चहा आणि बरंच काही भाग २९

Story of love in friendship

       आपण मागील भागात बघितलं, मेघनाला आईकडून समजते की बाबांना आदित्य आवडला आहे आणि लग्नाची पुढील बोलणी करण्यासाठी बाबा तयार आहेत.

      दुपारच्या वेळी मनोज जुलियाला हॉटेलमध्ये ठेऊन लग्नाच्या ठिकाणी पोहोचतो. मनोजला बघून आई त्याच्याजवळ जाते आणि मनोजला रागवायला सुरवात करते.

आई--- मनोज काय आहे हे? एवढा मोठा झाला आहेस पण जबाबदारी नावाची काही गोष्टच नाहीये. तु पोरकटपणा कधी सोडणार आहेस?

आईच्या एकदम अश्या बोलण्याने मनोज गोंधळून गेला, त्याला वाटले की मेघनाने आईला जुलिया बद्दल सर्व खरं खरं सांगून दिलेलं दिसतंय. मनोजला दरदरून घाम फुटला त्याला आईसमोर काय बोलावे काहीच कळत नव्हते. 

मनोज--- आ..... ई.... त.... ते.... ( मनोज ततपप करत काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता)

आई--- (मध्येच त्याला अडवत) अरे असा ततपप करत का बोलत आहेस? विद्या तुझी बहिणचं आहे ना, आज तिची हळद आहे, तुझी भाऊ म्हणून काही जबाबदारी आहे की नाही, घरातून केव्हाचा बाहेर पडला होतास आणि कधी परत आलास याचे काही भान आहे की नाही. घरात बहिणीचे लग्न असताना कोणी भाऊ मित्रांसोबत टवाळक्या करत बसेल का?

मनोज--- मित्र? टवाळक्या? आई तु हे काय बोलत आहेस?

मेघना दुरून आई व मनोजचे संभाषण ऐकत होती, मेघनाला असे वाटले की आता जाऊन आपण काही बोललो नाही तर आई समोर आपणच खोटे पडू आणि ही परिस्थिती मनोज दादाला एकट्याला काही हाताळता येणार नाही म्हणून मेघना आई व मनोज जिथे उभे राहून बोलत असता तिथे जाते.

मेघना--- दादा मित्रांना भेटून खूपच लवकर आलास, आज आला नसता तरी चाललं असत ना. अरे केव्हाच सगळे जण विचारत आहेत की मनोज कुठे गेला? कुठे गेला?

आई--- बघ ना मेघना, मी त्याला हेच सांगत होते की आपली प्रत्येकाची काहीतरी जबाबदारी असते, साधा एखादा फोन पण करून उशीर होणार असल्याचे सांगितले नाही.

मेघना--- आई आपला मनोज दादा अमेरिकेत गेल्यापासून नुसता शरीरानेच नाहीतर मनाने सुद्धा खूप दूर गेला आहे.

मनोज--- आई तु हीच काही ऐकू नकोस. मला टोचून बोलण्याची मेघना एक पण संधी वाया जाऊ देणार नाही. मी जरा फ्रेश होऊन कपडे बदलून येतो.

एवढे बोलून मनोज तेथून सटकतो

आई--- मेघना मनोजला अशी का बोललीस? त्याच्या मनाला किती लागलं असेल? अग तो किती दिवसातून परत आला आहे. 

मेघना--- आई तु दादाच्या मनाचा विचार करतेस पण तो तुझ्या मनाचा विचार करतो का? जाऊदेत मी काय बोलणार आणि माझं म्हणणं तुला कधीच पटलं नाही. मी विद्या ताईकडे चाललेय तिला माझी मदत हवी आहे.

मेघना निघून गेल्यावर आई मेघनाच्या बोलण्याचा किती तरी वेळ विचार करत होती पण मेघनाच्या बोलण्याचा अर्थ काही आईला उमगला नाही.

मेघना विद्याच्या रुममध्ये जाते,विद्या खिडकीत उभी राहून बाहेर बघत उभी होती, मेघना विद्याच्या जवळ गेल्यावर तिच्या लक्षात आले की विद्याच्या डोळ्यात पाणी होते, विद्याला मेघनाच्या येण्याची चाहूल लागल्यावर विद्याने घाईघाई डोळ्यातील पाणी पुसले.

मेघना--- विद्या दीदी प्रत्येक मुलीच्या आयुष्यात आपलं घर, आई वडील सोडून जायचा क्षण यायलाच हवा का? का म्हणून मुलींनीच नेहमी आपले घर सोडून जायचे?( मेघनाच्या डोळ्यात पाणी येते)

विद्या--- ( मेघनाच्या डोळ्यातील पाणी पुसते) ये वेडाबाई असं लगेच डोळ्यात पाणी येऊ द्यायचं का? तुझ्या प्रश्नाच एकच उत्तर आहे, आपलं घर सोडून दुसऱ्या घरी जाऊन त्या घराला आपलंसं करण्याची ताकद फक्त एका मुलीतच असते. 

मेघना--- तुझ्या डोळ्यात पाणी का होते? काही झालं का?

विद्या--- अर्जुन दादाची आठवण येत आहे, तो आज असता तर किती खुश असता, आनंदाने नाचला असता, माझं लग्न त्याचं स्वप्न होतं.मेघना आई बाबा जरी दाखवत नसले तरी त्यांना अर्जुन दादा नसल्याची खंत जाणवते.

मेघना--- अर्जुन दादाने शहीद होऊन आपल्या सर्वांची मान उंचावली आहे. अर्जुन दादा गेल्यापासून रोहित बऱ्यापैकी जबाबदार झाला आहे.

विद्या--- हो रोहित घरात मोठा असल्याप्रमाणे वागत आहे. ते राहुदेत तु बाहेरून आल्यापासून बघतेय, तुला काहीतरी झालंय, काय झालंय? आदित्यसोबत काही भांडण वगैरे झाले का?

मेघना--- नाही ग, आदित्यसोबत सकाळपासून एकदाही फोन झाला नाहीये मग भांडण दूरच राहिले. 

विद्या--- मग काय झालं?

मेघना--- दीदी मला काही नाही झाले. हळदीची वेळ होईल, आपल्याला पटपट आवरायला हवे.

विद्या--- मेघना हे तर नक्कीच आहे की तु माझ्यापासून काहीतरी लपवत आहे, ठीक आहे आत्ता नसेल सांगायचं तर नको सांगूस पण दोन तीन दिवसांनी तुला खर काय आहे ते सांगावेच लागेल.

विद्याच्या या बोलण्यावर मेघनाने फक्त एक हलकीशी स्माईल दिली आणि मनातल्या मनात बोलली, मला सांगायची काही गरजच पडणार नाही, खर काय आहे ते काही दिवसांतच सगळ्यांनाच कळणार आहे.

मेघना--- दीदी तुला माझ्या मनातील एक शंका विचारु?

विद्या--- हो विचार ना

मेघना--- दीदी प्रेमात पडलेला माणूस सारासार विचार करण्याची बुद्धी हरवून बसतो का?

विद्या--- कस असत ना मेघना, प्रेमात वाहवत जाणे हे प्रत्येकावर आणि त्या परिस्थिती वर अवलंबून असते. निर्माण झालेली परिस्थिती कशी हाताळली जाते यावर सर्व अवलंबून असते, काहीजण प्रेमाला सर्वच बाबतीत झुकतं माप देतात आणि काहीजण कुटुंब आणि प्रेमाचा समतोल बाळगण्याचा प्रयत्न करतात. 

मेघना--- काहीजण प्रेम मिळवण्यासाठी किंवा आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी आपल्या आई वडिलांना, फॅमिलीला कसे सोडू शकतात, आपल्या फॅमिलीप्रती यांची काहीच जबाबदारी, कर्तव्ये नसतात का? ( मेघना चिडून बोलत होती)

विद्या--- रिलॅक्स मेघना, काय झालंय? आज अश्या मूडमध्ये कशी काय? एवढा राग कोणाबद्दल आहे?

मेघना--- मी मनोज दादासोबत मार्केटमध्ये गेले असताना तिथे माझी एक जुनी मैत्रीण मला भेटली ती सांगत होती की तिच्या भावाने घरी कल्पना न देता लग्न केले आणि पुढील सहा महिने त्याने घरी काहीच सांगितले नाही. तिने तिच्या घरची पूर्ण कथा सांगितली ते ऐकून खूप वाईट वाटले.

मेघना विद्यासोबत बोलत असतानाच विद्याची आई रूममध्ये येते व त्यांना सांगते की गप्पा बस झाल्या, नवरदेवाकडची मंडळी यायची वेळ झाली, पटपट सगळं आवरायला घ्या.

संध्याकाळ झाली, नवरदेव व तिकडची सर्व मंडळी लग्नाच्या हॉल मध्ये पोहोचली, त्यांचं वाजत गाजत जंगी स्वागत झाले. हळद लागायच्या वेळी आदित्य त्याच्या मित्रांसोबत आला. काही वेळातच हळदीचा कार्यक्रम मजा मस्ती करत, एकमेकांना हळद लावत, मजेत पार पडला. 

आदित्यने एका हातात हळद लपवून ठेवली होती. मेघना हळदीने खूप भरली होती, चेहरा धुण्यासाठी ती वॉशरूमकडे चालली होती, ती एकटीच चाललेली आदित्यला दिसली तसा आदित्यही तिच्यामागे गेला आणि तिच्या नकळतपणे आदित्यने मेघनाच्या गालाला हळद लावली, अचानक झालेल्या स्पर्शाने मेघना घाबरलीच मग तिने मागून वळून पाहिल्यावर तिला आदित्य नजरेस पडला.

मेघना--- आदित्य मी घाबरले ना, तु पण ना, अरे कोणी बघेल ना.

आदित्य--- कोणी बघणार नाही, सर्वजण हळद खेळण्यात दंग आहेत.

तेवढ्यात कोणाची तरी यायची चाहूल लागल्याने मेघना तिथून निघून गेली.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all