तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 10

सिरियल किलर आणि नित्या मेहरा खून दोन्ही धागे एकमेकांत गुंतलेले असतील?

तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 10

मागील भागात आपण पाहिले की नित्याच्या फोनवरून काही माहिती पूर्वा मिळवण्यात यशस्वी झाली. मयंकचा संशय पक्का होत चालला. सचिन आणि त्याचे मित्र टॅटूचा शोध घ्यायचे ठरवतात. त्याचवेळी आता केसचा तपास नवीन ऑफिसर करणार असल्याचे जाहीर होते. आता पाहूया पुढे.


कदम अक्षरशः धापा टाकत पोलीस स्टेशनला पोहोचले. गाडी डबल स्टँडवर लावून पळत निघाले.

"कदम रिलॅक्स,बसा इथे आणि चहा घ्या."
इन्स्पेक्टर सूरज त्यांना खाली बसवत म्हणाला.
"ते रोजची सवय ना. मॅडमना एक सेकंद उशीर चालत नसे."
कदम ओशाळले.

"पण आता ती क्रुएला तुमची बॉस नाही."
सूरज हसून म्हणाला.

"पण साहेब,मॅडम काळजी पण तेवढीच घ्यायच्या. मला वाचवायला स्वतः हातावर गोळी लागली होती त्यांना."
कदम अभिमानाने म्हणाले.

"पण नाकावर राग आणि कपाळावर आठ्या. ते जाऊ द्या फाईल काढा आणि लोकल पोलिसांकडून सगळी बातमी घ्या."

सूरजने सूचना दिली.

"साहेब,कायतरी गडबड आहे. मॅडम आणि खून? डोकं आणि काळीज दोन्हींना पटत नाही. तुमी आन त्या एकाच बॅचला होते ना?"
कदम भावुक झाले. तेवढ्यात फाईल आल्या आणि सूरज फाईल वाचू लागला.

घररररररsssss मोबाईल व्हायब्रेट झाला. अंथरुणातून हात बाहेर काढून किंजल मोबाईल बंद केला. तेवढ्यात परत फोन व्हायब्रेट झाला. तशी किंजलची आई ओरडली.

"अवे तारो मोबाईल पाछी वाग्यो तर समिझी जा तू अने तारो मोबाईल आगढना सफर करवा लाईक नही राहीशे.. समझीयो गांडी ."

"सैतान नाही सैतानिणीचा फोन आहे. कशाला उचलू."

मनातच ओरडत किंजलने फोन उचलला.

"किंजल,मला एक मदत हवी आहे."
पूर्वा शक्य तितक्या गोड आवाजात बोलली.

"कोण छे? हा इन्स्पेक्टर पुर्वाचा नंबर हाय ना?"
किंजल अविश्वासाने बोलली.

"किंजल ऐक,आता तुला एक लोकेशन पाठवते. तिकडे लॅपटॉप,राउटर आणि सगळे सामान घेऊन पोहोच. यानंतर माझा फोन बंद असेल."
किंजलला एकही शब्द बोलू न देता फोन कट झाला.

"ही एक दिवस किंजलचा गेम बजावणार."

किंजल बडबड करत तयारी करू लागली.


"कदम गाडी काढा."
इन्स्पेक्टर सूरजने आवाज दिला.

कदम पोलिसांच्या गाडीकडे निघाले.

"कदम,माझी गाडी घ्या. कपडे चेंज करून सिविल ड्रेसवर चला."
सूरज सूचना देत चेंज करायला गेला.

बिल्ला! ह्याच नावाभोवती बरेच प्रश्न अडकले आहेत. नक्कीच बिल्ला सापडला तर पूर्वा कशी अडकली हे शोधता येणार होते. कदम आणि सूरज गाडी घेऊन बाहेर पडले.


काल रात्रीपासून बिल्ला बेशुद्ध होता. चिकना आणि त्याचे साथीदार घाबरले होते. जवळपास सकाळचे दहा वाजले होते. बिल्ला शुध्दीवर आला.

"रागिणी,साली माजलीय. दोन वेळा आपल्यावर अटॅक केला. सोडणार नाय तिला. चिकना चल गाडी निकाल."

बिल्ला संतापाने वेडापिसा झाला होता.

"भाई,पोलीस मागावर हाय. रागिणी कुठं पळून जात नाय."
चिकना समजवायचा प्रयत्न करू लागला.

"चल,जितकं बोललो तेवढं करायचं."
बिल्लाने रिव्हॉल्व्हर काढले.

"ठीक है भाई,गाडी काढतो. कपडा बदलो."
चिकना बाहेर गेला.

गाडी अनलॉक केली आणि त्यात बसला. मागून डोक्याला पिस्तूल लागले.

"गडबड केलीस तर खोपडी उडवीन. गप बसून रहा."
सुरजच्या आवाजातील जरब बघून चिकना गप्प बसला.

बिल्ला बाहेर आला. त्याने पुढचे दार उघडले आणि तेवढ्यात चिकनाने त्याला इशारा केला. त्यासरशी बिल्ला धावायला लागला.

तितक्यात कोणाचा तरी पाय मध्ये आला आणि बिल्ला धाडकन कोसळला. तोपर्यंत चिकनाच्या मुसक्या सूरजने आवळल्या होत्या. कॉन्स्टेबल कदमचा मजबूत हात मानेवर पडताच आपण फसल्याचे बिल्लाने ओळखले. दोघांना गाडीत टाकून गाडी सुसाट बाहेर पडली.


मयंक सकाळी सगळे आवरून शाळेत गेला. दुपारी घरी आल्यावर आजीला लाडिगोडी लावून त्याने खाली जायची परवानगी मिळवली. सोसायटीच्या बाहेरच करिअरचे ऑफिस होते.

"नमस्ते काका,एक काम होते."
मयंकने गोड आवाजात विनंती केली.

"काय रे? पार्सल आहे की काही पाठवायचे आहे कुठे?" समोरच्या माणसाने प्रश्न विचारला.

"काका,माझा दादा मेडिकल कॉलेजला आहे. त्याचे एक पार्सल आले आहे. पण त्यात काही वस्तू कमी आहेत."
मयंकने थाप मारली.

"बघू,यात पाठवणाऱ्या कुरिअर ऑफिसचा पत्ता आहे. हा घे तिथला नंबर. तुला सामान पाठवणाऱ्याचा पत्ता तिकडून मिळेल."

व्यवस्थित माहिती घेऊन मयंक बाहेर पडला.


दुसऱ्या दिवशी नलिनी म्हात्रेला अशोकने संपर्क केला. सगळ्या चॅनलवर इन्स्पेक्टर पुर्वाचे मित्र सापडले आणि त्यांचाही तिच्याबरोबर संपर्क नाही ही बातमी झळकली. त्यात रागिणीचे स्टेटमेंट असल्याने जास्त चौकशी झाली नाही. सगळेजण घरी जायला निघाले.

वाटेत सचिनने प्रियांकाला त्याने पाहिलेल्या टॅटूचे वर्णन केले.

"सचिन,असा टॅटू काढणारा वाकबगार कलाकार असला पाहिजे."

एवढे बोलून प्रियांकाने इंटरनेटवरून काही प्रसिद्ध आर्टिस्टची यादी काढली.

"आता ह्यातील प्रत्येकाला आपल्याला ट्रॅक करावे लागेल."
मनोज म्हणाला.

"सोपं आहे. आपल्यापैकी एकाने ग्राहक बनून फोन करू. असा टॅटू युनिक असल्याने ज्याने काढला तो शंभर टक्के बोलणारच." अशोकने उपाय सांगितला.


किंजल दिलेल्या लोकेशनवर पोहोचली. तिकडे पूर्वा आधीच आलेली होती.

"हे तीन नंबर आहेत. कुठून आणि कोण ऑपरेट करते शोधायचे आहे."
पुर्वाने तिला लगेच सांगितले.

"अरे जरा पाणी त पिऊन दे. इथ यायला काय तरास झाला." किंजल पाणी बॉटल काढत बोलत होती.

तिने लॅपटॉप उघडला.

"पूर्वा, तमे पोलीस मधल्या दोस लोकांनी पण केली असती मदत."
किंजलने शंका काढली.

"माझा कोणावर विश्वास नाही. तू पटकन काम कर."
पूर्वा ओरडली.

"हा,भडकते काय. हे नंबर इंटरनॅशनल दिसते फक्त."
किंजल हसली.
"म्हणजे? कुठून ऑपरेट होत असेल हे नंबर?"
पूर्वा संभ्रमात होती.

" देख,हा मोबाईलचा एक खास नंबर असते. लोकेशन तर इकडे मुंबई दाखवते. अने ब्लॅक रॅबीट एवढं नाव दिसते."

बोलता बोलता किंजलने पत्ता लिहून पुर्वाच्या हवाली केला. त्याबरोबर स्वतः चे डेबिट कार्ड आणि पैसेही दिले. काळजी घ्यायला सांगून किंजल घरी परत निघाली.


"कदम,गाडी थांबवा."
सूरजने ऑर्डर दिली.
गाडी थांबली.

"बिल्ला,तसेही तू काही बोलणार नाही. मग आम्ही परत तुला टॉर्चर करणार. कदम,पिस्तूल काढा."
सूरजने खाजगी पिस्तूल हातात घेतले.

बिल्ला आज प्रथमच स्वतः गन पॉइंटवर होता.

"आता मी फक्त मणक्यात गोळी मारणार आणि मग आयुष्यभर तू अपंग होऊन जगणार."

सूरज हसू लागला.

बिल्लाला घाम फुटला.

"साहेब, माझी जान वाचणार असेल तर मी सांगतो सगळ."

बिल्लाने शरणागती पत्करली. गाडी एका वेगळ्याच रस्त्याने सुसाट वेगाने धावू लागली.


टॅटूधारीचा शोध लागेल का? ब्लॅक रॅबीट कोण असेल? पूर्वा खुनी शोधू शकेल? सूरज नक्की पुर्वाला मदत करतोय का?

वाचत रहा.
तमाच्या तळाशी दिवे पेटलेले.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all