Login

एक कप चहाची तलप

Talap


एक कप चहाची तलप

ती रोजच कामाला जायची, त्या कामाची तयारी त्याच दिवशी 4 वाजता उठून तर होतच असायची पण आदल्या दिवशी रात्री आठ वाजता ही चालूच असायची...

सोबत मोठी मुलगी आणि जाउबाई असत...तर एकीकडे अपंग नवरा ही तिच्या मदतीला जिद्दीने सोबत करायचा...

तिच्या ह्या जिद्दीने तिचे दिवस पालटले होते, छोट्या हतागडीची मोठे दुकान आणि दुकानाचे हॉटेल झाले होते..

तरी तिला थांबायचे माहीत नव्हते... तिला साथ देणारे आता सगळे कुटुंब तिच्या पाठीशी नाही तर तिच्या सोबत उभे होते.. बघता बघता घराचे रुपडे पालटले होते...हॉटेल दुमजली झाले होते ..तरी ती मात्र थांबली नव्हती..

तिची एक खासियत लोकांना लांबून तिच्या दुकानाकडे आज ही ओढून आणत होती ,ती म्हणजे तिच्या हाताच्या गुळाच्या चहाची तलप..सोबत असायचा गवती चहा...आणि तो वाफाळलेला चहा खास चुलीवर तयार करणे तिने सोडले नव्हते..

ती जेव्हा ही कामाला लागायची तेव्हा सर्वात आधी तिची तलप भागवायची..तो म्हणजे एक मोठा कप भरून चहा तो ही बशीत सांडेपर्यंत..

त्या चहाच्या नावाने तिला सगळ्या शहरात ओळख निर्माण करून दिली...

थकून येणाऱ्या प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला तो एक कप चहा सुखावत असे... किती तरी महागाई वाढली तरी त्या चहाची किंमत कधीच अमाप वाढत नसे...

तिला वाटायचे मी ह्याच खासियती मुळे लक्षात राहणार आहे... पैसे आज आहेत तर उद्या नसतील ही..मी आज आहे उद्या नसेल ही..पण ही जागा आणि लोकांची तलप नेहमीच ह्या चहासाठी राहील...

ते एकदा घेतील आणि पुन्हा हे ठिकाण शोधत येतील हे नक्की...

बोलण्यात आणि प्रामाणिक पणात चोख असलेली गंगा आज ही त्या शहराच्या आठवणीत आहे..एक तलप ती सगळ्यांच्या जिभेवर सोडून गेली आहे... आज त्याच जागी दुसऱ्याने जागा घेतली आहे पण लोक अजून ही गंगा ताई चे नाव घेऊन चहाची ही तलप शोधत येतात..


पण तो गोडवा उरला नाही, ती चव ह्या चहा ला नाही ,तो प्रामाणिकपणा जाणवला नाही..ती माणसे टिकवून ठेवण्याची आता ह्या मालकाला गरज नाही हे जाणवल्यावर लोक पुन्हा इकडे फिरकत नाही...