स्वीकार.. द ॲक्सेप्टन्स

स्वीकार.. द ॲक्सेप्टन्स



अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
पहिली फेरी :- कथामालिका
कथेचे नाव :- स्वीकार.. द ॲक्सेप्टन्स


“अरे वैदू, बाळा थांब. थांब.. एक मिनटं.. आत येऊ नकोस हं.. तिथेच थांब..”

घरात प्रवेश करणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला दारातच थांबवून कुसुम पटकन आत किचनमध्ये गेली आणि भाकरीचा तुकडा आणि पाणी घेऊन बाहेर आली. वैदेहीचे बाबा आणि वैदेही दारात थांबून राहिले. कुसुम आपल्या लाडक्या लेकीवरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकणार इतक्यात तिचा हात झिडकारत वैदेही चिडून म्हणाली,

“आई, काय करतेस हे? फार मोठा पराक्रम गाजवून आलेले नाहीये मी? हे सगळं असं माझं स्वागत करायला.. थांबव हे सगळं..”

“अगं पण बाळा, एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आलीस. तुझा जीव वाचला म्हणून भाकरीचा तुकडा ओवळून टाकला गं..”

कुसुम पदराने डोळ्यातलं पाणी टिपत म्हणाली.

“कशाला? मेले असते तर बरं झालं असतं.. काय करायचंय असलं जिणं जगून?”

दारातून घरात प्रवेश करता करता वैदेही चिडून म्हणाली. वैदेहीच्या डोळयात पाणी साठू लागलं. मनातला राग, संताप, चीड उफाळून बाहेर पडू लागला. तिला असं चिडलेलं पाहून तिचे बाबा तिच्या सोबत आत येत समजावणीच्या सुरात म्हणाले,

“बेटा, शांत हो.. आताच आपण हॉस्पिटलमधून आलोय नं.. असं आल्या आल्या चिडचिड करू नकोस गं. इतका त्रास करून घेऊ नकोस बाळा.. तुला आरामाची खूप गरज आहे. जा आराम कर.. कुसुम, जा तिला तिच्या खोलीत घेऊन जा.”

कुसुमने होकारार्थी मान डोलावली. डोळ्यातलं पाणी पुसत ती वैदेहीकडे पाहून म्हणाली,

“बेटा चल, मी तुझ्यासाठी अंघोळीला गरम पाणी काढून ठेवते. आधी फ्रेश हो.. तोपर्यंत मी तुझ्यासाठी गरमागरम कांदेपोहे आणि तुझी आवडती स्ट्रॉंग कॉफी घेऊन आलेच.. तुला बरं वाटेल.”

“आई, हे काय चाललंय तुमचं? का माझ्याशी तुम्ही इतकं गोड गोड बोलताय? का माझी इतकी काळजी करताय? मला हे सगळं नकोय.. कोणता मोठा किल्ला सर करून आलेले नाहीये मी.. मला कोणाचीही सहानुभूती नकोय. समजलं तुम्हाला?”

“अगं वैदू.. तसं काही नाही बाळ..”

कुसुम वैदेहीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती.

“तसंच आहे आई, मी पाहतेय ना.. सोसायटीच्या आवारात उभ्या असणाऱ्या बायका, पुरुष, मुलं या सगळ्यांच्या माझ्यावर रोखलेल्या नजरा, त्यांची ती आपापसातली कुजबुज, ते सहेतूक इशारे, त्यांच्या डोळ्यात दिसणारे खूप सारे प्रश्न मला खूप टोचताहेत गं. त्या नजरांचा सामना करण्याची ताकत माझ्यात खरंच उरली नाहीये गं.. मला हे सहन होत नाहीये..”

वैदेही अतीव वेदनेने कळवळून म्हणाली.

“वैदू, वैदू.. शांत हो बाळ.. तू चल आतमध्ये.”

कुसुम लेकीला कुशीत घेत तिचे डोळे पुसत म्हणाली. आपल्या लाडक्या लेकीला या अवस्थेत पाहून कुसुमला काय बोलावं, तिचं कसं सांत्वन करावं ते समजत नव्हतं.

‘कुसुम आणि प्रभाकर कर्णिक या मध्यमवर्गीय जोडप्याच्या कुटुंबात बऱ्याच वर्षांनी एका कन्यारत्नाने जन्म घेतला आणि तिच्या जन्माने अवघ्या घराचं गोकुळ झालं. एकुलतं एक कन्यारत्न असल्याने लहानपणापासून प्रभाकर आणि कुसुमने वैदेहीला अतिशय लाडाकोडात वाढवलं होतं. तिचे सगळे हट्ट पुरवले होते. तिच्या मर्जीप्रमाणे वागण्याची मुभा दिली होती. वैदेही लहानपणापासून अभ्यासात अतिशय हुशार होती. शाळा कॉलेजात नेहमी तिची हुशार मुलांत गणना व्हायची. सर्व शिक्षकांची आवडती विद्यार्थिनी होती ती. आईवडिलांचा जीव की प्राण होती. यंदाच्या वर्षी तिने आपलं एमबीए (मार्केटिंग) पूर्ण केलं आणि नुकतंच एका मल्टीनॅशनल कंपनीत ग्लोबल मार्केटिंग हेड म्हणून ती रुजू झाली होती.

इतर चारचौघींसारखी नव्हतीच ती. वेगळ्या विचारांची, अफाट कल्पनाशक्ती असलेली, आपल्या सवांद कौशल्याने मोठमोठ्या क्लाईंट्सची मनं जिंकणारी, आपल्या विषयाची मुद्देसूद मांडणी करून मॅनेजमेंटसमोर आपल्या कामाला उत्तमरित्या प्रेझेंट करणारी, ऑफिसमध्ये सर्वांशी हसून खेळून राहणारी, चारचौघींसारखी निमूटपणे अन्याय सहन करण्यारी नव्हतीच ती.. अन्याय करणाऱ्या कडाडून विरोध करणारी, सर्वांच्या मनाचा विचार करणारी, प्रत्येकाच्या अडीअडचणीत मदतीला धावून जाणारी एक गुणी, धाडसी मुलगी.. वैदेहीच्या चांगल्या कामामुळे कंपनीला चांगल्या ऑर्डर्स मिळत होत्या. कंपनीतले तिचे वरिष्ठ तिच्या कामावर खूप खूष होते. आपल्या मुलीची प्रगती पाहून कुसुम आणि प्रभाकर दोघेही प्रचंड आनंदात होते.

एक दिवस सकाळी प्रभाकर वर्तमानपत्र वाचत बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर बसला होता. कुसुम स्वयंपाकघरात सर्वांसाठी नाष्टा बनवत होती. तिने आतूनच प्रभाकरला आवाज दिला.

“अहो ऐकलंत का? आता आपल्याला वैदूच्या लग्नाचं पाहिलं पाहिजे बरं..”

वर्तमानपत्रातून आपलं डोकं बाहेर काढत प्रभाकर म्हणाला,

“अगं, काहीही काय? इतक्यात कुठे लग्न करतेस तिचं? माझी प्रिन्सेस अजून खूप लहान आहे.”

चहाचा कप घेऊन बाहेर येत कुसुम आश्चर्याने पाहत प्रभाकरला हसून म्हणाली,

“लहान? प्रत्येक मुलीच्या बाबांना त्याची मुलगी कायम लहानच वाटतं असते. अहो, यंदा तिला पंचवीस वर्ष पूर्ण झालेत. आहात कुठे? लग्नाचं वय झालंय तिचं.. माझ्या वयाच्या पंचवीशीला आपल्या आयुष्यात वैदू नावाची गोड परी होती.”

“काय सांगतेस? एवढी मोठी झाली आपली परी? दिवस कसे भुर्रकन निघून जातात नां?”

वैदेही आपल्याला सोडून सासरी जाणार या कल्पनेने प्रभाकरच्या डोळ्यात पाणी साठू लागलं.

“हो नां.. मी माझ्या ताईला मुलगा पहायला सांगितलं होतं.. भावोजींनी बऱ्याच स्थळातून निवडून एक चांगलं स्थळ सुचवलंय. ते सांगत होते की, मुलगा चांगला देखणा, शिकलेला आहे. चांगल्या ठिकाणी चांगल्या पदावर नोकरीला आहे. लवकरच कंपनीतर्फे अमेरिकेला जाण्याची संधीही आहे. येत्या रविवारी मुलाकडच्या लोकांना घेऊन वैदूला पहायला येऊ का असं भावोजी विचारताहेत. काय सांगू?”

“आता येतो म्हणताहेत तर येऊ देत.. पण आपल्याला एक गोष्ट ठेवायची. आपल्या वैदूच्या मर्जीशिवाय काही करायचं नाही. तिला मुलगा आवडला तरच आपण पुढचा विचार करायचा..”

“हो.. सगळं तिच्या मनासारखंच होईल.. वैदूला आवडला तरच पुढे जायचं..”

इतक्यात वैदेही तिच्या खोलीतून बाहेर आली. कुसुम आणि प्रभाकरचं बोलणं तिच्या कानावर पडलं.

“नाही हं बाबा.. मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही.. मी गेले तर तुम्हा दोघांना कोण पाहील? तुम्हाला सोडून जावं लागणार असेल तर मला लग्नच करायचं नाही..”

वैदेही बाबांच्या गळ्यात आपले हात टाकून म्हणाली. तिचं बोलणं ऐकून कुसुमचे डोळे भरून आले.

“वैदू, सगळ्याच पऱ्यांना एक ना एक दिवस आपल्या सासरी जावंच लागतं बाळ.. तुलाही जावं लागेल नां? बरं मी काय म्हणते, आपल्याला मुलाला पाहून घ्यायला काय हरकत आहे? आवडला तर ठीक नाहीतर नाही.. काय म्हणता वैदूचे बाबा?”

“हो.. वैदू, तुझी आई म्हणतेय ते बरोबर आहे. पाहून घेऊया.. आपल्याला लगेच थोडं फायनल करायचंय? दोघांनाही आवडायला पाहिजे नां? दोन्ही कुटुंबाची पसंती महत्वाची. आणि या गोष्टीत बराच वेळ जाईल..”

प्रभाकर वैदेहीकडे पाहत हसून म्हणाला.

“ठीक आहे.. आता तुम्ही सगळं ठरवलंच आहे म्हटल्यावर काय बोलणार? होऊ द्या आपल्या आईच्या मनासारखं.. पण आई, तुम्हा दोघांना आवडला तरच मी विचार करेन. समजलं?”

दोघांनी हसून माना डोलावल्या.

मग अशा चांगल्या मुलीच्या, वैदेहीच्या आयुष्यात काय घडलं? पाहूया पुढच्या भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all