टपाल - पत्रलेखन

टपाल-पत्रलेखन

दरवर्षी ९ ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. ज्याची सुरुवात स्वित्झर्लंड मध्ये १८७४ ला झाली. पोस्ट खाते हे सर्वात जुने खाते आहे. आजच्या इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या वेगवान होत चाललेल्या युगात टपाल सेवा ही आपल्या कार्याचे स्वरूप बदलत आहे.

आम्ही लहान असतांना ' पत्र 'हा आमचा जिव्हाळ्याचा विषय. त्यावेळी आम्ही अगदी आतुरतेने पत्राची वाट पाहायचो. पोस्टमन काका कुठेही दिसले तरी 'काका,आमच्या घरचे पत्र आहे कां?'अशी आवर्जून विचारना व्हायची. खेळताना सुद्धा एक खेळ 'मामाचं पत्र हरवलं, तेच आम्हाला सापडलं वगैरे वगैरे.

इतकच नव्हे तर गाणं सुद्धा अगदी तालासुरात.

           राजमान्य राजश्री...

           पत्र लिहिण्यास कारण की.....

            तुमची मुलगी माझ्या....

             मुलाला देता कां हो, मुलाला देता कां?....

             

              माझा मुलगा भोळा....

               वय त्याचं सोळा.....

                चालताना पायात येतो....

                 वाताचा गोळा....


                सांगा तुमची मुलगी...

                 माझ्या मुलाला देता कां हो ,

                 मुलाला देता कां ?

हे गाणं गात गात मन मुराद हसायचो आम्ही. शाळेत पत्रलेखन शिकवलं जायचं. पत्र लेखनाचे दोन प्रकार.१) घरगुती पत्रे २) व्यावहारिक पत्रे.

आई, वडील,बहीण,भाऊ,काका यांना लिहिलेली घरगुती पत्रे तर निमंत्रण पत्र, मागणी पत्र, चौकशी पत्र, अभिनंदन पर पत्र ही व्यावहारिक पत्रे.

घरगुती पत्रांच्या आरंभी 'श्री 'लिहायचं. फक्त दुःखद वार्ता असलेल्या पत्रावर 'श्री 'लिहायचं नसतं. पत्राच्या सुरुवातीला उजव्या कोपऱ्यात स्वतःचा पत्ता व दिनांक. त्यानंतर मायना. यामध्ये आई व वडील यांना तीर्थरूप. तीर्थरूप म्हणजे तीर्थ हेच रूप. आई वडील तीर्थच आहेत. त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. इतर आपल्यापेक्षा मोठ्या नातेवाईकांना तीर्थस्वरुप. तीर्थासारखे स्वरूप म्हणजे त्यांची तुलना इतर कोणाशीही करता येते असा त्याचा अर्थ.

        तीर्थरूप बाबास,

        शिरसाष्टांग नमस्कार .

         विनंती विशेष. (शि.सा.वि.वि)

लहानांना चिरंजीव.......

              अनेक आशीर्वाद.

आजही शाळेत पत्रलेखन शिकवलं जातं. पण ते शिकण्यापुरता मर्यादित. प्रत्यक्षात मामा ,मावशी इतर नातेवाईकांना पत्र लिहिल्या जात नाही कारण मोबाईलचा जमाना आहे. पण आजही आम्ही अनुभवलेल्या पत्राची आठवण येते. नजरेसमोरून पोस्ट कार्ड, लिफाफा सरकायला लागतो. त्या पत्रातल्या मजकुरातील जिव्हाळा, प्रेम आजही आठवते. चला तर मग मैत्रिणींनो, आपणही लिहून पाहूया आपल्या प्रियजनांना एखादे पत्र.