"तात्या"

It is real story of my uncle... I wrote in short the journey of my uncles life...

                            

    "बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय..." असा आवाज कानावर पडला की मी आमच्या घरातून पलीकडच्या घरात उड्या मारत पळत सुटायचा... चार ते पाच ढेंगातच काकूच्या स्वयंपाक घरापासून ते माळीतून थेट सोप्यापर्यंत पोहोचायचा. कधीकधी काकू मला "खडूबळ्या त्वांड फोडून घेशील की..." म्हणायची. पण मला पोथीच्या प्रसादाची ओढ लागलेली असायची. सगळ्यांना प्रसाद वाटायचा आणि राहिलेला सगळा आपण खायचा ह्याचसाठी सगळी पळापळ असायची...
     पुण्याहून माझ्या वडिलांनी मला व आईला आमच्या गावी राहायला पाठवलं होतं. वयाच्या सातव्या वर्षापासून माझं आयुष्य माझ्या गावात एक मार्गी सरळ सरळ चालू झालं होतं. आई आणि माझे चुलता चुलती यांच्या हाताखालीच मी लहानाचा मोठा झालो.वडील पुण्यालाच असल्यामुळे त्यांच्या पत्राची, फोनची आणि त्यांच्या येण्याची नेहमीच ओढ वाटायची. पण तात्यांच्या छत्राखाली ती उणिवही भरून निघू लागली... तात्यांनी त्यांच्या मुलांत आणि माझ्यात कधी फरक केलाच नाही. तात्या आमच्या वडिलांपेक्षा लहान होते पण त्यांचं लग्न आधी आणि माझ्या वडिलांचं नंतर झाल्यामुळे मी सगळ्यात लहान आणि सगळ्यांचा लाडका होतो.
     पोथीच्या प्रसाद वाटण्यापासून ते पोथी ऐकणे, वाचणे आणि नंतर नंतर पोथीतल्या ओव्यांचं विश्लेषण करून सांगणे असा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला पोथीतलं काही कळायचं नाही. वाटायचं " ही माणसं काय वेड्यासारखं ऐकत बसतात काय माहिती?" पण शाहीर आजोबांचं पोथीवाचन बघून मज्जा वाटायची. एक सुरात ते एक एक ओवी म्हणायचे आणि नंतर त्याचा अर्थ समजावून सांगायचे. महाभारतातल्या, रामायणातल्या कथा माझ्या बालमनाला भुरळ घालू लागल्या. त्यांचं अप्रूप वाटू लागलं. काही गोष्टी कळायच्या तर काही खोचक गोष्टी कळायच्याही नाहीत. पण पोथी ऐकण्याची, वाचण्याची आवड मात्र निर्माण झाली. अध्यात्म काय असतं, ते कशाबरोबर खातात याची कल्पनाही नसताना अध्यात्मिक गोष्टींची ओढ वाटू लागली... संस्कार हे बालपणातच होतात असं म्हणतात ते काही खोटं नाही.
     भक्तिमार्ग हा सगळ्यांसाठी खुला असतो. पण त्या मार्गावरून जाणं न जाणं हे व्यक्तिपरत्वे ठरत असतं. तुकाराम महाराजांविषयी ऐकलं होतं की त्यांच्या सर्वांगातून "पांडुरंग पांडुरंग " अशा ध्वनिलहरी बाहेर पडतात. झोपेत-जागेपणीही सदैव त्यांच्या शरीराचा कणन् कण पांडुरंगाचं नामस्मरण करतो. त्यांचं अस्तित्व म्हणजे चैतन्याचं, प्रकाशाचं, करूणेचं, भक्तीचं, प्रेमाचं मूर्तिमंत उदाहरण होतं. माझ्या तात्यांनीही भक्तिमार्गच निवडलेला होता. सकाळी उठून आंघोळ झाली की ते जवळपास तास ते दीड तास देवाची पूजा प्रार्थना करत. गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ अशा दोन मुर्त्या माझ्या वडिलांनी त्यांना बनवून दिल्या होत्या. त्यांची नित्यनियमाने पूजा अर्चना करणे, त्यांना धूप-दीप लावणे, सूर्य देवाची आराधना करणे हे त्यांचं नित्याचं काम होतं. पूजा करताना त्यांच्या उघड्या अंगावरचे विभूतीचे पट्टे बघितले की वाटायचं साक्षात शंकर भगवान पृथ्वीवर अवतरले की काय? 
     तात्यांनी त्यांच्या तरुण वयात पैलवानकी केली होती असं मी ऐकलेलं होतं. त्यामुळे ते अंगापिंडाने मजबूत होते. त्यांचा खुराकही त्या मानाने मजबूतच होता. सकाळी देवपूजा झाली की त्यांचं जेवण व्हायचं. दोन तीन भाकरी ताकात कुस्करून खाणे हे नित्याचं होतं. भाकरी खाऊन झाल्यावर काकू त्यांना ताट भरून कण्या वाढायची. त्यात थोडं ताक टाकून ते फुर्र फुर्र करत कण्या वरपायचे. मला कण्या म्हणजे काय आणि त्या फुर्र फुर्र करत खायच्या असतात हे तेव्हा कळलं.
     तात्यांचा स्वभाव थोडा वेगळ्या धाटणीचा होता.
"ठेविले अनंते तैसेची रहावे" या उक्तीवर आपलं जीवन व्यतीत करणाऱ्यांमध्ये ते मोडत होते. त्यांच्या जीवनात लक्ष्य, ध्येय अशा शब्दांना थाराच नव्हता." मी हे करीन, मी ते करीन, मी हे मिळवीन, मी ते मिळवीन " अशा गोष्टी त्यांच्या उभ्या आयुष्यात गौणच होत्या.ना सुखाचा उन्माद, ना दुःखाची चाड... कितीही सुख दुःख आली तरी सदैव हसतमुख... वडाच्या झाडाने आपल्या पारंब्या जमिनीत खुपसून तटस्थ रहावं तसाच हा एक मार्गी माणूस...
     आमचा परंपरागत व्यवसाय म्हणजे कुंभारकाम. कुंभारकामात तात्यांचं कौशल्य चांगलं होतं. सकाळी लीद आणण्यापासून ते लाल माती,लीद,राख एकत्र करून त्याचा चिखल तुडवून त्या चिखलाची लोटकी, घागरी, भिश्या, धुप आरत्या अशी वेगवेगळी भांडी चाकावर बनवणे तसेच लोटकी बडवणे, घागरी बडवणे आणि त्यांना भट्टीत भाजून घेणे अशी अनेक कामे तात्या काकूला सोबत घेऊन करायचे. कधीकधी माझीही मध्येच लुडबूड असायची. तात्या चाक फिरवायचे त्यावेळी अनेक विचार मनात कडमडायचे. ते बैलगाडीच्या चाकाएवढं प्रचंड मोठं चाक तात्या अगदी सहजपणे हाताळायचे. तळात मांडीएवढा आणि वरती निमुळता होत होत माणसाच्या अनामिकेएवढा झालेला एक खुट्टा जमिनीत गाढलेला असायचा. त्याच्या टोकावर त्या चाकाचं मधलं छिद्र जुळवून एका झटक्यात ते हातानं फिरवून नंतर ते काठीच्या आधाराने गरगर फिरवायचे. एकदा चाकाने वेग धरला की त्याच्या मध्यभागी चिखल ठेवून ते घागरी, लोटकी, धूपआरत्या, झाकणं, केळ्या अशा वस्तू बनवायचे. मी मात्र तासन् तास बघत राहायचा. मला ते बघायला खूप आवडायचं. मी तात्याला म्हणायचो," तात्या, मला पण शिकवा असलं बनवायला." तर ते म्हणायचे," अजून तू बारका हाईस, अजून जरा मोठ्ठा हू, मग शिकीवतो तुला."
      बेंदराला मातीचे बैल, नागपंचमीला नाग, गणेश चतुर्थीला गणपती-हरितालिका हे सगळं तात्या काकू हातावर बनवायचे, त्यांचं बघून मी सुद्धा थोडं थोडं बनवायला शिकू लागलो... पण खूप प्रयत्न करून सुद्धा मला चाकावरचं काम कधी जमलंच नाही.बेंदराला तर घरी लहान मोठ्या पोरांचे थवेच्या थवे यायचे. "कुंभार मामा आमच्यासाठी यावर्षी एवढी मोठी बैल जोडी बनवा," असा वर पर्यंत हात करून सांगायचे. तात्यांनाही मग हुरूप चढायचा. चिखलात गनगाट्याच्या काड्या वापरून चांगले गुडघ्याएवढे मोठे चिखलाचे बैल ते बनवायचे आणि मग बेंदरादिवशी पोरांच्या रांगा लागायच्या... ते चिखलाचे बैल घ्यायला.
      गावात तात्यांचा रोजचा एक तरी फेरफटका असायचा.  गावातले बरेच लोक तात्यांकडून गार पाण्यासाठी घागरी, रांजण आणि सणासुदीला बैल, नागोबा, गणपती घेऊन जायचे. त्यामुळे बऱ्याच लोकांशी त्यांची सोयरीक जमलेली होती. लोक त्यांना 'कुंभार मामा' म्हणून ओळखायचे. डोक्यावर पांढरी टोपी, अंगात नेहरू शर्ट आणि पांढरधोट धोतर असा पेहराव त्यांच्या पुष्ट देहदंडाला शोभून दिसायचा. हत्तीच्या भक्कम पावलासारखी पावलं टाकत ते गावातून संध्याकाळी चक्कर मारायचे. लोक आपुलकीने त्यांना 'कुंभार मामा, कुंभार मामा' करत चहा प्यायला आग्रह करायचे. नको नको म्हणता त्यांचा सात-आठ कप चहा व्हायचाच. 
     रोज सकाळी सहाच्या ठोक्याला उठणं, अंगणातली- परसातली झाडलोट, अंघोळ, देवपूजा, दिवसभर कुंभारकाम आणि संध्याकाळी गावातून एक फेरफटका असा तात्यांचा नित्यनियम कधी चुकलेला मला आठवत नाही. चार मुली, एक मुलगा, बायको एवढं मोठं कुटुंब... पण संसाराच्या गाड्याचं चाक वंगण मिळालं म्हणून कधी वेगाने धावलं नाही आणि वंगण नाही म्हणून कधी कुरकुरलही नाही. ताटात येणारी भाकरी शिळी का ताजी याचा विचार कधी त्यांच्या मनाला शिवला नाही. ताटातल्या चटणी-भाकरीला पंचपक्वान्न म्हणून खाणं एवढंच त्यांना माहिती होतं. भातात मीठ कमी आहे, कालवण तिखटंच आहे, चहात साखरंच कमी आहे अशी तक्रार त्यांच्या तोंडून माझ्या आयुष्यात मी कधी ऐकली नाही.'पदरी पडलं आणि पवित्र झालं' या उक्तीनुसार परमेश्वराने जे काही दिलं त्यातच त्यांनी सुख मानलं. मुलं लहानाची मोठी केली. चारही मुलींची लग्नं लावून दिली.  मुलाला सरकारमान्य धान्य दुकानात मापाडी म्हणून कामाला लावलं. त्याचंही लग्न करून टाकलं.
     'दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही' म्हणतात... दुःखाची दरी आता मागं पडू लागली होती, हळूहळू सुखाच्या हिरवळीचा स्पर्श त्यांना सुखावत होता. नातवंडं झाली, ती अंगाखांद्यावर खेळू लागली. मुलाची नोकरीत बढती झाली. चांगल्या पगाराने घर व्यवस्थित चालू लागलं.आता तात्यांचे हात पाय थकत चालले, हातापायात पूर्वीसारखं बळ राहिलं नाही. त्यांनी कुंभार काम करणं जवळजवळ बंदच केलं. नातवंडांबरोबर खेळण्यात दिवस जाऊ लागले. माझ्या वडिलांचा कधी फोन, कधी पत्र यायचं. त्यात ते तात्यांची ख्यालीखुशाली विचारायचे. तात्यांना ते पत्र मी आवडीने वाचून दाखवायचो. पत्राच्या उत्तरात आमची खुशाली कळवायचो... माझे वडील सहा महिन्यातून- वर्षातून एकदा गावी येऊन जायचे. पण गावची यात्रा मात्र कधीच चुकवायचे नाहीत." दादाला पत्र लिव आणि मला उरसाला येताना एक धोतर जोडी आणि अंगरख्याचं कापाड घेऊन ये" म्हणून सांग, असं तात्या मला बजावून सांगायचे आणि खरोखरच उरुसाला येताना माझे वडील अगदी आठवणीनं धोतरजोडी आणि अंगरख्याचं कापड घेऊन यायचे. त्या दोघा भावांचं एकमेकावर अतोनात प्रेम होतं. असं म्हणतात की लग्न झालं की भावाचं भावावरील प्रेम कमी होतं. पण त्या दोघांच्या प्रेमात तसूभरही कधी फरक पडलेला मला जाणवला नाही. कधीकधी तात्या त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगायचे," माझ्या दादानं माझं लई लाड केलं, आपल्या पोटाला कमी खाल्लं, दोन दोन दिवस पोट बांधुन काढलं, पर माझ्या पोटाला कधी कमी पडू दिलं न्हाई. आई बाप मेल्यावर दादाच माझी आई आणि दादाच माझा बाप होता, त्येनच आमास्नी लहानाचं मोठं केलं." हे ऐकलं की डोळ्यातून पाणी कधी गालावर ओघळलं कळायचंच नाही...
      मीही आता मोठा झालो. माझ्या वडिलांनी माझं लग्न करून दिलं. लग्नाआधी आणि लग्नानंतरही नोकरीच कुठं बस्तान बसेना त्यामुळे परत एकदा पुण्याला येऊन राहिलो. पुण्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. त्यानंतर आईला व बायकोलाही पुण्याला घेऊन आलो. हां हां म्हणता पाच-सहा वर्षात मला ही एक मुलगा-  एक मुलगी झाली. सकाळी-सकाळी घरट्यातून उडून जाणाऱ्या चिमण्यांसारखे दिवस भुर्रकन उडुन चालले होते. आता माझा गावाकडचा संपर्कही कमी झाला होता. अधूनमधून भावाला फोन करून तात्यांची मी चौकशी करायचो. सहा महिन्यातून-वर्षातून गावाकडे एखादी चक्कर व्हायची. तेव्हा तात्याजवळ गेलो की तात्यांचा पहिला प्रश्न असायचा," दादा कसा हाय...  तब्येत बरी हाय का त्याची?" असं म्हणून मग इतरांची ख्यालीखुशाली ते विचारायचे.
     आता तात्यांचंही आणि माझ्या वडिलांचंही बरंच वय झालं होतं. माझ्या वडिलांना दम्याचा त्रास असल्यामुळे जास्त चालणं जमायचं नाही. तरीही ते शंभर दोनशे मीटर का होईना हळूहळू चालून यायचेच. एक दिवस संध्याकाळी चालून आल्यावर ते गेटच्या बाहेरच मटकन् खाली बसले. मी त्यांचा हात पकडून त्यांना घरात घेऊन गेलो.त्यांना पाणी प्यायला दिलं. त्यांना थोडं बरं वाटलं. पण ती रात्र त्यांच्यासाठी काळरात्र ठरली. दम्याच्या अटॅक पुढे त्यांना हार मानावी लागली. भूतलावरचं एक हृदय एका क्षणात लोप पावलं... परत कधीच न धडधडण्यासाठी...
     पहाटेपासून सगळ्या नातेवाईकांना फोन लावून वडिलांच्या निधनाची बातमी दिली. माझ्या वडिलांची इच्छा होती की त्यांच्या निधनानंतर त्यांचा अंत्यविधी त्यांच्या गावीच व्हावा. चुलत भावाला फोन करून सांगितले कि मी वडिलांचा अंत्यविधी गावीच करणार आहे त्यामुळे त्यांना तिकडे घेऊन येतोय...
      वडिलांच्या निधनाच्या बातमीने तात्यांना जणू मोठा धक्काच बसला. आकाशातून निखळून पडणाऱ्या  उल्केला जसं स्वतःचं अस्तित्व शिल्लक राहत नाही, ती निराधार होऊन जाते, अगदी तशीच तात्यांची अवस्था झाली. आम्ही सगळे ऍम्ब्युलन्समधून संध्याकाळी चार साडेचारच्या सुमारास गावी पोहोचलो. आपल्या दादाचा तो अचेतन देह बघितल्यावर तात्यांनी मृत गायीला बघून वासरू जसे हंबरडा फोडते तसा अक्षरशः हंबरडा फोडला. ते त्या अचेत देहाला गदागदा हलवू लागले. "दादा उठ की रं, बोल की माझ्याबरूबर, एकडाव शंकरू म्हणून बोलिव की मला..." असं म्हणून ओरडू लागले." माझा दादा मला सोडून गेला, माझी आय माझा बा मी बघितला न्हाई...  माझा दादाच माझी आय होती, त्योच माझा बा हुता,आता त्योच गेला तर मी तरी जगून काय करू?" असं म्हणून ते लहान मुलासारखे अक्षरशः ओक्साबोक्शी रडू लागले." मला दादापासनं येगळं करू नका," म्हणत ते माझ्या वडिलांचे पटापट मुके घेत होते.
     अंत्यविधी झाल्यानंतर आम्ही पुण्याला परत आलो. तात्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावतच चालली होती. अगदी पुढचे दोन-चार महिने त्यांनी त्यांच्या दादाचा दोसराच काढला. दादाच्या आठवणीने ते अक्षरशः व्याकुळ झाले आणि माझ्या वडिलांच्या निधनापासून अवघ्या सहाव्या महिन्यातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
     वडीलांच्या मृत्यूच्या धक्क्यातून अजून सावरलोही नव्हतो तोवर तात्यांच्या मृत्यूचा आणखी एक धक्का नियतीनं मला दिला. पुण्याहून गावी जाईपर्यंत तात्यांचा अंत्यविधी भावाने आटोपून घेतला होता. माती-कार्य उरकेपर्यंत मी गावीच थांबलो. माझे वडील आणि माझे तात्या दोन्हीही छत्रं डोक्यावरून निखळून पडली होती. सगळ्यांच्या रडण्याने घराचे रूप भेदरून गेलेल्या वासरासारखे झाले होते. घराचा आधार कायमचा निघून गेला, घराचे घरपण निघून गेले. भावाची अवस्थाही छप्पर नसलेल्या घरासारखी झाली. म्हणतात ना म्हातारी माणसं घरात असली की घराला कुलुपाची गरज नसते, त्यांच्या असण्यानेच घराला केवढा मोठा आधार असतो.
     माझ्या आयुष्यात मला माझ्या वडिलांचा कमी पण तात्यांचा सहवास जास्त लाभला... त्यांच्या असण्यानं मला माझ्या वडिलांची उणीव फार कमी भासली. स्वतःच्या मुलांसारखंच त्यांनी मला ही सांभाळलं. 'सुखात सुख असतं, तसंच दुःखातही सुखच असतं' हे  मी त्यांच्यामुळे शिकलो.
     माझे वडील आणि तात्या हे माझ्यासाठी देवापेक्षा कमी नव्हते. जीवनाचे तत्वज्ञान मी त्यांच्याकडूनच शिकलो. अशा धाटणीची माणसं जगात फार कमी बघायला मिळतात. सुख आणि दुःख त्यांना मृगजळासारखं क्षणभंगुर असतं. त्यांचं जगणं म्हणजे एखाद्या शुभ्र झऱ्यासारखं निर्मळ... ना कधीच कुठल्या गोष्टीचा अहंकार, ना कुणाबद्दल राग, ना कुणाचा हेवा, ना कुणाचा तिरस्कार आणि ना कुणाबद्दल वैरभाव... जीवनाचं ध्येय एकच... माणसाशी माणुसकीनं वागायचं
     जसं एकापाठोपाठ दोघांनी धरतीवर पाऊल टाकलं तसंच एकापाठोपाठ दोघेही पंचतत्वात विलीनही झाले. परमेश्वराने या सृष्टीवर जीवजंतूची निर्मिती केली... त्यातल्या 'मानव' नावाच्या जीवाला त्यानं सर्वश्रेष्ठ बनवलं. त्याला मन, भाव-भावना, प्रेम, करुणा, सुख-दुःख या सगळ्या गोष्टी देऊ केल्या पण त्या गोष्टींनाही त्याने जन्म-मृत्यूचा बांध घालायला तो विसरला नाही. जो जन्मला त्याचा मृत्यूही परमेश्वरानेच ठरवून टाकला. जन्म मृत्यूचा फेरा जिथं परमेश्वराला चुकला नाही तिथं मनुष्याची काय बिशाद??? मनुष्य जन्माला येतो आणि  मरूनही जातो पण काही लोक निराळेच असतात जे मरूनही आपल्या आठवणी या सृष्टीवरती अनंत काळासाठी जिवंत ठेवून जातात.
     गावाकडून परतताना तात्यांच्या घराचा उंबरा ओलांडून बाहेर पडताना ह्यावेळी उगाचंच काहीतरी राहून गेल्यासारखं वाटलं... ह्यावेळी गावी गेल्यावर तात्यांनी माझ्या वडिलांची विचारपूस केली नव्हती.... "माझा दादा कसा आहे" असं विचारलं नव्हतं....

                                                  लेखक: मंगेश कुंभार