आपण मागील भागात बघितलं, आदित्यच्या मामाची मुलगी शाल्मली त्याच्या घरी आलेली असते, आदित्य मेघना समोर शाल्मलीचे खूप कौतुक करत असतो, मेघनाला शाल्मलीचे कौतुक आदित्यच्या तोंडून ऐकल्यावर मनातून थोडे वाईटच वाटते.
आदित्य मेघनाशी बोलताना शाल्मली बद्दल बोलायलाच, शाल्मली किती ग्रेट आहे हेच सतत तो सांगत असायचा. मेघनाला शाल्मली बद्दल ऐकून कंटाळा आला होता, पण ती डायरेक्ट आदित्यला तस सांगू शकायची नाही. एके दिवशी मेघनाने आदित्यला शॉपिंगला सोबत येशील का म्हणून विचारले तर आदित्यने सांगितले की शाल्मली सोबत बाहेर जायचे आहे. मेघनाला आदित्यचा खूप राग आला होता. मेघनाने या विषयावर शिवानी सोबत बोलायचे ठरवले.
मेघना--- शिवानी आदित्य सतत त्या शाल्मलीच गुणगाण गात असतो, मी त्याला शॉपिंगला जाऊया म्हटलं तर त्याला शाल्मली सोबत बाहेर जायचं आहे.
शिवानी--- मेघना तुला शाल्मली बद्दल काहीच ऐकायचे नसेल तर तस आदित्यला सरळसरळ सांगून टाक. शाल्मली थोड्या दिवसांसाठी आदित्यच्या घरी आली असल्याने आदित्य तिला जास्त वेळ देणे स्वाभाविकच आहे.
मेघना--- आदित्य शाल्मलीमुळे मला टाळत आहे असं वाटतंय.
शिवानी--- मेघना तुझं ना कावीळ झालेल्या लोकांप्रमाणे झालंय.
मेघना--- म्हणजे?
शिवानी--- कावीळ झालेल्या लोकांना सगळं पिवळ दिसतं तस आदित्य आणि शाल्मलीत काही नसेल तरी तुला असंच वाटत राहील की त्यांच्यात काहीतरी आहेच.
मेघना--- शिवानी पण खरंच आदित्य आणि शाल्मलीत काही असेल का?
शिवानी--- मेघना जर यापुढे आदित्य आणि शाल्मलीचा विषय काढशील तर एक कानाखाली खाशील, मला तेच तेच ऐकून इरिटेट झालंय. खूप दिवस झालेत आपण मुव्हीला गेलो नाही, उद्या आपण सेन्ट्रल मॉलला जाऊया, मुव्ही बघूया, शॉपिंग करूया आणि मस्त मज्जा करूया.
मेघना--- ओके चालेल
दुसऱ्या दिवशी सकाळी मेघना आणि शिवानी सेन्ट्रल मॉलला पोहोचल्या, मूव्हीचे तिकीट काढण्यासाठी तिकीट काउंटरवर गेल्या तर तिथे आदित्यही होता, मेघनाला आदित्यला बघून खूप आनंद झाला पण त्यासोबत एक मुलगी होती तिला बघून ही शाल्मलीच असेल याचा अंदाज मेघनाला आला होता, मुव्ही सुरू व्हायला पंधरा मिनिटे अवकाश होता. आदित्यने शाल्मली सोबत मेघना आणि शिवानीची ओळख करून दिली.
शिवानी--- हाय शाल्मली, तुझ्या बद्दल आदित्य सरांकडून खूप ऐकलंय.
शाल्मली--- चांगलं की वाईट
शिवानी--- चांगलंच ऐकलंय, आदित्य सर तुझं खूप कौतुक करतात, त्यांनी केलेल्या तुझ्या कौतुकामुळेच मला तुला भेटण्याची तीव्र इच्छा होती.
शाल्मली--- आदू तु माझं कौतुक कधीपासून करायला लागलास? अगं लहानपणापासून फक्त माझ्या खोड्याच काढत असतो, माझ्यासमोर तरी माझ्या बद्दल कधीच काही चांगलं बोलत नाही.
आदित्य--- शालू तुझ्यासमोर तुझं कौतुक केलं तर तू हरभऱ्याच्या झाडावर चढशील आणि हरभऱ्याच्या झाडाला तुझं वजन नाही मानवणार आणि ते झाडही मोडेल आणि तुही त्यावरून खाली पडशील.
शाल्मली--- मी झाडावरून खाली पडले तरी तु असशीलच ना मला सावरायला.
आदित्य--- वाट बघ
शाल्मली--- आदू मला खात्री आहे की जेव्हाही कधी मी कुठून आणि कधीही कोसळले तरी तिथे माझा आदू मला सावरायला सर्वात आधी हजर असेल.
शाल्मलीचे हे बोलणं ऐकून मेघनाच्या चेहऱ्यावरचा रंग पार उडून गेला होता. तेवढ्यात मुव्ही सुरू होणार असल्याची announcment झाली, मेघना आदित्यला काही बोलनार तेवढ्यात शाल्मली आदित्यचा हात धरून त्याला ओढत घेऊन गेली, पाठोपाठ शिवानी व मेघनाही मूव्ही बघायला गेल्या. आदित्य व शाल्मली पुढच्या रांगेत बसले होते तर मेघना व शिवानी त्यांच्या मागच्या रांगेत बसले होते. मुव्ही सुरू झाला, हॉरर मुव्ही असल्याने शाल्मली आदित्यचा हात घट्ट पकडून बसली होती. मेघनाचे लक्ष मूव्ही कडे कमी आदित्य व शाल्मली कडेच जास्त होते.
मूव्ही संपल्यावर आदित्य व शाल्मली थिएटर बाहेर पडले पाठोपाठ शिवानी व मेघनाही बाहेर पडले.
आदित्य--- तुमचा पुढील प्लॅन काय आहे?
शिवानी--- काहीतरी इटींग आणि शॉपिंग
शाल्मली--- आदू मलाही भूक लागलीय चल आपण पण काहीतरी खाऊया.
आदित्य--- मेघना , शिवानी चला आपण फूड कोर्ट मध्ये जाऊया.
आदित्य,मेघना, शिवानी आणि शाल्मली फूड कोर्टकडे जायला निघतात, मेघना काहीच बोलत नसल्याने आदित्य शिवानीला खुणेने विचारतो की मेघनाला काय झालंय? शिवानी खुणेनेच सांगते की मला माहित नाही. फूड कोर्टमध्ये जाऊन सर्वजण आपापल्या आवडीचे पदार्थ मागवतात आणि सोबत गप्पाही मारतात.
शाल्मली--- मेघना, शिवानी कंपनीत आदू जर तुमच्यावर बॉस गिरी करत असेल तर मला सांगा, मी बरोबर त्याला सरळ करते.
शिवानी--- आदित्य सर कामाच्या बाबतीत स्ट्रिक्ट आहेत पण बॉस गिरी नाही करत.
शाल्मली--- मेघना खूप कमी बोलते वाटत.
आदित्य--- हो, शालू ती सुरवातीला माझ्याशी काहीच नाही बोलायची, मी एकदा तिला स्माईल दिली होती तर तिने स्माईल सुद्धा दिली नव्हती, जवळजवळ एक महिना झाल्या नंतर ती माझ्याशी बोलायला लागली.( आदित्य मेघनाची खेचत होता, मेघनाला आदित्य शाल्मली समोर खेचतोय हे पाहून खूप राग आला होता पण तिने तस दाखवलं नाही)
शिवानी--- शाल्मली मेघना अनोळखी लोकांशी लवकर बोलू शकत नाही, तिचा स्वभावच तसा आहे.
शाल्मली--- हो पण मेघना कॉर्पोरेट क्षेत्रात अस अबोल राहून चालत नाही.
मेघना--- मला फ्रेंडली व्हायला थोडा वेळ लागतो.
शिवानी--- शाल्मली मला US बद्दल सांग ना, मला US बघण्याची खूप इच्छा आहे.
शाल्मली--- शिवानी US थोडे दिवस रहाण्यासाठी किंवा फिरण्यासाठी चांगलेच आहे, अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. बाहेर फिरल्याशिवाय आपल्या देशाची, इथल्या माणसांची किंमत कळत नाही. मी कसे दोन वर्ष काढले आहेत हे मलाच माहीत, आता तर कितीही मोठी जॉब ची संधी आली तरी मी भारत सोडून जाणार नाहीये. तुला US बघायची इच्छा असेल तर नक्कीच बघ, खूप छान देश आहे.
मेघना--- शिवानीला US चा खूप क्रेज आहे.
शाल्मली--- मलाही होता पण आता नाही राहिला.
शिवानी--- काही वाईट अनुभव आले आहेत का?
शाल्मली--- नाही ग मुळीच नाही, US मध्ये जाऊन मी आईला, बाबांना, आत्त्याला आणि आदूला खूप मिस केलंय, आईच्या हातच्या जेवणाला तर सर्वांत जास्त मिस केलं, मी थोडी इमोशनल आहे ना.
शिवानी--- ओके
आदित्य--- चला मुलींनो आपलं सर्वांच खाऊन झालंय, तुम्ही शॉपिंगला जा आम्ही घरी जातो.
शिवानी--- तुम्ही आमच्या सोबत येऊ शकता, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये.
आदित्य--- नको, घरी जाऊन मला झोपायचं आहे, रात्री हॉरर वेब सिरीज बघायची म्हणून शाल्मलीने मलाही जाग ठेवलं, हॉरर मूव्ही, वेब सिरीज झेपत नसतील तर बघायच्या कशाला?
शाल्मली--- मला आवडतात बघायला.
आदित्य--- तुझ्या आवडीच्या नादात माझ्या हाताच बघ काय करून ठेवलंय, नख वाढलेले काप, सारख हाताला धरून धरून हातावर नखाचे ओरखडे पडले आहेत.
शाल्मली--- सॉरी आदू, त्या बदल्यात मी तुला तुझ्या फेवरेट पॅन केक्स करून खाऊ घालते.
मेघना--- शिवानी आपण निघुयात का? परत आपल्याला घरी जायला उशीर होईल.
शिवानी--- हो चालेल, शाल्मली NICE TO MEET YOU
शाल्मली--- SAME HERE
शिवानीला हे कळून चुकलं होत की आदित्य व शाल्मलीला एकत्र पाहून मेघनाला वाईट वाटले आहे.
©®Dr Supriya Dighe
