स्वप्नभूल.. भाग २१

स्वप्नभूल.. कथा एका रहस्याची..
स्वप्नभूल - भाग २१
© शिवप्रिया

अखेर युवराजने नंदिनीला प्रपोज केलं. आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी तिच्यावर प्रेम असल्याचं बोललं होतं. तिला त्या साऱ्या गोष्टी स्वप्नावत वाटत होत्या. युवराज एक मित्र म्हणून तिला आवडत होताच आणि आता तर युवराजने तिच्यासमोर त्याचं प्रेम व्यक्त केलं होतं. आयुष्याने सुंदर अशा वळणावर आणलं होतं.

“कोणीतरी आपल्यावर प्रेम करतंय. हे फिलिंग किती छान आहे ना? पण युवीला मी का आवडेन? कशी दिसते मी.. आजवर कोणी माझ्या असण्याची दखलही घेतली नाही. ऑफिसमध्ये तर माझ्या दिसण्यावरून किती काय काय बोललं जातं. मग युवी ऑफिसमधल्या इतर मुली सोडून माझ्याच प्रेमात का पडला असेल? त्याला वाटतंय ते नक्की प्रेमच आहे ना? की मी गावाकडची बिनडोक मुलगी आहे मला सहज प्रेमाच्या जाळ्यात ओढता येईल असं त्याला वाटतंय का? तो माझ्याशी फ्लर्ट तर करत नसेल? मला फसवतोय की काय?”

तिच्या मनात असंख्य प्रश्नांची गर्दी झाली होती. पण लगेच दुसऱ्या मनाने तिची समजूत घातली.

“नाही.. नाही.. असं नसेल.. युवी खूप चांगला मुलगा आहे. तो असं मुळीच करणार नाही. मी युवीला आज ओळखत नाहीये, गेली तीन चार वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत. तो वाईट मुलगा असता तर इतक्या दिवसांत मला नक्कीच समजलं असतं. तो तसा नाहीये.”

नंदिनीचं मन तिला निक्षुन सांगत होतं; पण बुद्धीने विचार करताना मनाची बाजू कमकुवत होत होती. बुद्धीने विचार करता हृदयापुढे हतबल व्हायला झालं होतं. थोडा वेळ असाच शांततेत गेला. दीर्घ श्वास घेऊन तिने बोलायला सुरुवात केली.

“युवी, कॉलेजमध्ये असताना ना, इतर मुलींप्रमाणे मलाही वाटायचं, मलाही कोणीतरी जिवाभावाचं असावं. ज्याला मी मनापासून आवडेन.. तो मला आवडेल. तो माझी आणि मी त्याची काळजी घेईन. मला हसवायला, दुःखात डोळे पुसायला कोणीतरी असायला हवं. माझ्यावरही कोणीतरी जीवापाड प्रेम करावं. ते वयच तसं असतं म्हणा! पण कायम आबांची, समर दादाची भीती वाटत राहिली. त्यांच्या आदरयुक्त भीतीने मी स्वतः भोवती नियमांचं काटेरी वलय घालून घेतलं होतं. म्हणून भावनांना मनात दाबून ठेवलं होतं. संस्काराच्या बेड्या मीच माझ्या पायात ठोकून घेतल्या होत्या. युवी, आज तू माझ्यासमोर तुझं प्रेम व्यक्त केलंस. मला प्रपोज केलंस. खरंतर तुझ्या शब्दांनी मी फार सुखावले गेले. तुला मी आवडते. तुझं माझ्यावर प्रेम आहे हे ऐकून फार छान वाटलं होतं. तुझा सच्चेपणा फार भावला होता. युवी, मी तुझ्या भावनांचा मनापासून आदर करते. मी आजवर एक चांगला मित्र म्हणूनच तुझ्याकडे पाहिलं होतं. एक मित्र म्हणून तू मलाही आवडतोस; पण तुझ्यावर प्रेम, वगैरे असा कधीच विचार केला नव्हता. प्लिज, तू वाईट वाटून घेऊ नकोस; पण घरच्यांच्या मनाविरुद्ध मी काहीच करणार नाही. आय ऍम सॉरी युवी..”

तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

“अगं, मी म्हणालो ना.. मला मुळीच घाई नाही. तू तुझा वेळ घे आणि मग मला उत्तर दे.. दुसरी गोष्ट आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन आपल्याला काही करायचंच नाही. त्यांना आपलं नातं आवडलं तरच आपण पुढे जाऊ; पण अरेंज मॅरेज सारखं एकमेकांना पसंत न करताच आईबाबांनी सांगितलं म्हणून लग्नाला उभं राहायचं असं नकोय मला. त्या आधी आपण एकमेकांना आवडायला नको का? आवडलो तर ठीकच, नाहीतर आपली मैत्री आहेच ना? तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. रिलॅक्स..”

युवराजने तिला धीराच्या शब्दांनी आश्वस्त केलं. तेंव्हा कुठे ती मोकळेपणाने बोलू लागली. थोडा वेळ गप्पा मारून ती दोघे ऑफिसमधून बाहेर पडले. युवराजने नंदिनीला तिच्या घराजवळ सोडलं आणि तो त्याच्या घरी निघाला. आता त्याची गाडी त्याच्या घराच्या दिशेमे धाऊ लागली; पण मात्र अजूनही नंदिनीजवळच घुटमळत होतं. तो क्षण जणू तिथेच थांबला होता. मनातलं सगळं बोलून टाकल्याने त्याला खूप मोकळं वाटत होतं. थोड्याच वेळात तो त्याच्या घरी पोहचला.

इकडे नंदिनीही युवराजच्याच विचारात घरी पोहचली. फ्रेश होऊन आरश्यासमोर उभी राहिली. तिची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली. नाहल्याने तिचा चेहरा खुलला होता. आज जणू तिला स्वतःवरच प्रेम येत होतं. चेहऱ्यावर एक वेगळीच झळाळी आली होती. मनाला जणू पंख लागले होते. पाय जमिनीवर थरत नव्हते. ती मनातून फार खूष होती.

“आज मैं ऊपर आसमाँ नीचे
आज मैं आगे ज़माना है पीछे
टेल मी ओ ख़ुदा
अब मैं क्या करूँ
चलूँ सीधी कि उल्टी चलूँ ”

नंदिनी आनंदात गाणं गुणगुणत होती. इतक्यात तिचा मोबाईल वाजला.

“दादा? असा अचानक का कॉल केला असेल?”

तिला प्रश्न पडला. तिने कॉल घेतला. ती हॅलो म्हणण्याच्या आतच समरजीतने बोलायला सुरुवात केली.

“नंदू, गावची यात्रा आली हाय. तुमास्नी आईसाहेबानी यायला सांगितलंय. ड्रायव्हरला धाडतोय.. लगोलग निघायचं..”

“पण दादा, माझं काम..”

“त्ये काय बी सांगू नकोस.. निघायचं म्हणजे निघायचं.. समजल?”

ती काही बोलणार इतक्यात समरजीतने कॉल कट केला. नंदिनी उदास झाली. थोडा विचार करून तिने नेहाला मेल करून दोन दिवसाच्या सुट्टीचं कळवून टाकलं. आणि ती स्वयंपाकाच्या तयारीला लागली. एकीकडे गॅसवर वरणभाताचा कुकर चढवला आणि दुसरीकडे भाजी टाकून तिने कणिक मळायला घेतलं. पोळ्या लाटत असतानाच त्रिशा घरी आली. नंदिनीचा पडलेला चेहरा पाहून त्रिशाने तिला विचारलं,

“काय झालं? चेहरा का असा पडलाय तुझा? क्लिनिकमध्ये काही घडलंय का? डॉक्टर काय म्हणाले? युवी सोबत होता ना?”

युवराजचं नाव ऐकताच तिचा चेहरा खुलला आणि ती गोड हसत म्हणाली,

“अगं, क्लिनिकमध्ये काही वाईट घडलं नाही.. संमोहन प्रकिया झाली आणि त्यावरून डॉक्टर नीरजा पुढील ट्रीटमेंट सुरू करणार आहे. आणि युवी माझ्यासोबतच होता.”

“पण तू इतकी का ब्लॅश करतेयस? काय झालंय?”

त्रिशाने प्रश्न केला. नंदिनी नजर झुकवत लाजून म्हणाली,

“त्रिशा, मला तुला एक सांगायचंय..”

त्रिशाने तिच्याकडे भुवया उंचावत पाहिलं.

“आज युवीने मला प्रपोज केलं..”

“काय?”

नंदिनीच्या वाक्यावर त्रिशा आश्चर्याने जवळजवळ किंचाळलीच.. तिला प्रचंड आनंद झाला होता. नंदिनीच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून ती उत्साहाने म्हणाली,

“आय न्यू इट.. आय न्यू इट.. तुला सांगू तो तुझ्याकडे ज्या प्रेमाने पाहायचा, तुझी काळजी घ्यायचा ना मला तेंव्हाच कळून चुकलं होतं. युवी नक्कीच तुझ्यावर प्रेम करत असेल. आणि ते खरंच झालं बघ.. ओह्ह माय गॉड! मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू! पण कसं झालं हे? तो काय म्हणाला तुला? सांग ना पटकन..”

“हो, हो.. सांगते.. सांगते.”

असं म्हणत नंदिनीने संध्याकाळी घडलेला सारा वृत्तांत कथन केला. त्रिशाचा चेहरा आनंदाने भरून गेला होता. नंदिनीसाठी ती फार खूष होती.

“मग तू काय म्हणालीस? त्याला हो म्हणालीस ना?”

त्रिशाने उत्साहाने विचारलं.

“नाही.. अजूनतरी मी त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. मला थोडा वेळ हवाय असं सांगितलंय मी..”

नंदिनीने हसून उत्तर दिलं तसं तिच्यावर नाराज होत त्रिशा बरसली.

“अगं काय हे? इतका चांगला चान्स गमावलास. काय हरकत होती हो म्हणायला? नंदू, तू पण ना..”

नंदिनी गालातल्या गालात हसत म्हणाली,

“घाई नकोय मला. तुला तर माझ्या घरची परिस्थिती चांगलीच माहित आहे ना? आई आबांच्या मर्जीशिवाय मी काही करणार नाही. त्यामुळे थोडं थांबावंच लागेल. त्यांना युवी आवडला तरच पुढे जाता येईल. ते सोड सध्यातरी मी एका वेगळ्याच टेन्शनमध्ये आहे.”

कसलं टेन्शन नंदू?”

त्रिशाने काळजीने विचारलं.

“समरदादाने गावी यायला सांगितलंय. म्हणजे तसं फर्मानच सोडलंय. गावची यात्रा आहे ना! आमचा पूजेचा मान असतो ना..”

त्रिशाच्या प्रश्नावर नंदिनीने उत्तर दिलं आणि समरजीतच्या कॉलबद्दल सविस्तर सांगितलं.

पुढे काय होईल? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©शिवप्रिया


🎭 Series Post

View all