चहा आणि बरंच काही भाग २१

Story of friendship

          आपण मागील भागात बघितलं, शिवानीचा साखरपुडा असतो, त्यात मेघना छान असा डान्स करते, आदित्यला मेघनाचा डान्स खूपच आवडतो. साखरपुडयाचे फोटो बघत असताना आदित्यची आई आदित्यला सांगते की मेघना त्यांना सून म्हणून पसंत आहे.

         आदित्य रूम मध्ये आल्यावर साखरपुडयाचे फोटो परत परत बघतो खास करून मेघनाला तो न्याहाळत असतो. फोटो बघत असताना त्याला आईचे बोलणे आठवते आणि तो विचारात पडतो की जर आईलाही मेघना पसंत असेल तर मेघनाला प्रपोज करावे की नाही, तिचेही माझ्यावर प्रेम असेल का? मेघनाकडे मी माझ्या मनातील भावना, माझे प्रेम व्यक्त करू का? खूप वेळ विचार करून झाल्यावर आदित्य ठरवतो की जे होईल ते बघून घेऊ पण आता मेघनाला प्रपोज करायचेच. प्रपोज करायचे तर ठरवले पण कसे करायचे हा प्रश्न आदित्यला पडला. आदित्यने विशालला मॅसेज केला की मी मेघनाला प्रपोज कस करू? त्याने रिप्लाय दिला की शिवानी मेघनाची खूप जवळची आणि खास मैत्रीण आहे, तिला विचारून बघ, तिला मेघना बद्दल सर्वच माहिती असेल. आदित्यला विशालचा सल्ला पटतो. आदित्य लगेच शिवानीला मॅसेज करतो, उद्या संध्याकाळी कॉफी शॉप मध्ये भेटशील का? मेघना बद्दल बोलायचे आहे, मेघनाला याची कल्पना देऊ नको. शिवानी आदित्यला भेटण्यास होकार देते.

       दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे संध्याकाळी आदित्य कॉफी शॉपमध्ये जाऊन शिवानीची वाट बघत असतो, थोड्याच वेळात शिवानीही तेथे पोहोचते.

शिवानी--- सॉरी सर मला यायला थोडा उशीर झाला.

आदित्य--- नाही मीच ठरल्या वेळेआधी आलो. साखरपुडा मस्त झाला, किती दिवस सुट्टी बाकी आहे?

शिवानी--- तुम्ही साखरपुड्याला आलात त्यासाठी थँक्स, सुट्टी फक्त आजच्या दिवस आहे, कालच्या धावपळीमुळे खूप थकायला झालं होतं. उद्यापासून बॅक टू रुटीन. Anyways तुम्ही मला का बोलावलं आहे?

आदित्य--- ( कॉफीची ऑर्डर देतो) तु मेघनाला लहानपणापासून ओळखते, तुमची एकमेकींची सर्व सिक्रेट्स एकमेकींना माहीत असते याची मला कल्पना आहे. मेघनाच्या मनात माझ्याबद्दल काय आहे याबद्दलही तुला माहीत असेलच.

शिवानी--- हो आम्हाला दोघींनाही आमची सिक्रेट्स माहीत असतात हे बरोबर आहे पण तुमच्या बद्दल तिच्या मनात जे चालू आहे ते मी तुम्हाला कस सांगू शकते, हे आमच्यातील सिक्रेट आहे ना.

आदित्य--- ते मला जाणून घ्यायचंच नाहीये, मी मेघनाला प्रपोजल करायचे ठरवले आहे तर त्यासाठी तु मला काही मदत करू शकशील का?

शिवानी--- मी काय मदत करू शकेल?

आदित्य--- मेघनाला प्रपोज कश्या पध्दतीने केलेलं आवडेल म्हणजे साधं सरळ की खूप रोमँटिक.

शिवानी--- सर मेघना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारी मुलगी आहे, तिच्यासाठी काहीतरी जगावेगळं करण्याची अशी गरज नाहीये किंवा फिल्मी स्टाईलने प्रपोज करायची गरज नाहीये. जास्त गाजावाजा न करता साध्या सरळ पद्धतीने प्रपोज करा. सर तिला अस प्रपोज करा की ते तिच्या आयुष्यभर लक्षात राहील.

आदित्य--- ठीक आहे, आलं माझ्या लक्षात, थँक्स.

शिवानी--- हे सगळं मी तुमच्यासाठी नाही करत आहे तर माझ्या मैत्रिणीसाठी करत आहे.

आदित्य--- आपल्या भेटीबद्दल मेघनाला काही सांगू नकोस.

शिवानी--- नाही सांगणार, डोन्ट वरी.

       एवढं बोलून शिवानी कॅफेतून बाहेर पडते, आदित्य विचार करत तिथेच बसलेला असतो. शिवानी दिलेल्या माहितीनुसार आदित्य मेघनाला कस प्रपोज करायच ते प्लॅन करतो. आदित्य मेघनाला प्रपोज करणार आहे हे ऐकून शिवानीला खूप आनंद झालेला असतो पण तिला ही गोष्ट मेघना पासून लपवायची असते हे तिच्यापुढे सर्वांत मोठे आव्हान होते.

       सुट्टीच्या दिवशी आदित्य प्लॅनप्रमाणे मेघनाला भेटायला बोलावतो, ज्या ठिकाणी आदित्य मेघनाला बोलावतो ते एक कॉफी शॉप असते जिथे मेघनाला खूप दिवसांपासून कॉफी पिण्याची इच्छा असते पण तिथे कॉफी खूप महाग असल्याने मेघना कधीच तिथे जायची नाही. मेघना कॉफी शॉपमध्ये पोहोचते, आदित्य आधीच तिथे पोहोचलेला असतो.

मेघना--- आदित्य तु मला इथे का बोलावलं आहेस? आपण इथे का आलो आहोत?

आदित्य--- अगं किती प्रश्न विचारशील? तुला इथली कॉफी पिण्याची इच्छा होती ना.

मेघना--- अरे हो पण आपल्या सगळयाच इच्छा पूर्ण होतील अस नाही ना, आपल्या इच्छा आपल्या खिशालाही परवडल पाहिजे ना.

आदित्य--- कॉफीचे बिल मी देणार आहे, तु तुझ्या आवडीची कॉफी ऑर्डर कर.

(नाही म्हणता म्हणता मेघना कॉफी ऑर्डर करते)

मेघना--- आज काही स्पेशल आहे का?

आदित्य--- नाही, तुला अस का वाटलं की काही स्पेशल असेल म्हणून?

मेघना--- आपण आज या कॉफी शॉपमध्ये आलो आहोत म्हणून.

आदित्य--- कॉफी पिऊन झाल्यावर तुला मी माझी आवडती जागा दाखवायला नेणार आहे.

मेघना--- आज साहेबांचा मूड काहीतरी वेगळंच सांगतोय.

       अशा रितीने आदित्य व मेघनात कॉफी पिता पिता गप्पा रंगतात. कॉफी पिऊन झाल्यावर आदित्य व मेघना कॉफी शॉप मधून बाहेर पडतात. गाडीत बसल्यावर मेघना आदित्यला विचारते की आपण कुठे जाणार आहोत? त्यावर आदित्य तिला सांगतो ते एक सरप्राईज आहे. गाडी शहराच्या बाहेर पडते, आदित्य गाडी एका टेकडीवर घेऊन जातो, मेघना गाडीतून खाली उतरते.

मेघना--- वाव आदित्य किती सुंदर जागा आहे, किती शांतता आहे.

आदित्य--- मला ही जागा खूप आवडते, शांत, गर्दीपासून दूर. इथे येऊन मनाला शांतता व समाधान लाभते.

मेघना--- तुला ह्या जागेबद्दल कसं कळलं?

आदित्य--- एकदा एका मित्रासोबत आलो होतो. मेघना आपण एखाद्या ठिकाणी बसूया का?

मेघना--- हो बसूया ना.

(मेघना व आदित्य दोघेही एका ठिकाणी जाऊन बसतात)

आदित्य--- मेघना मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं.

मेघना--- बोल ना, परमिशन का मागतो आहेस?

आदित्य--- तु रागावणार नाहीस ना?

मेघना--- नाही रागावणार, बोल ना.

आदित्य--- मेघना तुला मी पहिल्यांदा कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये पाहिलं होतं, तेव्हापासून मी तुझ्याकडे ओढला गेलो होतो, तुझ्या बद्दल माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली होती, त्यानंतर आपण इंटरव्ह्यूला भेटलो आणि नंतर कंपनीत, आपण सोबत काम करायला लागलो आणि नंतर आपल्यात मैत्री झाली, तुझ्या बद्दल माझ्या मनात एक अनामिक ओढ,हुरहूर निर्माण झाली होती, तुझा मॅसेज, कॉल बघितल्यावर नकळतपणे चेहऱ्यावर स्माईल यायला लागली, तुझा आवाज ऐकण्याची, तुझ्याशी बोलण्याची इच्छा होऊ लागली. मनात सतत तुझाच विचार येऊ लागला, मलाही कळत नव्हतं की हे माझ्यासोबत काय होत आहे, खूप विचार केल्यावर उत्तर आले की आपण मेघनाच्या प्रेमात पडलोय का? (आदित्य खिशात ठेवलेले गुलाबाचे फुल काढतो, मेघनासमोर गुडघ्यावर बसतो, गुलाबाचे फुल हातात धरतो)

I love you मेघना, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत, माझ्याशी लग्न करशील?

You are the happiness of my life and I want to live happy with you forever will you?

         मेघनाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात, मेघना आदित्यच्या हातातील फुल घेते व आदित्यला मानेनेच होकार देते, आदित्य उभा राहतो व आनंदाच्या भरात मेघनाला मिठी मारतो.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all