तगमग ( भाग तिसरा )

लहान मुलांना लहान समजणं ही केव्हढी मोठी चूक ठरू शकते


माझ्या कानाजवळ येऊन तिने मला एक खास गोष्ट हळूच सांगितली,

" काका, एक गोष्ट सांगू का. आज तुम्ही आणलेल्या बाहुलीचा वाढदिवस आहे. आत्ता तिनेच मला सांगितलं म्हणून समजलं. आता तुम्हीच तिच्या साठी एक केक घेऊन या ना. तोवर मी बर्थडे ची तयारी करून ठेवते " ही गोष्ट तिने इतक्या हळू आवाजात सांगितली की सगळ्यांना ऐकू गेलं.सगळ्यांनाच त्या गोष्टीच हसू आलं.

" अरे बाबा, असं काय काय तीच दिवसभर सुरु असतं. ती आहे म्हणून आम्हाला करमत तरी. " त्याची आई मला उद्देशून म्हणाली.

तरी पण, मी मित्राला म्हणालो,

" चल यार कुठं केक शॉप असला तर खरच घेऊन येवू "

त्यावर तो म्हणाला,

" अरे बाबा, काही गरज नाही केक बिक आणायची. सगळा लुटूपुटूचा मामला असतो. असे वाढदिवस आमच्या घरी प्रत्येक दिवशी प्रत्येक बाहुलीचा वाढदिवस असतो. तू फक्त बघत राहा. काय काय होतं ते. " मित्र म्हणाला.

" अरे पण खरंच आणू या ना एकदा "

" नाही रे बाबा. अजिबात नाही. फक्त आता ती कशी तयारीला लागते ते बघ " मित्राने सांगितलं.
तसं आम्ही तिची धावपळ बघत राहिलो.

तिने आम्हाला एक चादर मागे धरून उभं राहायला सांगितलं. त्या वर हॅपी बर्थडेचा बोर्ड लावलेला होता. आईला आणि आजीला रंगीबेरंगी फुगे फुगवायला सांगितले. ते सगळ्या घरभर व्यवस्थित लावायला सांगितले. अर्थात सगळं काल्पनिकच होतं.

तिच्या दृष्टीने आम्ही काहीच करत नसल्याने तिलाच सगळीकडे लक्ष घालावं लागतं होतं.

" बाबा, तुम्ही नाश्ता आणला आहे ना भरपूर. मागच्या वेळेसारखं कमी नको पडायला बरं आधीच सांगते.... काका.. खरच इथं ना कामं करून करून दमायला होतं... दुसरं काही करायला वेळच मिळतं नाही.. त्यातून ही पोर अजिबात अभ्यास करत नाहीत... "

असं बोलतं बोलतं तिने एक प्लास्टिकची खुर्ची ओढत आणली. त्या खुर्ची वर तिच्या आईची एक मॅक्सी कव्हर म्हणून टाकली. त्या वर त्या नव्या बाहुलीला तिचे केस धरून खुर्चीवर आदळलं. आणि दटावत म्हणाली ,

" हे बघ चुपचाप बसायचं. आम्ही हैप्पी बर्थडे म्हटल्यानंतर केक कापायचा. "
.
नंतर बाहुलीच्या गालावर पट्टीने जोरात फटका मारून म्हणाली,

" त्या नंतर सरळ मोबाईल घ्यायचा आणि अभ्यासाला बसायचं. समजलं ना. नाहीतर वाढदिवस रद्द करून टाकेल. आणि कसले दळभद्री कपडे घातले आहेस तू. चांगले कपडे नाही आहेत का तूझ्या कडे. नंबर एकची वेंधळी आहेस तू. एकदा या काकांना जावू दे. मग तू आहेस आणि मी आहे. अगदी खाण्यापिण्या पासून सगळ्याच बाबतीत तुझे नखरे आहेत. वरतून अभ्यासाची बोंब.... रडू नकोस. अजून मी तुला काहीच केलेलं नाही. दुसऱ्या सामोरं तमाशा करायची तुझी सवय जुनीच आहे... उद्या सासरी गेली की समजेल तुला त्रास काय असतो ते... " तिचं स्वगत ऐकतांना मजा वाटतं होतं. काय काय विचार ही पोरगी करत होती.

बोलून झाल्यावर एक प्लास्टिकचा स्टूल तिने खुर्ची सामोरं मांडला.त्या स्टुलावर पण एक साडी कव्हर म्हणून टाकली. केक म्हणून एक खेळण्यातली बस गाडी स्टुलावर ठेवली. केक कापायला मात्र खरोखरची सूरी घेतलेली होती. आम्ही मोठी माणसं पाहुणे होतो. बाकीच्या बाहुल्या सगळ्या तिच्या मैत्रिणी म्हणून आल्या होत्या.सगळ्या बाहुल्या एकजात टकल्या होत्या.एकाही बाहुलीच्या डोक्यावर केस नव्हता. तरीही त्या गोड दिसतं होत्या.

" आपण आधी केक कापून घेऊ. नंतर नाश्ता करू या. चालेल ना काका "

" आटोप ग लवकर हे तूझं नाटकं " मित्र जरा वैतागून म्हणाला. त्या बरोबर ती एकदम हिरमूसली झाली. मला तिच्या रडवेल्या चेहऱ्या कडे बघवेना.

" अरे, काय हे. करू दे तिला हवे तसे. मला उलट मजा वाटतेय. "
मी तिची बाजू घेतल्याने तिचा एकदम लाडका काका झालो.

मग सगळे त्या स्टुला भोवती जमा झालो. सगळ्यांना तिने, केक कापल्या नंतर हॅपी बर्थडे म्हणायची सूचना दिली.

बसच्या न दिसणाऱ्या केकवर तिने न दिसलेली मेणबत्ती लावली. स्वतःच मेणबत्ती फुकली आणि केक म्हणून सुरीने बस कापली आम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आणि जोर जोरात हॅपी बर्थडे टू यू असं म्हणालो.

मग त्या बाहुलीच्या तोंडाला केक लावला. तिला केक खाऊ घातला. आम्हाला डिश देण्यात आल्या. आम्ही नाश्ता करत असतांना तिने लगेच तो पसारा आवरला. बाहुली आत घेऊन गेली.

आम्ही खोटं खोटं खात होतो. तेव्हढ्यात प्रीती आत मधून किंचाळत बाहेर आली. आणि मला म्हणाली,

" काका, जरा आत या ना. बघा ना जरा या बाहुली कडे "

आणि मी आत गेलो.

( क्रमश:)

🎭 Series Post

View all