चहा आणि बरंच काही भाग १०

Story of friendship

          आपण मागील भागात बघितलं, मेघना आदित्यसोबत तुटकपणे वागत होती. आदित्यला मेघना अशी का वागत आहे याचे कारण जाणून घ्यायचे होते म्हणून आदित्य मेघनाला कंपनी सुटल्यावर भेटण्यास सांगतो. मेघना आदित्यला भेटायला तयार होते.

           आदित्य कंपनी सुटल्यावर मेघनाची पार्किंगमध्ये वाट बघत थांबलेला असतो. मेघना थोड्याच वेळात पार्किंग मध्ये पोहोचते. आदित्य तिला गाडीत बसायला सांगतो. मेघना गाडीत बसल्यावर आदित्य तिला एका कॉफी शॉप मध्ये घेऊन जातो. कॉफी शॉप पर्यंत जाताना गाडीत दोघेही एकमेकांशी काहीच बोलत नाही. कॉफी शॉप मध्ये गेल्यावर आदित्य व मेघना एका टेबलच्या इथे बसतात, आदित्य कॉफीची ऑर्डर देतो.

मेघना--- आदित्य आज चहा वरून कॉफी वर उडी कशी काय?

आदित्य--- मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, आपल्याकडे कॅफेत कॉफीच भेटते चहा नाही आणि शिवाय चहा टपरीवर भेटतो किंवा अशा हॉटेलमध्ये भेटतो जिथे आपल्याला गप्पा मारता नसत्या आल्या. आणि तसही मुलींना चहा पेक्षा कॉफीच जास्त आवडते.

मेघना--- मला म्हणशील तर मला चहाच जास्त आवडतो, मी तुझ्याइतकी चहाप्रेमी नाहीये पण मला चहा प्यायला आवडतो, ते सोड तुला माझ्याशी काय बोलायच आहे?

आदित्य--- मेघना तु माझ्याशी एवढं तुटकपणे का वागत आहेस? मला तुझा अश्या वागण्याचा अर्थच कळत नाहीये.

मेघना--- मी कुठे तुटकपणे वागतेय, मी तर नॉर्मलच वागत आहे.

आदित्य--- मेघना तुझं हे वागणं नॉर्मल आहे का? तु हॉस्पिटलमध्ये मला भेटायला आल्यापासून ते अगदी काल पर्वापर्यंत किती मनमोकळेपणाने बोलायची, आणि आता मात्र तुला अस काय झालंय की तू अशी वागत आहेस. मी कंपनी पुन्हा जॉईन केल्यापासून बघतोय तु वेगळीच वागत आहेस, माझं काही चुकलं आहे का?

मेघना--- आदित्य तुझा काही तरी गैरसमज होतोय.

आदित्य--- माझा काही गैरसमज होत नाहीये, तुला जर असच तुटकपणे वागायचं होत तर मला हॉस्पिटलमध्ये भेटायला यायची काय गरज होती? माझ्याशी मॅसेजवर, फोनवर बोलायची काय गरज होती? मी लहान बाळ नाहीये की तुझ्या वागण्यातला बदल मला जाणवणार नाही.

मेघना--- आदित्य तुला माझा राग आला आहे का?

आदित्य--- मला तुझा राग नाही आला, मला वाईट वाटले आहे, कस आहे ना मेघना, आपण एकमेकांना आत्ताच ओळखायला लागलो आहोत, तुला मॅसेज करणं, तुझ्याशी फोनवर बोलणं मलाही आवडायचं, मला वाटलं होत की आपल्यात खूप छान मैत्री होईल पण आता तुझ्या अशा तुटक वागण्यामुळे मला नाही वाटत की आपल्यात मैत्री होऊ शकेल.

मेघना--- आदित्य तु एकदम टोकाच्या भूमिकेपर्यंत येऊन ठेपला आहेस. तुला जे वाटतंय तस काही नाहीये. मी तुला माझा चांगला मित्रच समजते, मलाही आपल्यातील मैत्री आवडते.

आदित्य--- तुझ्या तुटक वागण्याचा अर्थ सांगशील का?

मेघना--- माझ्या मनमोकळेपणाने बोलण्याचा तु चुकीचा अर्थ काढशील याची मला भीती वाटत होती.

आदित्य--- चुकीचा अर्थ म्हणजे मी समजलो नाही.

मेघना--- अरे म्हणजे तुला माझ्या फ्री वागण्यातून अस वाटलं असतं की मी तुझ्या म्हणजे मला कस सांगू तेच कळत नाहीये.

आदित्य--- एक मिनिटं, म्हणजे तुला अस म्हणायचंय का की तु माझ्या प्रेमात पडलीस का? अस मला वाटू शकतं.

मेघना--- हो ( खाली मान घालून)

आदित्य--- तुला हे कोणी सांगितल?

मेघना--- शिवानी

आदित्य--- ती वेडी आहे का? तीच ठीक आहे पण तुलाही अस वाटू कस शकतं?

मेघना--- शिवानीकडे मी आपल्यात जे बोलणं झालं ते सर्व सांगायची आणि त्यावर माझी प्रतिक्रिया बघून तिला अस वाटलं की मी तुझ्या प्रेमात पडली आहे.

आदित्य--- मग खरंच तस काही आहे का?

मेघना--- नाही रे, मला तुझ्याशी बोलायला आवडतं, तु मला मित्र म्हणून आवडतो, त्या पलीकडे अजून काही नाही.

आदित्य--- मग झालं तर, म्हणून तु माझ्याशी तुटकपणे वागायचीस.

मेघना--- हो, मला तुझ्याशी मनमोकळेपणाने बोलायची इच्छा व्हायची पण मी स्वतःला आवर घालायचे.

आदित्य--- मेघना तु वेडी आहेस. मला मान्य आहे, शिवानी तुझी खूप जवळची मैत्रीण आहे पण ती अस काही म्हणाली म्हणून लगेच माझ्याशी मैत्री तोडणार होतीस का?

मेघना--- आदित्य शिवानीने तुझ्याशी मैत्री तोडायला नव्हती सांगितली, उलट तिने मला अस सांगितलं होतं की आदित्य मित्र म्हणून खूप चांगला आहे, त्याच्याशी मैत्री ठेव. मीच चुकीचा अर्थ काढला.

आदित्य--- आता माझ्या सोबत नीट बोलशील का?

मेघना--- हो पण एका अटीवर

आदित्य--- कुठल्या?

मेघना--- आपण त्या दिवशी गाडी बंद पडलेली जिथे चहा प्यायला होता तिथे मला चहा प्यायचा आहे.

आदित्य--- मेघना खरच तु वेडी आहेस

मेघना--- आदित्य एक रिकवेस्ट करू का?

आदित्य--- कर ना

मेघना--- शिवानीला तु काही बोलणार नाहीस

आदित्य--- हो चालेल पण यापुढे तु अस मूर्खा सारख वागणार नसशील तर.

मेघना--- हो, इथून पुढे अस नाही वागणार.

          मेघना आणि आदित्य कॉफी शॉप मधून बाहेर पडतात. आदित्य मेघनाला चहा पिण्यासाठी त्या ठिकाणी घेऊन जातो. आदित्यला चहा पिण्यासाठी पार्टनर भेटली होती. चहा पिऊन झाल्यावर आदित्यने मेघनाला तिच्या घरी सोडवले.

            आता मेघना आणि आदित्यमध्ये पहिल्याप्रमाणे मॅसेज, फोन होऊ लागले. कंपनीत असताना दोघेही एकमेकांशी तटस्थ वागायचे. मेघना शिवानीला आदित्य बद्दल जास्त काही सांगायची नाही. मेघना आणि आदित्यमध्ये खूप छान मैत्री झाली होती. मेघना आदित्यशी सर्व काही बोलायची, म्हणजे अगदी घरात कोणाशी भांडण झाल तरी पहिले आदित्यला सांगायची, ती हळूहळू सगळंच आदित्यशी शेअर करायला लागली. 

काही नाती बांधलेली असतात,

ती सगळीच खरी नसतात,

बांधलेली नाती जपावी लागतात,

काही जपून ही पोकळ राहतात,

काही मात्र आपोआप जपली जातात,

कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात.

©®Dr Supriya Dighe

            

🎭 Series Post

View all