तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 1

एका भयानक गुन्ह्याचा अंधार भेदणारी सहा मित्रांची कथा



तमाच्या तळाशी दिवे पेटलेले. भाग 1

"चिंटू,ये चिंटू आटप लवकर. स्कूल बस येईल आता." चिंटूची आई म्हणजे मिसेस देशमुख यांनी त्याला घाई करत आवाज दिला.

"ब्रिजेश,चिंटू बाबाला खाली सोडून ये."असे फर्मान काढून त्या आत पार्टीची तयारी करायला गेल्या.

मिस्टर अँड मिसेस देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय बडे प्रस्थ. सोबत अनेक उद्योगांचे आणि मोठ्या संपत्तीचे मालक. सहज चाळा म्हणून त्यांनी टी.व्ही लावला. तितक्यात आईचा फोन आला.

"शाल्मली,अग बातम्या बघ. आज अजून एक मुलगी गायब झाली. गेल्या आठ महिन्यात ही पाचवे मुल आहे. श्लोक शाळेत जातो तर मला भीती वाटते. त्याची काळजी घेत जा नीट."

आई तिकडून काळजीने सांगत होती.

"आई, श्लोकच्या शाळेत कोणालाही प्रवेश नसतो. इतर वेळी त्याच्या बरोबर सतत मदतनीस असतात. तू भलत्या सलत्या बातम्या पाहून चिंता करणे सोडून दे."

आईला समजावून शाल्मलीने फोन ठेवला. चेहऱ्यावर पफ फिरवताना मनात कुठेतरी सूक्ष्म भीतीची लहर उलटली होती. परंतु मनातील विचार मागे झटकत मुख्यमंत्र्यांच्या बायकोने दिलेल्या पार्टीला जायला शाल्मली तयार झाली.


"अहो,दोन मिनिट थांबा. डबा भरतेच आहे." कॉन्स्टेबल कदमांच्या बायकोने आवाज दिला.

"दोन मिनिट? दोन सेकंद उशीर झाला तरी ती बया एन्काऊंटर करील माझा." कदम घराबाहेर पडत ओरडले.

बायको पळत येईपर्यंत कदम गाडीला किक मारून निघूनही गेले.

"कदम,चला गाडी काढा."
इन्स्पेक्टर पूर्वाचा आवाज ऐकताच कदम आपली गाडी डबल स्टँडवर लावून तसेच गाडी काढायला पळाले.

क्राईम ब्रांच मधील नेमणूक असूनही आज मुख्यमंत्र्यांच्या बायकोच्या किटी पार्टीच्या ठिकाणी ड्युटी लावल्याने पूर्वा प्रचंड धुमसत होती. एरव्ही अगदी कोरा भावनाशून्य असणाऱ्या तिच्या चेहऱ्यावर संतापाची हलकी रेषा तिच्याही नकळत उलटली होती. कदम गाडी घेऊन आले. पूर्वा गाडीत बसली आणि गाडीने वेग घेतला.


"रज्जो मेरी जान, आज खास आदमी आनेवाला है| खुश कर देना|"

बिल्ला तिच्या कानात खुसपुस करून गेला आणि त्याक्षणी रज्जो उर्फ रागिणीला स्वतः ची किळस वाटली.


जगासमोर अभिनेत्री असली तरी तिला तिचा रेड लाईट एरियातील भूतकाळ सोडत नव्हता. आजही काही खास गिऱ्हाईक आले तर बिल्ला तिच्याकडे येत होता. जर तिने अमान्य केले तर तिचा भूतकाळ व्हिडिओ आणि फोटो सकट बाजारात मांडला जाणार होता. रजनी स्वतः ला रज्जोमध्ये बदलून तयार झाली.


"अशोक,प्रियांका, मन्या,सचिन आरे उठा लवकर. पूर्वा ड्युटीवर गेलीसुद्धा."

दिव्या बडबड करत सगळ्यांना उठवत होती.


मुंबापुरीचा थोडासा बाहेरचा भाग असलेला हा बंगला आणि त्यात एकमेकांना धरून राहणारी ही सहा मुले. खरतर स्टेशनवर भीक मागण्यात किंवा असेच काहीतरी करण्यात आयुष्य संपले असते. परंतु पाटील काका काकु यांच्या आयुष्यात देवदूत बनून आले. ह्या सहा मुलांना मायेने सांभाळून स्वतः च्या पायावर उभे केले. आज पाटील काका आणि काकू नसले तरी त्यांचे आशीर्वाद असणारा हा सावली बंगला पोरांनी जीवापाड जपला होता.


काकांच्या फोटोला दिव्या हळूच पूसत असताना तिला अनेक आठवणी आठवत होत्या. इतक्यात दारावरची बेल वाजली आणि दिव्या पटकन दूध घ्यायला पळाली. तोवर बाकीचे सगळेजण उठून तयारीला लागले.


अशोक एक निष्णात फोटोग्राफर होता. प्रियांका संगणक क्षेत्रात काम करायची. मनोज रेडिओ जॉकी म्हणून प्रसिद्ध होता. सचिन एक निष्णात नेमबाजी प्रशिक्षक होता. ह्या सर्वांपेक्षा वेगळे क्षेत्र होते दिव्याचे. दिव्या एक प्रसिद्ध ब्लॉगर होती. फूड आणि ट्रॅव्हल तसेच इतर विषयांवर सुद्धा तिचे ब्लॉग गाजत असत.


शाल्मली छान तयार होऊन बाहेर पडली. मर्सिडीजने सफाईदार वळण घेतले आणि गाडी मुख्य रस्त्यावर आली. मुंबई,चोवीस तास जागे असणारे शहर. सकाळी तर नुसता गर्दीचा महापूर असतो. गाडीत मोबाईलवर सोशल मीडिया चाळत असताना अचानक काचेवर टकटक झाली.


सिग्नलवर थांबलेल्या गाडीच्या काचेवर एक छोटी मुलगी टकटक करत होती. तिच्या चिंटूच्या वयाची छोटीशी मुलगी पाहून शाल्मली क्षणभर भावुक झाली. इतक्यात सिग्नल सुटला आणि तिच्या मनात दाटून आलेले भावनिक आंदोलन तिने झटकून टाकले.


सकाळी सकाळी एक मीटिंग आटोपून तिला पार्टीला पोहचायचे होते. शाल्मली देशमुख ह्या नावात कमावलेला आत्मविश्वास सोबत घेऊन तिने मीटिंग संपवली आणि गाडी पार्टीच्या दिशेने धावू लागली.


पार्टीच्या ठिकाणी आपला फोन जमा करून शाल्मली आत गेली. नो फोन पॉलिसी असल्याने फोन आत नेता येणार नव्हता. शाल्मली आत शिरली आणि चेहऱ्यावर कमावलेले हास्य झळकले.

इकडे रज्जो उर्फ रागिणी त्या आलिशान हॉटेलात पोहोचली. स्वतः च्या मनाविरुद्ध किती वेळा मरण भोगले याचा हिशोब करायचे तिने सोडले होते. दरवाजा उघडला आणि समोर देखणा समीर देशमुख पाहून तिला जरा बरे वाटले.


रूमचा दरवाजा बंद करून रज्जो उर्फ रागिणी आत आली. समीरने तिला आपल्याकडे खेचले आणि फोन सायलेंट वर टाकला. शरीराची भडकलेली आग जग विसरायला लावत होती. उत्कट क्षण जवळ येत असतानाच दारावर थाप पडली.


"सर,लवकर टी. व्ही. ऑन करा आणि इथून बाहेर पडा."
सेक्रेटरी दामले एवढेच बोलून खाली निघून गेला.

समीर बाजूला झाला आणि टी.व्ही. ऑन केला. बातमी बघताच. पँट चढवून शर्टची बटणे लावतच तो लिफ्टमध्ये शिरला. शाल्मली पार्टी एन्जॉय करत असताना अचानक संगीत बंद झाले.

मदतनीस जवळ आली आणि हळूच कानात बोलली. मिसेस मुख्यमंत्री आणि शाल्मली तातडीने पार्टीच्या बाहेर पडल्या.


पूर्वाला पार्टी संपली म्हणून जरा बरे वाटले. इतक्यात तिला रेडीओवर संदेश आला आणि पूर्वा ओरडली.

"कदम,इथूनच पार्सल बांधून घ्या आणि गाडी काढा लवकर."


कदम चपळाईने निघाले. अशोक पेज थ्री पार्टी संपवून निघाला होता. एवढ्यात त्याला शनायाचा फोन आला.


"असशील तिथून लोकेशनवर पोहोच."


लोकेशन पाहून अशोकच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने गाडी हळूवार वळवली. मायानगरी मुंबई रात्रीचे लेणे लेवून सज्ज झाली होती. रात्रीच्या ह्या गर्भात काय दडले असेल याची कल्पना कोणालाच नव्हती.


नक्की काय झाले असेल? ह्या सगळ्या लोकांचा एकमेकांशी काय संबंध? सगळी रहस्य हळूवार उलगडत जातील.

वाचत रहा.
तमाच्या तळाशी दिवे पेटलेले.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all