Aug 18, 2022
सामाजिक

#स्वसंरक्षण... काळाची गरज 

Read Later
#स्वसंरक्षण... काळाची गरज 

त्यादिवशी मला माझी एक मैत्रीण बऱ्याच दिवसांनी भेटली. मी तिला अगदी उत्साहाने विचारलेही,
"काय ग बाळंतपणानंतर कुठे गायब होतीस? किती दिवसांनी दिसलीस."

अगदी माझ्या नेहमीच्या रोडला लागूनच तिचे घर. मग येता जाता कधीतरी भेट व्हायची तेवढीच.पण मध्ये जवळजवळ वर्षभर ती काही दिसली नाही मग मी तिला विचारलेच.
पण तिने सांगितलेलं कारण ऐकून मी क्षणभर स्तब्ध झाले.
"अग काय सांगू दुसरीही मुलगीच झाली मग सासरचे लोक येऊच देत नव्हते घरी, नांदवणार नाही म्हणे. तिथेच सोय कर आम्ही काही तुला अन तुझ्या लेकींना फुकट पोसणार नाही. मग थोडे दिवस थांबले बाळही लहान होते पण आता आले ती मनाची पूर्ण तयारी करुनच. अजून किती दिवस माहेरी राहणार ना ".

मला तर तिच्या सासरच्या लोकांच्या मानसिकतेचा रागच आला.नवरा चांगला सुशिक्षित असून केवळ त्याच्या आईचे ऐकून असे वागत होता. म्हणजे एक स्त्रीच स्त्रीची शत्रू बनते किती घृणास्पद आहे हे सर्व.
मी तिला काळजीने विचारले, "मनाची तयारी ?"

"अग घरात घेत नव्हते मग दोन गाड्या भरून माझे लोकं आणले.पोलिसात तक्रार करण्याची तयारी होती आमची लगेचच. मला घरात घेतलं नसतं ना तर चांगले झोडपलं असतं सर्वांना. मग भीतीने का होईना मला घरात घेतले."
ती हसत म्हणाली.

"पण तू काळजी घे. काही सहन करू नको. तुझे आई बाबा तर खूप तणावात असतील ग मग", मी तसेच काळजीने विचारले.

त्यावर तीचे क्षणभर डोळे पाणावले पण नंतर हसून तिने ते अश्रू ही परतवून लावले अन बोलू लागली, "अग मी आहे खंबीर माझी काळजी घ्यायला.मी अन्याय सहन करणाऱ्यातली मुळीच नाही. समोरचा चुकीचा वागला तर एक ठेऊन देईल इतकी ताकद नक्कीच असते प्रत्येक स्त्रीकडे. फक्त ती ताकद ओळखायला हवी आणि योग्य वेळी वापरता आली पाहिजे, इतके स्वावलंबी नक्कीच बनवलेय मला माझ्या आईवडिलांनी.त्यांनाही निश्चिन्त करुन आलेय मी ". मग थोडक्यात बोलणे आटोपले आमचे पण मी मात्र कौतुकाने तिच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात आत्मविश्वासाची चमक पाहून छान वाटले.अशावेळी मनात विचार येतो, खरंच प्रत्येक स्त्रीने आज च्या जगात खंबीर होण्याची खूप गरज आहे.लग्न करुन जातो म्हणजे तेच घर हक्काचे असते. आपल्याच आईवडिलांना का म्हणून ताण द्यायचा. त्यात जर ती मुलगी धीट असेल तर तीही तिच्या हक्कासाठी तितक्याच खंबीरपणे उभी राहू शकते.प्रत्येक स्त्रीला सांगावेसे वाटते की,

नथ चेहऱ्याचे सौंदर्य खुलवते पण ठरू देऊ नकोस तिला तुझी वेसण...

बांगड्यांची किनकीन मन भारावते पण लक्षात ठेव तुझ्या मनगटाची ताकद...

पैंजणांची छमछम घरभर वावरते पण अडकवू नको त्यांच्या बेड्या पायात...

कारण याहूनही एक ओळख आहे तुझी...स्वतःची...

ती ओळख फक्त प्रत्येकीला ओळखता आली पाहिजे. कारण स्त्रीचे खरे सौंदर्य ह्या बाह्य गोष्टीत नसून मुळात तिच्या अस्तित्वात आहे. कारण ज्या घरात स्त्री नाही त्या घराची अवस्था कधीच उत्साही भासत नाही नेहमीच उणीव जाणवते, कधीही न भरू शकणारी एकप्रकारची पोकळी जाणवते.

आपण सर्वजण एकविसाव्या शतकात जगत आहोत ,खूप नवनवीन शोध लागले ,विविध क्षेत्रात प्रगती केली .स्मार्टफोनच्या काळात जणू सर्व जग मुठीत आहे असेच सर्व वावरताय .पण यासर्वात अजूनही एक प्रश्न अनुत्तरित राहतोच तो म्हणजे ,"खरंच स्त्री सुरक्षित आहे ?" अधिकाधिक प्रगती करूनही आजही वर्तमान पत्रात महिला अत्याचाराविषयी एक तरी ठळक बातमी आपले लक्ष वेधून घेतेच.अशा आशयाच्या बातम्या नजरेस पडल्या की , मन अधिकच अस्वस्थ होते. पाहिले तर स्त्री म्हणजे देवाची एक सुंदर रचना .जिच्याकडे पुनर्निर्मितीची क्षमता आहे,ताकद आहे तर ती स्वतःचे संरक्षणही नक्कीच करू शकते .फक्त ही ताकद ,हा आत्मविश्वास प्रत्येकीला कमवता यायला हवा .

आजच्या जगात प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहे.उच्च पदस्त महिलांना ही बऱ्याचदा पुरुष मक्तेदारीला सामोरे जावे लागते.
पण तरीही मुलींना शिकवतांना अगदी मोजकेच पालक असतील की जे स्वतःच्या मुलींना स्वसंरक्षण चे धडे देतात. पूर्वीपासून प्रत्येक घरात  जसा हा नियम असतो की, मुलगी आहे तर तिला स्वयंपाक आलाच पाहिजे, आता त्यासोबत हेही बोलणे वावगे ठरणार नाही की,आज प्रत्येक स्त्रीला स्वसंरक्षण हे आलेच पाहिजे.कारण सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे प्रत्येकवेळी कोणीही हिरो मदतीला धावून येणे केवळ अशक्य आहे.त्यापेक्षा आपणच आपापल्या आयुष्यात हिरो बनलो तर.... त्याचप्रमाणे आज शाळेत स्वसरंक्षणाचे इतर विषयांप्रमाणे  स्वतंत्र प्रशिक्षण दिलेच गेले पाहिजे. आपण इतिहासातील राणी लक्ष्मीबाईंचे वर्णन फक्त वाचण्यापुरते मर्यादेत न ठेवता ते आचरणात आणण्याची काळाची गरज आहे.आज स्त्रियासाठी अनेक कायदे आहेत, स्त्री शोषणविरोधात कितीही संघटना आहेत, पोलीस यंत्रणा पाठीशी उभ्या असल्या तरी प्रत्येकापर्यंत त्या पोहोचायला अनेक मर्यादा असतातच, तेव्हा स्त्रीला स्वतःच स्वतःला मदत करण्याची गरज आहे. समाजात असे अनेक चुकीचे प्रसंग मुली अनुभवतात पण तरीही आज आहे का प्रत्येक स्त्री गाफिल. तरीही खूप कमी महिला असतील की ज्या नेहमी त्यांच्या बॅगमध्ये मेकअपच्या सामानव्यतिरिक्त त्यांच्या स्वसंरक्षण साठी काही आपत्कालीन वस्तू बाळगत असतील. म्हणजे ज्या चुकीच्या घटना नेहमी घडताय त्यावर फक्त चर्चा करुन, मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढून काय साध्य करतोय आपण.जर स्त्रियांनी अशा नराधमांना वेळीच अद्दल घडवण्याची हिम्मत, ताकद बाळगली तर ती निरापराधी स्त्रियांना खरी श्रद्धांजली राहील.


छोट्या घरातील असो किंवा सुशिक्षित उच्चभ्रू घरातील स्त्रिया, मुली जर कधी शाळा ,कॉलेज किंवा ऑफिसहून काही कारणास्तव घरी उशिरा पोहोचल्या तर पालक हवालदिल होतात, कितीतरी शंका कुशन्का मनात निर्माण होतात. त्यासोबतच ज्यांना प्रत्यक्ष पणे उशीर होतो अशा मुलींची मनातील भीतीतर शब्दातही न सांगता येणारीच असते. घरात सुरक्षित पोहोचेपर्यंत त्यांच्या मनःस्थितीची तर कल्पनाही असह्य आहे. कारण आजूबाजूच्या घडणाऱ्या घटानांनी मनात शंकेची पाल चुकचूकतेच.

कोणतीही विनयभंग, बलात्काराची घटना किंवा सासरी कधी तिच्यावर अत्याचार होतात. तेव्हा अशी घटना कधी झाली? रात्री, मग तिचीच चूक. काय छोटे कपडे घालतात ना मुली... एवढ्या रात्री बाहेर राहणार मग होणारच असं हे.. असे एक ना अनेक प्रश्न आणि प्रश्नांच्या उत्तरादाखल फक्त पुरुषांकडून नाही तर महिलांकडूनही महिलांच्याच विरोधात टिप्पण्या दिल्या जातात .पण चार वर्षाच्या मुलीवर किंवा एखाद्या वयस्कर स्त्रीवर अत्याचार होतो तेव्हा मात्र वरील प्रश्न अनुत्तरितच राहतात.खरंतर ह्या घटना वेळ किंवा कपड्यावर नाही तर विचार अन संस्कारावर अवलंबून असतात .

ज्या महिलांवर, मुलींवर अत्याचार होतात त्या स्वतः ला दोषी, अबला समजतात. स्वतःला एकटे पाडतात. पण यात त्यांची चुकी नसतेच. त्या अशक्त नसतात तर अत्याचार करणारे पुरुष, मुलं मनाने अशक्त असतात. त्यांना उपचाराची आणि मदतीची गरज असते. त्यामुळे अशा मानसिकतेला प्रत्येक घरातून मदत व्हायला हवी. तरच समाजाचे सशक्तिकरण शक्य आहे.

आजच्या काळात मुलींनी फॅशनेबल राहणे वावगे नाहीच. मुलींनी खुशाल आवडीप्रमाणे कपडे वापरावे परंतु आवडीनुसार, फॅशननुसार कपडे घालून ह्या समाजात वावरण्याची ताकद आधीच कमवावी इतकेच. त्यासाठी आपले घर, कुटुंब अन कुटुंबातील सदस्य, पुरुषमंडळी सर्वांचे सहकार्य तितकेच महत्वाचे.मुलं वडिलांचे तर मुली आईचे   वागणं बघून मोठे होत असतात. आई दबावाखाली राहत असेल तर मुलींमध्ये अन्याया विरुद्ध लढण्याची ताकद कशी येणार?

कुटुंबात प्रत्येक नात्यात मोकळेपणा हवा. मुलामुलींना समान वागणूक हवी. मुलांच्या मनात जे असेल ते व्यक्त होण्याइतपत नात्यात संवादाचा पूल हवा. तर नकळतच मुले घरात व्यक्त होणार अन वेळीच मनातले समज गैरसमज काही विचित्र भावना व्यक्त झाल्या तर, त्याची वासना बनत नाही अन अशा चुकीच्या घटना काही प्रमाणात थांबतील. त्यामुळे घरात अन बाहेरही मुली सुरक्षित राहतील. मुलांना मुलीसोबत योग्य वागण्याचे भान येईल. मुलीनाही घरात किंवा बाहेर आपल्याबाबत काही चुकीचे घडतय हे सांगण्याचे बळ मिळेल.

  "बेटी बचाओ , बेटी पढाओ " हे नारे आपण नेहमीच देतो पण आता त्यासोबतच "बेटीको बहादूर और लडकेको समजदार बनाओ " हे नारे देण्याची आता वेळ आली आहे.कारण मुलं समंजस अन जबाबदार झाली तरच अशा चुकीच्या घटनांना आळा बसेल अन अपेक्षित समाज उदयास येईल यात शंकाच नाही.

धन्यवाद

©️®️प्राजक्ता कुलथे ✍️❣️

लेखणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव. नावासह लेख शेअर करण्यास हरकत नाही.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now