Jun 15, 2021
ललित

ताईच्या लग्नात

Read Later
ताईच्या लग्नात


                             ताईच्या लग्नात...

              पहाटं पहाटं चार वाजता यमलाबायच्या कोंबड्यानं बाग द्येच्या आंदीचं पवारांच्या घरी लायटी लागल्या. मोठ्या थोर मंडळींची बरीचं लगबग सुरू झाली. राती आठेकशे लाडू बांदून झोपायला उशीर झाल्याला घरातल्या समद्या बायकांची निस्ती धांदल उडाली. सोयराबायनं पाटदिशी उठून बंब बिंब पेटावला. तुळसाबायनं पाणी बिणी शिपडून घरापुढलं आंगाण लोटायं घितलं. कमळाबायनं चूल पेटावली आन समद्यांसाठी च्या कडत ठिवला. सदा बापूंनी टिऱ्या वर करून पालथी झोपल्याली समदी चिलावळ उठावली. त्या अवलादींनी मंग यकामागं यक घरातल्या समद्या बायकांचं डोक्सं उठवायं सुरवात केली. मला आंघुळ करायचे आन मी पयला नंबर लावलाय ह्याज्यावरणं त्यांच्यात मायंदाळ्या कळवंडी बी लागल्या. पवारांचं घर बायाबाप्यांच्या, पावण्यारावळ्यांच्या, ल्हानथोरांच्या,  पोराबाळांच्या कालव्यानं निस्त गलबलून निगालं. 
               ह्या समद्याला आज कारण बी तसंच हुतं म्हणा. आज पवारांच्या दारात लगीन पार पडणार हुतं. पवारांच्या धाकल्या पोरीचं. म्हंजी सदाबापूच्या लाडक्या सुमनीचं. देवानं सोन्यासारखी दोन पोरं बापूच्या पोटाला दिल्याली. एक पोरगा अन एक पोरगी. थोरला सुभन्या आन त्याज्या पाठची सुमनी. सुमनीच्या लग्नाची समदी जबाबदारी सुभन्यानं सोत्ताच्या खांद्यावं उचालल्याली. बापाला कायी म्हंजी कायीचं तरास द्येचा न्हायी ह्या लग्नात ह्ये त्येनं मनापास्नं ठरीवल्यालं. तशी त्यो पुढं हुन समदी धावपळ बी करत हुताचं. सुभन्याचा त्येज्या भनीवं आन सुमनीचा तिज्या दादावं लईचं जीव हुता.
                  आंघुळा बिंघुळा हुईस तवर पाक नव वाजल्या. पोराकडची सुपारीची माणसं यचा टाइम झाला. थोड्याच टायमानं यक बुलीरो गाडी भरून माणसं आली. मंग सुभन्यानं गावातली समदी पोरं हाताला धरली आन त्यांच्यात यवस्थित कामाची वाटणी केली. कुणी कुणी कंच काम करायचं आन कसं करायचं ह्येज्यावरणं तेंच्यात बोलणं झालं. कुठल्याचं पावण्याला कायीचं कमी पडू न्ये याची समद्यानी काळजी घ्या आसं जीव तोडून सुभन्यानं समद्या पोरांस्नी सांगितलं. सुभन्याच्या पायाला तर दमचं नव्हता. निस्तं हिकडून तिकडं आन तिकडून हिकडं त्येजी य जा चालूच हुती. सुमनीच्या सासरच्या माणसांस्नी कायीचं कमी पडू न्ये अशी त्येजी लय मनापास्नं इच्चा हुती. कारण लग्नात काय खाली वर झालं आसतं तर पवारांची इज्जत पणाला लागली आसती. पोरांनी उपीटाचा नाष्टा आन च्या समद्या पावण्यांच्या हातात निवून दिला.  समद्या पावण्यांनी पवारांच्या घराला नावाजलं. लयीचं भारी नियोजन केलंय बगा सोयऱ्यांनी अशी आपली यकमेकांत त्ये चर्चा करू लागले. सदाबापूच्या चेहऱ्यावं समाधान दिसाय लागलं. 
                 सुपारीचा कारीक्रम झाला. तेवढ्यात नवरदेवाचं वऱ्हाड आलं. सदाबापूच्या चुलत भावानं नव्यानं बांदल्याल्या घरात पावण्यांस्नी जानवसा दिला. जवळजवळ वऱ्हाडात पाचेकशे मंडळी आली हुती. मंग सुभन्यानं त्या समद्यांसाठी च्या नाष्ट्याची यवस्था केली आन पोरांस्नी हाताला घिवून ती चोख पार बी पाडली. यकांद्या लग्नाच्या हालला बी लाजवील आशी यवस्था पवारांच्या घरापुढल्या मंडपात केली हुती. सुभन्याचं मैतर सोत्ताच्या घरातलं लग्न आसल्यागत धावपळ करत हुतं. पुना साखरपुड्याचं आन मानपानाचं उराकता उराकता साडेबारा झाल्या. आल्याला पावण्यांनी मंग जेवायला लगबग केली. पोरं मंग पुना यकदा यकसाथ गटली आन त्येंनी जेवणाच्या पंगती उठवायं सुरवात केली. कुणी भात, कुणी लाडू, कुणी वांग्याची सुक्की भाजी, कुणी डाळ, कुणी तळाणं, कुणी पाणी आशी त्येंनी आपल्या आपल्यात वाटणी केली. पावणे मंडळींनी गरम गरम जेवणावं निब्बार ताव हाणला. सुभन्यानं जाऊन तवर आठवणीनं गरम पाण्याचा बंब पेटवून ठिवला. 
                 त्ये काम उरकत न्हाय तवरचं बायकांनी हाळदीचा कारीक्रम उराकला आन समद्या यकट्टी जेवायला आल्या. बायकांची पंगत बसली. पोरांनी तवाबी चिकाटीनं वाडप्याचं काम केलं. बायकांनी सुदीक पवारांच्या घराला नावाजलं. मंग हाळदीनं भरल्याल्या नवरदेवाला आंघुळ घालायला कुणीतरी गरम पाणी मागितलं. सुभन्यानं आधीचं बंब पिटवून ठिवल्यामुळं पाटदिशी दोन बादल्या गच भरून गरम पाणी त्येनं जानवस घरी निवून नवरदेवाला दिलं. पायात निस्ती भिंगरी बांदल्यागतं सुभन्या पळत हुता. आंगावं पडल्यालं काम कडपातूर न्येची त्येला भारी हौस. पुना नवरदेव श्रीवरनाला घोड्यावरनं बाहीर काढला. नवऱ्याकडची पोरं ‘ मुंगळा ’ गाण्यावं मनमुराद खांद उडवत नवरदेवा म्होरं नाचली. गावात झाकीरभाई बँड बारामतीकरांचा निस्ता दणका उठला. पोरीकडच्या पोरांस्नी बी लय नाचू वाटत हुतं पर काय करणार त्येंच्या म्होरं समद्या दुनवेची कामं वाढल्याली. त्येंला त्यातनंचं यळ मिळाला न्हायी. 
            झालं पुना नवरदेव वाजत गाजत मंडपात आला. मंग सुभन्या आन त्येज्या मैतरांनी गांधी टोप्या घालून हाय न्हाय त्याचं कापडावं लोकांस्नी तांदूळ बिंदुळ वाटाय सुरवात केली. भनीच्या लग्नासाठी खास शिवल्याल्या नव्या कपड्यांची घडी मोडायं बी त्येला यळं भेटला न्हायी लग्नात. पुना मंडपात नवरीकडच्या आन नवऱ्याकडच्या माणसांचा मानपान झाला. दाजीला, साडूला, जावायाला, इवायाला पोशाक बिशाक दिलं. मंग बामणानं नवरी मुलीला बोलावणं घातलं. सुमनी तिज्या मैत्रिणींबर चालत चालत मंडपात आली. सुभन्यानं तर कामामुळं दिवसात यकदा बी तिजा चेहरा नीट पाह्यला नव्हता. समदं जिथल्या तिथं झाल्यावं बामणानं पुना मंगल आष्टीका म्हणाय सुरवात केली. सुभन्या आन त्येज मैतर पाक मंडपाच्या बाहीर उभं ऱ्हायल्यालं. आत शिरायं जागाचं नव्हती तर. बामणानं शेवटची आष्टका म्हणली तसं नवरदेवाकडच्या पोरांनी बाहीर रस्त्यावं हजार फटाकड्याची माळ लावली. दोन मिंट निस्ता धडामधूड तिजाचं आवाज यत ऱ्हायला. पुना माणसांची जेवाय लगबग झाली. फोटुग्राफर फोटु काढायं घरातल्या समद्या माणसांस्नी बोलवायं लागला पर माणसांच्या जेवणाच्या पंगती बसल्यामुळं सुभन्याला काय तिकडं स्टेजवर जाता आलं न्हायी. पुना त्येंच्यामागं त्योचं उद्योग लागला.  
               एखादं दुसरा फोटु त्येज्या वाट्याला आला लग्नात. त्ये बी कानपिळीच्या टायमाला. बस तेवढाचं. पुना त्यो त्येज्या कामाला लागला. सुमनी निघताना तेवढी सुभन्याच्या गळ्यांत पडून मायंदाळी रडली. सुभन्याचं बी डोळं पाणावलं. भनीभावाचं ह्ये पिरेम समद्या गावानं भरल्या डोळ्यानं पाह्यलं. तिथल्या बायांस्नी बी हुंदका आवरला न्हायी. झालं... सुमनी गाडीत बसून तिज्या सासरला निघून गेली. पुना सुभन्याची धावपळ सुरू झाली. ज्याच्या त्याच्या मागून आणल्याल्या वस्तू-बिस्तू, भांडी-बिंडी ज्याला त्याला मागारी दिल्या. बामणाची दक्षणा दिली. मंडपवाल्याच भाडं भागावलं. आचाऱ्याचं पैकं दिलं. पूजा बिजा सगळं कसं नितरास पार पडल्यावं त्येनं पिरमाखातिर पोरांस्नी यकडाव मटणाची जंगी पार्टी करू आसं सांगितलं. पर पोरं न्हाय म्हणली. आन वरंन आसं बी म्हणली का, “भावा... तुझी भन ती आमची कुणीचं न्हाय व्हय रं ? आं..?”
              त्ये आयकून सुभन्यासारख्या रगवाट पोराच्या डोळ्यांत बी पाणी तराळलं. माणसांनी गावात सदाबापूच्या नावाचा गाजावाजा केला. “ काय जंगी लगीन लावून दिलं दारात पोरीचं बापानं ” आशी कायबाय त्ये चर्चा करू लागले. सुभन्याच्या ‘भनीचं लगीन’ नितरासपणं पार पडलं. पर यवढं सगळं चोख नियोजन करून बी माणसं दर यळेला पोरीच्या लग्नाचं समदं मोठेपण पोरीच्या बापालाचं का देत्यात काय माह्यती. गावातल्या कितीतरी भावांचे हात गावातल्या अश्या कित्येक भनींच्या लग्नात राबल्याले आसत्यात ह्याचा कुणी इचारंचं करत न्हायी च्या मायला ! 
               जावंद्या...चालायचंच ! हा... पर पोरीचा भाऊ ह्यो त्येज्या ‘ ताईच्या लग्नात ’ यक परकारे तिजा जबाबदार बापचं झाल्याला आसतो हे मातुर आगदी खरं. 

----- विशाल घाडगे ©™✍️

Circle Image

विशाल घाडगे

Student

Writer, Poet, Storyteller, Lyricist, Author, Rapper. I write the stories about village and its rural culture.