चाळ आणि तमाशा हेच तिचे सर्वस्व - विठाबाई नारायणगावकर
मी साधारण पाचवीला असेल ,नारायणगावच्या बाजारात शेतातील मेथी विकायला बसले होते.
बाई-ए पोरी दोन मेथीच्या गड्डया दे
मी त्यांना दोन गड्डया दिल्या ,तश्या त्या पैसे न देता तशाच पुढे जायला लागल्या ,तसं मी हाक मारुन म्हटलं,अहो भाजीचे पैसे द्या.
तशी शेजारी बसलेल्या मावशी म्हटल्या ,ती नाही देणार,तिच्या नादी लागू नको ,तमाशातली बाई आहे ती ,उगाच तमाशा करेल.
तरी मी तिच्या पाठिमागे गेली ,तिचं घर बाजाराजवळच होतं .
बाई-तिने सांगितलेलं कळालं नाही का
मी-मला काय करायचं,तुम्ही काही करा ,मला माझ्या भाजीचे पैसे द्या ,मला घरी गेल्यावर हिशोब द्यावा लागतो.
बाई-माझ्याकडे पैसे नाही
मी -मी सांगितलं ना ,मला पैसे द्या
बाई -देते ,इथं जवळच माझं घर आहे ,मी तुला आणून देते
मी-आणि तुम्ही नाही आल्या तर
बाई-एक काम कर ,तू चल माझ्या बरोबर,इथं जवळच आहे माझं घर
मी -बरं,मी त्या मावशीला लक्ष ठेवायला सांगून येते
मी मावशीला सांगितलं आणि तिच्या बरोबर निघाले .
बाई-शाळेत जाते का
मी-हो जाते
बाई-कितवीला
मी-पाचवीला
बाई-नाव काय तुझं
मी माझं नाव सांगितलं ,आजोबांच नाव सांगितलं
बाई-मी ओळखते तुझ्या आजीला,कडक आहे ,तू पण तिच्या सारखीच आहेस
मी-मग मी काय सांगू आजीला
बाई- सांग तमाशातली विठाबाई भेटली होती.
तितक्यात तिचं घर आलं,ती म्हणाली ,आत ये
मी-नाही ,माझी भाजी आहे बाजारात ,तुम्ही पैसे द्या माझे ,तिने माझे पैसे दिले आणि म्हणाली पोरी शिकून खूप मोठी हो,असं म्हणत तोंडावरुन हात फिरवला.
मी परत माझ्या जाग्यावर येऊन बसले ,शेजारची मावशी बोलली ,बरे तिने तुला पैसे दिले .
मी-भाजी घेतली ,तर द्यायला नको होय
त्यावर त्या शांत बसल्या ,फक्त हसल्या.
आता इराने दिलेल्या विषयामुळे तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला आणि तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली,मग काय गुगल बाबाला विचारलं आणि लेख लिहायला घेतला.
विठाबाई ही भाऊ बापूमांग नारायणगावकर आणि शांताबाई यांची कन्या ,बापाचा तमाशा असल्या कारणाने ,पंढरपुरात तमाशाच्या कणातीत जन्माला आलेली मुलगी आणि मुलगी जन्माला आली म्हणून नाव ठेवले विठाबाई . जशी जशी मोठी होत होती ,तसा तिचा ओढा लावणी म्हणण्याकडे आणि नृत्याकडे होता ,वडील तमाशाच्या निमित्ताने गावोगांव फ़िरायचे ,त्यामुळे त्यांनीही शिक्षणाची सक्ती केली नाही. वयाच्या दहाव्या वर्षी जिथं पैंजण घालून बागडायला पाहिजे ,तिथं त्या तमाशात कसं काम करायच्ं ,ह्याचे धडे मामा वरेकरांच्या कलापथकातून घेऊ लागल्या . मूळचा त्यांचा पिंड त्यातलाच असल्याने त्या लवकरच त्यांच्या कलेत पारंगत झाल्या.त्या दिसायला सावळ्या असल्या तरी देखणा चेहरा,गोड गळा आणि अप्रतिम अभिनय याचे देवाने त्यांना वरदान दिले होते. वडील शाहिर भाऊ बापूमांग नारायणगावकर यांचा नावाजलेला तमाशाचा फ़ड होता . नारायणगावला तमाशाचे माहेरघर मानले जाते ,तिथल्या मुक्ताबाईच्या यात्रेच्या वेळी सहा ते सात दिवस वेगवेगळे तमाशे असतात,प्रेक्षकांची तर झुंबड उडते. तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे आणि मनोरंजनाबरोबर सामाजिक प्रबोधन करणे हे ही त्याचे उद्दीष्ट आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर तमाशाची पूर्ण जबाबादारी विठाबाई यांच्यावर पडली ,फडात काम करणारे सारे कलावंत त्यांच्यावर अवलंबून होते ,1960 च्या काळात एका स्त्रीने असं फडाचं नेतृत्त्व करायचं ,म्हणजे खूपच धाडसाचं काम होतं. तमाशा चालवणं,म्हणजे साधी गोष्ट नाही ,त्यासाठी खूप हिंमत आणि प्रचंड इच्छाशक्तीची गरज असते ,जी विठाबाई यांच्यात काळाने ठासून भरली होती . हे सगळं करत असताना त्यांनी पुण्यातील मारुती सावंत यांच्या बरोबर संसार थाटला ,त्यांना पाच मुली व तीन मुले अशी आठ अपत्ये.
पण त्यांच्या बिनधास्त स्वभावामुळे,व्यक्तीगत आयुष्यात मात्र त्यांना म्हणावे तसे सुख आणि समाधान लाभले नाही , बदनामीही खूप वाट्याला आली ,पण कोणत्याही परिस्थितीत न डगमगता ,तिने तिचं लोककलेच घेतलेलं व्रत ,मात्र अखंडितपणे चालू ठेवलं,आपल्या व्यक्तिगत जीवनाचा प्रभाव त्यावर पडू दिला नाही आणि खरा कलाकार असल्याचं सिध्द केले.ज्या ज्या व्यक्तींना तिने आपलं समजून जवळ केले,त्यांनी मात्र स्वत:च्या स्वार्थासाठी तिचा उपयोग करून घेतला,पण प्रेक्षकांनी मात्र त्यांच्या व्यक्तीगत आयुष्याचा विचार न करता,त्यांच्या कलेवर फिदा होत,लावणीसम्राज्ञी अशी उपाधी दिली.त्यांची एक दंतकथा प्रचलित आहे, तमाशा करत असताना ,बाळंतपणाच्या वेदना सुरु झाल्या ,पडद्याआड जाऊन बाळाला जन्म देऊन,ती पुन्हा रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सिध्द झाली ,अशी ही रणरागिनी, म्हणतात ना स्त्री ही सोशिक असते ,हे त्याच उत्तम उदाहरण आणि या प्रसंगातून त्यांची कलेवरची निस्सीम श्रद्धा दिसून येते.
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची ,नेसली पितांबर जरी या त्यांच्या लोकप्रिय लावण्या आहेत.शिवाय रक्तात न्हाली कुऱ्हाड,रंगल्या रात्री अशा ,छोटा जवान ,मुंबईची केळेवाली ,मराठा सरदार , सापडला हरी नायकिणीच्या घरी ,चंद्रमोळ,शिवप्रताप आणि रायगडची राणी ही त्यांची गाजलेली वगनाट्ये आहेत.भारत-चीन युद्धाच्या दरम्यान विठाबाईंनी लष्करातील सैनिकांसाठी त्यांनी नेफा सीमेवर १९६२ तमाशा सादर केला होता . घरापासून दूर देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांना तमाशा कलेच्या माध्यमातून मानवंदना देण्याचा बहूमान विठाबाईंनी मिळाला.
विठाबाई १९६८ साली पुणे येथे भरलेल्या अखिल भारतीय तमाशा परिशदेच्या अध्यक्ष होत्या. त्यांनी १९९० रोजी महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कारही दिला. दलित नाट्यासंमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार, जागतिक महिला दिन पुरस्कार, मोठ मोठ्या मान्यवरांच्या हस्तेही विठाबाईंचा गुणगौरव करण्यात आला. भारत सरकारचा सन्मानाचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.१९९० मध्ये त्यांना कलेतील राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. योगदानाबद्दल पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानचा दया पवारांच्या नावे या बहुआयामी विठाबाईचा गौरव करून सन्मानही करण्यात आला.
तमाशा चालवत असताना सर्वाची साथ सुटलेली असताना विठाबाई वेगवेगळ्या शेठ सावकाराकडून कर्जाने घेऊन आर्थिक आपत्ती ओढवली असताना तमाशा उभा केला. श्रीमंती ही केवळ बोर्डावरची हीच मालमत्ता घेऊन वार्धक्यात विठाबाई जीवन व्यतीत करू लागल्या.त्यांचे शेवटचे दिवस हे खूप हलाखीत गेले ,जसे इतर लोककलाकारांचेही होते ,उमेदीच्या काळात जो पैसा मिळतो ,त्याचा वापर योग्य रितीने न केल्यामुळे असे होते. शेवटी 15 जानेवारी 2002 मध्ये अशा ह्या धाडसी आणि तमाशा साम्राज्ञीची जीवन ज्योत मालवली ,अशा ह्या लावणी सम्राज्ञीला या लेखाच्या निमित्ताने मानाचा मुजरा की जिच चाळ आणि तमाशा हेच सर्वस्व होतं .
जर लेख आवडला असेल तर नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या.
रुपाली थोरात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा