ते गेल्यावर

कुठे जायचं फिरायला म्हटलं की म्हातारी मंडळी अडगळ होते तेव्हा काय होतं? एका सासू सुनेची मार्मिक बोध कथा
नवरात्र उठलं तसं बोरकरांच्या घरात दिवाळीची तयारी सुरु झाली. अडगळ काढा. घर दार धुवा, लिपाई पोताई करा. दिवे रंगवा. तसे सासू सासरे खूप चांगल्या स्वभावाचे. कशाचीच सक्ती नाही पण दिवाळी कुटुंबा सोबतच साजरी करायची असा घरातील नेम. सून अन्वीला याची सवय झालेली. दहा वर्ष झालेली तिला या घरात लग्न होऊन येऊन. नवीनच लग्न करून आलेली असतांना एकदा तिने असंच टीव्हीवर राजस्थान, जयपूरला होणाऱ्या दिवाळी सोहळ्या बद्दल बघितलं. तेव्हापासून तिची खूप इच्छा, एकदा तरी जयपूरला जाऊन तिथली दिवाळी अनुभवावी. तेव्हा तिने आपली इच्छा नवरोबा शिरीषला सांगितलीही. पण त्याने साफ नकार दिला. म्हणाला,
"जेव्हा पर्यंत आई बाबा आहेत तेव्हा पर्यंत दिवाळी आणि इतर सणही घरीच, त्यांच्या सोबत साजरे होणार."

"अहो मी कुठे म्हणतेय त्यांना सोडून जायचं. त्यांना सोबतच घेऊन जाऊ ना. म्हणजे त्यांनाही नवीन काहीतरी अनुभवायला मिळेल." अन्वी म्हणाली.

"आणि अर्धांगवायू असलेल्या आजीला कुठे ठेवायचं? बाबा तिला सोडून कुठेही जाणार नाहीत. तेव्हा हा विषय परत नको. ते आहेत तेव्हा पर्यंत तरी. ते गेल्यावर बघू." शिरीष स्पष्टपणे बोलला. अन्वी हिरमुसली. त्यावेळी तिच्या मनात आलं,
"आता का कुठे जायचं, काही करायचं यासाठी यांच्या (सासू सासऱ्यांच्या) मरणाची वाट बघू मी? असो पहिलीच दिवाळी आहे. आनंदात जायला हवी."

आता दहा वर्षांनी परत जवळ आलेली दिवाळी बघून तिला तिच्या इच्छेची आठवण झाली. पण तिचं ऐकणार कोण? तरीही तिने एकदा प्रयत्न करून बघायचं ठरवलं.

रविवार दिवशी सकाळी मुलं खेळायला म्हणून बाहेर गेलेली असतांना आणि शिरीष खोलीत निवांत पेपर वाचत बसला होता. अन्वी देवपूजा करून कपूर द्यायच्या बहाण्याने शिरीष जवळ आली.

मोकळ्या, ओल्या केसांमधे ती कमालीची आकर्षक दिसत होती. ती कपूर देऊन जाणार तोच शिरीषने पेपर बाजूला ठेऊन तिला थांबवलं.

"अहो थांबा राणी साहेब. बसा आमच्या जवळ. दोन क्षण गप्पा मारा प्रेमाच्या आमच्या सोबत." शिरीष म्हणाला.

तशी अन्वी लाजली, "काहीही, आई बाबा बसले आहेत हॉल मधे. काय म्हणतील ते?"

"काय म्हणतील म्हणजे? नवरा बायको गप्पा मारत आहेत आणखी काय?" तो उत्तरला.

"अहो पण..." अन्वी उठत म्हणाली.

"पण बिन काही नाही." शिरीषने तिचा हात पकडला, "बसायचं म्हटलं ना मग बसायचं. किती दिवस झालेत आपण निवांत बसून बोललोच नाही."

"काय करणार साहेब? मला घर, मुलां पासून आणि तुम्हाला तुमच्या नौकरी पासून वेळच मिळत नाही. एकच विश्व असलेलो आपण आज दोन विश्वात वाटल्या गेलोय आणि जणू कैद झालोत दोघेही आपापल्या विश्वात." अन्वी भावूक होऊन म्हणाली.

"ए माफ कर हं. आजकाल खूप कमी वेळ देतोय तुला. घरी आल्यावर आई बाबा सोबत गप्पा मारण्यात कधी वेळ जातो कळत नाही. मग मुलांचं आपलं काहीतरी असतंच अन तु आपली स्वयंपाक खोलीत नाहीतर आजीच्या दिमतीत असतेस." शिरीष तिला म्हणाला, "मला सारखं अपराधी वाटतं तुला वेळ नाही देऊ शकत म्हणून. तेव्हा सांग या दिवाळीला तुला पाडव्याला काय देऊ?"

"असू द्या हो सगळंच तर आहे माझ्याकडे." अन्वी आजूबाजूला मुलांनी केलेला पसारा आवरत म्हणाली.

"अरे असं नाही गं. नवऱ्याने देतो म्हटलं कि पटकन घेऊन घ्यायचं." शिरीष म्हणाला.
"खरंच मी मागेल ते देणार तुम्ही मला?" अन्वीने खात्री करून घ्यायला विचारलं.

"अरे म्हणजे असं काय हिरे मोती मागणार आहेस बाई तु? तरीही माग. माझ्या ऐपतीत असेल तर नक्कीच देणार." शिरीष म्हणाला.

"मग दिवाळीला जयपूरला घेऊन चला." अन्वी चमक भरलेल्या डोळ्यांना मोठ्ठ करून पटकन म्हणाली.

शिरीष उठून उभा झाला, "काय हे अन्वी? लग्न होऊन दहा वर्ष झाले तरी आजही तेच. आपली पहिली दिवाळी होती तेव्हाच मी तुला सांगितलं होतं कि आई बाबा असे पर्यंत तरी दिवाळी ही कुटुंबा सोबतच साजरी करायची. जे काही करायचं ते, ते गेल्यावरच. तरीही तु मला परत तेच बोलतेस."

"तुम्ही हवं ते माग म्हणाले म्हणून बोलली. परत नाही बोलणार." अन्वीचे डोळे भरून आले. ती तशीच अश्रू पुसत खोली बाहेर निघून गेली. अन्वीला शोधत शिरीष च्या खोली जवळ येऊन पोहोचलेल्या तिच्या सासूबाईनी, गोदावरी बाईनी सर्व ऐकलं आणि बघितलंही. पण त्या कोणाला काहीच बोलल्या नाही.

दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली. मुलांची फटाक्यांची यादी तयार झाली. नवीन कपड्यांची खरेदी झाली. घरा दारात लाडू, चकल्या, अनारसे यांचा घमघमाट पसरला. अन्वी तुळशी जवळ दिवा लावून स्वयंपाक करायला भिडली.

शिरीष ऑफिस मधून आल्यावर हातपाय धुवून रोज सारखं त्याच्या आई बाबा जवळ चहा पाणी घेत गप्पा मारायला बसला. श्रीयुत बोरकरनी, म्हणजे शिरीषच्या बाबाने एक लिफाफा त्याच्या हातात दिला.

"हे काय बाबा?" शिरीषने लिफाफ्यातील कागद बाहेर काढत विचारलं.

"आमच्या कडून तुला आणि सुनबाईला दिवाळीचं गिफ्ट." श्रीयुत बोरकर गोदावरी बाईंकडे बघून स्मित हास्य करून म्हणाले.

"जयपूरची तिकिटं. तेही चारच दिवसा नंतरची. पण चार दिवसा नंतर तर दिवाळी आहे." शिरीष आश्चर्याने म्हणाला. त्याला अन्वीची इच्छा आठवली आणि त्याची तळपायाची आग मस्तकात गेली, "अन्वी बोलली का काही तुम्हाला? कवडीची अक्कल नाही या बाईला इतकं समजावलं तरीही तुमच्या जवळ गाऱ्हाणं घेऊन आली ती?"

अन्वीने ऐकलं तशी ती हॉल मधे आली अन कावरी बावरी होऊन म्हणाली, "नाही हो मी काहीच नाही बोलली आई बाबाला. खरंच सांगते."

"अरे शांत व्हा दोघेही आणि मी काय सांगते ते ऐका बरं." गोदावरी बाई म्हणाल्या, "अन्वी गॅस बंद करून ये."

अन्वी लगेच गॅस बंद करून आली. कोपऱ्यात अपराध्या सारखी उभी राहून कधी शिरीष कडे बघत होती तर कधी सासू सासऱ्यांकडे. तर शिरीष डोक्याला हात लावून बसला होता.

"तो हात काढ शिरीष बाळ डोक्यावरून." श्रीयुत बोरकर म्हणाले. तसा शिरीष हात बाजूला करून बसला. "बरं शिरीषची आई तुम्ही सांगता कि आम्ही बोलू?"

"बोला हो तुम्हीच." गोदावरी बाई म्हणाल्या. शिरीष आणि अन्वीला समजेना हे काय सुरु आहे म्हणून.

"तूझ्या आईला भारी हौस भजन म्हणायची, तीर्थ यात्रेला जायची. एका वर्षी तु लहान असतांना तिची मोठी बहीण आषाढी एकादशीच्या पंढरपूर यात्रेला पालखी सोबत पुणे ते पंढरपूर पायी जाऊन आली. तिने वारीचा जो सोहळा वर्णन केला हिलाही ओढ लागली पालखी सोबत जायची. हिचा रोजचा एकच नांदा, पुण्यातच राहतो आपण. यावर्षी मी जाणारच पालखी सोबत. मला त्या रिंगणात फुगडी खेळायची आहे. बायकांसोबत रात्री जागून भजनं म्हणायची आहेत. आता पासुनच सांगतेय. तुम्ही नाही आले तरी मला पाठवा ताईसोबत. मीही हो ला हो भरलं. आषाढी एकादशी जवळ आली आणि... " बोरकर बोलता बोलता थांबले.

"आणि यांच्या आईला म्हणजे तुमच्या आजीला अर्धांगवायूचा झटका आला. मग त्यांना सोडून कसं जाणार? यांची, सासऱ्यांची भाकर कोण करणार म्हणून माझं जाणं पुढे ढकलल्या गेलं. डॉक्टर म्हणाले सासूबाई जास्त दिवस जगणार नाहीत. मन म्हटलं त्या वरती गेल्यावरच जाऊ आता वारीला. पण गंम्मत बघा. सासरे हृदय विकाराने गेले आणि बिछान्यावर पडलेल्या सासूबाई तिस वर्ष होऊन आजही जगत आहेत." गोदावरी बाई डोळे पुसून परत बोलू लागल्या, "तुम्हाला वाटत असेल अशी कशी आपली आई आपल्या सासूच्या मरणाची वाट बघतेय. पण अशा परिस्थितीत आणखी कसे विचार येतील मनात?"
"आई अन्वी आली तेव्हाच बोलायची ना तुझी इच्छा. तिने सांभाळलं असतं सगळं. आजीचेही मनोभावाने करते ती." शिरीष गोदावरी बाईचा हात हातात घेऊन म्हणाला.

"हो आई मी बघितलं असतं आणि मी तर म्हणते या वर्षी जाच तुम्ही. मी आहे करायला सगळं." अन्वीही पुढे होऊन म्हणाली.

"हो तु आहेसच गुणी पोर." श्रीयुत बोरकर बोलू लागले, "त्या दिवशी तुला शोधत तूझ्या खोली समोर आलेल्या हिने अनावधानाने तुम्हा दोघांचं संभाषण ऐकलं आणि मला येऊन सांगितलं. म्हणाली, कशाला पोरीला आपल्या मरणाची वाट बघायला लावायचं एका छोट्याशा इच्छे पायी? जसं माझं झालं तिचं नाही होऊ द्यायचं. आपणच पाठवू त्यांना जयपूरची दिवाळी पाहायला." श्रीयुत बोरकर म्हणाले.

अन्वी जाऊन गोदावरी बाईच्या गळ्यात पडली, "मला माफ करा. मी नको तो मोह केला. मी नाही जायची सणासुदीला तुम्हाला सोडून कुठे जयपूर वगैरे. तिथेही दिवेच असणार दिवाळीत अजून काय?"

"नाही बरं का. मिळालेली संधी गमवायची नाही. छान एंजॉय करा." श्रीयुत बोरकर म्हणाले.

"ठीक आहे जातो आम्ही. पण एका अटीवर. बाबा तुम्ही आणि आई जा या वर्षी वारीत आषाढी एकादशीच्या अन आम्ही दोघे करू आजीचं सगळं." अन्वी म्हणाली.

तसा शिरीषही पुढे झाला, "हो आई बाबा, हे पटलं मला. अगदी माझ्या मनाचं बोलली अन्वी."

"असं असेल तर नक्कीच जाऊ आम्ही. काय श्रीमती चालणार ना?" श्रीयुत बोरकर म्हणाले.

गोदावरी बाईच्या चेहऱ्यावर समाधानी स्मित उभरलं.

समाप्त !