ते ५ दिवस

आज जागतिक महिला दिवस. आज सर्वांना धुमारे फुटतील स्त्रीशक्तीचे. जिला एरवी पायदळी तुडवले जात??

आज जागतिक महिला दिवस.

       आज सर्वांना धुमारे फुटतील स्त्रीशक्तीचे. जिला एरवी पायदळी तुडवले जाते, जिच्यावर सर्रास विनोद बनवले जातात, जीची चारचौघात बिनधास्तपणे टर उडविली जाते, आज तिच्या नावाने सगळे उदो उदो करणार.

कोणी केक आणेल आपल्या बायकोसाठी, तर कोणी गुलाब आणि गिफ्टस. इतरवेळी आपला चहाचा कपही न उचलणारा नवरा चक्क किचन मध्ये जाऊन जेवणही बनवेल कदाचित. अपवाद आईसोबत राहणाऱ्यांना, कारण ती पण एक महिला आहे ना घरात. मग फक्त केक आणला की कसं, दोघीही खुश. बाकी रहाटगाडे कोणाला चुकणार?

असो, तर आज बऱ्याच घरांमध्ये महिलादिन साजरा होणार हे मात्र नक्की!

         सुशिक्षित आणि शिकलेला आजचा समाज स्त्रियांना बऱ्याच प्रमाणात योग्य वागणूक देऊ लागला आहे. स्त्री-पुरुष समानता आता रुजू लागली आहे. पण काही गोष्टी अजूनही अपवाद आहेत. आणि सगळ्यात मोठा अपवाद म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी. आजही शिकलेल्या आणि प्रतिष्ठित समाजात स्त्रियांना मासिक पाळीमध्ये वेगळे बसवले जाते. ते ५ दिवस तिला वेगळे बसवणारी तिची शिकलेली आई आणि सासुच असते. मग अशिक्षितांची गोष्टच सोडा. जेव्हा एक नवी नवरी लग्न करून सासरी जाते, सगळ्या गोष्टी ती आत्मसात करते. रितीरिवाज आपले मानून सांभाळू लागते. आणि मग एके दिवशी येते तिची मासिक पाळी. सासूला समजतं आणि मग सुरू होते तिची परवड. तिला बाजूला कसं बसायचं हे समजावलं जातं, जेवणाचे ताट वेगळे आणून दिले जाते. बिचारी घरातल्या पुरुष मंडळींच्या नजरा चुकवून वेगळी बसायला तयार होते. माहेरी मासिक पाळी आलेली कोणाला माहितीही पडत नसे आणि इथे तर जगजाहीर झालेली असते तिची पाळी. 

        घरी आलेले पाहुणे असो की अजून कोणी सगळ्यांना ती दिसते वेगळी बसलेली. काय करणार ती तरी? ज्याच्या भरवशावर या घरात आले, त्यालाच यात काही गैर वाटत नाही, तर बोलणार कोणाला? सासू, जावा, नणंदा, या पण तर स्त्रियाच आहेत ना? पण त्यांनाही हे सगळं योग्य वाटत असतं, मग ती कोणाविरुद्ध आणि कुठे आवाज उठवणार? बरं फक्त बाजूला बसवून यांचं पोट नाही भरत. या दिवसांत तिला आराम देण्याऐवजी कपडे धुणे, भांडी घासणे, झाडलोट ही कामं बिनबोभाट दिली जातात. तिने जेवण बनवलेले मात्र चालत नाही. तिचा वारा लागला तर पापाचे धनी होणार असा यांचा समज. पण तिने अंगमेहनत केलेली चालते. त्यात पण यांची जबरदस्ती पॅड नाही वापरायचे, का तर ते टाकायला डस्टबिन वापरावा लागेल, आणि बहुतांश घरातला डस्टबीन असतो किचन मध्ये. कधीही कापड न वापरलेल्या तिला ही गोष्ट मात्र खटकते. मग काय कित्येक जणी सासरच्या या गोष्टी टाळण्यासाठी जाऊन बसतात माहेरी ५ दिवस. पण काहींच्या माहेरीही तीच परिस्थिती असते, पण सासरच्या कामांपासून सुटका म्हणून मग माहेरचा पर्याय निवडला जातो.

         ही झाली घरातली परिस्थिती. बाहेर तर आणखी वेगळी तऱ्हा. पॅड आणायला मेडिकलला जायचं टेन्शन.

कधी येणार तो दिवस जेव्हा ती बिनधास्त मेडिकल ला जाऊ शकेल आणि गोळ्या औषधं मागतो तितक्याच ठसक्यात ती पॅडची मागणी करू शकेल? मेडिकल मध्ये लेडीज असेल तर ठीक, पण मग नसेल तर काय? हिम्मत करून मागितले की, मग देतात ते कागदात रॅप करून किंवा लपून छपून. आणि मग आजूबाजूच्या लोकांच्या नजरा चुकवून भरायचे ते बॅगेत. कधी टाकता येतील पॅड बिनधास्त पर्स मध्ये लोकांच्या गर्दीत?

          मासिक पाळी म्हणजे विटाळ हे मुलींना फक्त शिकवलं नाही जात, तर त्यांच्या मनात बिंबवलं जातं. कधी शिकवलं जाणार की, पाळी इतकं पवित्र निसर्गात दुसरं काहीच नाही. ज्या रक्तात गर्भ ९ महिने वाढतो, ते रक्त दूषित असेल, तर मग जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती ही अपवित्रच आहे. आणि तिला बाजूला बसवणारा प्रत्येकजण सुद्धा तिच्यापेक्षा जास्त अपवित्र आहे. वाईट वाटते आपल्या समाजाचे. एकीकडे स्त्री शिक्षणाचे आणि महिला सबलीकरणासाठी पोवाडे गायले जातात, आणि दुसरीकडे ते ५ दिवस त्याच स्त्रीला बाजूला बसवले जाते. पूर्वापार चालत आलेल्या या परंपरा; पण कुठेतरी कोणीतरी थांबवायला हव्या ना! 

          स्त्रीच स्त्रीची ही परवड थांबवू शकते. तीच आहे जिने ठरवले तर ती खंबीरपणे या गोष्टी थांबवू शकते. या मासिक पाळीचे महत्व सर्वांना समजले पाहिजे. ते ५ दिवस नसते तर ९ महिने तो अंकुरही तिच्या गर्भात रुजला नसता, हे तिलाच सांगता आले पाहिजे. "आली आहे माझी पाळी. म्हणून काय झालं? करेन मी जेवण, आणि देवपूजा", असं ठणकावून म्हणणारी दुर्गा प्रत्येक घरात जन्मली, तरच महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल.

तू जननी या विश्वाची.

ही लढाई तुझ्या अस्तित्वाची.

तुझ्या हक्काच्या ५ दिवसांची...