Feb 29, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 4

Read Later
तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 4

तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 4

मागील भागात आपण पाहिले पूर्वा मुलांच्या मदतीने स्केच मिळवते. इकडे चुकीची मुले पळवून आणल्याने बॉस स्नेहा आणि मयुरला विकून टाका असे सांगतो. अशोक रागिणीचा पाठलाग सुरू करतो. पूर्वा ह्या सगळ्यात नक्कीच सिरीयल किलर असेल असे धरून चालते. आता पाहूया पुढे.अशोक आणि फिरोज ठराविक अंतर ठेवून पाठलाग करत होते. थोड्याच वेळात गाडी एका बोळात जाऊन थांबली. ते दोघे रस्त्यात गाडीतच बसून होते. काही वेळाने गाडी रिकामी बाहेर आली. रागिणी गाडीत नव्हती.

"अशोक,चल तिने आपल्याला चकमा दिला आहे." फिरोज निराश झाला.

तेवढ्यात एक घुंगट घेतलेली महिला बाहेर आली. तिने रिक्षा थांबवली.

"फिरोज फॉलो दॅट ऑटो." अशोक हसून म्हणाला.

रागिणी उर्फ रज्जो रिक्षात बसून होती. आज पुन्हा बिल्ला नावाचा दलाल तिचा सौदा करणार होता.


"हॅलो,इन्स्पेक्टर पूर्वा. नलिनी हिअर."
नलिनीचे नाव ऐकताच पूर्वा कॉल कट करणार होती.

"पूर्वा,एक बातमी आहे. मयूर आणि स्नेहा टार्गेट नव्हते. सुपर्णा आणि श्लोकसाठी असलेल्या सापळ्यात ते सापडले. इट्स अ बिग गेम."
नलिनी थांबली.

"नेहमीप्रमाणे तू सोर्स सांगणार नाहीस. पण नक्कीच ह्याची मदत त्या दोन मुलांचा जीव वाचवायला होईल. थँकस."

पूर्वा फोन ठेवून खुर्चीवर बसली.


तिने प्रियांकाला फोन लावला.

"प्रियांका,मला आता तुझ्यात असलेल्या इंजिनिअरची मदत हवीय."

पूर्वा असे म्हणाली आणि पलीकडून हसायचा आवाज आला.

"हो ना! एका फॅशन डिझायनरला विचारतो कोण? तुम्ही सगळ्यांनी बोकांडी बसून ते बी. ई. करायला लावले. तरी बरे त्याच वेळी मी ह्या क्षेत्राचे शिक्षण घेतले. नाहीतर लॅपटॉपचे आवाज ऐकत मेले असते."
प्रियांका थांबली.

"दुःख ओकून झाले असेल तर ऐक. तुला एक स्केच पाठवते. त्यावरून फोटो बनवून पाहिजे लगेच."
पूर्वा रुक्ष कोरड्या आवाजात बोलली.

"मिळेल पण से द मॅजिक वर्ड्स माय डिअर."
प्रियांका अडून बसली.

"प्लीज! प्लीज! महाराणी प्रियांका मला मदत मिळेल का?"
पूर्वा चिडली.

"अर्ध्या तासात पाठवते. तसेही आज रागिणी नसल्याने शूट नाही." प्रियांकाने उत्तर दिले.तेवढ्यात कॉन्स्टेबल जाधव पळत आली.

"मॅडम! मॅडम! न्यूज बघा. अजुन एक मूल मारले गेले आहे."
पुर्वाने हे ऐकले आणि झटकन मोबाईल हातात घेतला. वाशीच्या खाडीत एका पाच वर्षे वयाच्या छोट्या मुलाचा मृतदेह मिळाला होता. मारायची पद्धत अगदी सेम होती.

"कदम गाडी काढा. शिंदे,तिथल्या लोकल पोलीस स्टेशन इन्चार्ज बरोबर बोलून घ्या."

सूचना देत पूर्वा झपाट्याने गाडीजवळ पोहोचली.

मारला गेलेला मुलगा मयूर असेल? विचार मनात येताच भितीची थंड लहर तिला जाणवली. गाडी वेगाने वाशीकडे धावू लागली.


"समीर,आपली माणसे कामाला लाव. मुलांना हात लावायची हिंमत कोणाची झाली."
सी.एम. त्याला चिडून विचारत होते.

"गेले दोन दिवस माझी माणसे शहर पिंजून काढत आहेत. कसलाच धागा जुळत नाहीय."
समीर शांतपणे म्हणाला.

सी. एम.च्या ऑफिसातून बाहेर पडला तेवढ्यात फोनवर एक मॅसेज आला. त्रासिक चेहऱ्याने समीर गाडीत बसला. गाडी शहराच्या बाहेर पडताच त्याने ड्रायव्हरला घरी जायला सांगितले आणि तो स्टिअरिंग हातात घेऊन गाडी चालवू लागला.रागिणी एका अत्यंत कळकट लॉजमध्ये पोहोचली. आतून मात्र लॉज आलिशान होते. अशोक आणि फिरोज दोघेही तिच्या मागून आत आले.
"एक कमरा पाहिजे दोन तासांसाठी." अशोक त्या पोऱ्याला म्हणाला.

देखण्या फिरोजकडे बघून पोऱ्या हसला आणि त्याने चावी दिली.

"तो माझ्याकडे बघून का हसला?" फिरोज असे बोलत असताना त्याच्या डोक्यात ट्युब पेटली.

"अशोक,तू त्याला आपण कपल आहोत असे सांगितले?" फिरोज चिडला.

"आपले काम झाले ना!" असे म्हणून दोघेही रागिणीच्या शेजारच्या खोलीत शिरले.


पूर्वा आणि तिचे युनिट लोकेशनवर पोहोचले. ज्या दोन स्त्रियांनी पहिल्यांदा पाहिले त्यांना पोलिसांनी थांबवले होते. पूर्वा गाडीतून उतरली आणि तिने आधी जाऊन मुलाचा चेहरा पाहिला. पण चेहरा माश्यानी खाल्ला होता. मुलाच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तिने मयुरच्या पाठीवर त्याच्या आईने सांगितलेली जन्मखूण पडताळून पाहिली. नकळत पूर्वा थोडी रिलॅक्स झाली.


मृतदेहाचे सगळीकडून फोटो घेण्यात आले. पी.एम साठी बॉडी पाठवायला सांगून पूर्वा निघाली. तेवढ्यात तिला कमिशनर साहेबांनी बोलावल्याचा मॅसेज दिसला.

"कदम गाडी साहेबांच्या ऑफिसला घ्या."
पूर्वा शांत बसून होती.

आजवर सहा मुले मारली गेली. आजचा सातवा मुलगा. नक्की कोण मारत असेल एवढ्या लहान मुलांना. पुर्वाचे विचार थांबत नव्हते."हाय मेरी रज्जो!" बिल्ला रागिणीकडे बघत म्हणाला.

"रज्जो मेलीय. मला त्या नावाचा,वस्तीचा तिरस्कार वाटतो. तुला आधीच सांगितले आहे पाहिजे तितके पैसे घे आणि मला सोड."
रागिणी प्रचंड चिडली होती.

"सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहेस तू. आज इनको खुश करना|" बिल्ला फोटो दाखवत म्हणाला.

"काय? चार जण आहेत ते." रागिणी संतापाने ओरडली.

"चूप,साली. अगर ना बोली तो तेरे सारे व्हिडिओ डाल दुंगा नेट पर."
बिल्ला तिचे केस ओढत म्हणाला.

"बडे बापके बेटे आहेत. त्यांची फॅनटसी पुरी कर."
त्याने रागिणीला ढकलले.

"नो! मला जमणार नाही." रागिणी जोरात ओरडली.

"तो फिर अभी नंगा करके रखता हू तुझे. मग कुठे जाशील."बिल्ला पुढे येऊ लागला.

रागिणी चिडली. टेबलवर फळे चिरायला ठेवलेला चाकू तिने उचलला.

"बिल्ला पुढे येऊ नको." तिने चाकू समोर धरला.

तरीही बिल्ला पुढे पाऊल टाकत होता. त्याने तिच्या अंगावर झेप घेतली आणि काही कळायच्या आत चाकू त्याच्या मांडीत घुसला.

रागिणी ओरडली,"आता तुला संपवून टाकते. जा टाक व्हिडिओ कुठेही मग."

तेवढ्यात बिल्लाने पिस्तूल काढले आणि गोळी झाडली. रागिणी सावध होती. तरीही गोळी खांद्याला लागली. गोळीचा आवाज ऐकून अशोक आणि फिरोज बाहेर आले. रागिणी वेगाने बाहेर पडली.

पाठोपाठ ते दोघे आले. रागिणी कशीबशी लॉजबाहेर पडली. ती कोसळणार एवढ्यात अशोकने तिला पकडले आणि तिने गच्च डोळे झाकले.रागिणी ह्यातून बाहेर पडेल का? समीर देशमुखला कोणाचा मॅसेज आला होता? मयूर आणि स्नेहाचे काय होईल? बिल्ला परत रागिणीला गाठू शकेल ? खुनी नक्की कोण असेल?


वाचत रहा.
तमाच्या तळाशी दिवे पेटलेले.
©®प्रशांत कुंजीर.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kunjir Prashant Vishwanath

Primary Teacher

Primary Teacher In Z P Pune A Writer,A Poet An Anchor

//