Mar 02, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

टपाल

Read Later
टपाल

आज महिन्याचा पहिलाच आठवडा सुरू झाला होता, पोस्टात पेन्शन घेणाऱ्या वृद्ध मंडळींची लगबग सुरू होती. पोस्टात काम करणारी मंडळीही सर्वांना जमेल तसे सहाय्य करत होते. वेगवेगळ्या पत्रांवर पडणाऱ्या शिक्यांचा आवाज माणसांच्या गदरोळावर लीलया मात करत होता. 

'जाधव, सानेआजी आल्या रे. बेस्ट ऑफ लक दोस्ता.'- एका पोस्टमनने आपल्या सहकाऱ्याला चिडवलं.

'अरे देवा! काय हि म्हातारी! भयंकर आशावादी आहे.'- जाधव कपाळावरचा घाम पुसत उठले.

'दादा, मला माहितेय की माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना फार त्रास होतो. पण मी तरी काय करू? माझ्यातली आई मला इथे खेचून आणते ओ. आलंय का त्याच पत्र?'- आजीने केविलवाण्या स्वरात विचारलं.

'अहो आजी तसं नाही. तुमची काळजी वाटते म्हणून. याही वेळी पत्र आलेलं नाहीये. आजी, अहो मागचे सहा वर्षे तुम्ही दरमहा इथे हेलपाटे घालत आहात. दरवेळेस तुमच्या पदरी निराशाच पडली आहे. तरीही तुम्ही?'- जाधव आजी जवळ जाऊन बोलत होते.

'काय करू दादा? आठवणी खेचून आणतात ओ. दुसरं काय? जवळच्या माणसासारखं आता हळूहळू एक एक अवयव संगत सोडू लागलाय बघा. मागच्या महिन्यापासून डाव्या डोळ्याने कमी दिसतंय. म्हटलं या खेपेला त्याच पत्र आलं तर किमान त्यावर तरी त्याला कळवता येईल. पण देवाला माझी काय दया येत नाही बघा.'- आजीने डोळ्याला पदर लावला होता.

'आजी, परगावी असणारा मुलगा तुम्हाला पत्र कशाला पाठवेल? त्याला तुमची आठवण असती तर इतक्या वर्षात किमान एक फोन केला नसता का त्याने? तुम्ही उगीच स्वतःला त्रास करून घेताय. आणि पत्र आलंच तर आम्ही ते तुमच्या पत्त्यावर आणून देऊच की.'- पोस्टात नव्याने रुजू झालेला दिपेश आजीजवळ जाऊन त्यांना दिलासा देत होता. त्याला त्याच्या सहकाऱ्यांकडून सानेआजीबद्दल कळलं होतं.

'मला फोनपेक्षा पत्रातून माणसांशी संवाद साधायला आवडतो रे. त्यालाही माहितेय ते. माझं लग्न ठरलं ते कळलं ते पण पत्रातूनच. त्याच पत्राच्या आडून मी किती दिवस लाजत राहिले ते माझं मलाच माहिती. आमचे हे मी घरी असतानाही अधूनमधून मला पत्र लिहायचे. किती भारी वाटायचं सांगू. ते गेले आणि संपलं सगळं. आयुष्याचे रंग पार फिकट झाले. आता तर जगण्यातली शाईच संपली तर पत्र लिहायची कशाने? '- आजी जवळच्या बाकड्यावर बसून भूतकाळात हरवून गेल्या होत्या.

'आजी, तुमचं पत्राबद्दलच प्रेम पाहून भारी वाटलं बघा.'- दिपेश स्वतःच्या डोळ्यातले पाणी लपवत बोलला.

'हो रे. आयुष्याच्या संध्याकाळी ती अक्षरेच जगवतात रे. आपल्या माणसाचं अक्षर पाहिलं की आशेचा किरण जगण्याचा एक एक क्षण आपसूक वाढवतो. फोन काय, दोन मिनिटं बोललो की संपलं सगळं. पत्रामुळे आठवणी कायमस्वरूपी आठवणीत राहतात. त्या पत्रावरून हात फिरवताना असं वाटतं की ती व्यक्ती आपल्या आसपासच आहे.हो की नाही? चल निघते मी नाहीतर सगळे म्हणतील की म्हातारी वेडी झाली बघा.'- आजी खिन्न हसत उठल्या.

'हा, जयंत. आमच्यासोबतच असतो. पुढच्या वेळेस मला येणं जमेल की नाही ते माहिती नाही. पण याला मी हक्काने त्रास देणार आहे. यानेही तसं कबूल केलं आहे. याच्या पायगुणाने पत्र आलं तर याच्याकडे नक्कीच द्याल. ओळख असावी म्हणून आज सोबत आणलं याला.'- आजी सोबतच्या मुलाकडे बोट दाखवत सर्वांची त्याच्याशी ओळख करून देत होत्या.

आजींची पाठ फिरताच पोस्टात एकच हळहळ व्यक्त होत होती.

असाच महिना उलटला होता. साने आजींची गुडघेदुखी बळावली होती. अपुऱ्या पैशांमुळे उपचार तोकडे पडले होते. जयंत जमेल तशी मदत करत होता तरी तो अपुरा पडत होता. पहिली तारीख जवळ आली तशी आजीने हट्टाने जयंतला पोस्टात पाठवलं होतं. स्वतः दारात त्याची वाट पाहत बसल्या होत्या.

यावेळी जयंत आला तोच अगदी उड्या मारत.

'सानेआजी, माझा पायगुण दैवी आहे बघ. बघ, शेवटी तुझ्या लेकाच पत्र आलं. दगडाला पाझर फुटला रे एकदाचा.'- जयंत सानेआजीची मस्करी करत होता.

'देव पावला रे! दे दे, माझ्याकडे दे.'- आजींनी जयंतजवळून पत्र जवळपास ओढून घेत पटापट पत्राचे मुके घेऊन काही क्षणांसाठी पत्र छातीशी कवटाळून घेत त्या डोळे घट्ट मिटून बसल्या. अश्रुंचे काही थेंब हातावर पडले तसे त्यांनी पत्र जपून धरले. काही मिनिटांनी स्वतःला सावरत त्यांनी पत्र जयंतकडे वाचायला दिलं. पत्रात लेकाने आजीची खुशाली विचारत, स्वतःची खुशाली कळवली होती. अगदी मोजक्याच वाक्यात पत्र संपलं असलं तरी आजीसाठी तेही पुरेसं होतं.

पुढचे कित्येक महिने पत्र येतच राहिली. एकदोनदा दिपेश स्वतः पत्र घेऊन आला होता. सानेआजी आता अगदी उत्साही राहू लागल्या होत्या. तब्येतीच्या तक्रारी हळूहळू काहीश्या कमी झाल्या होत्या.

एकदिवस मात्र त्यांना त्यांच्या लेकाने स्वतःहून फोन केला होता. तो खास त्यांना भेटायला भारतात येणार होता. आजी मात्र त्या बातमीने आनंदित होण्याऐवजी व्यथित झाल्या होत्या. त्या पुनः गप्प राहू लागल्या होत्या. जयंतने कित्येक प्रयत्न करूनही त्या व्यक्त होत नव्हत्या. ठरल्यादिवशी त्यांचा लेक त्यांना भेटायला आला होता. आजीने त्यावेळेस जयंत आणि दिपेशला बोलवून घेत, सोबत ठेवले होते.

'कशी आहेस आई?'- सुंदरने कोरड्या आपुलकीने सानेआजीला विचारलं.

'मी आहे रे छान. तू तात्पुरतं राहण्यासाठी पाठवलेल्या या वृद्धाश्रमाची कायमस्वरूपी रहिवासी झाले की रे मी. तुझं सगळं व्यवस्थित ना? काही अडचण नाही ना?'- सानेआजीने डबडबलेल्या डोळ्यांना लपवत लेकाला विचारलं.

'माझा नाईलाज होता आई. तुला तर माहिती आहे ना?'

'हो रे. माझं नशीब! माझी काही तक्रार नाही. बोल. आज असा अचानक?'

'हो ते थोडा बिजनेस गडबडला ग.'

'बरं, मग?'

'आपलं घर..'

'ते तर मी विकलं. दोन दिवसांपूर्वीच. तू त्यासाठी येशील असं माहीत नव्हतं ना मला. घराच्या मिळकतीचे दोन हिस्से केलेत आणि त्याचे हिस्सेदार, हे बघ दोघे.'- साने आजीने जयंत आणि दिपेशकडे बोट दाखवत म्हटलं तसे सगळेच तिनताड उडाले होते.

'आजी?'

'आई?'

'तुम्हाला काय वाटलं? तुमची नाटकं मला कळणार नाहीत का?अरे बिनतेलाची कोरडी चपाती मी इकडे येऊन खायला शिकली ते पण नाईलाज म्हणून. तुम्हा सेवेकऱ्यांना वाईट वाटू नये म्हणून मला लहानपणापासून सवय आहे असं भासवत राहिली.  तुम्ही पत्रात त्याचा उल्लेख केला तेव्हाच मला कळलं की माझी ममता फसली असली तरी माझं नशीब तितकंसं वाईट नव्हतं. मग मीही तुमच्या नाटकात सहभागी झाले. तुम्ही माझ्या आयुष्यात पेरत असलेल्या आनंदाचा पुरेपूर उपभोग घेतच होते की याचा फोन आला. झालं आता सगळ्यांच बिंग फुटणार होतं. सहा दिवसांसाठी सोडून गेलेला पोरगा सहा वर्षांनी अचानक भेटायला येतो तेव्हाच मला त्याच प्रेम समजलं. उरलीसुरली आशा तिकडेच संपली. काही दिवसांनी मीही संपून जाईन. पण मागचे काही महिने तुम्ही दोघांनी मिळून मला जे जगवलं त्याची परतफेड म्हणून..'- साने आजींना पुढे बोलवेना तश्या त्या रडू लागल्या.

'आजी, तुमच्यातली हताश आई पाहवत नव्हती म्हणून आम्ही दोघांनी मिळून हा बनाव..'- जयंत आजींना सावरत बोलत होता.

'मला कळलं रे ते. तुला जेव्हा पहिल्यांदा पोस्टात आणलं तेव्हा तुझी आणि दिपेशची झालेली नजरानजर या अनुभवी डोळ्यांना एक आशा दाखवून गेली होतीच. शेवटी तेच झालं. पण ते क्षण मी जगले रे. कोणीतरी नव्याने आयुष्यात रंग भरल्याच अनुभवायला मिळालं. तुमच्या दोघांचे खूप आभार. देव तुमचं भलं करो. ज्या टपालाने जगण्याची नवी उमेद दिली त्याच अस्तित्व कायम राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना! '- साने आजींनी दोघांचे हात एकत्रित घेत आपल्या कपाळी लावले होते.

'आजी, मला हे पैसे नकोत.आम्हाला तुम्हाला आनंदी पाहायचं होतं.'- योगायोगाने दोघेही एकत्रच बोलले.

'हो रे माझ्या पोरांनो. पोटच्या पोराने पाठ फिरवली म्हणून काय झाली तुम्ही सोबत आहात म्हटल्यावर मी आता आनंदातच राहायचं ठरवलं आहे.'- सानेआजी डोळे पुसत बोलल्या.

'मी अनाथ आहे.'- पुनः दोघे एकत्र बोलले आणि सगळेच स्तब्ध झाले होते.

'पण आता आपण एक कुटुंब आहोत बरं. चला मग तुम्हाला आई मिळाली आणि मला माझी मुलं.'- सानेआजी दोघांचे गाल ओढत बोलताच वृद्धाश्रमातील जेष्ठांनी टाळ्यांचा कडकडाट केला होता.

संपत्ती लोभाचा पत्ता टाकलेलं सुंदरच पत्र त्याच्याकडे माघारी धाडण्यात आलं होतं. स्वार्थीपणाचा शिक्का मारूनच..

समाप्त.
©® मयुरेश तांबे

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Mayuresh G. Tambe

Service

नमस्कार मंडळी.. इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि नोकरी.. त्यामुळे नट आणि बोल्ट भोवती फिरणाऱ्या आयुष्यात विरंगुळा म्हणून जस जमतं तसं लिहितो.. आवडलं तर दाद द्या आणि नाही आवडलं तर नक्कीच हटका..

//