चहा आणि बरंच काही भाग ३३

Story of love and friendship

आपण मागील भागात बघितलं, मेघनाचे बाबा मनोजला घराबाहेर निघून जायला सांगतात आणि त्याच्याशी सर्व संबंध तोडून टाकतात. 

आदित्यने मेघनाला व तिच्या आईला घरी सोडल्यावर मेघना व तिच्या आई मध्ये त्या विषयाला घेऊन थोडी फार चर्चा होते आणि मेघनाची आई मेघनाला सांगते की ती बाबांसोबत मेघना व आदित्यच्या लग्नाबद्दल बोलणार आहे. रात्री जेवण झाल्यानंतर मेघनाचे बाबा हॉलमध्ये टीव्ही बघत बसलेले असतात. मेघनाची आई किचनमधील कामे आटोपून त्यांच्या जवळ येऊन बसते.

मेघनाची आई--- अहो मला तुमच्याशी जरा महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे.

मेघनाचे बाबा--- बोल ना, काय बोलायचे आहे? ( मेघनाचे बाबा टिव्ही बंद करतात)

मेघनाची आई--- मनोज गेल्यापासून तुम्ही खूप शांत झाला आहात, पहिल्यासारखे बोलत नाहीत, मला तुमची खूप काळजी वाटत आहे.

मेघनाचे बाबा--- शालिनी हा माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा व अनपेक्षित धक्का होता. मनोजच्या बाबतीत कठोर निर्णय घेऊन मला काही आनंद झाला नाहीये पण तो जर डोळ्यासमोर राहिला असता तर मनस्ताप खूप जास्त झाला असता. तुम्ही बायका रडून मोकळ्या होतात, आम्हा पुरुषांना रडताही येत नाही. मनोजसाठी मी खूप स्वप्ने पाहिली होती त्याने सर्व स्वप्नांचा चक्काचुर केला आहे. मी नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत आहे.

मेघनाची आई--- मनोजने जे केले ते केले पण आपल्याला अजून एक मुलगी आहे तिच्या बाबतीत आपल्याला विचार करावा लागेल. विद्याच्या लग्नाच्या वेळेस तुम्ही आदित्यबद्दल बोलला होता त्याचा पुढे काही विचार करायचा की नाही?

मेघनाचे बाबा--- हो माझ्या डोक्यात आहे ते पण सध्या आपल्या घरात जे घडून गेले त्याने मन सुन्न होऊन गेले होते. मी वैभव रावांसोबत एकदा बोलून घेतो मग बघण्याचा कार्यक्रम करून घेऊ. मला तर आदित्य आपल्या मेघनासाठी परफेक्ट मुलगा वाटतो आहे, शिवाय ते एकाच कंपनीत आहेत, कामाचे क्षेत्रही एकच आहेत आणि मुलगा स्वभावाने मस्त वाटतो आहे. फक्त एकच अडचण आहे.

मेघनाची आई--- आता कसली अडचण?

मेघनाचे बाबा--- आदित्यच्या घरच्यांना मनोजबद्दल कळलं तर ते लग्नाला नकार तर देणार नाहीत ना?

मेघनाची आई--- हा विचार डोक्यातून काढून टाका. हल्ली या गोष्टींकडे सहसा कोणी लक्ष देत नाही.

मेघनाचे बाबा--- मी उद्या सकाळी वैभव रावांना फोन करतो मग बघू पुढे जे होईल ते होईल.

दुसऱ्या दिवशी मेघनाचे बाबा वैभवला फोन करून आदित्य व त्याच्या घरच्यांसोबत मेघनाबद्दल बोलून घ्यायला लावतात. वैभव आदित्यसोबत याबद्दल बोलून घेतो आणि सर्वानुमते रविवारी कांदेपोहे कार्यक्रम मेघनाच्या घरी ठरवतात. 

कांदेपोहे कार्यक्रम एकदाचा ठरला याचा मेघनाला आनंदच असतो पण बाबांना आपल्या व आदित्यच्या अफेअर बद्दल नको कळायला याचे टेन्शन अधिक असते. मेघना तोच विचार करत कंपनीत बसलेली असते. शिवानीच्या नजरेतून मेघनाचा चिंताग्रस्त चेहरा सुटला नाही. कंपनीत सर्वांसमोर काही बोलता येणार नाही म्हणून शिवानीने मेघनाला कंपनी सुटल्यावर कॉफी शॉप मध्ये जाऊया असे सांगितले.

ठरल्याप्रमाणे कंपनी सुटल्यावर मेघना व शिवानी कॉफी शॉपमध्ये जातात, शिवानी कॉफी ऑर्डर करते.

मेघना--- काय म्हणतेस शिवानी? आज तुझा कॉफी प्यायचा मूड कसा झाला?

शिवानी--- मला तुझा खूप राग आला आहे.

मेघना--- ( मेघना हसत हसत बोलते) म्हणजे राग आल्यावर कॉफी प्यायची असते का?

शिवानी--- मेघना मला सिरियसली तुझा खूप राग आला आहे.

मेघना--- आज माझ्या मैत्रिणीला माझा राग का आला असेल हे तर कळेल आणि तो राग जाण्यासाठी मी काय करू हे आपण सांगाल का?

शिवानी--- मेघना आदित्य तुझ्या आयुष्यात आल्यापासून तु खूप बदलली आहेस.मला विसरून गेली आहेस.

मेघना--- तुला कोण म्हणाले की मी तुला विसरली आहे?

शिवानी--- कोणी म्हणायला कशाला हवं? ते तुझ्या वागण्यातून दिसत तर आहे. आधी तु फक्त माझा वाढदिवसच विसरली होती आणि आता तर मलाच विसरली.

मेघना--- शिवानी खरंच अस काही नाहीये, नक्की तुला काय म्हणायचे आहे ते तर सांग.

शिवानी--- अग मैत्रिणीचा साखरपुडा झाला आहे, काही दिवसांत तिचे लग्न होणार आहे, तिला चिडवण्याचे काम कोणाचे असते? मला शॉपिंग करायची आहे, तुझ्या सोबत खूप बोलायच असतं, गप्पा मारायच्या असतात पण काही दिवसांपासून बघतेय तु आपल्या वेगळ्याच झोनमध्ये आहेस.

मेघना--- ( मेघना जोराने हसायला लागते) म्हणजे मी तुला संकेत जिजूंवरून चिडवले नाही याचा राग आला आहे तर. तु पण ना शिवानी.

शिवानी--- तुला माहिती तरी आहे का? माझ्या आयुष्यात काय चालू आहे ते ?

मेघना--- तुझ्या आयुष्यात काय चालू आहे ते तुझा राग थोड्या वेळ बाजूला ठेऊन सांगशील का?

शिवानी--- संकेत म्हणतो आहे की आपण लग्न US मध्ये करूयात, त्याच्या घरचेही तयार आहेत, माझ्या आई बाबांनाही काहीच प्रॉब्लेम नाहीये.

मेघना--- अरे वा मस्तच की, मग घोड कुठे अडलं आहे?

शिवानी--- तुला माझ्या लग्नाला येत येणार नाही ना.

मेघना--- शिवानी हे बघ तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे, मी जरी तुझ्या लग्नाला येऊ शकले नाही तरी माझ्या गुड विशेस कायम तुझ्यासोबत राहतील.लग्न कधी करण्याचा प्लॅन आहे?

शिवानी--- पुढच्या महिन्यात, संकेतचे असे म्हणणे आहे की पुढचा महिना तिकडे फिरण्यासाठी खूप छान असतो, लग्नाच्या निमित्ताने आई बाबा आणि जवळचे नातेवाईक येतीलच तर त्यांना छानपैकी फिरताही येईल.

मेघना--- म्हणजे तु थोड्याच दिवस माझ्या सोबत असणार आहेस तर. शिवानी मी तुझ्या लग्नाला जरी आली नाही तरी तु आमच्या लग्नाला येणारेस एवढे लक्षात ठेव.

शिवानी--- हो ग बाई हे काही सांगण्याची गरज आहे का? ते जाऊदेत पण तुमच पुढे काय झालं?

मेघना--- येत्या रविवारी माझ्या घरी कांदेपोहे कार्यक्रम ठरला आहे. बाबांना आदित्य तर आवडला आहे पण त्यांना जर आमच्या अफेअरची थोडी जरी शंका आली ना तर होत्याच नव्हतं होऊन जाईल. बाबा काही आमच्या लग्नाला परवानगी देणार नाही. एकतर मनोज दादाचे प्रकरण ताजे आहे. बाबा खूप खचले आहेत ग.

शिवानी--- मेघना एक सांगू तु ह्या सर्वाचा खूप जास्त विचार करत आहेस. मला तुझा राग आलाच नव्हता मुळी पण कंपनीत तुझ्यासोबत सविस्तर बोलता आले नसते म्हणून मी तुला कॉफी शॉप मध्ये घेऊन आले. तु लग्नाचा खूप जास्त स्ट्रेस घेतला आहेस.सगळं व्यवस्थित होईल, बी पॉजिटीव्ह.

मेघना--- शिवानी गेल्या काही दिवसात इतकं काही घडलं आहे की पॉजिटीव्ह रहाताच येत नाहीये.

अशा प्रकारे मेघना व शिवानीच्या गप्पा चालू असतानाच मेघनाच्या आईचा फोन येतो आणि मेघना व शिवानीला कॉफी शॉप मधून घरी जाण्यासाठी निघावे लागते.

©® Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all