ऑफिसला निघाले होते, त्यांना सामानाची एक मोठी लिस्ट मेघनाच्या आईने दिली होती. आईची चालू असलेली धावपळ बघून मेघनाला हसायला येत होते आणि आईचे कौतुकही वाटत होते. मेघना चहा पित पित आईचे निरीक्षण करत होती आणि ती मनातल्या मनात विचार करत होती की " हा कार्यक्रम कसा होईल ते माहीत नाही पण या निमित्ताने आई बाबांच्या चेहऱ्यावर स्माईल परत आली आहे, घरातील मरगळ दूर झाली आहे" मेघना तिच्या विचारात असताना आईने मेघनाला बडबड करायला सुरुवात केली.

मेघनाची आई--- मेघना अग किती वेळेपासून तु चहा घोटत बसली आहेस, तुला माझी धावपळ दिसत नाहीये का? माझी थोडी मदत कर बर.

मेघना--- आई एवढी पॅनिक का होत आहेस? एवढी तयारी करण्यासारखे काय आहे? एक छोटासा कांदेपोहे कार्यक्रम आहे. आदित्य आपल्या घरी या आधीही येऊन गेला आहे. तु जरा शांतता घेशील का?

मेघनाची आई--- मेघना माझ्या मुलीचा पहिला आणि शेवटचा कांदेपोहे कार्यक्रम होणार आहे. तुझ्या सासरची मंडळी तुला बघायला येणार आहे, आदित्य जरी आपल्या घरी आधी येऊन गेला असेल तरी त्याचे आई वडील आपल्याकडे पहिल्यांदा येणार आहे. सर्व कस व्यवस्थित व्हायला पाहिजे. ते जाऊदेत तुझी साडी ब्लाउज सगळं व्यवस्थित आहे ना, त्याला इस्त्री केलेली आहे ना.

मेघना--- आई तु हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून कितव्यांदा विचारत आहेस याची कल्पना तरी तुला आहे का?

मेघनाची आई--- बरं राहिलं, तु आई झाल्याशिवाय तुला या गोष्टी नाही समजणार. तु बस निवांत, मला काही तुझ्यासोबत बसता येणार नाही, भरपूर कामे पडली आहेत.

     मेघनाची आई दिवसभर घरातील कामे करण्यात व्यस्त होती. संध्याकाळी मेघनाचे बाबा ऑफिसमधून आल्यावर तेही मेघनाच्या आईला कामात मदत करत होते. उद्याचा कार्यक्रम कसा होईल? पाहुण्यांशी काय बोलायचे? किंवा काय बोलायचे नाही यावर चर्चा चालू होती. मेघनाला त्यांचा उत्साह बघून खूप भारी वाटत होते. रात्री झोपण्याच्या वेळेला मेघनाला अचानक अस्वस्थ वाटू लागले होते, उद्या काही वाईट तर घडणार नाही ना ह्या विचाराने तिला ग्रासले होते, तिला झोपही लवकर लागत नव्हती.

    रविवारचा दिवस उजाडला, मेघनाची आई सकाळी लवकरच उठली होती. रात्रभर नीट झोप न लागल्याने मेघनाचे डोळे जड पडले होते. इच्छा नसतानाही मेघनाला झोपेतून लवकर उठावे लागले होते. आईने दिलेल्या आदेशानुसार मेघना पटपट तिचे आटोपत होती. मावशीला काही मदत करता येईल या उद्देशाने विद्या वैभवला घेऊन जरा लवकरच मेघनाच्या घरी पोहोचली होती.

मेघनाचे बाबा--- अरे विद्या, वैभव राव तुम्ही खूपच लवकर आलात.

विद्या--- काका आम्ही घरचे लोकं, मग पाहुण्यांसारखे वेळेवर येऊन कसे चालेल? मावशीला व मेघनाला माझी तेवढीच मदत होईल म्हणून मी लवकर आले आहे.

मेघनाचे बाबा--- अग बाळा हे तुमचेच घर आहे, तुम्ही कधीही येऊ शकता.

तेवढ्यात मेघनाची आई तिथे येते.

मेघनाची आई--- विद्या बरं झालं तु लवकर आलीस, मेघनाला जरा आवरायला मदत कर, माझी सर्व कामे झाली आहेत. मी तुमच्या दोघांसाठी चहा टाकते तोपर्यंत तु मेघनाची भेट घेऊन ये.

वैभव व मेघनाचे बाबा हॉल मध्ये गप्पा मारत बसतात, विद्या मेघनाच्या रुममध्ये जाते. मेघना साडी नेसत असते.

विद्या--- मेघना आत येऊ का?

मेघना--- अग दीदी ये ना, बरं झाले आलीस, जरा या साडीच्या मिऱ्या घालायला मदत कर ना.

विद्या मेघनाची साडी नीट करता करता तिच्याशी बोलायला सुरुवात करते.

विद्या--- मेघना तु आजच्या कार्यक्रमाचे टेन्शन घेतले आहेस का?

मेघना--- नाही ग, पण तुला अस का वाटतं आहे?

विद्या--- तुझा चेहरा वेगळेच काही सांगत आहे.

मेघना--- अग दीदी रात्री नीट झोप न लागल्याने चेहरा असा दिसत असेल.

विद्या--- नीट झोप न लागायला काय झाले?

मेघना--- काल रात्रीपासून मला खूप अस्वस्थ वाटत आहे. आज सर्व व्यवस्थित पार पडेल ना याची काळजी वाटत आहे.

विद्या--- मेघना सर्व व्यवस्थित होईल, तु जास्त काळजी करू नकोस.

मेघना व विद्याचे बोलणे चालू असतानाच मेघनाची आई चहा झाला म्हणून विद्याला आवाज देते. 

सर्व तयारी झालेली असते, मेघनाही साडी घालून तयार झालेली असते. आता सर्वजण आदित्य व त्याच्या घरच्यांची वाट बघत असतात. काही वेळात आदित्यची गाडी मेघनाच्या घराबाहेर लागते. मेघना तिच्या रुममध्ये निघून जाते. वैभव आणि मेघनाचे बाबा घराबाहेर जाऊन उभे रहातात. गाडीतून आदित्य व त्याची आई दोघेच उतरतात. मेघनाचे बाबा त्यांचे हसतमुखाने स्वागत करतात. आदित्य, त्याची आई घरात येऊन हॉलमध्ये सोप्यावर बसतात. विद्या त्यांना पाणी देते. वैभव आदित्यच्या आईसोबत विद्या आणि मेघनाच्या आई बाबांची ओळख करून देतो.

वैभव--- आदित्य तुम्ही दोघेच आलात, बाबा नाही आलेत का?

आदित्य--- अरे बाबा आमच्यासोबत निघणार होते पण त्यांच्या एका मित्राचा फोन आला की त्यांना बाबांचे ब्लडग्रुप असणाऱ्या रक्ताची त्वरित गरज आहे म्हणून बाबा तिकडे गेले आहेत. काही वेळात बाबा इथे पोहोचतील.

मेघनाचे बाबा--- अरे वा, तुमचे बाबा खरंच खूप ग्रेट आहेत, आपल्या मुलाचा कार्यक्रम सोडून ते दुसऱ्या कोणाचा तरी जीव वाचावा म्हणून ते तिकडे गेले आहेत. अस निस्वार्थी वागणे सर्वांनाच जमते असे नाही.

आदित्य--- माझे बाबा दरवर्षी रक्तदान करत असतात.

सर्वांचा चहापाणी होतो. आदित्य व मेघनाच्या बाबांमध्ये बऱ्यापैकी गप्पा रंगतात.

आदित्यची आई--- मला वाटतंय की आदित्यच्या बाबांना यायला थोडा उशीरच होईल तोपर्यंत तुम्ही मेघनाला बोलावता का?

मेघनाचे बाबा--- हो चालेल का नाही, विद्या जरा मेघनाला घेऊन येते का?

विद्या मेघनाला तिच्या रुम मधून घेऊन येते, मेघना बरोबर आदित्यच्या समोर असलेल्या खुर्चीवर बसते. आता हॉलमध्ये आदित्य, त्याची आई, विद्या, वैभव, मेघना व तिचे आई बाबा एवढे बसलेले असतात. आदित्यची आई मेघनाला काही जुजबी प्रश्न विचारते. तेवढ्यात आदित्यच्या बाबांची एन्ट्री होते. नेमका त्याच वेळी मेघनाच्या बाबांना कोणाचा तरी फोन येतो म्हणून ते हॉल मधून उठून बाजूला जातात.

वैभव--- अरे काका या ना, आम्ही सगळे तुमचीच वाट पाहत होतो, विद्या काकांना जरा पाणी देते का?

विद्या आदित्यच्या बाबांना पाणी देते. वैभव आदित्यच्या बाबांची ओळख घरातल्या सर्वांशी करून देतो.

आदित्यचे बाबा--- मेघनाचे बाबा कुठे दिसत नाहीयेत?

वैभव--- काका फोनवर बोलत आहेत, येतीलच.

आदित्यच्या बाबांनी मेघनाला थोडे फार प्रश्न विचारले, त्यांचे बोलणे चालू असते तेवढयात मेघनाचे बाबा आपला फोन संपवून तिथे येतात.

वैभव--- काका मी तुमच्या दोघांची ओळख करून देतो.

वैभव असे बोलत असतानाच आदित्यचे बाबा आश्चर्याने आनंदीत होऊन ओरडतात.

आदित्यचे बाबा--- दीपक तु? म्हणजे मेघना तुझी मुलगी आहे.

मेघनाच्या बाबांच्या चेहऱ्यावर आठ्या उभ्या राहिलेल्या असतात, चेहरा रागाने लालबुंद झालेला असतो, ते रागातच बोलायला सुरुवात करतात.

मेघनाचे बाबा--- अविनाश मेघना माझीच मुलगी आहे. मला नव्हते माहीत की आदित्य तुझा मुलगा आहे, हे जर आधीच कळाले असते तर मी तुम्हाला माझ्या घरी बोलावलेच नसते. वैभव राव माफ करा पण मी माझ्या मुलीचे लग्न ह्या माणसाच्या मुलाशी लावून देऊ शकत नाही. शालिनी अविनाशला चहा नाश्ता दे, आपल्या दारात आलेल्या पाहुण्यांना आपण उपाशी जाऊ देत नाही ही आपली रीत आहे त्याप्रमाणे त्याचे आदरातिथ्य कर आणि त्यांना जायला सांग. आपण आपल्या मेघनासाठी दुसरा चांगल्या घरातला मुलगा शोधू.

एवढे बोलून मेघनाचे बाबा त्यांच्या रुममध्ये निघून जातात. मेघनाच्या बाबांच्या बोलण्याचा अर्थ कोणालाच समजला नाही. मेघनाच्या डोळ्यात चटकन पाणी आले, सगळं काही व्यवस्थित चालू असताना हे काय घडले? 

मेघनाच्या बाबांनी हा टोकाचा निर्णय का घेतला असेल? मेघनाच्या बाबांची व आदित्यच्या बाबांची ओळख केव्हा आणि कधी झाली असेल? हे बघूया पुढील भागात...

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all