Jan 23, 2022
वैचारिक

तडजोड

Read Later
तडजोड

शीतल तिची बॅग घेऊन आली होती. ती थोडी रागात, थोडी दुःखात वाटत होती. तिच्या आईला नवल वाटलं. तिने फोन करून सांगितलं देखील नव्हतं की ती येणार आहे म्हणून. तसेच ती एकटीच आली होती. तिच्या आईला काळजी वाटू लागली.

 

त्या म्हणाल्या, "काय झालं? अचानक कसंकाय येणं झालं? एकटीच का आलीस? अरविंद नाही आला का?"

 

तिने हातातील बॅग सोडून दिली व सोप्यावर बसली. तिचा चेहरा गंभीर होता. ती काहीच बोलली नाही. तिची आई तिच्याजवळ येऊन बसली.

 

त्यांनी विचारलं, "काय झालं? भांडण झालं का दोघांचं?"

 

ती म्हणाली, "हो."

 

त्यांनी विचारलं, "नक्की काय झालं सांग बरं."

 

ती म्हणाली, "आई तो पूर्णपणे बदलला आहे. सतत मला टाळू लागला आहे. कुठं बाहेर जायचं म्हणाले तर नेहमी नकारच देतो. स्वतःहून काही बोलत नाही आणि मी बोलण्याचा प्रयत्न केला तर माझ्यावरच ओरडतो. सारखी वटवट चालू असते, दोन मिनिट शांत नाही बसू शकत का,असं म्हणतो. त्याच्या वागण्यावरून असं वाटतं की तो कंटाळला आहे मला. माझी प्रत्येक गोष्ट कंटाळवानी वाटते त्याला. जशी काय मी ओझं आहे त्याच्यावर! मला तर वाटतं त्याला इंटरेस्टच राहिलेला नाही माझ्यात. अश्या माणसासोबत मी नाही राहु शकत."

 

त्या म्हणाल्या, "अगं असंकाय बोलते. पतिपत्नी मध्ये छोटया-छोटया गोष्टी होतच राहतात. त्याचं एवढं काय मनावर घेतेस."

 

ती म्हणाली, "नाही आई. मी इतकं चांगलं वागूनही तो असं वागतोय. माझी काहीही चूक नसतांना सुद्धा मी हे सगळं कसंकाय सहन करून घेऊ? त्यालाच माझ्यात इंटरेस्ट नाही तर मी काय करू? मला नाही राहायचं त्याच्यासोबत."

 

आता त्यांचा आवाज वाढला.

 

त्या म्हणाल्या, "अगं वेडी आहेस का? हे काय कारण आहे का वेगळं होण्याचं. जर दुसरा काही त्रास असला असता तर वेगळी गोष्ट होती. अगं अरेंज मॅरेजेस मध्ये समोरची व्यक्ती कशी आहे, त्यांच्या आवडीनिवडी, स्वभाव कुठलीच गोष्ट पूर्ण माहित नसते. तरीही जुळवून घेतलं जातंच ना! जुळवून घ्यावंच लागतं. कोणत्याही दोन व्यक्ती एकदम सारख्या नसतात. तसं तुमचं तर लव्ह मॅरेज आहे ना! मंग. तुम्हाला एकमेकांबद्दल बरंच काही अगोदरच माहित असेलच ना. सगळं पारखूनच तुम्ही लग्न केलं ना. हे बघ नात्यांमध्ये तडजोड करावीच लागते. तडजोड करण्याची मानसिकता ठेव."

 

ती म्हणाली, "अगं आई पण मीच का तडजोड करू? त्याचं पण कर्तव्य आहे ना!"

 

त्या म्हणाल्या, " अगं तुला तुझा इगो जास्त महत्वाचा वाटतो का तूझ्या लग्नापेक्षा? कधीकधी माघार घ्यावी लागते. काय फरक पडतो कोण तडजोड करतंय तर? नातं तर दोघांचं आहे ना आणि गोष्ट तेवढी मोठीही नाही. थोडा वेळ दे तुमच्या नात्याला. तुझ्या सांगण्यावरून तरी मला वाटतं की नक्कीच त्याच्यावर कामाचा किंवा कुठल्यातरी गोष्टीचा ताण आहे. त्यामुळे तो चिडचिड करत असावा. तू नेहमी म्हणत असते ना स्पेस हवी म्हणून. त्यालाही थोडी स्पेस हवी असेल कदाचित. काय होतं एखाद्या वेळेस त्याची बोलण्याची इच्छा नसेल तर? बघ प्रयत्न करून. "

 

तिने थोडा वेळ विचार केला. नंतर हळूहळू तिलाही जाणीव झाली की गोष्ट तेवढीपण मोठी नव्हती. ती घरी परतली.

 

रस्त्यात तिने बघितलं सत्तावीस मिस्ड कॉल! तिच्या डोळ्यांत पाणी झळकलं. ती घरी पोहोचली होती. ती रिक्षातून उतरली. धावत घरामध्ये आली.

 

तिने बघितलं अरविंद एका खुर्चीवर बसलेला होता. त्याला जाणवलं की ती आली आहे. त्याने तिच्याकडे बघून हलकसं स्मितहास्य केलं. ती त्याच्या जवळ येऊन उभी राहिली.

 

तो म्हणाला, "एवढा राग आला माझा? फोन पण नाही उचलला. सॉरी गं. कामामुळे दमून जातो. चिडचिड होते. त्यामुळे कधीकधी जास्तच होऊन जातं...."

 

तो बोलत होता. ती गंभीर होऊन ऐकत होती. त्याच्या हातात एक फोटोफ्रेम होती. त्या दोघांची! ती फ्रेम बघून तिचे डोळे गच्च भरले. ती त्याला बिलगली.

 

ती म्हणाली, "सॉरी. माझं पण चुकलं. मला तुझा थकवा, तणाव दिसलाच नाही."

 

तिला जाणवलं की तो जाणूनबुजून तसं वागत नव्हता. कामाचा तणाव असल्यामुळे तो त्रस्त होत होता. त्यामुळे चिडचिड होत होती. कधीकधी गोष्टी फार लहान असतात पण आपणच त्यांना खूप मोठं समजून बसतो.

 

आवडल्यास share नक्की करा.

 

©Akash Gadhave 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Akash Gadhave

Engineering Student

नमस्कार.