Login

तारामती (मराठी कथा : marathi story )

Story of a married woman

तारामती
सिद्धी भुरके ©®

"तारे... अगं ए.. तारे... झालं कि नाही पाणी भरून? चल ये लवकर. भाकऱ्या टाक जरा." तारामतीच्या सासूबाई तिला आवाज देत होत्या. तारामती साधारण वीस बावीस वर्षांची नाजूक पोर. एका हाताला तीन वर्षाची लेक, तिच्याच बाजूला नुकतीच चालायला लागलेली अजून एक लेक अन पोटात तिसरा जीव वाढत होता. कसा बसा भार सांभाळत तारामतीने पाण्याचा हंडा डोक्यावर ठेवला आणि ती थेट स्वयंपाक घरात गेली.

तारामती मूळची मुंबईची होती.गोरीपान,नाजूक, उंच सडपातळ बांधा असून सौंदर्याची खाणच होती म्हणून तर तिच्या भावाच्या मित्राने तिला पसंद केले आणि किसनरावांसोबत लग्न होऊन तारामती पुण्याला आली. मुबंईतील छोट्याश्या चाळीतील खोलीत राहणाऱ्या तारामतीला किसनने पुण्यात एका मोठ्या वाड्यात लग्न करून आणले. वाडा होता जरी मोठा पण किसनच्या कुटुंबात फारशी माणसं नव्हती. एक म्हातारी आई आणि किसन,बहिणीचे लग्न होऊन ती सासरी सुखाने नांदत होती.किसनने एकच गोष्ट तारामतीला सांगितली होती कि, " जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल, मात्र माझ्या आईला काहीपण कमी पडू द्यायचं नाही,तिचं सगळं ऐकायचं... ती म्हणेल तसंच करायचं." आणि तारामतीने ते कबूल केले होते. त्याकाळात सासू विरुद्ध बोलायची कोणाच्यात बिषाद होती. तारामतीच्या सासूबाई होत्या जऱ्या जुन्या विचारांच्या. तारामतीला ऐन सणाच्या दिवशी पाळी वगैरे आली कि सुरु करायच्या बडबड.उठसूठ तिला गोळ्या घ्यायला लावायच्या. जसं कि तारामती मुद्दाम सणाच्या दिवशी शिवेनाशी व्हायची. तारामतीचा डोक्यावरचा पदर जरा सरकला कि घरात तुफान आलं समजा. "बाईची इज्जत या पदराड असते तारे.. तुला सांभाळता येत नसेल तर खिळे ठोकेन तुझ्या पदाराला.."असं सासूबाई म्हणायच्या.पण तारामती कधी त्यांना काही उलटून बोलली नाही. त्या म्हणतील तसं सगळं करत गेली. येणाऱ्या जाणाऱ्या पाहुणे मंडळींचं पण सगळं व्यवस्थित करायची. पुण्यात तारामतीची एकच हक्काची मैत्रीण होती ती म्हणजे तिची नणंद. नणंदेचं लग्न झालं होतं तरी एकाच शहरात असल्याने तारामती तिला जाऊन भेटायची आणि तिचं मन मोकळं करायची.

  तारामतीला लागोपाठ दोन मुली झाल्याने सासूबाई आणि किसन जरा नाराजच होते. दुसरी मुलगी जर कधी खेळत किसन जवळ गेली तर तो तिला उचलून पण घ्यायचा नाही. यामुळे तिसऱ्या वेळेस तारामतीला मुलगा होणे गरजेचे होते. बघता बघता तारामतीचे नऊ महिने भरले, देवाला केलेले नवस कामी आले आणि तारामतीने मुलाला जन्म दिला. मुलाच्या आगमनाने किसन आणि सासूबाई तर जाम खुश झाल्या. त्यांचे खुललेले चेहरे पाहून तारामतीलादेखील बरं वाटलं. या मुलानंतर तारामतीला अजून दोन मुले झाली. दोन मुली,तीन मुले यांनी घर भरलं गोकुळ झालं.

अशीच वर्षामागून वर्षे गेली. मुलं आता मोठी होऊ लागली होती. सासूबाईंच्या सततच्या सांगण्याने तारामतीने वाट्टेल तशा पाळी ढकलायच्या गोळया घेतल्याने तिची गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्यात आली. तरी सुद्धा तारामती सासूबाईंना कधी काही उलटून बोलली नव्हती. "म्हातारं माणूस ते... त्याचं मन राखायला करायचं सगळं", असं म्हणून तारामती आनंदी राहायची.काही वर्षांनी सासूबाई अंथरुणाला खिळल्या, कशालासुद्धा उठू शकत नव्हत्या. तारामतीने मनापासून त्यांची सेवा केली. कोणताही राग मनात न ठेवता तारामतीने सासूबाईंना काय हवं नको ते सगळं पाहिलं.पण काही दिवसातच सासूबाईंना देवाज्ञा झाली. आता सगळ्या घराची जबाबदारी तारामतीवर होती. पाच मुलं, त्यांची शिक्षणं सगळं तारामतीने निभावून नेलं. किसनने नवीन उद्योग सुरु केला, त्यात त्याला यशही मिळाले.घरात नवीन रंगीत टीव्ही, फ्रिज सगळे काही आले. तारामतीच्या संसारात आता कशाचीच कमी नव्हती. किसनरावांनी सगळं सुख तारामतीच्या पायाशी आणून ठेवलं होतं मात्र कधी बसून दोन शब्द तिच्याशी प्रेमाने बोलले नव्हते .तिला काय हवं नको याची विचारपूस केली नव्हती. पण तारामतीला याचं काही दुःख नव्हतं. सोन्यासारखी पाच लेकरं, घरात पैसा लत्ता सगळं काही होतं.हे किसनचं प्रेम नाहीतर अजून काय? तारामतीला तर आपण जगातील सर्वात सुखी बायको आहोत असं वाटे.

तारामतीचा संसार आता बहरत होता. दोन्ही लेकी शिकून मोठ्या झाल्या. त्यांना चांगली स्थळं मिळाली. दोघींची लग्न झाली. लेकी आपापल्या संसारात खुश होत्या. काही वर्षांनी बघता बघता तिनही मुलांची लग्न झाली. घरात तीन सूना आल्या.थोड्या दिवसांनी नातवंडांनी घर गजबजून गेलं. तारामती त्यांच्यामध्ये रमून गेली. तारामतीची तिनही मुले कर्तृत्ववान होती. आपापल्या नोकरी धंद्यात खुश होती.तारामतीला याहून अजून काय हवं होतं.तिने सुनांना पोटच्या लेकीप्रमाणे ठेवलं होतं. त्यामुळे त्यादेखील तारामतीला जीव लावत होत्या. चाळीस वर्ष तारामतीने या संसाराचा गाडा ओढला होता त्यामुळे आता सूनांवर वाड्याची जबाबदारी सोपवून तारामतीने देवा धर्मात, भजन, कीर्तनात आपलं लक्ष वळवलं होतं. पण तरीही अजूनही किसनरावांना काय हवं नको ते जातीने ती बघायची. तारामतीचा किसनरावांवर फार जीव होता. एक अव्यक्त प्रेम होते. अजूनही कधी साधा फोटो काढण्यासाठी लेकांनी तारामतीला किसनरावांच्या शेजारी बसवले तरी ती लाजेने चिंब व्हायची. हे तारामतीचे तिच्या नवऱ्यावर असलेले जीवापाड प्रेम नाहीतर काय होते .पण म्हणतात ना एखाद्याची नजर लागावी आणि पत्त्याच्या इमारतीसारखा संसार मोडावा असचं काहीसं अघटित झालं.एक दिवशी किसनरावांचे  कपाट आवरताना तारामतीला एक कागद सापडला. सातवीपर्यंत शिकलेली असल्याने तारामतीला लिहिता, वाचता येत होते. तारामतीने तो कागद उघडला आणि वाचू लागली अन तिच्या पायाखालची जमीन सरकली, जणू तिच्यावर आभाळ कोसळलं. तो काही साधासुधा कागद नव्हता. तारामतीचा संसार मोडण्याची ताकद असणारा, तिच्या आणि किसनरावांच्या  नात्यात दरी निर्माण करणारा तो तारामतीची फसवून सही घेतलेला कागद होता.तारामती त्यातील मजकूर वाचू लागली......

"मी तारामती किसन देशमुख..माझं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही, मी माझ्या मुलांचा सांभाळ करायला आणि संसार करायला सक्षम नाही म्हणून मी माझे पती किसन देशमुख यांना दुसरं लग्न करायची संमती देत आहे.त्यांनी सुलेखा देशमुख यांच्याशी केलेल्या दुसऱ्या लग्नाला माझी काहीही हरकत नाही ."
आणि त्याखाली तारामतीची स्वाक्षरी होती. तारामतीला काही समजेना, कोण सुलेखा?? दुसरं लग्न?? आणि त्याखाली तिची स्वाक्षरी कशी आली??. ती वारंवार तो मजकूर वाचू लागली. त्याखाली केलेली तिची स्वाक्षरी पाहू लागली. स्वाक्षरी तर तिचीच होती आणि तिने केलेलीच होती. पण कधी? आणि कशी? तिला काही समजेना.तारामतीने तो कागद घेतला आणि थेट तिच्या नणंदेकडं गेली. तारामतीला अचानक पाहून नणंदेला काही कळलं नाही. तारामतीच्या तोंडून शब्द फुटेना. ती नणंदेच्या गळ्यात पडून रडली.. खूप रडली. पण तिने काही सांगितले नाही. काय सांगणार होती ती नणंदेला?? कि तिच्या भावाने दुसरं लग्न केलं आहे आणि ते पण फसवून?? नाही.. तारामतीची हिंमतच नाही झाली. नणंदेने पण मनसोक्त तिच्या अश्रूना वाट मोकळी करून दिली. "मन हलकं झालं कि सांगेल ती" असा विचार करून नणंद शांत बसली.त्या दिवशी तारामती खूप रडली. पण तिचं दुःख ती अजून कोणालाच सांगू शकत नव्हती. "कोणाला सांगणार?मुलांना सांगणार कि त्यांच्या वडिलांनी फसवून दुसरं लग्न केलं आहे हे.. काय विचार करतील ते वडिलांबद्दल..?? सुंनांना समजलं तर त्या सासऱ्याची काय किंमत ठेवतील?? आणि मुलींच्या सासरी समजलं तर??? त्यांचा संसार मोडेल. सासरकडची मंडळी किती नावं ठेवतील?? नको.. शांत बसण्यात सगळ्यांची भलाई आहे." तारामतीने मनोमन विचार केला.इतकं सगळं होऊनही तारामती किसनचाच विचार करत होती. तिच्यात किसनला जाऊन जाब विचारायची हिंमत नव्हती.

त्या दिवसानंतर तारामती मात्र खचली, तिने त्यानंतर तिची शृंगार पेटी कधी उघडली नाही, ना कधी किसनरावांच्या चहा पाण्याकडे लक्ष दिले. संसारातून जणू तिचा रसच उडाला. सतत देवघरातील समईकडे एकटक बघत बसायची आणि विचार करायची, "माझं आयुष्य या समईतील वाती प्रमाणे आहे.. आयुष्यभर इतरांना सुखाचा प्रकाश मिळण्यासाठी झटले, जळले पण शेवटी दिव्याखाली अंधार याप्रमाणे माझ्या आयुष्यात अंधाराचे सावट पसरले आहे..."सुनांना कळेना सासूबाईंना अचानक काय झालं ते.आई अबोल झाली आहे.. सतत एकटी असते हे मुलांना जाणवलं पण त्यांनी कधी स्वतःहून विचारलं नाही. किसनरावांना तर तिच्यातील बदल लक्षात आला होता कि नाही हे तर परमेश्वराला ठाऊक.अशातच एक रात्री तारामती तिच्या खोलीत गेली. आरशासमोर उभी राहिली. स्वतःकडे तिने उपहासात्मक पाहिले. हळूच डोक्यावरचा पदर खाली टाकला. चाळीस वर्षात पहिल्यांदा तिच्या डोक्यावर पदर नव्हता. कापळावरचं ठसठशीत कुंकू तिने पुसलं, हातातील हिरव्या बांगड्या काढल्या, पायातील जोडवी काढली, गळ्यातील मंगळसूत्र काढायला तिचे हात धजत नव्हते पण आता तिच्या गळ्यात शोभत नव्हतं. अचानक तिला सगळ्या बंधनातून मुक्त झालो असे वाटले. ती तशीच जाऊन गादीवर आडवी झाली.
     
       सकाळी देशमुखांच्या घरातून एकच गोंधळ ऐकू येत होता. काय घडलं?? कसं काय घडलं? कोणाला कळत नव्हतं. कारण त्या रात्री तारामतीने आपले प्राण सोडले.. झोपेत कधी तिने जगाचा निरोप घेतला कळलेच नाही. डॉक्टरांनी हार्ट स्ट्रोक सांगितलं पण हा तर तिच्या मनावर झालेला आघात होता. जायच्या आधी तारामतीने तो कागद मात्र जाळून टाकला होता. शेवटच्या क्षणापर्यंत तिने फक्त आणि फक्त किसनरावांच्या भल्याचा विचार केला होता.

या सगळ्यात काय चूक होती तारामतीची..???घर, संसार, मुलं नवरा हेच तर तिचं जग होतं..नवरा म्हणेल तसं वागत होती, सासू म्हणेल तशी राहत होती. सासूबाई ओरडतील म्हणून स्वतःच्या आरोग्याची काळजी नं करता पाळी पुढे ढकलायच्या गोळ्या घ्यायची, देशमुख घरण्याची इज्जत राखायला डोक्यावर पदर घ्यायची, नवऱ्यावर जीवापाड प्रेम करायची पण यासगळ्याच्या बदल्यात तिला काय मिळाले? फसवणूक??तिला किसनरावांकडून या वयात प्रेमाचा आधार पाहिजे होता.. पण किसनराव तर तिला अर्धांगिनीचा दर्जा पण देऊ शकले नाही. का वागले असं किसनराव हे त्यांचं त्यांनाच माहित पण हाच प्रश्न मनात ठेऊन तारामतीने कायमचाच जगाचा निरोप घेतला...

वाचकहो वरील कथा कशी वाटली ते मला नक्की सांगा.. तुम्हाला काय वाटतंय तारामतीबद्दल त्याबद्दल कमेंट करा.कथा आवडली तर like नक्की करा.धन्यवाद.
सिद्धी भुरके ©®