चहा आणि बरंच काही भाग २८

Story of love in friendship

      आपण मागील भागात बघितलं, जुलियाची तब्येत अचानक बिघडल्यामुळे मेघना व मनोज हॉटेलवर पोहोचतात त्यावेळी मेघनाला कळते की जुलिया व मनोजचे लग्न झाले असून जुलिया प्रेग्नन्ट आहे. मनोजने जुलियासोबत लग्न केल्याचे घरातील कोणालाही माहित नसते, ही बातमी ऐकून मेघना खूप जास्त शॉक होते. 

     मेघना हॉटेलमधून घरी जायला निघते तेवढ्यात तिला शिवानीचा फोन येतो.

शिवानी--- हॅलो मेघना तु ठीक आहेस ना? 

मेघना--- ( रडवेल्या आवाजात) शिवानी मला काहीच सुचत नाहीये 

शिवानी--- मेघना ऐक तु रडू नकोस, तु शांत हो. मी तुला भेटायला येऊ का?

मेघना--- नको तु आत्ता येऊ नकोस. तु संध्याकाळी हळदीला येशीलच ना. शिवानी आई बाबांना दादाने लग्न केल्याचे कळल्यावर घरी काय परिस्थिती निर्माण होईल याची मी कल्पनाही करू शकत नाहीये.

शिवानी--- मेघना हे बघ, जे दादाने केलं ते वाईटच आहे पण जे पुढे वाढून ठेवले आहे त्याला आपल्याला सामोरे जावेच लागणार आहे. काका काकूंना तुलाच सांभाळावे लागणार आहे कारण त्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे.

मेघना--- हो ते आहेच, पण शिवानी मला तर वेगळीच भीती वाटत आहे.

शिवानी--- कसली भीती?

मेघना--- मनोज दादाने आधीच एवढा मोठा घोळ घालून ठेवलाय. आता माझ्या आणि आदित्यच्या लग्नाचा विषय लांबच राहील, मला नाही वाटतं की बाबा माझ्या आणि आदित्यच्या लग्नाला कधी होकार देतील.

शिवानी--- मेघना अस नाही होणार, मला कळतंय की तुझ्या बाबांना लव्ह मॅरेज केलेलं आवडत नाही, आता सध्या परिस्थिती अशी निर्माण झाली हे की तुझे बाबा काय प्रतिक्रिया देतील हे आपण सांगूच शकत नाही. आपण निगेटिव्ह विचार करायचा नाही. तुझं आणि आदित्यचे लग्न होईल. आपण सगळे सोबत आहोत सो तु काही काळजी करू नकोस.

मेघना--- विद्या दिदीच लग्न झाल्यावर दादा जुलिया बद्दल आई बाबांना खर सांगणार आहे तोपर्यंत आईपासून सर्व लपवणे माझ्यासाठी खूप कठीण जाणार आहे.

शिवानी--- मी तुझी परिस्थिती समजू शकते, घरी जाण्याआधी डोकं शांत कर, डोळ्यात पाणी येऊ देऊ नको, विद्या दिदीचे लग्न एन्जॉय करण्याचा प्रयत्न कर. आपण संध्याकाळी भेटूच.

मेघना--- शिवानी तुझ्यासोबत बोलून जरा बरे वाटले. संध्याकाळी भेटूच, बाय.

      काही वेळातच मेघना लग्नघरी पोहोचते. दारातच आई उभी दिसते. आईला बघून खरेतर मेघनाला खूप भरून येते पण आता जर आईला सगळे खरे कळले तर आई कोलमडून पडेल याची कल्पना मेघनाला असल्याने मेघना चेहऱ्यावर उसने हसू आणण्याचा प्रयत्न करत होती. मेघना आईशी जुजबी बोलून घरात निघून जाते. मेघना आपल्याला टाळून गेली हे आईच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. मुलीने आईपासून कितीही काहीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते आईच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. काही वेळाने मेघनाची आई मेघना ज्या रुम मध्ये एकटी बसलेली होती तिथे जाते. मेघना रुममध्ये शांत एकटक शून्यात पाहत बसलेली आईला दिसली, आई रुममध्ये आल्याचे मेघनाच्या लक्षातही आले नाही. मेघनाची आई मेघना जवळ गेली तिच्या डोक्यावरुन हात फिरवला तेव्हा मेघनाच्या लक्षात आले की आई बाजूला येऊन उभी आहे.

मेघना--- अरे आई काही हवंय का?

आई--- मेघना काय झालंय? तु बाहेरुन आल्यापासून बघतेय तु खूप विचारात दिसत आहेस आणि इथे अशी एकटी बसली आहेस का?

मेघना--- रात्री उशिरापर्यंत जागरण झाले त्यामुळे झोप पूर्ण होऊ शकली नाही म्हणून चेहरा असा दिसत असेल.

आई--- नक्की हेच कारण आहे की अजून काही वेगळं कारण आहे.

मेघना--- नाही ग, अजून काही झालं असतं तर तुझ्यापासून मी का लपवले असते?

आई--- ठीक आहे, तसही तु माझ्यापासून काही लपवत नाहीसच पण तुझ्या चेहऱ्यावरून वाटलं की काही तरी झालंय. बघ बोलण्याच्या नादात तुला जे सांगायला आले होते ते सांगायचेच राहिले.

मेघना--- काय ग?

आई--- काल तु आणि आदित्य सोबत डान्स करत होते त्यावेळी वैभव रावांनी तुझ्या बाबांना विचारलं की आदित्य मेघनासाठी तुम्हाला कसा वाटतो आहे?

मेघना--- ( मेघना प्रश्नार्थक चेहऱ्याने आईकडे बघत होती) बाबा काय म्हणाले?

आई--- बाबांनी वैभव रावांकडे आदित्यची पूर्ण चौकशी केली आणि विचार करून सांगतो असे सांगितले. आज सकाळी बाबा मला विचारत होते की तुला आदित्य कसा वाटतो आहे? मी त्यांना सांगितले की जोडा छान वाटतो आहे, आदित्य आपल्या मेघनासाठी योग्य वाटतो आहे बाकी तुम्ही सर्व चौकशी करून घ्या.

मेघना--- ( मेघनाच्या चेहऱ्यावर स्माईल आली होती) बाबा पुढे काय म्हणाले?

आई--- ते म्हणाले की विद्याचे लग्न झाले की मग आदित्यच्या घरच्यांसोबत बोलून कांदेपोहे कार्यक्रम ठरवूया.

मेघना--- चला बाबा आदित्यच्या बाबतीत पॉजिटीव्ह तरी आहेत म्हणजे आपल्याला त्यांना कंविंस करण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागणार नाही.

आई--- हो ना, बाबा आदित्यच्या बाबतीत खरंच खूप पॉजिटीव्ह आहेत. आदित्य त्यांना मनापासून आवडला अस दिसत आहे.

मेघना--- थँक गॉड, बाबांना आदित्य आवडला.

आई--- हो, मनोज आणि तु सोबत गेले होते ना मग येताना तु एकटीच का आलीस? मनोज कुठे आहे?

मेघना--- दादाला त्याचे जुने मित्र भेटले, तो त्यांच्यासोबत बोलत तिथेच थांबला, थोड्या वेळात तो येईलच.

आई--- मनोज आला की आदित्य बद्दल त्याच्या कानावर टाकावं अस वाटतंय.

मेघना--- नको आई, लगेच दादाला काही सांगू नकोस, एकदा पहिले विद्या दिदीच लग्न पार पडू देत, मग दादासोबत बोलू.

आई--- का ग?

मेघना--- मनोज दादाची रिऍकॅशन काय असेल हे सांगता येणार नाही.

आई--- यावेळी मनोज आल्यापासून मी बघतेय, तो खूप बदलल्यासारखा दिसत आहे, त्याला काय झालं काय माहीत? आता तर मी त्याला सांगून टाकणार आहे, बस झालं अमेरिकेत राहणे, आता इकडेच नोकरी शोधायला लावणार आहे, आमची ही वय होत चालली आहे. तुझं लग्न झाल्यावर तु सासरी निघून जाशील मग आमच्याकडे बघायला कोण राहील.

मेघना मनातल्या मनात बोलली, आई दादाने काय घोळ घालून ठेवला आहे याची तु कल्पनाही करू शकत नाही. पुढे काय वाढून ठेवले आहे हे तुला माहीतच नाहीये.

मेघना व तिची आई बोलत असतानाच मेघनाची मावशी त्यांना बोलावण्यासाठी रुम मध्ये येते आणि मेघनाचे व तिच्या आईचे बोलणे अर्धवटच राहते.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all