तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 11

रहस्य उलगडताना अनेक नवी नावे येत आहेत. नक्की सूत्रधार कोण असेल?

तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 11

मागील भागात आपण पाहिले बिल्ला इन्स्पेक्टर सुरजच्या ताब्यात आहे. तिकडे मयंक पार्सल कुठून आले आणि कोणी मागवले शोधण्याच्या अगदी जवळ पोहोचला. टॅटूवरून हल्लेखोर शोधण्याचा प्लॅन अशोक आणि त्याच्या मित्रांनी बनवला. पूर्वा मोबाईल नंबर वरून ऑपरेट करणारा शोधत होती. आता पाहूया पुढे.


बिल्ला सगळे सांगायला तयार झाला. इतक्यात सूरजला फोन आला.
"सर,आणखी एक लहान मुलगी सापडली आहे. स्नेहाच्या पालकांना बोलावले आहे. मारायची पद्धत अगदी सेम आहे."

फोन ठेवताच सूरज बिल्लाकडे वळला.

"लहान लहान मुलांना मारून काय मिळतं रे? आता तुला सोडणार नाही."
सूरजने आपल्या पोलादी हाताने बिल्लाच्या कानफटात लावली.

"सायेब,आम्ही बारकी मुल आणि मोठ्या पोरी पकडुन इकतो. पैसे मिळणारी गोष्ट आमी कशाला मारू?"
बिल्ला गायवया करत होता.
"हरामखोर,वस्तू आहे का त्या विकायला? मयूर आणि स्नेहा कुठेय? त्यांना पण विकले का कुठे?"
सूरज संतापाने थरथरत होता.
"सायेब,त्या कमलच्या मुन्नीने दोनी पोरांना घिऊन कलटी मारली. पण त्यांना इकायच नव्हत. त्यांना एका ठिकाणी द्यायचं होत."
बिल्लाने सगळे सांगितले.
"कोणाच्या सांगण्यावरून?"
सूरजने विचारले.
"नित्या मॅडम. त्यांनी दिलं होत काम."
बिल्लाने उत्तर दिले.
"मग? पैसे पोहोचले नाहीत म्हणून तूच नित्याचा गेम केला ना?"
सूरजने त्याचे केस पकडत विचारले.
"नाही साहेब. पूर्वा मला अटक करायला आल्यावर मी पळालो. नित्या मॅडम मला त्यांच्या फार्म हाऊसवर रहा असे म्हणाल्या. तिकडे पोहोचलो तेव्हा नित्या मॅडमवर पिस्तूल रोखून इन्स्पेक्टर पूर्वा उभी होती. नंतर अचानक गोळीबार झाला आणि मी घाबरून तिकडून सटकलो."
बिल्ला गप्प झाला.

इतक्यात पत्रकार परिषद असल्याचा फोन आल्याने सूरज आणि कदम बिल्लाला बंदिस्त करून निघाले.


"ब्लॅक रॅबीट!" एवढे एकच नाव पुर्वाच्या डोक्यात घोळत होते. कोण असेल ही व्यक्ती? एक असेल की अनेकजण असतील? पूर्वा विचारात पडली. त्यासाठी किंजलने दिलेल्या लोकेशनवर जावे लागणार होते. पुर्वाने तोंडाला स्कार्फ बांधला आणि डोळ्यांवर गॉगल लावला. आता आपल्याला कोणी ओळखू शकणार नाही याची खात्री पटताच पूर्वा बाहेर पडली.

समीर देशमुखने तिच्यासाठी गाडी ठेवली होती. इमारतीत कोणीही पाहू नये यासाठी संपूर्ण चेहरा झाकून पूर्वा बाहेर पडली. समीर देशमुख साहेबांची गाडी पाहताच तिची गाडी चौकशी न होता गेटमधून बाहेर आली.

हळूहळू मुंबईचा मध्य भाग मागे पडला. अंधेरी,विरार,बोरिवलीसुद्धा मागे पडले. हद्दीबाहेर वाढणाऱ्या मुंबईच्या अजस्त्र पसाऱ्यात नवीन भर पडणाऱ्या इमारती आकारास येत होत्या. एका बांधकाम चालू असलेल्या बिल्डिंगजवळ लोकेशन संपले.

कसे शक्य आहे? इथून नंबर ऑपरेट होत असतील? पूर्वा आता अतिशय निराश झाली होती. जवळपास तीन तास प्रवास करून हाती काहीच लागले नव्हते. सकाळचे साडे दहा वाजत आले होते. पूर्वा निराश होऊन किंजलला फोन लावू लागली.

इतक्यात इमारतीजवळ एक कॅब येऊन थांबली. त्यातून तीन तरुणी उतरल्या. अगदी वेल ड्रेस,बघितले तरी शिक्षण वगैरे लक्षात येईल अशा. पूर्वा सावध झाली. कॅब निघून जाताच त्या तीन मुली समोर चालू लागल्या. पूर्वा हळूच उतरून त्यांचा पाठलाग करू लागली.


मयंक दिलेल्या पत्त्यावर चौकशी करण्यासाठी गेला. आजी झोपली आहे तोवरच काम होणार होते. त्याने तिथल्या माणसाला मोबाईलमधला फोटो दाखवला.

"काका,हे साहित्य कोणी पाठवले सांगू शकाल का?"
त्यावर त्या माणसाने त्याला कोणतेही उत्तर न देता हाकलून दिले.

मयंक निराश होऊन घरी निघाला. तेवढ्यात त्या दुकानातील माणसाने मयंकचा काढलेला फोटो सेंड केला आणि लिहिले. आज हा मुलगा पार्सल बद्दल विचारायला आला होता.


सत्येन अचानक डोके दुखायला लागले म्हणून घरी आला. डोकेदुखीची गोळी शोधू लागला. गोळी कुठेच सापडेना. त्यामुळे तो प्रथमच अंगद नसताना त्याच्या खोलीत गेला. कपाट बंद होते. टेबलाच्या ड्रॉवरमध्ये त्याने शोधायचे ठरवले. ड्रॉवर उघडला आणि त्यात असलेले मेकअपचे सामान पाहून त्याला जरा आश्चर्य वाटले. तरीही गोळी सापडली ती घेऊन सत्येन निघाला.

तेवढ्यात त्याला कोपऱ्यात पार्सलची सात आठ खोकी दिसली. त्याने जवळ जाऊन बघितले. त्यावर वैद्यकीय हत्यारे होती. सत्येन खोके उचलणार इतक्यात फोन वाजला. सत्येन अंगदची रूम बंद करून बाहेर आला. नंतर गोळी खाऊन तो गाढ झोपी गेला.


प्रियांकाने काढलेल्या यादीतील जवळपास चाळीस टॅटू आर्टिस्ट बरोबर दिव्या,मनोज,अशोक आणि सचिन बोलत होते. सकाळपासून शोध घेऊनही हाती काहीच लागत नव्हते. इतक्यात अशोकने फोन लावला.

"हॅलो, डिव्हाईन टॅटू स्टुडिओ?" अशोकने विचारले.
"येस, व्हॉट काईंड ऑफ टॅटू यू वॉन्ट?" पलीकडून प्रश्न आला.
"अशोकने कसा टॅटू हवा हे सांगितले.

"स्ट्रेंज,असे सेम टॅटू मी दोन वर्षांपूर्वी काढले आहेत."

तिने उत्तर देताच अशोकने तिची अपॉइंटमेंट बुक केली. आता नक्कीच काहीतरी धागा सापडणार होता.


समीर आता अत्यंत सावध होता. नित्याला ज्याने संपवले त्याला बरीच माहिती असण्याची शक्यता होती. शिवाय प्रियांक आणि त्याच्याबद्दल असलेला संशय सी.एम. साहेबांच्या डोळ्यात स्पष्ट दिसून येत होता. त्याने आपले सोर्स लावून माहिती मिळवायला सुरुवात केली होती. त्यानुसार मयूर आणि स्नेहा नाही तर सुपर्णा आणि श्लोक यांना पळवायची सुपारी दिलेली होती.

समीरने त्याच्या अत्यंत विश्वासू लोकांना चिकना आणि बिल्ला दोघांचा शोध घ्यायला सांगितला होता. समीर विचारात असताना फोन वाजला.

"सर, चिकना आपल्या ताब्यात आहे. त्याला घेऊन फार्म हाऊसवर जातोय."

समीरने लगेच ही बातमी पुर्वाला कळवली.


इकडे सूरज पत्रकार परिषदेत पोहोचला.

"इन्स्पेक्टर सूरज,तुम्ही आणि पूर्वा एकत्र शिकत होतात. मग तुम्ही निःपक्ष तपास कराल?"
समोरून पहिलाच प्रश्न आला.

"तुम्ही तुमच्या घरची बातमी असेल तर देत नाही का?"
समीरने प्रतिप्रश्न विचारून त्याला गप्प केले.

"अजूनही दोन मुले सापडली नाहीत. त्यांचा खून होईपर्यंत पोलीस गप्प बसणार का?"
आणखी एक जळजळीत प्रश्न आदळला.

समीरने पत्रकारांना वाटेला लावले आणि ऑफिसला आला. नित्या मेहराच्या फोनवरून केलेल्या कॉल डिटेल्समधून ब्लॅक रॅबीट हे नाव पुढे आले होते. त्या नंबरवरून लोकेशन मिळाले होते. सोबतीला फोर्स घेऊन समीर तातडीने तिकडे जायला निघाला.


संध्याकाळ झाली आणि मयंकची आजी दिवेलागण करायला गेली. मयंक पटकन घरात शिरला. आज दोन माणसांनी त्याचा पाठलाग केला होता. मयंकला समजले की आपण चौकशी करतोय हे कोणाच्या तरी लक्षात आले आहे.


समीर मस्त बाथ घेऊन बाहेर आला आणि समोर चालू असलेली बातमी पाहून त्याला प्रचंड धक्का बसला. सौम्या मेहराची धाकटी बहीण रिंकी मेहरा बरोबर मुख्यमंत्री साहेबांचा पुतण्या प्रियांक याचा साखरपुडा.


सूरज आणि पूर्वा दोघांपैकी कोण आधी गुन्हेगारापर्यंत पोहोचेल? मयंक संकटात सापडले का? टॅटू वरून काही शोध लागेल का?

वाचत रहा.
तमाच्या तळाशी दिवे पेटलेले.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all