चहा आणि बरंच काही भाग २३

Story of friendship

         आपण मागील भागात बघितलं, आदित्यने प्रपोज केलं हे मेघना तिच्या आईला सांगते, मेघनाची आई यावर मेघनाला सांगते की मला आदित्य आवडतो पण याबाबतीतचा अंतिम निर्णय तुझ्या बाबांचा असेल.

          दुसऱ्या दिवशी आदित्य मेघनाला प्रपोज केल्याबद्दल आईला कल्पना देतो.

आई--- चला फायनली माझ्या मुलाने माझ्या होणाऱ्या सुनेला प्रपोज केलं.

आदित्य--- आई तु बाबांना सांगशील ना.

आई--- बाबा तुझे आहेत तूच सांग, मी कशाला तुमच्या दोघांत पडू.

आदित्य--- आई तु पण ना.

आई--- मेघना घरी कधी सांगणार आहे?

आदित्य--- काल मेघनाने तिच्या आईला सांगितलं.

आई--- मग?

आदित्य--- मेघनाच्या आईला मी आवडतो पण त्या तुला आणि बाबांना भेटल्यावर पुढे काय करायचं ते ठरवणार आहे आणि शिवाय मेघनाच्या बाबांचा निर्णय हा अंतिम असेल.

आई--- तु काळजी करू नकोस, मेघनाला व तिच्या आईला घरी बोलव मग मी त्यांच्याशी बोलते.

आदित्य--- ठीक आहे, त्यांना आपण बोलावू पण आपल्या बाबांच काय?

आई--- तुझे बाबा सकाळीच कामासाठी बंगलोरला गेले आहेत सो ते आल्यावर ह्या विषयावर आपण त्यांच्याशी बोलू.

आदित्य--- ठीक आहे. मेघनाला व तिच्या आईला घरी कधी बोलवायचे?

आई--- माझ्याकडे मेघनाचा फोन नंबर आहे, मी तिला फोन करून विचारते, तिला व तिच्या आईला जर आजचं यायला जमणार असेल तर आजच बोलावते.

आदित्य--- आज? खूप घाई केल्यासारखी नाही वाटत का?

आई--- मेघनाच्या आईची व माझी भेट झाली की एक पाऊल पुढे गेल्यासारखं वाटेल, किती दिवस एकच गोष्ट खेळवत ठेवायची.

आदित्य--- ठीक आहे, तुला जस पटतंय तस कर.

        आदित्यची आई मेघनाला फोन करून आज तिला व तिच्या आईला घरी यायला जमेल का? अस विचारते. यावर मेघना आईला विचारून कळवते अस सांगते. आदित्यच्या आईशी बोलून झाल्यावर मेघना तिच्या आईला आदित्यच्या आईचा फोन आल्याचे व त्यांनी घरी बोलावल्याचे सांगते. थोडा वेळ विचार करून झाल्यावर मेघनाची आई मेघनाला सांगते की आपण एकदा आदित्यच्या घरी जाऊन येऊया म्हणजे मलाही कळेल की त्याची आई , त्याचे घर कसे आहे म्हणजे आपल्याला पुढे निर्णय घ्यायला सोपे जाईल.

         मेघना आदित्यच्या आईला फोन करून त्या दोघी घरी येणार आहेत ते कळवते. आदित्यच्या आईचा जीव भांड्यात पडतो. आदित्य व आदित्यची आई घराची साफसफाई करतात, घर नीटनेटके आवरून ठेवतात. संध्याकाळी मेघना व तिची आई आदित्यच्या घरी जायचं ठरवतात.

         संध्याकाळी ठरलेल्या वेळेनुसार मेघना व तिची आई आदित्यच्या घरी जातात. मेघनाही आदित्यच्या घरी पहिल्यांदाच जाणार असते. मेघना व तिची आई आदित्यच्या घरी जाताना मिठाई घेऊन जातात. आदित्य मेघनाची वाट पाहत दारातच उभा असतो. मेघना व तिची आई घरी गेल्यावर आदित्य त्यांच हसून स्वागत करतो. 

आदित्य--- मेघना घर शोधायला त्रास झाला नाही ना?

मेघना--- नाही इथे मागच्या कॉलनीत आईची एक मैत्रीण राहते, त्यांच्याकडे आमच अधूनमधून येणं जाण चालूच असतं सो हा एरिया बऱ्यापैकी ओळखीचा झाला आहे.

( मेघना व तिची आई घरात जाऊन सोप्यावर बसतात, आदित्यची आई पाण्याचे ग्लास घेऊन येते, मेघना मिठाईचा बॉक्स आदित्यकडे देते)

आदित्य--- अगं ही फॉर्मलिटी कशाला?

मेघनाची आई--- कुणाच्याही घरी जाताना अस रिकाम्या हाताने गेलेलं बर दिसत नाही, ही आपली संस्कृतीच आहे नाही का हो आदित्यच्या आई.

आदित्यची आई--- हो तुम्ही बरोबर बोलत आहात. तुम्ही मला आदित्यच्या आई न म्हणता सुलभा म्हणू शकता.

मेघनाची आई--- बरं, तुम्हीही मला शालिनी म्हणू शकता.

सुलभा( आदित्यची आई)--- मेघना, शालिनी ताई चहा घेणार की कॉफी?

शालिनी( मेघनाची आई)--- काहीही चालेल.

सुलभा--- मग तुम्ही आमच्या आदित्यच्या हातचा चहा पिऊनच बघा, आदित्य जा चहा घेऊन ये.

शालिनी--- आदित्यला चहा खूप आवडतो हे मेघनाकडून समजलं होत पण तो स्वतः चहा करतो हे मला नव्हतं माहीत.

सुलभा--- आदित्यला कुकिंग मध्ये बऱ्यापैकी इंटरेस्ट आहे, आदित्य आमचा एकुलता एक मुलगा मग मी आजारी पडल्यावर घरातील सर्व जबाबदारी त्याच्यावरच यायची. आदित्यला त्याच्या बाबांनीच बऱ्यापैकी कुकिंग शिकवली आहे.

शालिनी--- आदित्यचे बाबाही कुकिंग करतात. मेघनाचे बाबा तर साधं पाण्याचा ग्लासही भरून घेत नाही किंवा किचनमध्ये पाऊलही ठेवत नाहीत.

सुलभा--- आमच्याकडे आदित्य व त्याचे बाबा घरातील सर्व कामे आवरायला मदत करतात. माझ्या आदित्यला घरातील सर्व कामांची सवय आहे. मेघनाला पुढे जाऊन काहीच अडचण येणार नाही.

(मेघना लाजते, आदित्य व मेघनाची आई हसतात, तेवढ्यात आदित्य चहा घेऊन येतो)

शालिनी--- वा आदित्य मस्त चहा केला आहेस, अप्रतिम.

आदित्य--- थँक्स काकू.

शालिनी--- आदित्यचे बाबा घरी नाहीयेत का?

सुलभा--- नाही, ते कामानिमित्त बंगलोरला गेले आहेत.

शालिनी--- त्यांना आदित्य व मेघना बद्दल कल्पना आहे का?

सुलभा--- नाही त्यांना काहीच माहीत नाही. 

शालिनी--- आदित्यचे बाबा ह्या लग्नासाठी तयार असतील ना.म्हणजे लव्ह मॅरेज.

सुलभा--- हो का नाही, शालिनी ताई आमच्या दोघांचही लव्ह मॅरेज आहे.

शालिनी--- ओके, सुलभा ताई आम्ही अजून मेघनाच्या बाबांना या बद्दल काहीच सांगितलेलं नाही, मेघनाचे बाबा थोडे कडक स्वभावाचे आहे, त्यांना समजवायला थोडा वेळ लागेल.

सुलभा--- मुलीच्या सुखासाठी ते नाही थोडेच म्हणतील, कस आहे ना शालिनीताई मेघना व आदित्यला सोबत आयुष्य घालवायचं आहे, ते दोघे एकमेकांना पसंत आहेत ना मग झालं, आपला रोल नाममात्र आहे. माझा आदित्य निर्व्यसनी, साधा सरळ मुलगा आहे, तो तुमच्या मेघनाला खूप सुखात ठेवेल, बाकी कसलीही चिंता तुम्हाला करण्याची गरज नाही, मी सासू म्हणून तशी बरी असेल.

शालिनी--- सुलभाताई तुम्ही कशा आहात हे तुमच्या बोलण्यातूनच कळतंय, तुम्ही आदित्यवर खूप छान संस्कार केले आहेत. आपली मुलगी कायम सुखात रहावी हीच तिच्या आई वडिलांची इच्छा असते, आम्हालाही तेच हवं आहे. माझ्या मेघनासाठी तुमचं घर आणि आदित्य एकदम परफेक्ट आहे. माझी तर सर्व चिंताच मिटली.

सुलभा--- मेघनाही आमच्या घरासाठी एकदम परफेक्ट आहे, मी जेव्हा मेघनाला पहिल्यांदा भेटले होते तेव्हाच ती मला सुन म्हणून पसंत होती. शालिनीताई मला मुलगी नाहीये, मी माझ्या मुलीबद्दल असलेल्या सर्व अपेक्षा मेघना कडून पूर्ण करून घेणार आहे. लग्न झाल्यावर मेघना ह्या घरात सून म्हणून नाहीतर मुलगी म्हणूनच राहील.

( मेघनाच्या आईचे डोळे भरून येतात)

शालिनी--- मेघना बाळा तुझं नशीब खुप चांगलं आहे की तुला अस घर भेटणार आहे. इथून पुढे मला तुझी काळजी करण्याची काहीच गरज नाहीये.

सुलभा--- ताई तुमचा होकार आहे ना ह्या लग्नाला?

शालिनी--- हो आता मला काहीच शंका नाहीये.

सुलभा--- पुढील बोलणी केव्हा करायची?

शालिनी--- पाच दिवसांनी माझ्या बहिणीच्या मुलीच लग्न आहे ते झालं की मग मी मेघनाच्या बाबांशी बोलून तुम्हाला कळवते.

सुलभा--- चालेल, तोपर्यंत मी आदित्यच्या बाबांशी बोलून घेते.

शालिनी--- आम्ही निघतो, मेघनाचे बाबा घरी येईपर्यंत आम्हाला घरी पोहोचावे लागेल.

सुलभा--- हो चालेल.

(निघताना मेघना आदित्यच्या आईच्या पाया पडते आणि आदित्यही मेघनाच्या आईच्या पाया पडतो, चौघांच्याही चेहऱ्यावर हसू झळकत असते)

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all