चहा आणि बरंच काही भाग १

Story of a friendship

चहा आणि बरंच काही भाग १

        आदित्य 4 वर्षांनंतर त्याच्या कॉलेजला गेला होता. कॉलेजच्या गेटमधून आत गेल्यावर आदित्यच्या लक्षात आले की कॉलेजच्या कॅम्पसमध्ये खूप बदल झाले आहेत. आदित्यने त्याची गाडी पार्किंगमध्ये पार्क केली, गाडीतून उतरल्यावर त्याच्या डोक्यात एक विचार येऊन गेला, 4 वर्षांपूर्वी जेव्हा आपण याच कॉलेजमध्ये होतो त्यावेळी बाबांनी घेऊन दिलेली बाईक होती ती आपण याच पार्किंगमध्ये पार्क करायचो आणि आता मी स्वतःच्या पगारातून गाडी घेतली आहे, किती लवकर दिवस बदलतात. आदित्यने आजूबाजूला बघितले तर सर्व मूल मुली घोळक्यात उभे होते, त्यांच्याकडे बघून त्याला त्याच्या ग्रुप ची आठवण झाली, त्याच्या जुन्या आठवणी ताज्या होऊ लागल्या होत्या. 

        आदित्य कॉलेजच्या ऑफिसकडे जात होता तेवढ्यात त्याला मागून कोणी तर आवाज दिला. आदित्यने मागे वळून पाहिले तर त्याचा क्लासमेट वैभव उभा होता. वैभवला बघून आदित्यला आनंद झाला, दोघांनी पुढे येऊन हस्तांदोलन केले व एकमेकांना मिठी मारली.

वैभव--- किती वर्षांनी भेटतो आहेस मित्रा, कसा आहेस?

आदित्य--- मी मजेत, तु कसा आहेस आणि इकडे काय करतोय?

वैभव--- मी मस्त, postgraduation झाल्यावर मी कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून जॉईन झालो. तु आज कॉलेजची वाट कशी चुकलास?

आदित्य--- आज प्लेसमेंट आहे ना, कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला आलोय.

वैभव--- ओके, खूपच मोठा ऑफिसर झाला आहेस वाटतं.

आदित्य--- एरवी मी इंटरव्ह्यू नाही घेत पण आज आमच्या सिनिअर सरांना अचानक दुसरे काम आले म्हणून इंटरव्ह्यू घ्यायची जबाबदारी माझ्यावर आली. आपले कॉलेज किती बदलले आहे ना.

वैभव--- हो, कॉलेजच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये बरेच बदल झाले. बरं चल कँटीनमध्ये जाऊन चहा घेऊया.

आदित्य--- हो नक्कीच, मी कॅन्टीन मधला चहा खूप मिस केलाय, जगात कुठेही जा पण कँटीन सारखा चहा कुठे नाही भेटत.

वैभव--- बर चल मग कँटीनमध्ये जाऊ.

आदित्य--- तु जाऊन कँटीन मध्ये बस मी ऑफिस मध्ये जाऊन मी आल्याचे इंफॉर्म करून येतो.

वैभव--- ठीक आहे, चालेल

वैभव कॅन्टीनच्या दिशेने जातो तर आदित्य ऑफिस कडे जातो. आदित्यचे graduation याच कॉलेज मधून झालेले असते, त्यांनंतर आदित्यने MBA केले आणि आता सध्या तो एका नामांकित कंपनीत जॉब करतो. आदित्य ऑफिस मधील काम संपवून कँटीनमध्ये येतो, कॅन्टीनच्या दरवाजात उभे राहून वैभवला शोधत असतो तेवढ्यात वैभव आदित्यला आवाज देतो, आदित्य वैभवच्या दिशेने जायला निघतो तोच त्याचा धक्का एका मुलीला लागतो, धक्का लागल्यामुळे त्या मुलीच्या हातातील पुस्तके व नोट्स खाली पडतात, आदित्य खाली वाकून त्या मुलीला पुस्तके उचलण्यासाठी मदत करतो, ती मुलगी आदित्यकडे न बघता त्याला सॉरी म्हणून घाईघाईत तेथून निघून जाते.आदित्य तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बघत वैभव कडे जातो. वैभव चहाची ऑर्डर देतो.

आदित्य--- वैभव कोण होती रे ती मुलगी? माझा धक्का लागला म्हणून तिच्या हातातील सामान खाली पडले, तिची काहीही चुक नसताना माझ्याकडे न बघता मला सॉरी म्हणून निघून गेली.

वैभव--- ती मेघना होती, फायनल इअर ला आहे, कॉलेज मधील सर्वात सिंसिअर विद्यार्थीनी आहे, खूप साधी सरळ मुलगी आहे, अभ्यास एके अभ्यास चालू असतो.

आदित्य--- इंटरेस्टिंग दिसतेय.

वैभव--- तु काही तिच्यात इंटरेस्ट घेऊ नकोस, कॉलेज मधील बरीच मुले तिच्या मागे होती पण आजपर्यंत तिने कोणालाही भाव दिला नाही.

आदित्य--- मग तर अजूनच इंटरेस्टिंग वाटतेय, तु पण try करून बघितला का?

वैभव--- गप रे, पोरींच्या मागे फिरायला मी कॉलेज स्टुडंट नाही राहिलोय, तसही माझी engagement झालीय, दोन महिन्याने लग्न आहे.

आदित्य--- अरे वा मित्रा, अभिनंदन

वैभव--- तुझ्या माहितीसाठी सांगतोय, मेघना माझ्या होणाऱ्या बायकोची मावस बहिण आहे. तु मेघनाच्या बाबतीत सिरिअस असशील तर लगेच घरून सेटिंग लावून देतो.

आदित्य--- नको रे बाबा, मी अशीच गम्मत करत होतो.

वैभव--- ग्रुपमधील इतर कोणाशी संपर्क आहे की नाही? काय करतात सगळे?

आदित्य--- सगळेजण आपापल्या कामात व्यस्त आहेत. कॉलेज संपल्यापासून कोणाची भेटच नाही झाली. Whatsapp वर नावाला ग्रुप आहे, कोणाचा बर्थडे असेल तर तेवढं विश करायच.

वैभव--- हो ते आहेच, कॉलेज alumni meet प्लॅन करत आहे, मग होईलच सगळ्यांच्या भेटी.

आदित्य--- हो, पण सगळ्यांना त्यावेळी यायला जमणार आहे का? मला माझीच गॅरंटी नाही तर बाकीच्यांच काय सांगू?

वैभव--- आपण एक करू शकतो, आपल्या बॅचच गेट टूगेदर प्लॅन करू शकतो.

आदित्य--- नाईस आयडिया.

वैभव--- मी आजच ग्रुपवर टाकतो, बघूया कितीजण interested आहेत, मग प्लॅन करूया.

आदित्य--- हो चालेल, सर्वांच्या सोयीनुसार वेळ आणि ठिकाण ठरवता येईल.

वैभव--- बाकी काय म्हणतोय, How's life?

आदित्य--- कॉलेज मध्ये होतो तेच बरं होतं, तेव्हा नो टेन्शन, नो जबाबदारी मस्त मजेत आयुष्य होतं, आता वर्क लोड, कामाचे टार्गेट, घराच्या व कामाच्या जबाबदाऱ्या सर्वच वाढल्या आहेत.

वैभव--- आयुष्य यालाच म्हणतात.

आदित्य--- आई तर आता लग्न कर म्हणून मागे लागली आहे.

वैभव--- मग करायच लग्न, जेवढ्या लवकर लग्न करशील तेवढ्या लवकर आयुष्यात स्थिरता येईल.

आदित्य--- मला तुझं म्हणणं पटतंय, पण लग्न करण्याआधी मी स्वतः आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असलो पाहिजे, कोणीतरी म्हणतंय लग्न कर म्हणून मला लग्न करायचं नाहीये.

वैभव--- तुला जे हवं ते कर, तुझ्याशी बोलण्यात कोणी जिंकू शकत का? इंटरव्ह्यू किती वाजता सुरू होणार आहेत?

आदित्य--- माझा एक सहकारी माझ्यासोबत आलेला आहे तो written exam घेत असेल, साधारणतः एका तासात इंटरव्ह्यू सुरु होतील. तुला काही काम नसत का? कॉलेज कॅन्टीन मध्ये बसण्याचे पैसे देते का?

वैभव--- अरे भरपूर काम असतं, काम रोजच असतं पण तू रोजरोज थोडीच कॉलेजला येणार आहेस, आपल्या मित्रांसाठी वेळ नाही काढायचा मग कोणासाठी काढायचा.

आदित्य--- तुला माझ्या बोलण्याचा राग नाही ना आला, मी गम्मत करत होतो.

वैभव--- आलं माझ्या लक्षात.

आदित्य--- वैभव अजून एक एक चहा घ्यायचा का?

वैभव--- नको रे बाबा, बोलता बोलता 2 चहा पिऊन झाले, एवढे चहा पिण्याची सवय चांगली नाही.

आदित्य--- कॉलेजला यायच्या आधी मला चहा पिण्याची सवय नव्हती पण कॉलेजला आल्यानंतर मात्र मित्रांसोबत चहा पिण्याची खूप सवय लागली.

वैभव--- ओके, चल आता मी निघतो, lecture ची वेळ झाली आहे.

आदित्य--- हो चालेल, खूप दिवसांनी तुला भेटून खूप छान वाटले.

वैभव--- हो मलाही खूप छान वाटले, जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

वैभवने चहाचे पैसे दिले, वैभव व आदित्य दोघेही कॅन्टीन मधून बाहेर पडले व आपापल्या कामाच्या दिशेने निघून गेले.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all