स्वप्नांचं वय कधीच होत नाही

Dream Makes You Feel Alive
राधा सासरी माप ओलांडून आली. रघु आणि राधा ह्यांचे लव्ह मॅरेज .राधाच्या घरच्यांनी आधी विरोध केला, पण राधा ठाम राहिली .लग्न करेन तर रघुशीच.रघुचे कुटुंब म्हणजे आई लता.रघूचे वडील किरकोळ आजाराने देवाघरी गेली होते.

पतीच्या निधनानंतर लता एकटी पडली होती पण आता सुनेच्या येण्याने तिला सोबती मिळाली होती.राधा तर प्रचंड खुश होती कारण तिला हवं तसं झालं होतं ,रघु ज्याच्यावर मनापासून प्रेम केले तोच आयुष्यात नवरा म्हणून आला होता.

नव्याचे नऊ दिवस सरले. रघु आणि राधा हनिमून वरून परतले आणि दोघेही कामाला जाऊ लागले. राधाचा दिवस कधी कामात निघून जात असे हे तिलाही कळत नसे.घरी आल्यावर सासू सुना गप्प मारत घरातली कामं आवरून ठेवत असे.ह्या कुटुंबाचा सर्वांनाच हेवा वाटत असे.होतेच असे कुटुंब.

एक दिवस लता तिच्या बहिणीकडे चार दिवसासाठी गेली होती.राधालाही सुट्टी होती. तिने घरातला पसारा आवरायला घेतला.रघूच्या लहानपणीचा फोटो अल्बम चाळत असताना तिला रघु एक वर्षाचा असताना फ्रॉक घालून डोळ्यात काजळ घातलेला फोटो पाहून तिला फार हसू आले.राधाने मोर्चा पोटमाळ्यावर वळवला. तिला भलीमोठी बॅग सापडली. तिने उघडण्याचा प्रयत्न केला पण उघडता उघडेना.

पाठून रघु आला.

रघु:"राधा,काय चालू आहे?"

राधा:"रघु केव्हापासून ही बॅग उघडण्याचा प्रयत्न करते आहे पण काही केल्या उघडेना..जरा उघडून देतोस का??


रघुने लक्ष देऊन बॅग पाहिली आणि म्हणाला अगं ही तर आईची सामानाची बॅग आहे .नको उघडू राहू दे..

राधा:"काय सामान आहे? पाहू तर दे"


रघु:"राधा,राहू दे म्हंटलं ना...तू दुसरं काम बघ ही बॅग मी ठेवून देतो "


रघूने ती बॅग ठेवून दिली.


राधाला आता मात्र कुतूहल वाटू लागले नक्की काय बरं असेल बॅगमध्ये?.

रघुने का नाही बघू दिले सामान?


रघु तसा प्रत्येक गोष्ट खुलुन सांगायचा मग आज का असा वागला?.

रघूवर प्रचंड राग आला..

ती रघूला रागातच म्हणाली..

"रघु,मी काय परकी आहे का?अशी काय गोष्ट आहे बॅगमध्ये जी माझ्यापासून तू लपवतो आहेस?"


रघु: तू अशी का बोलते आहेस ?तू काही परकी नाही...


राधा:"मग सांग पटकन काय आहे बॅगमध्ये"


रघूला तितक्यात एक फोन आला..तो फोनवर बोलता बोलता बाहेर निघून गेला.


आता मात्र राधा मनातल्या मनात अंदाज लावू लागली नक्की काय असेल त्या बॅगमध्ये?.


भरपूर उशीर झाला म्हणून तिने पटकन साफसफाई केली आणि जेवन बनवायला निघून गेली.

जेवण बनवत असताना फक्त डोक्यात विचार बॅग विषयी चालू होते.रघु कधी काहीच लपवत नसे पण आज का असे करावे??


कसेबसे तिने जेवन बनवले आणि बेडरूममध्ये जाऊन बसली.पाठून रघु आला,त्याने तिला मिठीत घेतले तसे तिने त्याचा हात जोरात झटकला.


रघु:"राधा,हे काय ?मी इतक्या प्रेमाने तुला जवळ घेतो आहे आणि तू माझा हात झटकला?"

राधा रागातच त्याच्याकडे पाहत होती.

तिचा राग शांत करण्यासाठी रघु गोडीगुलाबी करू लागला ,पण तरीही तिचा नाकावरचा राग काही हलेना.

रघु:"ए बायको,काय झालं सांग तरी इतकं रागवायला??"


राधा:"मी तुला बॅगमध्ये काय आहे विचारले तर सांगितले का नाही"


रघु:"अच्छा ते होय, राधा तू पण ना कोणत्याही गोष्टीला धरून बसते"


राधा:"रघु,मला एक सांग मी ह्या कुटुंबाचा भाग आहे ना??

रघु:"हा काय प्रश्न झाला??आहेसच तू कुटुंबाचा भाग"


राधा:"मग मला घरातल्या गोष्टी कळायला हव्या की नाही??

रघु:"हो नक्कीच कळायला हव्या"

राधा:"मग सांग आता त्या बॅगमध्ये काय आहे?"

रघु:"बरं बाबा हरलो मी ,तुझ्यापुढे माझी डाळ काही शिजणारा नाही हे मी ओळखले"

आता राधाच्या नाकावरचा राग जाऊन चेहऱ्यावर कुतूहल होते.. रघुचे बोलणे राधा लक्ष देऊन ऐकू लागली..


रघु:"राधा,त्या बॅगमध्ये आईच्या सर्व फाइल्स आहेत.,सर्टिफिकेट आहेत.आई ग्रॅज्युएट होती.भरपूर स्वप्न होती.आईचं लग्न खाटल्याच्या घरात झाले.रोज तीस माणसांचा स्वयंपाक करणे, वरून माझी आजी खानावळसुद्धा चालवायची.आई आणि माझ्या लहान दोन काकू ह्या तिघीही घरातच राबत असायच्या .आईची खूप इच्छा होती स्वतःच्या पायावर उभं रहायची ,पण माझ्या आजी आजोबासमोर कधी हिम्मत झाली नाही .आजोबा म्हणतील ती पूर्व दिशा .तिची डिग्री जणू एक कागदाचा तुकडा म्हणून राहिली.घरात सतत पाहुण्यांची ये जा असायची, आईला कधी स्वतःसाठी वेळ भेटत नसे.

कालांतराने मी झालो. आई माझ्यात गुरफुटून गेली.माझ्या सर्वांगीण विकासाकडे आईने जातीने लक्ष दिले. तुला माहित आहे आठवीपर्यंत आईनेच मला शिकवलं. खूप छान शिकवायची आई.काळ जसा लोटला तसा सगळे वेगळे झाले. आजी आजोबा इथेच राहिले.काही वर्षांपूर्वी आजी गेली आणि आजी गेल्यावर वर्षभरातच आजोबा गेले.घर रिकामं झालं.


राधा:"पुढे?"

रघु:"पुढे काय आई गृहिणी म्हणून राहिली.तिचा एक सोसायटीत छान ग्रुप आहे,खूप मैत्रिणी आहे आता ती त्यांच्यात मन रमवते.बाबा गेल्यापासून आई एकटी पडली. मी जवळ असलो तरी बाबांची कमी मी काही केल्या पूर्ण करू शकत नाही.हो पण आता तू आली आहे ना तर आई पुन्हा पाहिल्यासारखी राहू लागली आहे .आनंदी..


राधा:"रघु,मला एक खरं खरं सांगशील??

रघु:"काय?"

राधा:"तू बॅगमध्ये काय आहे हे माझ्यापासून का लपवत होता"

रघु:"राधा,मला ती बॅग पाहिली की तो दिवस आठवतो..ज्या दिवशी आई स्वतःचे सर्व प्रमाणपत्र घेऊन खूप रडली होती. तेव्हा मी लहान होतो.म्हणून मला त्या विषयी काहीच बोलू वाटत न्हवते.


राधा:"रघु मग तू किंवा बाबांनी आईना सपोर्ट का केला नाहीस??

रघु:"राधा,मी खूप वेळा आईला म्हणालो आई तू घरातून बाहेर निघ.तुला जिथे नोकरी करावी वाटते तिथे कर ,स्वतःची ओळख निर्माण कर पण आई म्हणायची :"जेव्हा वय होते,इच्छा होती तेव्हा मन मारलं आणि आता कुठे मी काहीच करू शकत नाही.माझ्यात आत्मविश्वास अजिबात नाही.रांधा,वाढा, उष्टी काढा ह्याच्यातून मुक्ती मिळालीच नाही. ह्या सर्व जबाबदारीने आता पंख छाटले आहेत ,आता उडण्याचे बळ नाही"आणि बाबांचं तर एकच मत होते मी बऱ्यापैकी कमावतो तर आईला बाहेर कमावण्यासाठी जाण्याची गरज नाही.


राधा:"रघु,फार वाईट वाटलं हे सर्व ऐकून.मनातल्या इच्छा आकांक्षाचा गळा चिरल्यावर खूप त्रास होतो रे .आज किती तरी स्त्रिया उच्च शिक्षण घेऊनसुद्धा संसाराच्या किंवा इतर जबाबदारीच्या ओझ्याखाली नोकरी करण्याचे स्वप्न, इंडिपेंडंट राहण्याचे स्वप्न पायदळी तुडवतात. तुला वाटत नाही का आपण आईंना त्यांची ओळख पुन्हा नव्याने करून द्यावी.?

रघु:"म्हणजे?"

राधा:"मला म्हणायचे आहे आपण त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं ह्यासाठी प्रयत्न करायला हवे"

रघु:"राधा,आई आणि ह्या वयात आता स्वतःच्या पायावर कशी उभी राहणार?"

राधा:"रघु, काय हे किती नकारात्मक विचार करतोस ?.मनात आणलं तर स्त्री काहीही करू शकते.राहिली गोष्ट आईंना स्वतःच्या पायावर उभं करायची ते तू माझ्यावर सोड"

रघु:"बरं, मग आता ते मिशन पूर्णतः तुझ्याकडे सोपवतो"


चार दिवसाने राधाची सासू लता आली.राधा सासूला पाहून भलतीच खुश झाली.राधाच्या डोक्यात अनेक विचार चालूच असतात ह्याची खबर लताला न्हवती.


राधाने एक दिवस लतासमोर विषय काढला.

राधा:"आई,माझी एक मैत्रीण आहे .ती ऑफिसला जाते आणि जेव्हा ती घरी येऊन मुलाचा अभ्यास घेते तेव्हा मात्र तो काही ऐकत नाही.खूप टंगळ मंगळ करतो. ती खूप वैतागली आहे "

लता:"तिला सांग मुलासाठी एखादा क्लास बघ म्हणावं"

राधा:"मीसुद्धा हेच म्हणाले पण तिचं म्हणणं आहे एखादा घरगुती क्लास असेल तर बरं होईल"

लता:"आपल्या इथे घरगुती क्लास..


लताचे बोलणं अर्धवट तोडतच राधा म्हणाली..

"आई तुम्हीच घेता का त्याचा क्लास?"


लता:"मी ?नाही नाही मला नाही जमणार...


राधा:"का ?का नाही जमणार .?आई तुम्ही ग्रॅज्युएट आहात ना मग इतकं घाबरायला काय झालं??


लता:"हो आहे मी ग्रॅज्युएट पण मला भीती वाटते?


राधा:"कसली??

लता:"राधा,माझ्यात आत्मविश्वास राहिला नाही"


राधा:"आई असं कसं बोलू शकता तुम्ही?जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्ही असं बोलूच शकत नाही.आई आत्मविश्वास आहे की नाही हे पाहण्यासाठी आधी कार्य करावे लागते आणि कितपत आपण ते कार्य पेलू शकतो हे ठरवतो आपल्यातला आत्मविश्वास किती आहे..आई तुम्हाला प्रयत्न करायला हवा.

लता:"राधा,अजिबात नाही"मला ह्या वयात हे असलं क्लास घेणं जमणार नाही बघ"


राधा लगबगीने रूममध्ये गेली आणि तिने लताच्या हातात तिची फाईल दिली..

ती फाईल बघून लताचे डोळे चमकले..एक एक पान चाळू लागली. दहावी ,बारावी,पंधरावी सगळीकडे फर्स्ट क्लास होता.लताचे डोळे आता भरून आले.पाठचे दिवस आठवले.किती मेहनत केली होती .आई ,बाबा,भाऊ किती खुश झाले होते.शिक्षकांनीही किती कौतुक केले होते.सर्व स्पर्धामध्ये भाग घ्यायची.वक्तृत्व किती छान होते.किती तरी प्रमाणपत्र होते त्या file मध्ये.ती फक्त कागदं न्हवती ती तर मनापासून केलेली सरस्ववती मातेची आराधना होती.खूप मेहनत केली होती .खूप रात्र जागून काढल्या होत्या.प्रत्येक मार्क जणू मेहनतीची ग्वाही देत होता.लताचे अश्रू अनावर झाले.मन भरून आले..

राधा:"आई,आता पुन्हा नव्याने सुरवात करायची आहे.बघा तुमचे अश्रू सांगतात किती मौल्यवान आहे ही प्रमाणपत्र. ह्यांना असं वाया जाऊ देऊ नका.ही प्रमाणपत्र किंचाळून सांगत आहेत तुम्हाला पुन्हा संधी हवी आहे.कित्येक वर्षे बंधनातच होती पण ह्यांना आता मुक्त करा ,ह्यांनाही मोकळा श्वास घेऊ द्या.ह्यांना सिद्ध व्हायचे आहे.


लता रडत तर होती पण आता ह्या रडण्यात एक आत्मविश्वास ओसंडून वाहत होता.राधाला लताच्या डोळ्यात एक सकारत्मकता दिसली.तिने डोळे पुसले..पदर खोचला आणि राधाला म्हणाली "मी आज पासून क्लास सुरू करते आहे"

आज लताने राधाच्या मदतीने एक पाऊल उचलले होते.आत्मविश्वास जो राधाने दिला त्याच्या जोरावर पुन्हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी तीसुद्धा आतुर झाली होती. कित्येक वर्षे जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेली लता आज खर्या अर्थाने मुक्त झाली होती .स्वतःची ओळख बनवण्यासाठी ,आत्मविश्वासाचे पंख सोबतीला घेऊन उंच भरारी घेण्यासाठी ती सज्ज झाली होती.ती लहान मुलांचे क्लास घेऊ लागली. उत्तरोत्तर तिची प्रगती झाली.सुनेने दिलेल्या पाठबळामुळे लता पुन्हा नव्याने जन्मली होती.


लेख आवडला असेल तर नक्की अभिप्राय द्या..लाईक,शेअर,कंमेंट जरूर करा.
©®अश्विनी ओगले. लेख आवडला असेल तर मला फॉलो करायला विसरू नका..

समाप्त.