स्वप्नभूल.. भाग २२

स्वप्नभूल.. कथा एका रहस्याची..
स्वप्नभूल - भाग २२
©शिवप्रिया

त्रिशा विचार करू लागली. तिला विचार करताना पाहून नंदिनीने विचारलं,

“कसला विचार करतेयस त्रिशा?”

“नंदू, मी काय म्हणत होते, तू युवीलाही सोबत का घेऊन जात नाहीस?”

त्रिशाचं बोलणं ऐकून नंदिनीला एकदम ठसका लागला.

“अगं सावकाश..”

पाण्याचा ग्लास पुढे सरकवत त्रिशा म्हणाली.

“अगं वेडी आहेस का तू? दादा जीव घेईल माझा.. कोण्या परक्या मुलाला घरी घेऊन गेले तर पाय मोडून हातात देईल तो माझ्या आणि युवीच्याही..”

ती घाबरत म्हणाली.

“काहीही होणार नाही.. हवंतर तुमच्यासोबत मी पण येते. युवी माझा मित्र आहे म्हणून सांग. मग तर झालं? युवी आपल्यासोबत आला तर त्याची तुझ्या आई आबांशी भेट होईल. त्यांचं त्याला पाहणं होईल आणि चांगली ओळखही होईल. काय म्हणतेस?”

“अगं पण? दादाला हे नाही आवडणार.. प्लिज युवीला नको.. तुला यायचं असेल तर चल.. पण युवी नको..”

नंदिनी त्रिशाला आर्जवे करत होती.

“नाही.. युवी येणारच.. खरंतर त्याला तुझ्या घरच्यांना भेटवण्यासाठीच हा सगळा प्लॅन आहे. चला ठरलं तर मग! मी पॅकिंग करायला घेते. आणि युवीला गावी येण्याबद्दल तू सांगतेस की मी सांगू?”

ताटातलं जेवण संपवत त्रिशाने युवराजला कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतला आणि नंदिनीला तिचा निर्णय सांगितला.

“अगं त्रिशा पण मी माझाच निर्णय त्याला सांगितलेला नाहीये आणि तुझं काय चाललंय? आईआबांना युवीला भेटवायचं खूळ तुझ्या डोक्यात का शिरलंय?”

“मग तुच तर म्हणालीस ना? घरच्यांच्या मनाविरुद्ध तू काहीच करणार नाहीस. मग आई आबांना युवी आवडला तर तुझ्या नकाराचा प्रश्नच उद्भवणार नाही ना? तू आबांना कॉल लाव.. मी त्यांना सांगते मी आणि माझा मित्र नंदूसोबत तुमच्या गावी येतोय म्हणून. मी तुझी डायरेक्ट सेटिंग लावतेय. आबांची परवानगी घेतली म्हणजे दादाच्या रागावण्याचा प्रश्नच येणार नाही. ते सगळं मी पाहते.. तू अजिबात काळजी करू नकोस. तू युवीला कॉल करतेस की नाही?”

तिने पुन्हा प्रश्न केला.

“बरं माझे आई.. मीच कॉल करते त्याला.. तू हे डायनींग टेबल आवरशील का? जेवणाची भांडी फक्त सिंकमध्ये ठेव.. मी घासून घेईन नंतर..”

“हो चालेल.. मी आवरते सगळं.. हवंतर भांडीही घासते पण तू युवीला गावी येण्यासाठी तयार कर.. ”

त्रिशाच्या बोलण्यावर नंदिनीने होकारार्थी मान डोलावली आणि युवराजला कॉल करण्यासाठी तिने मोबाईल हातात घेतला. तिने त्याचा नंबर डायल केला.

“हॅलो नंदू.. बोल ना.. इतक्या तत्परतेने कॉल केलास? निर्णय झाला तुझा? होकार सांगायला फोन केलास नं? तू तर सुपर फास्ट निघालीस.. वॉव मस्तच!”

युवराज मिश्किलपणे म्हणाला.

“गप रे.. तुझं आपलं काहीतरीच! मी काही तुला होकार वगैरे कळवायला कॉल केलेला नाहीये. एक गोष्ट सांगायची होती.”

“हं.. बोल ना..”

“युवी, मी दोन दिवसांसाठी माझ्या गावी जातेय. आमच्या गावची यात्रा आहे. मी तसं नेहाला कळवलंय.. तुझ्याही कानावर घालावं म्हणून कॉल केलाय..”

“ओके.. चालेल.. तुलाही आईबाबांसोबत वेळ घालवायला मिळेल. जा.. मस्त एन्जॉय कर.. हॅपी जर्नी..”

“थँक्यू.. चल ठेवू मी? ओके बाय..”

त्रिशा नंदिनीचं बोलणं ऐकत होती. युवराजला आमंत्रण देण्यासाठी खुणावत होती; पण फोन ठेवण्याची वेळ आली तरी नंदिनीचा धीर होत नव्हता. ती त्याला आमंत्रित करत नाही हे पाहून तिने ओला हात रुमालाला पुसला आणि पटकन नंदिनीच्या हातातला मोबाईल हिसकावून घेत बोलायला सुरुवात केली.

“युवी, तुलाही आमच्याबरोबर नंदिनीच्या गावाला यायचं आहे. मीही जातेय तिच्याबरोबर..”

“अगं मी काय करणार तिथे येऊन? माझं काय काम?”

त्याने प्रश्न केला.

“हे बघ.. तुला नंदिनीशी लग्न करायचं असेल तर तुला तिच्या आईवडिलांचं मन जिंकायला हवं. त्यासाठी तुला तिच्याबरोबर तिच्या गावी यायला लागेल. हं, पण तुला आता माझा मित्र म्हणूनच यावं लागेल. खरं सांगितलं तर तिचा भाऊ तुला आल्या पावली परत पाठवेल. समजलं? ही तुझी वरपरीक्षा आहे असं समज.. आणि तू येणार नसशील तर तसंही सांग म्हणजे कसं तिचे आईबाबा तिच्या लग्नासाठी दुसरा मुलगा बघतील..”

एका दमात त्रिशाने बोलून टाकलं.

“अगं त्रिशा, काय बोलतेयस तू हे? वेड लागलंय का तुला?”

नंदिनी तिच्या बोलण्याने चांगलीच बावरली होती. त्रिशावर डाफरत तिने पटकन तिच्या हातातून मोबाईल खेचून घेतला आणि युवराजशी बोलू लागली.

“युवी, तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. काहीही बरळत असते ती.. चल ठेवते मी..”

“पण मी तुमच्या सोबत येतोय.. कधी निघायचंय आपल्याला?”

“काय? खरंच? अरे नको.. तू उगीच तिचं बोलणं मनावर घेऊन त्रास करून घेऊ नको आणि ऑफिस? तुझं नवीन प्रोजेक्ट?”

युवराजच्या बोलण्यावर तिने चमकून विचारलं. त्यावर युवराज पुढे म्हणाला,

“ते मी सगळं मॅनेज करेन.. तू फक्त आपण कधी निघायचं ते सांग.. म्हणजे मला पॅकिंग करावी लागेल ना?”

“उद्या दुपारपर्यंत गाडी येईल. घरातून निघताना ड्राइव्हर काका कॉल करतीलच. त्यांचा कॉल आला की मी तुला सांगेनच.”

तिने उत्तर दिलं.

“ओके चल, आता मी फोन ठेवतो. मेल करून नेहाला आणि आपल्या सरांनाही कळवावं लागेल ना? चल बाय..”

“हो चालेल.. बाय.. गुडनाईट युवी..”

युवराजने तिचा निरोप घेऊन कॉल कट केला तशी त्रिशा आनंदाने तिच्या भोवती गिरकी घेत म्हणाली,

“नंदू.. नंदू.. युवी आपल्या बरोबर यायला तयार झाला. कसलं भारी नं! चल मी माझी पॅकिंग करून घेते. तुझी पण बॅग मी भरू का?”

“नको गं, मी माझी बॅग भरेन. आबांना कळवायला हवं, आपण तिघे येतोय ते.. ”

त्रिशाने होकारार्थी मान डोलावली. नंदिनीने घरी आबांना कॉल केला. मोबाईल स्क्रीनवर आपल्या लाडक्या मुलीचं नाव पाहून आबांचा चेहऱ्यावर आनंद पसरला. त्यांनी पटकन फोन घेतला आणि बोलायला सुरुवात केली.

“हॅलो, नंदू बेटा.. कशा हाईसा? गावच्या यात्रेला येताय नव्हं? उंद्या आरवाळीच तुमचा ड्राइव्हर काका गाडी घेऊन पुण्याला येईल बघा..”

“हो आबासाहेब.. समरदादाचा कॉल आला होता. त्याने सांगितलंय. आबा, उद्या माझ्यासोबत त्रिशा आणि तिचा एक मित्र येणार आहे. चालेल ना?”

“नंदू, असं का विचारताय? ह्ये तुमचं बी घर हाय.. येऊ द्या की त्यास्नी.. तिथं त्या तुमची इतकी काळजी घेतात मग आपल्याला बी पाहुणचार करायला पायजेल की नाय?”

नंदिनीच्या प्रश्नावर आबा हसून म्हणाले.

“पण समरदादा? त्यांना कोण समजवून सांगणार?”

तिने जरा चाचपडतच विचारलं.

“तुम्ही त्यांची काळजी करू नगा.. आमी हाय नव्हं? खुशाल या तुमी..”

सयाजीरावांनी परवानगी दिली तशी नंदिनीची कळी खुलली. मग सर्वांची विचारपूस करून तिने आबांचा निरोप घेतला आणि कॉल कट केला. खरंतर युवराज सोबत येणार म्हणून तिला आनंद झाला होता पण समरजीतच्या तापट स्वभावाची तिला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे नाही म्हटलं तरी मनावर भीतीचं सावट पसरलं होतं. थोड्या वेळात रात्रीच्या जेवणानंतर किचन आवरून त्रिशा आणि नंदिनी बेडरूममध्ये झोपायला गेल्या. दिवसभराच्या कामाने दोघीही दमल्या होत्या. बिछान्यात पडताक्षणी त्रिशाला झोप लागली. नंदिनीच्या मनात युवराजचं बोलणं घोळत होतं. त्याचे शब्द जणू तिला स्पर्श करत होते. त्या गोड आठवणीत कधी झोप लागली तिला समजलंच नाही. पहाटे चार साडेचारचा सुमार.. नंदिनी छान साखरझोपेत होती. आणि मग पुन्हा ते स्वप्नाचं दृष्ट चक्र सुरू झालं.

रात्रीचा काळाकुट्ट अंधार.. रातकीड्यांची किरकिर.. मधेच कुत्रं विव्हळण्याचा आवाज.. एक अनोळखी रस्ता.. समरजीत वेगाने बाईक चालवतोय. मागे नंदिनी बसलीय..

“दादा, गाडी सावकाश चालवा.. मला फार भीती वाटतेय.. प्लिज दादा..”

नंदिनी समरजीतला गाडी सावकाश चालवायला सांगत होती; पण तो तिचं काहीच ऐकत नव्हता. त्याची गाडी सुसाट वेगाने रस्त्यावर धावत होती. अचानक गाडीच्या पुढच्या चाकाला आग लागली; पण समरजीतला कशाचंच भान नव्हतं. तो तसाच गाडी पुढे दामटत होता. गाडीच्या चाकाला आग लागलेली पाहून रस्त्यावर पायी चालणारे लोक भयभीत झाले होते. गाडी थांबण्याचं नाव घेत नव्हती. रस्त्यावरचा ट्रॅफिक सिग्नल मोडला म्हणून ट्राफिक पोलीस त्याच्या मागे लागले. तरीही समरजीत गाडी वेगाने धावत होती. आणि मग अचानक….

पुढे काय होईल? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©शिवप्रिया


🎭 Series Post

View all