Mar 02, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

तस्मै श्री गुरवे नमः

Read Later
तस्मै श्री गुरवे नमः


गुरुपौर्णिमा.गुरुप्रती श्रद्धा व्यक्त करण्याचा हा दिवस."गुरु बिन ज्ञान नही..." असं म्हटलंच आहे.

आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी माणसं भेटत गेली अजूनही भेटतायत्.मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून मला खूप काही शिकायला मिळतं, ते सर्वच माझे गुरु ! ज्यांनी ज्ञान दिलं ते गुरु ! ज्यांच्याकडून काही शिकता आलं ते गुरु !! ज्यांनी हाताला धरून चालवलं, घडवलं ते  गुरु !!! मला घडवण्याऱ्या आणि माझ्या प्रगतीसाठी मार्ग दाखवणाऱ्या,ज्ञान देणाऱ्या माझ्या ज्ञात-अज्ञात गुरूंना माझा साष्टांग प्रणिपात !

प्रत्येक व्यक्तीची पहिली गुरु ही आईच असते.तिने आम्हां तिघी बहिणींचे उत्तम संगोपन तर केलेच पण सोबतच गृहव्यवस्थापनाचे आणि काटकसरीचे धडेही दिले.

मला आठवतं मी आठवीत असेन.एकदा दुपारी मी चहा केला.थोड्या वेळाने आईने स्वैपाकघरात जाऊन पाहिले तर ओट्यावर हा भणका....! चहाचे भांडे, गाळणी ओट्यावर तशीच होती.कपबश्या सिंकमध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या.आईने मला बोलावून सांगितले की चहा करणे म्हणजे चहा उकळवणे नव्हे...चहाची भांडी घासून/घासायला टाकून, कपबश्या विसळून ओटा स्वच्छ केला आणि सगळं जागच्याजागी गेलं म्हणजे म्हणायचं की "मी चहा केला !"

हे मातृवाक्य मी ब्रह्मवाक्य समजून माझ्या मेंदूत फिट्ट करून ठेवलं आहे.घर असो किंवा ऑफिस हाती घेतलेलं काम पूर्ण तडीस गेल्याशिवाय मी त्याचा पिच्छा सोडत नाही ! ह्या सवयीमुळे एक फायदा असा झाला की मी हाती घेतलेलं कुठलंच काम अर्धवट रहात नाही आणि अगदी मुळातून काम केल्याने कामावर लवकर प्रभुत्व मिळवता आलं.

शाळेत नवव्या वर्गापर्यंत आम्हां दोघी बहिणींचा गणित विषय अगदीच कच्चा होता.गणितातील प्रमेय आणि इक्वेशन्स काही केल्या जमत नसत.शिक्षक म्हणाले "दोघींचाही दहावीत गणित विषय "निघणे" अगदी अशक्य!ह्यांना जन्मात गणित येणार नाही!!"

आई बिचारी धास्तावली ! दहावीत नापास म्हणजे अगदीच नामुष्की ! तिला आठवलं, तिची एक भाची म्हणजे माझी मावसबहीण अलकाताई गणित विषय घेऊन MSC झालीये.आईने तिला आम्हाला शिकवण्याबद्दल विचारलं अन् तिने हे आव्हान स्वीकारलं.

तिचा प्रेमळ स्वभाव आणि विषय सोपा करून सांगण्याची हातोटी ह्यामुळे अक्षरशः जादू झाली. गणित विषय जमायला तर लागला होताच पण आता गणितात प्रचंड आवड निर्माण झाली होती. तिने जवळपास सात महिने आम्हाला शिकवलं आणि तिचे लग्न होऊन ती नागपूरला गेली पण जाताना गणिताची गोडी आणि प्रगतीची संधी देऊन गेली.

मी आज ही नोकरी करतेय त्याचे 100% श्रेय अलकाताईचेच आहे कारण नोकरीच्या लेखी परीक्षेत गणित आणि इंग्रजी असे दोनच विषय होते ! न जाणो तिने आम्हाला शिकवायला नकार दिला असता तर...कल्पनाही करवत नाही !

अलकाताई, तू गणित शिकवलंस आणि माझं आयुष्याचं अवघड गणित बऱ्यापैकी जमून गेलं !

तसेच आम्ही बहिणी अकरावीत असताना अकोल्याला टॉवरजवळील एका चर्चमध्ये इंग्लिश स्पिकिंग क्लासेस चालत.त्याकाळी अभ्यासात थोडी गती असणारी मुलं इंग्लिश स्पीकिंग क्लास लावत असत !

तर आईबाबांची परवानगी मिळवून आम्ही त्या "इंग्लिश स्पीकिंग क्लास" मध्ये प्रवेश घेतला.विजय मनवर नावाचे सर (ते चर्चमध्ये फादर होते) हे क्लासेस घेत.दोन महिन्याचा कोर्स काही कारणाने आम्हाला एक महिन्यातच सोडावा लागला त्यामुळे तेव्हा इंग्रजी बोलता तर आलं नाही पण ग्रामर मात्र एकदम पक्कं झालं !

नोकरीला लागल्यावर आणि आजही जेव्हा वरिष्ठांकडून माझ्या english drafting कौतुक होतं तेव्हा मनवर सरांची आठवण हमखास येते.माझे बी.कॉम.चे शिक्षण मराठी माध्यमातून झालं. परंतू इंग्रजीच्या व्याकरणाचा पाया पक्का झाल्याने पुढे वयाच्या अडतिसाव्या वर्षी  इंग्रजी माध्यमातून MBA करताना सुद्धा अडचण गेली नाही !

अकरावीला कॉमर्स शाखा निवडली अन् माझी गाठ पडली एकदम नव्याकोऱ्या विषयांशी ! लेखापालन अर्थात अकाउंटन्सी हा त्यातलाच एक.पण एखादी अनोळखी व्यक्ती भेटावी अन् क्षणार्धात जिवलग व्हावी असं काहीसं अकाउंटन्सीबाबत झालं ते श्री गोडबोले सरांमुळे !

अकरावीत असतानाच बारावीकरिता म्हणून गोडबोले सरांच्या "कमर्शिअल कोचिंग क्लासेस" मध्ये ऍडमिशन घेतली अन् अकाउंट्सची अन् माझी गट्टी जमली ती आजतागायत.सरांनी शिकवलेले अकाउंट्सचे बेसिक सूत्र आजही तालासुरात कानात गुंजतात.इतक्या सोप्या पद्धतीने कॉमर्स शिकता येतं हे सरांमुळेच कळलं.

आजही एका वित्तीय संस्थेत नोकरी करत असताना "अकाउंटिंग" च्या कन्सेप्ट अगदी क्लिअर आहेत कुठेही गोंधळ उडत होत नाही की चुका होत नाहीत ते गोडबोले सरांच्या उत्तम शिकवणीमुळेच !

सरांनी लेखापालनाची इतकी गोडी लावली की घरीदेखील आर्थिक नियोजन करताना अकाउंट्सचे शिकलेले फंडे आठवतात आणि त्याबरहुकूम नियोजन केले जाते !

जीवनात घडत राहणाऱ्या छोट्या मोठ्या घटनांपेक्षा जीवनातला आनंद फार महत्वाचा आहे हा माझ्या बाबांनी दिलेला गुरुमंत्र ! ज्या गोष्टी पैश्याने साध्य होऊ शकतात त्यासाठी जीव जाळू नये हे त्यांचे वाक्य माझ्या आयुष्याचे ब्रीदवाक्य बनले आहे !

मला आठवतं शाळेत शिकत असताना आईनं माझ्यासाठी ड्रेसचं कापड आणलं जे मला अज्जिबात आवडलं नव्हतं.त्यावरून माझी घरात चिडचिड, रडरड सुरु होती.तेव्हा बाबांनी म्हटलेलं की ह्या न आवडलेल्या कापडाचा ड्रेस शिवून घातलास तरी फार तर दोन वर्ष टिकेल, जन्माला पुरणार नाही.नाही घातलास तर फक्त दोनशे रुपये वाया जातील.ज्या गोष्टी आयुष्यभर पुरणार नाहीत अश्या क्षुल्लक गोष्टीसाठी रडून-चिडून स्वतःची लाखमोलाची तब्येत का खराब करावी?

तसेच कमावलेले सर्व खर्च करू नये.आयुष्यात दोन पैसे गाठीशी ठेवावेत असे ते सांगत.आपल्या कष्टाच्या कमाईचे खावे. बेईमानीच्या रुपयालाही हात लावू नये, "सदा निभेल असे राहावे" ही त्यांची शिकवण माझी जीवनशैली बनली आहे!

लग्न होऊन सासरी आले.नवीन वातावरणात नवीन लोकांशी जुळवून घेताना बऱ्याच अडचणी येत गेल्या.संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच.मी माझ्या सासूबाईंना गेली सत्तावीस वर्ष पहाते आहे.घरात काही मतभेद किंवा वाद झाले तरी त्या ते नंतर/वारंवार उकरून काढत नाहीत. मनात काहीही कटूता ठेवत नाहीत.इतक्या वर्षात मी त्यांना कधीही आक्रस्ताळेपणा करताना पाहिले नाही.त्यामुळे संबंधांमध्ये तणाव येत नाही. त्यांची ही गोष्ट माझ्या मनाला खूप भावते.

पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना कुण्डे कुण्डे नवं पयः। जातौ जातौ नवा चारा नवा वाणी मुखे मुखे॥
अर्थात व्यक्ति तितक्या प्रकृति, प्रत्येक मनुष्याचें मत स्वतंत्र असतें, जो तो आपल्या बुद्धीप्रमाणें विचार करतो.

असे असले तरीही मी आईंचे अनुकरण करत माझ्या स्वभावात लक्षणीय बदल घडवला आहे !आणि त्यासाठी आई माझ्या गुरु आहेत !

घरी नवरा-मुलगा आणि नोकरी सगळं सुरळीत सुरु होतं.सुयोग मोठा झाल्यामुळे जरा निवांतपणा आला होता.सासऱ्यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमच्या स्नेही धनश्री मुळावकर वहिनी आल्या होत्या.त्यांनी सहज विचारलं-" तू काय करतेस मग? " मला जरा आश्चर्य वाटलं,मी नोकरी करतेय हे ह्यांना माहित नसावं??

"मी नोकरी करते" ह्या माझ्या उत्तरानंतर त्यांनी प्रतिप्रश्न केला-"ते माहितेय गं मला.पण घर आणि नोकरी ह्याव्यतिरिक्त तू काय करतेस?" तेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर तेव्हा माझ्याकडे नव्हतं पण करण्यासाठी खूप काही होतं !

मग मी वेळात वेळ काढून संगीताचा क्लास लावला अन् गाण्याची आवड जोपासली.अर्धवट राहिलेलं शिक्षण MBA करून पूर्ण केलं.त्याकाळी स्पर्धात्मक परीक्षापूर्व क्लासेस संघटनेतर्फे चालवले जात तिथे शिकवण्याचं कामही केलं.

नोकरीत प्रमोशन घ्यायचं ठरलं तर कारने अपडाऊन करता यावं म्हणून कार चालवायला शिकले.ऑफिसच्या परीक्षा देऊन इन्शुरन्समध्ये फेलोशिप मिळवली. आणि आता लेखणीचा मार्ग स्वीकारलाय! ह्या माझ्या कर्तृत्वामागची प्रेरणा तुम्हीच आहात वहिनी ! माझ्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या तुम्ही माझ्या गुरु आहात!

माझ्या सामान्य आयुष्यात आलेली ही असामान्य माणसं ! ह्यांनी अगदी प्रत्यक्षरित्या मला घडवलं.मी आज सन्मानाने जगतेय ते ह्यांच्यामुळे आणि ह्यांनी दिलेल्या शिकवणीमुळे ! ह्या आणि अश्याच अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या आणि माझं आयुष्य सोनेरी झालं ! ह्या सर्व व्यक्ती मला गुरुस्थानी आहेत !

सर्वाना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार !!!
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Vaishali Pradip Joshi

Service

I Love reading and writing

//