Login

ते एकटे आहेत भाग 5 अंतिम

ते एकटे आहेत पण कोणामुळे
ते एकटे आहेत भाग 5 अंतिम

©️®️शिल्पा सुतार

काका काकू हळूच बाहेर येऊन बसले. "बघ प्रभा मी म्हणतो ना तसच होईल. आता डॉक्टर सुहासला काहीही सांगून बाहेर पाठवतील. आपल्याला स्पेशलिस्टचा नंबर देणार नाही. त्यांना असं वाटतं की आपण त्यांच्याकडे यावं. आपली फी इतरांना जायला नको."

"तेच तर आपण पुढच्या वेळी दुसरा चांगला डॉक्टर बघू." काकू बोलल्या.

सुहास बाहेर आला." काय म्हटले डॉक्टर? "

" तब्येत ठीक आहे. एवढच बोलले. "

" दुसर्‍या डॉक्टरचा नंबर दिला का?"

"त्याची काही गरज नाही बाबा. तुम्ही असे कसे या डॉक्टरच्या तोंडावर दुसर्‍या डॉक्टरचा नंबर मागतात. अस होत तर आधी इथे का आलात? काहीही बोलायच का?" सुहास चिडला.

"प्रभा बघीतल का कस बोलतो हा. "

" चला आता. " बाहेर आल्यानंतर दोघांचे महिनाभराचे औषध घेतले. दोघांना कारमध्ये बसवलं

"हे डॉक्टर आम्हाला गोळ्या देत नाही. काही विशेष ट्रीटमेंट सुरू नाही. " काका बोलले.

" तशी गरज नसेल आई-बाबा. तुमची तब्येत चांगली आहे. व्यवस्थित जेवत जा. सकाळी वॉकला जात जा. फक्त जरा शांत राहत जा. आणि हे औषध घेत जा बाकी काही नाही." सुहास अजूनही त्यांना समजावत होता.

"हे असं आहे तुम्हा मुलांना ना आमची काळजीच नाही. तुला माहिती का आम्हाला काय होत ते. तू तसं आणि तो तुझा दादा तसा. हे बघ प्रभा हे असं आहे महिन्यातुन एकदा आई-वडिलांना दवाखान्यात नेऊन आणलं की नंतर त्यांच्याकडे बघायलाच नको. झाल यांच कर्तव्य."

"हो अहो. काही करायला नको याला आणि याच्या बायकोला. आपल्याला काही झाल तर आपल आपल्याला बघण आहे. त्या पेक्षा उद्या आपण दुसर्‍या डॉक्टर कडे जावू. सुहास तू उद्या सकाळी ये."

"मला जमणार नाही. एक तर तुम्हाला काहीही झाल नाही. उगीच या डॉक्टर कडे त्या डॉक्टर कडे करू नका. मला आणि माझ्या बायकोला उगीच काही बोलू नका. " तो चिडला.

" जबाबदारी नको आहे यांना. तोंडावर नाही म्हणतो. मग थोड्या वेळा पूर्वी का बोलला होता की ड्रायवर पाठवला असता. आपल्या मुलांना वळण नाही. आपल्याला कोणाचा आधार नाही. आपण वॉचमनला सोबत घेवून जावू. " प्रभा ताई बोलल्या.

"जा घेवून कोणालाही मला पर्वा नाही. " सुहास चिडला होता. त्याने बाजूला कार उभी केली. "कशामुळे झालं आहे हे असं आई-बाबा? काय आहे नेहमी तेच तेच. मी आलो की तुम्ही नेहमी वाटेल ते बोलतात. तिथे डॉक्टर समोर ही म्हणालात की मला तुमची प्रॉपर्टी हवी आहे. काहीही अगदी. तुम्हाला वाटतं का की दादा प्रमाणे मी ही तुमच्या कडे नको यायला. दादा करतो ते बरोबर आहे. तुम्हाला एकट पाडल पाहिजे. तुम्ही दोघांनी आम्हाला अगदी नको नको करून सोडले आहे. मला ना आता वैताग आला आहे.

वडीलधारी म्हणून किती वेळ गप्प बसणार. जरा शांत रहात चला. आम्हाला सुद्धा आणि आमच्या बायकांना सुद्धा तुम्ही दोघांनी खूप त्रास दिला आहे. हे दिसतं का सगळ्यांना. सगळीकडे काय आमची बदनामी करतात. ते बंद करा आधी.

आपण सेपरेट राहणं हेच उत्तम आहे. नाहीतर लग्नाला 30-40 वर्ष होऊन जातात तरी घरच्या बायकांचा त्रास संपत नाही. घरचे म्हातारे लोक त्यांना त्रास देत राहतात हे योग्य नाही. घरच्या सुनांना घरात आपलेपण वाटल पाहिजे. " खूप बोलला तो पण काका काकू मधे काहीही फरक पडला नाही.

" पाहील का हो याच्या बायकोला म्हणे आपण त्रास देतो. ती याचे कान भरते. " प्रभा ताई बोलल्या.

" हो आणि हा आपल्याला येवून बोलतो. "काका बोलले.

" आई प्लीज काहीही काय अर्थ काढते आहेस. तुमच्याशी बोलायला नको. " सुहासने घर आल्यानंतर त्या दोघांना कार मधून उतरवून दिल. घरातही न येता तो निघून गेला.

प्रभा ताईंनी डोळ्याला पदर लावला.

" नको त्रास करून घेवू प्रभा. रडू नको. सावर. आपले मुल चांगले वागत नाहीत. "

समोरच्या सोसायटीत नवीन राहिला आलेले एक मुलगा पळत आला. त्याने काकांना गेटचा कुलूप उघडायला मदत केली. काका-काकू दोघं आत आले.

"तुम्ही एकटे रहातात का इथे?"

"हो बेटा काय करणार ? आम्हाला चांगले दोन मुल आहेत . शिकलेले मोठ्या पगाराची नोकरी करणारे. ते आम्हाला मदत करत नाहीत. आमची परवड होते बघ." ते घरात येऊन बसले.

तो मुलगा निघाला. तो विचार करत होता. किती त्रास आहे काका काकूंना. त्यांचे मुलं त्यांच्याकडे लक्ष का देत नाही. शी काय मुल आहेत.