तसलं काय नाय

It is a funny story based on real incident happened in my life. Honorable Mr. Sharadchandraji Pawar Sahaeb is always a great leader and politician in our country. Everyone gives him lots of respect. But what will happen when Sharad Pawar's name will

सत्य घटनेपासून प्रेरित...

              म्या बारावी सायन्सला हुतो. आमची सामायं परीक्षा चालू व्हती. आमच्या कालेजात फिजिक्स शिकवायला नवीन सर आले व्हते. आमचं कालेज तालुक्याच्या ठिकाणी व्हतं. नुकतंच जॉइनिंग झाल्यामुळं तेस्नी कालेज आन पोरांबद्दल जास्ती माहिती नव्हती. पोरं म्हंजी नुसतीच पोरं नव्हती. नेत्यांची थेरं बगून नादावल्याली जमात हुती. तालुक्याच्या ठिकाणी ऱ्हायाला आसल्यामुळं पोरांच्या बापायंनी जमनी बिमनी इकून मोठमोठं बंगलं बिंगलं बांधल्यालं. टू-विलर, फोर-इलर घिवूनशान सारखं आपलं आमदारांच्या मागं पुढं करण्यात दिवस काढल्याल. त्याज्या मुळं बापांसारखचं पोरांच्या बी तोंडावं त्यो माज भरभरून दिसायचा. बरीच पोरं वर्गात बिर्गात तसं वागायची बी. सरानला ताप दे निदान वर्गात मोबाईल बिबाईल वाजव, न्हाय न्हाय त्ये आवाज काढ आसं आपलं चालायचं समदं त्येंच. 
                   तर त्या सामायं परिक्षेला म्हंजी झालं आसं का यक गरीब पोरगं व्हतं जी माज्यासारखचं लांबनं कालेजाला येचं. आमी यक चाळीस जणं त्या वर्गात परिक्षेला बसल्यालो. तर ती नवीन आल्यालं सर आमच्याचं वर्गात सुपरइजनला व्हतं.   आब्यास केला नसल्यामुळं आन वर्गात शिकवल्यालं घंटा कायी कळलं नसल्यामुळं त्या पोरानं कॉपी करून आणल्याली. सरांची नजर बिजर चुकवून त्येनं ती बेल्टमंदी लपावल्याली कॉपी काढली आन त्यो त्याज्यामदलं बगून पेपरात लिव्हायं लागला. कसणूक त्या सरांस्नी कळलं काय माहिती.
                   सर जवळ आले आन त्याला उठवलं. सरळ यक कानाखाली लावून दिली आन त्येला म्हणलं ,“कॉपी करतोस नालायका...नाव काय तुजं ?
                   तर त्यो आपलं खरं बोलला, “शरद पवार.” तसं म्हणल्या बराबर सरानं खाडकन कानाखाली लावली अन म्हणला, “ तसलं काय नाय...अं...हं.....तसलं काय सांगायचचं न्हाय इथं...शरद पवार आन आमदार न खासदार.”
                   पोरानं आपला गालावं हात ठिवला आन पुना म्हणला,“आवं सर खरंच सांगतुय तर”
सरांनं पुना त्येला मारायं हात वर केला तर तेवढ्यात कालेजचं उपप्राचार्य वर्गात आलं. त्येंनी आल्या बराबर सरांस्नी इचारलं...काय झालं वं सर ? 
                  तर सर म्हणलं, “ आवं बगा की सर गायबानं कॉपी करतंय आन नाव इचारलं तर मलाच उलटं म्हणतंय शरद पवार. ” उपप्राचार्यांनी त्ये ऐकल्या बराबर पुना त्या पोराच्या दुसऱ्या कानशिलात लावून दिली आन म्हणलं, “काय शरद पवार...तुमाला लगा मस्त्याचं लय माजूरड्यानो...आं...हाय का न्हाई. आमदाराच्या मागं हिंडतायसा म्हंजी काय तुजी पोच शरद पवारांबर गेली का...नरसाळ्या...आं...व्हय रं ?”
                 समदा वर्ग खळखळून हासत व्हता. पोरगं बिचारं खाली मान घालून परत सरांस्नी म्हणलं,“ आवं ऐकून तर घ्या की सर माजं नाव खरंच शरद पवार हाय. ह्ये बगा आयडेंटी कार्ड.” मग उपप्राचार्य सरांनी नीट निरखून पाहिलं तर त्याज्यावं खरंच त्येजं नाव शरद पवार व्हतं. मग सर जरा नरामलं आन त्वांड दाबून हासत हासत मागं सरलं. त्या पोराला बी तवा वाटलं आसलं का बापानं कंच्या मुरतावं माजं नाव ठिवलं काय माहीत. आन ह्यो समदा परसंग त्येज्या मागच्या बाकावं बसल्यालं ‘आजित पवार’ बगत व्हतं. त्येज्या पृष्ठभागावं आधीचं गार आली. त्येनं गपचूप आपलं कॉप्या हाय तिथं ठिवून दिल्या आन सुटकेचा निस्वास सोडला. ????

------ विशाल घाडगे ©™✍️

( टीप - सायबांचा मनापासून आदर हाये. पर डोळ्या म्होरं घडल्याला ह्यो परसंग पण तेवढाच खरा हाये. सायबांच्या निसत्या नावानं सिस्टीम हालती ह्येज ह्ये मूर्तिमंत उदाहरण आनभावलं म्या. बाकी कायी नायी.)