Mar 02, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

टपाल (अ ल क)

Read Later
टपाल (अ ल क)

टपाल(अ. ल. क.)

नुकतेच सीमेवर युद्ध सुरू झाले होते. ती सैन्यात असलेल्या नवाऱ्याच्या काळजीने हैराण होत असे. रोज कुंकू लावताना तिचा हात थरथरत असे. त्यात संक्रांत दोन दिवसांवर आलेली. अनेक जवान चकमकीत शहीद झाल्याची तर काही बेपत्ता असल्याची माहिती सतत दिली जात होती. ती अस्वस्थ होती.

इतक्यात लांबूनच पोस्टमन येताना दिसला. तिने अधिरतेने टपाल उघडले. नवरा किरकोळ जखमी होऊन उपचार घेत होता. लवकरच घरी येईल असा निरोप होता. तेच टपाल हृदयाशी लावून ती संक्रांतीचा सण साजरा करायला सज्ज झाली.
अतिशय गरिबीत दहावी पास झाल्यावर त्याने शिक्षक व्हायचे ठरवले. उत्तम गुण असल्याने प्रवेश मिळाला. दोन वर्ष संपली. निकाल जाहीर झाला. तो उत्तीर्ण झाला. घरी आल्यावर परत माय बापाबरोबर शेतात राबणाऱ्या त्याला पाहून अनेकजण नाक मुरडत.

तो मात्र काम करत राही. एक दिवस शेतात नांगरणी करत असलेल्या त्याला बाप धावत पळत येताना दिसला. बापाने नोकरी लागल्याचे टपाल त्याच्या हाती दिले आणि घट्ट मिठीत त्याच्या कष्टांचे सार्थक झाले.

नुकतेच लग्न होऊन सासरी आलेल्या तिला माहेरची आठवण येई. त्यात माहेर विदर्भात. लवकर जाणे शक्य नसे. सगळे सण नवरा आणि ती दोघेच. तिला मात्र माणसे आवडत.


शेवटी तिने टपाल लिहायला घेतले,"सासूबाई,इथे करमत नाही. मला दिवाळीला न्या नाहीतर तुम्ही इकडे या."

टपाल पोस्ट केले आणि तिचे मन नकळत सासर माहेरच्या उंबरठयावर जाऊन पोहोचले.
ती नुकतीच पदवी घेऊन घरी बसलेली. आता बाबा स्थळे पहात होते. तिची बैचेनी वाढत होती. वर्गातील त्याचे हसणे,काळजी घेणे,मदत करणे. सगळे परत परत आठवत होते.

तरी दुसरे मन सांगायचे त्याने कुठे प्रेमाची कबुली दिली? तो रमला असेल दुसऱ्या कोणीकडे. इतक्यात पोस्टमन आला,"टपाल!"असा आवाज कानावर येताच ती भानावर आली.

तिच्या नावावर पत्र होते. दोनच ओळीचा मजकूर तिचे आयुष्य
बदलून गेला,"मला नोकरी लागली आहे.आई बाबांना घेऊन तुला मागणी घालायला येतोय."

घरच्या परिस्थितीमुळे त्याचे शिक्षण लवकर सुटले. पोटापाण्यासाठी शहरात नोकरी करत होता. इथे रहायची सोय नव्हती. तरी जनरीत आणि वय पाहून लग्न झाले.

जेमतेम चार इयत्ता शिकलेली बायको. लग्न झाल्यावर काही दिवस राहून तो परत आला. तो मधुगंधी सहवास,बांगड्यांची किणकिण सगळे आठवायचे. तिला आपल्या परिस्थितीमुळे इकडे आणता येत नाही याचे दुःख होई.

एक दिवस सकाळी पोस्टमनची हाक आली,"टपाल!"त्याने पत्र फोडले,"कारभारी म्या मजेत हाय. तुमि काळजी घेवा. दिवाळीला कायबाय घिउन यिवू नगा. फकस्त दोन दिस जास्त सवड काडा."

त्याच्या डोळ्यातून अश्रू कधी बरसले त्याला कळलेच नाही.

पत्रातून त्यावेळी माणसे प्रत्यक्ष भेटायला यायची. अनेकांना जगण्याचे बळ देणारे हे टपाल घेऊन येणारा पोस्टमन देवदूत वाटायचा. असेच काही सकारात्मक प्रसंग मांडायचा हा छोटासा प्रयत्न.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kunjir Prashant Vishwanath

Primary Teacher

Primary Teacher In Z P Pune A Writer,A Poet An Anchor

//