Jan 19, 2022
General

तातूकाका

Read Later
तातूकाका

तातूकाका

हा लेख म्हणजे एक स्म्र्उतीपुष्प आहे. यातून काही संदेश दिलेला नाही.

पाच ऑक्टोबर..
तसं बघायला गेलं तर दिनदर्शिकेतली एक तारीख. नेहमीसारखाच दिवस पण कायमची हुरहूर लावून गेला.
दहा वर्षापूर्वी याच दिवशी मी सकाळचा डबा,लेकाला शाळेत सोडणं,नंतरची आवराआवर केली. थोडा वेळ असला की मी जवळच गावदेवीचं मंदिर आहे तिथे जाऊन बसायची फक्त पाचेक मिनटं. खूप बरं वाटायचं.  जरा जास्त वेळ मिळाला की वीसेक मिनटावर असलेल्या मारुतीच्या देवळात. 
 त्यादिवशी का कोण जाणे मन बेचैन झालं होतं. गाभाऱ्यात जाऊन नेहमीसारखंच देवीपुढे हात जोडले. मला देवीचे डोळे अतिशय बोलके जाणवतात. कोणी काही म्हणो पण दिव्यत्वाची प्रचिती येते तिच्या सानिध्यात. 

घरी आले तर नणंदेचा फोन होता. तातुकाका म्हणजे माझे दिर..त्यांचा अपघात झाला.होता. नणंदेला मी धीर दिला. बरंच समजावलं. नंतर सतत फोन चालू होते. दुपारी बारा दरम्यान परत फोन,"वयनी,माका काय खरा वाटत नाय हा. आवाटातल्या सगळ्या गाड्या भरुन मानसा तडे ओरोसीच्या हास्पिटलात जातहत." मी काय सांगणार होते तिला. दोनचार वर्षाचा फरक आमच्यात. दोघीही सारख्याच. 

थोड्या वेळाने यांचा फोन आला,"कपडे भर बेगेत,निघायचय आपल्याला." तरी मी अनभिज्ञ.. कदाचित वास्तव स्वीकारण्याची ताकद नसावी. सगळे दिर भावासारखेच माया लावणारे त्यामुळे असावं. 

काय उरलंसुरलं होतं ते शेजारणीकडे दिलं. कचराही तिला टाकायला सांगितला. मला काहीच सुचत नव्हतं.

 दोन वाजले. जोरात वारा सुटलेला. धुळीचं वादळच जणू. धुळीचे लोट इकडेतिकडे वहात होते. मी खाली जाऊन उभी राहिले. लेक तेव्हा चौथीत होता. त्याला म्हंटलं,"अनु,आपल्याला गावी जावं लागणार. तातूकाका एडमिट आहेत." अनू म्हणाला,"आई,माझी सहामाही जवळ आलेय,ओरल चालू आहेत. मी आजीकडे रहातो." मला त्याही स्थितीत त्याच्या निर्णयक्षमतेचं कौतुक वाटलं. तिथे हॉस्पिटलमध्ये कुठे उगाच मुलाला न्यायचं म्हणून मला त्याचं म्हणणं रास्त वाटलं. 

एका बेगेत मी त्याची पुस्तकं तर दुसरीत त्याचे स्कुल युनिफॉर्म,इतर कपडे भरले. तो घरी एकटा थांबेना. त्याला मीराजवळ(शेजारीण) ठेवलं व बाबांसोबत रिक्षाने निघाले. नंतर आई येऊन त्याला घरी घेऊन गेली. आम्ही कल्याणच्या गाडीत बसलो. तिथून पुढे रिक्षा केली नि मोठ्या दिरांकडे उतरलो. सगळी मान खाली घालून बसलेली. थोड्याच वेळात गाडी आली..यांच्या साहेबांनी प्रसंगाचं गांभीर्य कळताच त्वरीत करुन दिली होती. मी खिडकीजवळ बसले. माझ्या बाजूला दोघी जावा व मोठ्या जावेची लेक,पुढे हे,मागे मोठे दिर,त्यांचा लेक व लहान दिर. दिरांचे एक शेजारीही होते.

गाडी सुरु झाली. मी अधुनमधून  वाटेत येणाऱ्या नर्सरीतली फुलं जावेला दाखवत होते. मधेच गाडी थांबली..पेट्रोल भरायला..तेव्हा लहान जावेने मला सांगितलं की तातूकाका गेले. खूप वाईट वाटलं. मला तातूकाकांची शेवटची झालेली भेट आठवली..गावी घर बांधलं तेव्हा होम घातला होता . दुसऱ्या दिवशी तातूकाका नि मी होमाच्या कुंडातली रक्षा पिशव्यांत भरत होतौ,प्रत्येकाच्या घरी नेऊन ठेवायला. 

तातूकाका मला सांगत होते,बाळाचा नीट अभ्यास घे. त्याला आतापासून अभ्यासाची सवय लाव.  बाकीचे दिर मराठीत बोलायचे पण तातुकाका कायम मालवणीत नि आवाजाची पट्टीही खालची. कधी घरी आले की चहा प्याले की हातात खराटा घ्यायचे नि सगळं परडं,मागलं,पुढलं दार झाडून काढायचे,वाडा साफ करायचे.

 पुढचा प्रवास निराशेत गेला. मला खरंतर गाडीचा प्रवास अजिबात जमत नाही पण कसं कोण जाणे त्या प्रवासात काही त्रास जाणवला नाही. अडीचेक वाजले असतील,एका पेट्रोलपंपाजवळ यांनी गाडी थांबवली व तासभर डोळे मिटले म्हणाले उगा रात्रीचं जाऊन सगळ्या वाडीतल्यांना त्रास नको.

 चारसाडेचारच्या सुमारास गाडी कणकवलीत आली. यांचे दोन आतेभाऊ आले होते त्यांनी सगळ्यांना चहा दिला. आम्ही जरा तोंडं धुतली. गाडी पुढे गावात जाऊ लागली. दाट अंधार होता,दिव्यांच्या उजेडात रस्यावर झाडांच्या सावल्या दिसत होत्या.

 मला तातुकाका दिसत होते डोळ्यासमोर. तातुकाकांची नि माझी तितकीशी भेटही नव्हती कारण ते कसालात रहायचे. वायरमन होते. खाकी ड्रेस घालायचे नोकरीवर जाताना. सडपातळ बांध्याचे होते. आम्ही तातूकाका,भाऊकाका असंच म्हणतो..भाओजी वगैरे नाही म्हणत. तातुकाकांची पहिली दोन मुलं गेली होती..तिही एकाच दिवशी..एकाच वेळी. बाजूच्या घरात आंबे विकणारे होते. तिथे खेळायला गेली होती. तिथलं औषध त्यांनी दोघांनी वाटून वाटून खाल्लं
होतं. डॉक्टरकडे न्हेईपर्यंत रिक्षेत आईवडलांच्या मांडीवर दोन्ही भाऊबहीण एकत्र निघून गेले होते. तेव्हापासून तातूकाका कधी खूष दिसलेच नव्हते. नंतर त्यांना तीन मुलं झाली होती. 

त्यादिवशी ते इकडे आईकडेच होते. सकाळीच खाकी ड्रेस घालून बाहेर पडले. धाकटी जाऊ बाहेरची होती त्यामुळे चहा तयार नव्हता. जाताना त्यांनी साखरेच्या डब्यातली थोडीसी साखर तेवढी खाल्ली होती. आईंनाही बरं नव्हतं,येतो गे आई म्हणून निघालेले. करंट बंद करुन पोलावर चढलेले व काम करत होते तर अचानक कुणी करंट सुरु केला नि तातुकाकांना तीव्र वीजेचा धक्का बसला. ते रस्त्यावर उडवले गेले. मेंदूला जबर मार लागला. जागच्या जागीच गेले. तिथून त्यांना ओरोसच्या हॉस्पिटलमधे न्हेलं. 

आम्ही घरी पोहोचलो. गाडीतून बाहेर पाय टाकवत नव्हता. सासूचं आर्त ओरडणं ऐकू येत होतं. 'माझे पाच पांडव होते गं',म्हणत रडत होती. मी तिच्या बाजूला जावून बसले. मी त्यांना कसंतरी गप्प रहा,नाहीतर त्रास होईल म्हणून विनवत होते. तातूकाकाची बायको मधेच रडत होती. तिची अवस्था खूप वाईट होती. मुलं गपचूप काकांच्या मांडीवर बसली होती. त्यांना काहीच कळत नव्हतं. धाकटा तर दिडेक वर्षाचा होता. 

पहाट झाली तशी बॉडी आणून खळ्यात ठेवली. ते पाहिलं नि काय झालं त्या वेदना शब्दात नाही व्यक्त करु शकत. थोड्याच वेळात त्यांना घेऊन गेले. 
सासरे डोक्यावरून आंघोळ करताना मी पहात होते. त्याही अवस्थेत तो पापभिरू माणूस देवांची नावं घेत होता. मनात म्हंटलं,आपण थोडं काय झालं की देवावर रागावतो आणि ही व्यक्ती जिचा मुलगा काही क्षणापुर्वी गेला ती प्रभुनाम घेतेय. 

कोणीतरी पेजभात आणून दिला. मी दुपारी तातूकाकांच्यापत्नीसोबत बसलेले बऱ्याचजणींना खटकले होते. तिचं तोंडही बारा दिवस पहायचं नाही अशी आंधळी समजूत काहीजणींच्या मनात होती पण यांच्या काकीने बारा दिवस तिला भरवणं,तिचे कपडे धुणं सगळं केलं. म्हणाली,वेळेक उपेगी पडत नाय तो मनुष्याचो जन्म कसलो. मला कायव म्हणूदेत मी माझं मन सांगेल तसं करणार.

तातूकाकांच्या जागेवर त्यांच्या पत्नीला नोकरी मिळाली. तिन्ही मुलांना ती छान सांभाळते आहे. सगळं व्यवस्थित चाललय तरी तातूकाका ह्रदयात अजून जीवंत आहे.

 ----सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now