टपाल...पत्र आईला

एका मुलीचं पत्र


टपाल
पत्र आईला…एका मुलीचं

प्रिय आई

पत्रास कारण की …पुढे काय सांगायचं तुला? नेहमीचं मी मजेत आहे असं सांगू? तुला हे उत्तर वाचलं की बरं वाटेल नं! मग माझं हेच उत्तर आहे.

खरी गोष्ट तुला सांगून कशाला दुखावू. कारण आता तू या जगात नाहीस.माझ्या लग्नाची मंगलाष्टकं ऐकायला नको म्हणून फार दूर गेलीस का? तू कार्यालयाच्या बाहेर थांबली असतीस तरी मला धीर आला असता ग.

लग्न छान झालं. जावई आधीपासूनच तुझा लाडका होता. हे मला माहीत होतं पण…लग्नानंतर आईनी डोळ्यातून दिलेला आधार हवा असतो ग. तो नव्हता ग माझ्या पाठीशी. मी माहेरी आल्यावर तुझी माझ्याभोवती भिरभिरणारी नजर नव्हती.

तू का ग अशी घाईने गेलीस? लग्नानंतरच्या मायलेकींच्या गप्पा झाल्याचं नाहीत.मी मात्र मनातच तुझे प्रश्न मला विचारत होते आणि मीच उत्तर देत होते.

वर्षभर चालणारे सण ,त्यांचं कौतुक आईच्या डोळ्यात बघायला मुलीला आवडत ग हे कसं तू विसरलीस आणि निघून गेलीस.

तुझ्यासारखी काळजी घेणारी सासू माझ्या आयुष्यात आली पण मुळात माझा स्वभाव अबोल असल्याने आमचं नातं जुळायला वेळ लागला .हे नातं मला आईची माया पाखरं देत आहे तोच तीही दूर निघून गेली तुझ्यासारखी.

तेव्हा मी कोलमडले आणि वाटू लागलं सगळं काही आपल्या जवळ असलं तरी आई नाही म्हणजे आपली अवस्था आईविना भिकारी अशी होते.

आई हवी. आईसारखी माया करणारं दुसरं कोणी आलं नाही ग माझ्या आयुष्यात.

आईची माया आईचं देते.कारण निसर्गानेच तिच्यात आईचं वात्सल्य,महत्व, पुरेपूर भरलेलं असतं.


माझ्या आयुष्यात अनेक चढउतार आले.सगळ्याला खंबीरपणे तोंड दिलं.वरती हात लावून जीवंत परत आलेल्या नव-याचं दुखणं पण खंबीरपणे झेललं.पण प्रत्येक वेळी वाटायचं आई तू असती तर तू मला कुशीत घेतलं असतं.मला समजून घेतलं असतं.माझ्या दु:खा वर फुंकर घातली असती. का नाही होऊ शकलं ग असं?


तू जाऊन कितीतरी वर्ष झाली तरी कधीतरी एकटी असताना मला तुझ्या आठवणीने गलबलून येतं. तुला मी दिलेला त्रास आठवतो, तुझ्याशी घातलेली हुज्जत आठवते,तुझ्यावर रागाउन उपाशी राह्यलेलं आठवतं. माझं हे वागणं तू कसं सहन केलस? तू आई होतीस नं…म्हणून तर सहन करू शकली.

आई….
तुझ्या आयुष्यात पण आली असतील नं संघर्षाची वादळं? अश्वत्थाम्यासारखी ती भळभळणारी जखम घेऊन वावरली असशील!

कधी कुणाला कळू दिल्या नसशील अंतरीच्या वेदना…

मुलांसमोर कधीच गाळले नाहीस अश्रू.
शिस्तीचं एक कठोर कुंपण मात्र घातला स्वतःभवती आणि माझ्या भवतीही.

तुझ्यासारखी धडाडी आणि संघर्ष करण्याची ताकद माझ्यात येईल नं?

मुलांना योग्य वळण लावण्याची तुझी शिस्त माझ्यात येईल नं?

आई….बोल नं..
तुझं उत्तर ऐकायला कान आतूर झालेत.
आई बोलतेस नं?
आई तुझ्या उत्तराची वाट बघतेय तुझी मुलगी. पत्र पाठवशील नं?

तुझ्या मायेला पारखी झालेली…
तुझी मुलगी.

__________________________
*** मीनाक्षी वैद्य