चहा आणि बरंच काही भाग २५

Story of love in friendship

          आपण मागील भागात बघितलं, आदित्यने प्रपोज केल्याची बातमी मेघना विद्याला सांगते, तसेच मेघनाचे बाबा लव्ह मॅरेज तयार होणार नाही याची कल्पना असल्याने मेघना विद्याला सांगते की वैभव जिजूंना बाबांना आदित्यचे स्थळ सुचवायला सांग म्हणजे पुढचा मार्ग मोकळा व सुकर होईल. आता बघूया पुढे काय होत?

           विद्या व वैभवच्या संगीतचा दिवस उजाडतो. मेघनाने कंपनीतून चार दिवसांची सुट्टी घेतलेली असते. आधल्या दिवशी मेघनाचा भाऊ मनोजही आलेला असतो त्यामुळे मेघना व तिचा परिवार खूप जास्त खुश असतो. मेघना, मनोज व त्यांचे आई बाबा पूर्ण लग्न पार पडेपर्यंत विद्याच्या घरी रहायला आले होते. सर्व नातेवाईक खूप वर्षांनंतर एकत्र जमले होते त्यामुळे सर्वांची मजा मस्ती, चेष्टा मस्करी चालू होती. लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत घरातील सर्वच खुश होते आणि लग्नाचा परिपूर्ण आनंद घेत होते. मेघना व तिचे बहीण भाऊ डान्सची प्रॅक्टिस करत होते, सर्वजण एकमेकांची खेचत होते. आजकालच्या आयुष्याच्या व्यस्त वेळापत्रकातून म्हणजेच कॉलेज, ऑफिस यातून सर्वांना मोकळा वेळ भेटला असल्याने सर्वच मजा लुटत होते. या सर्वांत फक्त एकच चेहरा चिंतेने ग्रासलेला दिसत होता तो म्हणजे मनोज होता. बऱ्याच वर्षांनी मनोजला भेटता आल्याने घरातील सर्वच खुश होते पण तो आनंद, ती खुशी मनोजच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. मनोजचा चिंतेने ग्रासलेला चेहरा मेघनाच्या नजरेतून सुटला नाही, सुरवातीला तिला वाटले की एवढ्या लांबच्या प्रवासातून आल्याने मनोज थकला असेल म्हणून त्याचा चेहरा असा दिसत आहे पण आराम केल्यावरही मनोज टेन्शन मध्ये दिसत होता. मेघना न राहवून मनोजला सर्वांपासून दूर घेऊन गेली.

मेघना--- दादा काय झालंय?

मनोज--- कुठे काय? मला अशी सर्वांपासून दूर का घेऊन आलीस?

मेघना--- दादा तु आल्यापासून मी बघतेय, तु कुठेतरी हरवला आहेस, तु खूप टेन्शन मध्ये दिसत आहेस, काय झालंय?

मनोज--- काही नाही, मी ठीक आहे, अगं ह्या सगळ्या गोंगाटाची सवय राहिली नाहीये सो त्यामुळे थोडं uncomfortable वाटत आहे, बाकी काही नाही.

मेघना--- दादा खरंच बाकी काही नाहीये, दादा तुला एक गोष्ट माहितीये, तुला खोटं बोलताही येत नाही आणि वागताही येत नाही. तु जरी सांगत असशील की सर्व ठीक आहे पण तुझा चेहरा तर वेगळंच काही तरी सांगत आहे.

मनोज--- मेघना विद्याचं लग्न झालं की मी तुला सर्व सविस्तर सांगेल, पण आता सध्या तु माझी एक मदत करशील का?

मेघना--- हो करेल ना, काय मदत हवी आहे?

मनोज--- माझ्यासोबत माझी एक मैत्रीण आली आहे, तिला विद्याच्या लग्नाला यायचे आहे. 

मेघना--- तुझी गर्लफ्रेंड आहे का?

मनोज--- ती माझी कोण आहे? काय आहे? हे सर्व नंतर सांगतो. तिचे आई पप्पा महाराष्ट्रीयन आहेत पण नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत गेले आणि तिथलेच नागरिक झाले, तिला आपला देश बघायचा होता, आपल्या कडील लग्न कसे असते हे बघायचं आहे म्हणून ती माझ्यासोबत आली आहे आणि तिला विद्याच्या लग्नात यायचं आहे.

मेघना--- मग मी काय करायचं आहे?

मनोज--- इथल्या सर्वांना सांग की ती तुझी फ्रेंड आहे आणि तिला लग्नाला यायची खूप इच्छा होती म्हणून तु तिला लग्नाचे आमंत्रण दिले.

मेघना--- अरे दादा पण तिच्या बोलण्यावरून सगळ्यांना समजेल की ती अमेरिकेत रहाणारी आहे मग ती माझी फ्रेंड कशी होऊ शकेल?

मनोज--- सॊशल मीडियावर ओळख झाली अस सांग ना.

मेघना--- दादा या सगळ्यात आपल्याला एकच व्यक्ती मदत करू शकते.

मनोज--- कोण?

मेघना--- शिवानी

मनोज--- शिवानी आपली मदत कशी करू शकेल?

मेघना--- दादा शिवानीचं लग्न जमलं आहे, तिचा होणारा नवरा US मध्ये राहतो, आपण हे सांगू शकतो की तुझी मैत्रीण शिवानीच्या होणाऱ्या नवऱ्याची मैत्रीण आहे आणि तिला भारतीय पद्धतीचे लग्न बघण्याची इच्छा असल्याने शिवानी तिला लग्नाला घेऊन आली आहे.

मनोज--- मेघना तु खूप जिनिअस आहेस, मस्त आयडिया आहे.

मेघना--- बरं मला तुझ्या मैत्रिणीचे शुभ नाम कळेल का? आणि ती सध्या कुठे आहे?

मनोज--- तिचे नाव जुलिया आहे आणि ती आता सध्या इथल्या जवळच्याच हॉटेल मध्ये राहते.

मेघना--- जुलिया म्हणजे ख्रिश्चन, दादा तुमच्या दोघांमध्ये जर काही असेल तर आपल्या घरात नक्कीच पुढील काही दिवसांत चक्रीवादळ येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ( तेवढ्यात मेघनाचा फोन वाजतो)

मेघना--- दादा सर्वजण आपल्याला शोधत असतील, मी शिवानीला फोन करून सर्व सांगते, तु शिवानी व जुलियाची ओळख करून दे आणि जुलियाला आपला सर्व प्लॅन समजावून सांग तोपर्यंत बाकीची सेटिंग मी लावते.

मनोज--- Thank you so much meghna, या बदल्यात तुला जे पाहिजे ते मी देईल.

मेघना--- लक्षात ठेव दादा जे पाहिजे ते द्यावं लागेल.

            एवढं बोलून मेघना तिथून निघून जाते. मेघना शिवानीला फोन करून या सर्व प्लॅनची कल्पना देते.

शिवानी--- मेघना अगं मला ह्या कश्यात अडकवले आहेस? मला तर अडकवल आहेस शिवाय संकेतचंही नाव घेतलंस.

मेघना--- काय यार शिवानी, माझ्यासाठी एवढही नाही करणार का?

शिवानी--- करेन ग पण जर सर्वांना खरं कळलं तर माझी वाट लागेलच पण सोबत तुझीही वाट लागेल.

मेघना--- मी तुझी वाट लागू देणार नाही, खरं बाहेर आलं तर त्याची पूर्ण जबाबदारी माझी राहील.

शिवानी--- ठीक आहे, इतक्या दिवस तुला झेलत आहे अजून काही दिवस जुलियाला झेलेलं.

मेघना--- तसही पुढची दोन वर्षे तुला US मध्ये काढायची आहेत सो तुलाही फॉरेनर्स ची सवय झाली पाहिजे.

शिवानी--- मेघना मला एक सांग, जुलिया मनोज दादाची फक्त फ्रेंड आहे की गर्लफ्रेंड?

मेघना--- मलाही नक्की माहीत नाही, दादा तर म्हटलाय की फक्त फ्रेंड आहे. काही दिवसात खरं ते बाहेर पडेलच.

          मेघना शिवानीला सर्व प्लॅन व्यवस्थित समजावून सांगते तर दुसरीकडे मनोज जुलियाला पूर्ण प्लॅन सांगतो तसेच शिवानी आणि जुलियाची भेट घालून देतो आणि एकमेकींची ओळख करून देतो.

           मेघना विद्याला सांगते की शिवानीच्या नवऱ्याची फ्रेंड जुलियाला भारतीय लग्न पाहायची इच्छा असल्याने मी तिला तुझ्या लग्नासाठी तुला न विचारता आमंत्रित केले आहे. यावर विद्या मेघनाला सांगते की अगं माझी परवानगी घेण्याची काही गरज नाहीये, येऊ देत तिला लग्नाला, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all