Login

स्वीकार.. द ॲक्सेप्टन्स- भाग पाच (अंतिम)

स्वीकार.. द ॲक्सेप्टन्स




अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
पहिली फेरी :- कथामालिका
कथेचे नाव :- स्वीकार.. द ॲक्सेप्टन्स

स्वीकार.. द ॲक्सेप्टन्स- भाग पाच (अंतिम)

“काय होणार आई? आता सगळं संपलंय.. लोकांच्या त्या तिरस्कारयुक्त जीवघेण्या नजरा, त्यांच्या नजरेतले ते प्रश्न.. मी गुन्हेगार असल्यासारखं त्यांचं माझ्याशी वागणं.. तू पाहिलंस नां आताच शांताकाकू काय बोलून गेल्या, म्हणे, मी घराबाहेर पडेलच का? आपल्या समाजाचा अजब न्याय आहे बघ.. वासनाधिन पुरुष रात्री अपरात्री कधीही, कुठेही मोकाट कुत्र्यांसारखे निर्धास्तपणे समाजात वावरताहेत आणि मी मात्र रात्रीचं कुठे बाहेर पडायचं नाही.. व्वा रे समाज! आई, कामासाठीच गेले होते नां? किती खूष होते अगं मी.. मीटिंग किती छान झाली होती! सर्वांनी माझ्या प्रोजेक्टचं किती कौतुक केलं होतं! माझ्या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली होती. आमचे एमडी पण खूष होते अगं.. मीटिंग संपवून हॉटेलवर यायला थोडा उशीर झाला. हॉटेलवरून कॅब बुक केली आणि आई, तिथेच घात झाला गं.. त्या नराधमांनी निर्जन जागी नेऊन माझ्यावर.. वेदनेने तडफडत होते गं.. कोणीच नव्हतं मदतीला.. त्यांनी रस्त्यावर फेकून दिलं मला..”

वैदेही मटकन खाली बसली आणि खूप मोठ्याने रडू लागली. तिचा तो आक्रोश काळजाला चरे पाडत होता. कुसुम धावत तिच्याजवळ आली. मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिली. डोळ्यातलं पाणी पुसत ती म्हणाली,

“शांत हो वैदू.. मान्य आहे जे झालं ते अतिशय वाईट होतं. निर्घृण होतं.. कोर्ट त्या नराधमांना शिक्षा देईलच.. तू सावर स्वतःला.. सगळं ठीक होईल..”

“काय ठीक होणार आहे? आई, माझ्यावर रेप झालाय.. रेप.. बलात्कार.. तुला समजतंय? कसं सावरू आई? त्यांनी माझं सर्वस्व हिरावून घेतलंय.. कशी विसरू? सांग मला आई, माझी गेलेली अब्रू परत मिळेल? शरीरासोबत मनावर झालेले घाव भरून निघतील? आई, माझ्या आयुष्याची राख रांगोळी झाली गं.. माझ्यामुळे तुम्हालाही खूप ऐकून घ्यावं लागतंय.. आई, एक काम कर, घराची दारं, खिडक्या बंद कर, नाहीतर आतल्या खोलीत मला कोंडून ठेव.. कुठेही तोंड दाखवायला जागा राहिली नाही. आई, हे सारं खूप असह्य होतंय गं.. असं कलंकित आयुष्य जगण्यापेक्षा मी मेलेलंच बरं.. मी जिवंत राहिले न तर हा समाज तुमचेही लचके तोडायला मागेपुढे पाहणार नाही.. आई मला जगायचं नाहीये.. खरंच मला जगायचं नाही..”

वैदेही कुसुमच्या कुशीत शिरून रडू लागली. प्रभाकर जागेवरून उठून वैदेही जवळ आला आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला,

“बाळा, रडणं थांबव.. जे झालं त्यात तुझी काहीच चुक नाही. तू काहीही वाईट वागलेली नाहीयेस त्यामुळे तुझ्यामुळे आम्हाला शरमेने मान खाली घालावी लागतेय हा विचार पहिल्यांदा मनातून पुसून टाक.. आम्हाला आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास होता, आजही आहे आणि कायम राहील.. अगं ज्यांनी गुन्हा केला त्यांना शरम वाटायला हवी तू का स्वतःला कमी लेखतेय? बाळा तू आमचा स्वाभिमान आहेस.. समजलं तुला? उठ आता.. असं हातपाय गाळून कसं चालेल? आता तुला खंबीर व्हायला हवं.. वाईट प्रवृतीशी लढायचं तुला..”


“बरोबर बोलताहेत तुझे बाबा.. मला पटतय त्यांचं बोलणं.. आम्ही दोघं तुझ्यासोबत आहोत बाळा, आपण सगळे मिळून या परिस्थितीला सामोरं जावू.. तू आता सगळं वाईट पुसून टाक.. पुन्हा नव्या जोमाने सुरुवात कर.. बोलणारे बोलतच राहतील. तू घाबरू नकोस. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस.. चल आता आतल्या खोलीत जाऊन आराम कर..”

प्रभाकर आणि कुसुम वैदेहीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. कुसुम तिला घेऊन आत जाणार इतक्यात दारावरची बेल वाजली.

“थांब मी बघतो.. ”

असं म्हणत प्रभाकरने दार उघडलं

“अरे समर, प्रतिभाताई तुम्ही? या.. या नां आत या..”

समरला समोर पाहून वैदेही अजूनच दुःखी झाली. त्याच्याकडे पाठ फिरवून उभी राहिली.

“इथे का आला आहेस समर? माझं कलंकित तोंड पहायला? की आपला साखरपुडा मोडला हे सांगायला? की माझ्या जखमेवर मीठ चोळायला?”

“नाही वैदू, मी आणि आई तुला भेटायला आलोय.. कशी आहेस तू?”

“कशी असणार? काय उरलंय आता सांगशील? समर, सगळं संपलंय अरे.. प्लिज तू जा.. मला नाही बोलायचं..”

“काय झालंय? काहीही संपलेलं नाहीये वैदू.. सगळं पूर्वीसाखंच आहे. माझं तुझ्यावर तेंव्हाही खूप प्रेम होतं आणि आजही मी तुझ्यावर तितकंच प्रेम करतो. आपण ठरवल्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी होतील. आपलं लग्न आपण धूमधडक्यात करू.. सगळे पाहून थक्क झाले पाहिजेत.. इतकं ग्रँड सेलिब्रेशन करू.. समजलं का?”

“इतकं सगळं घडून गेल्यावर अजूनही तुला माझ्याशी लग्न करावंसं वाटतंय? कमाल आहे.. की मला सहानुभूती दाखवतोयस? मला कोणाची दया, सहानुभूती नकोय.. समर, मी तुझ्या लायक राहिले नाही रे.. माझ्या अब्रूचे धिंडवडे निघालेत.. मी भ्रष्ट झालेय.. अपवित्र झालेय.. जा तू.. मीच आपला साखरपुडा मोडतेय.. तू दुसऱ्या कोणाशीही लग्न कर.. सुखी रहा.. जा तू..”

“तुला सोडून कुठे जाऊ वैदू? तुझ्याशिवाय जगू शकतो का मी? आणि काय म्हणालीस तू? मी अपवित्र झालेय.. या गोष्टींमुळे तुझी पवित्रता नष्ट होते? त्यामुळे मला तुझ्याशी लग्न नाही करता येणार? खरंच या गोष्टी आपल्या नात्यात मॅटर करतात? तुझं माझं नातं या गोष्टींवर अवलंबून आहे? वैदू, अगं मी तुझ्यावर खूप प्रेम केलंय, ते फक्त तुझ्या बाह्यसौन्दर्यावर नाही तर तुझ्या निर्मळ मनावरही.. आणि माझ्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे. मी तुला अजिबात सहानुभूती दाखवत नाहीये.. आय रियली लव्ह यू.. समजलं तुला? आपलं लग्न आपण ठरवलेल्या वेळेतच होईल.. काय म्हणतेस आई?”

“हो अगदी बरोबर.. त्याचसाठीच आलेय मी.. पुढच्या गोष्टी ठरवायला हव्यात नां? आपल्याकडे खूप कमी वेळ आहे आणि बरीच कामे बाकी आहेत. चला बरं आपण कामाची लिस्ट बनवूया..”

प्रतिभाताई हसून म्हणाल्या.

“पण आई, तुम्हाला अशी सुन चालेल? जिच्या चारित्र्यावर समाज रोज शिंतोडे उडवेल.. एका बलात्कारी मुलीला तुमच्या घराण्याची सुन करून घेताना तुम्हाला काहीच वाटणार नाही? लोक काय म्हणतील? तुमचे नातेवाईक काय म्हणतील? नको आई.. मी आयुष्यभर तुमच्या वाट्याला हे असलं अपमानस्पद जिणं देऊ इच्छित नाही..”

“काय बोलतेस बाळा तू? कसला अपमान? अगं जे तुझ्यासोबत घडलं ते देव करो कोणासोबत न घडो.. समज माझ्याच मुलीच्या बाबतीत असं काही झालं असतं तर मी तिला एकटीला सोडून दिलं असतं? आई म्हणून मी तिच्या सोबत राहिलेच असते नां? मग वैदेही, तू फक्त माझी सुन नाहीयेस तर माझी मुलगीच आहेस आणि माझ्या लाडक्या समरची होणारी लाडकी बायको आहेस.. त्यामुळे तू अशा गोष्टी मनात आणू नकोस. लोक तर बोलतीलच. मला लोकांच्या बोलण्याचा फरक पडत नाही. मला माझ्या मुलाचं सुख जास्त महत्वाचं आहे. हेच नावे ठेवणारे आपले नातेवाईक आपल्या अडचणीच्या काळात सोबत असतात का? घरात काही कमी असेल तर आणून देतात का? नाही नां.. मग का त्यांचा विचार करायचा? आपलं सुख कशात आहे ते आपणच पाहायला हवं नं बाळा?

“आई…”

वैदेहीने प्रतिभाताईना कडकडून मिठी मारून रडू लागली.

“हो बाळा, वैदेही, जे झालं त्यात तुझा काहीच दोष नाही. मला माहीत आहे त्या गोष्टी विसरण्यासारख्या नाहीत पण तुला यातून बाहेर पडायला हवं. पुढे जायला हवं.. ज्यांनी गुन्हा केला त्यांनी मोकाट फिरावं आणि तू कसलं गिल्ट मनात ठेवून आहेस? लाज तर त्यांना वाटायला हवी.. एकट्या निरपराध मुलीवर सर्वांनी मिळून अत्याचार केला. हा कसला पुरुषार्थ? बेटा, ही तुझी एकटीची लढाई नाहीये. त्या नराधमांना शिक्षा व्हायलाच हवी. त्यासाठी तुलाच लढावं लागेल. त्यासाठी तुलाच खंबीर व्हावं लागेल नां? आणि या लढाईत आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. हो की नाही वैदेहीची आई? समर बरोबर बोलतेय नं मी?

कुसुमने डोळ्यातलं पाणी पदराने पुसत मान डोलावली.

“हो आई अगदी बरोबर बोलतेयस. वैदू, तू एकटी नाहीस.. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत.. सगळे मिळून, एकत्र राहून आलेल्या संकटाला सामोरं जाऊ..”

वैदेहीचा हात पकडत समर पुढे म्हणाला,

“आणि वैदू, मी तुझा हात कधीच सोडणार नाही.. सात जन्माचा करार आहे बाबा.. असा कसा मोडायचा?”

त्याच्या वाक्य ऐकताच सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुटलं. समरच्या हातातून आपला हात सोडवून घेत वैदेही म्हणाली,

“समर, मी तुझ्या प्रेमाचा आदर करते पण समर, इतकं विचित्र घडून गेलंय ना, मनावरचे घाव भरायला थोडा वेळ लागेल. मला हे सगळं स्वीकारायला वेळ लागेल. तू वाईट वाटून घेऊ नकोस पण मला विचार करण्यासाठी थोडा वेळ हवाय..”

“खुशाल घे राणी, तुला हवा तितका वेळ घे.. मी तुझ्यासाठी आयुष्यभरही थांबायला तयार आहे.. मी वाट पाहीन तू मला स्वीकारण्याची.. तुझ्या ॲक्सेप्टन्सची.. मी वाट पाहीन वैदू.. मी वाट पाहीन..”


समाप्त..
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all