स्वीकार.. द ॲक्सेप्टन्स भाग ३

स्वीकार.. द ॲक्सेप्टन्स


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
पहिली फेरी :- कथामालिका
कथेचे नाव :- स्वीकार.. द ॲक्सेप्टन्स

स्वीकार.. द ॲक्सेप्टन्स- भाग तीन

थोड्याच दिवसांत एक चांगला शुभ मुहूर्त पाहून समर आणि वैदेहीचा साखरपुडा उरकण्यात आला. दोन्ही घरात समर आणि वैदेहीच्या लग्नाची धांदल उडाली होती. पंधरा दिवसांवर लग्न येऊन ठेपलं होतं. लग्नपत्रिका, दागिनेखरेदी, कपड्यांची खरेदी, हॉल बुकिंग, कॅटर्स साऱ्याचं नियोजन करण्यात आलं होतं. एकीकडे वैदेहीचं लग्न जवळ येत होतं आणि दुसरीकडे एका मोठ्या प्रोजेक्टवर वैदेही काम पाहत होती. एकीकडे घरातले लग्नाच्या तयारीत व्यस्त होते तर वैदेही तिच्या खोलीत आपल्या प्रोजेक्टचं प्रेझेन्टेशन बनवण्यात बिझी होती. इतक्यात तिच्या मोबाईलची रिंग झाली. मोबाईलच्या स्क्रीनवर समरचं नाव पाहून तिची कळी खुलली.

“बोला डियर हजबंड..”

“काय म्हणतेय माझी लाडकी बायको?”

“काय म्हणणार? प्रेझेंटेशन बनवतेय.. उद्या दिल्लीला जायचंय..”

“अगं तू अजून सुट्टी नाही घेतली का?”

“अरे रजेचा अर्ज मागेच टाकला होता. सुट्टी मंजूरही झाली पण अचानक हे क्लायंट विझिट ठरली. आमचे एमडी म्हणाले की, अजून लग्न पंधरा दिवसांवर आहे. एवढी एक मीटिंग उरकून घे.. हवं तर पुढे सुट्टया वाढवून देऊ.. मग मी पण विचार केला, आधी सुट्टया घेऊन काय करायचं. पुढे घेतल्या तर आपल्याला एकमेकांना एकत्र जास्त वेळ राहता येईल.. बरोबर की नाही?”

पलीकडून हसण्याचा गडगडाट झाला.

“हो.. हो.. अगदी बरोबर केलंस. मी पण तेच करतो मग.. माझी बायको इतका पुढचा विचार करते तर मग मीही करायला हवा नां? माझ्या बायकोला माझ्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचाय म्हणे.. तर मलाही तिचा विचार करायला हवा नं?”

“चल बेशरम कुठला..”

“आय लव्ह यू बायको..”

वैदेहीच्या गालावर लाजेची लाली पसरली.

“आय लव्ह यू टू शोना.. चल मी ठेवते आता.. हे प्रेझेंटेशन पूर्ण करते. उद्या जायचं म्हटल्यावर तुझ्या सासूबाईंना मनवावं लागेल. ती खूप आरडाओरडा करेल. तिला समजावून सांगणं म्हणजे खुप कठीण रे बाबा! त्यामुळे तिला मनवण्यासाठी तुझ्या सासऱ्यांची म्हणजे माझ्या लाडक्या बाबाची मदत घ्यावी लागणार.. खूप मोठा टास्क आहे बाबा.. म्हणून ठेवते आता.. उद्या बोलू..”

असं म्हणून वैदेहीने कॉल कट केला आणि पुन्हा आपलं काम करण्यात दंग झाली. इतक्यात कुसुमने तिला जेवणासाठी आवाज दिला.

“वैदू, झालं का तुझं? स्वयंपाक तयार झालाय. जेवायला बाहेर ये.. आतातरी चार दिवस आमच्या सोबत घालव गं.. पुन्हा जाशील आपल्या सासरी मग आहोतच आम्ही एकटे..चला हो.. या जेवायला..”

बोलता बोलता कुसुमचा गळा भरून आला. तिचं बोलणं ऐकून प्रभाकरच्या डोळ्यातही पाणी दाटून आलं. वैदेही आपल्या खोलीतून बाहेर आली. हातपाय धुवून डायनींग टेबलजवळ मांडलेल्या खुर्चीत येऊन बसली. मागोमाग प्रभाकरही येऊन जेवायला बसला. कुसुमने सर्वांची पानं वाढून घेतली.

“अरे व्वा! मस्तच पुन्हा आजचा जेवणाचा बेत आपल्या लाडक्या लेकीसाठी वाटतं. आमच्या आवडीनिवडी कोणी विचारतही नाही हल्ली..”

प्रभाकर चेष्टेत म्हणाला.

“असू देत ओ.. तिचे या घरात किती कमी दिवस राहिलेत बरं.. मग मला तिच्या आवडीचे पदार्थ करून खाऊ घालू द्या नं.. परत इतकं प्रेमाने तिला कोण करून घालेल बरं?”

“का? तिच्या सासूबाई आहेत की.. त्या तिला चांगले पदार्थ करून घालतील की.. हो की नाही वैदू?”

प्रभाकरने वैदेहीला प्रश्न विचारला पण वैदेहीचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. प्रभाकरने पुन्हा एकदा आवाज दिल्यावर ती भानावर आली.

“हं.. बाबा काही बोललात का? अहो मी थोडी विचार करत होते. माझ्या प्रोजेक्टचं प्रेझेन्टेशन आहे. उद्या मला दिल्लीला जायचं आहे. क्लाईंट विझिट आहे..”

“अगं काय हे? लग्न पंधरा दिवसांवर आलंय आणि तू अजून ऑफिसचंच काम करतेय? नाही, नाही मी तुला कुठेही जाऊ देणार नाही..”

कुसुम निक्षुन म्हणाली.

“अगं आई, असं काय करतेय? विमानाने जायचंय आणि लगेच त्याच रात्री विमानाने परत येणार.. एक दोन दिवसांचा तर प्रश्न आहे. तुझ्या कॉलवरच्या गप्पा संपेपर्यंत मी घरी असेन. बाबा प्लिज, आईला समजावून सांगा नां..”

वैदेही बाबांना आईला समजवण्यासाठी विनवण्या करत होती.

“तू शांतपणे जेवून घे आणि उद्याची तयारी कर.. तुझ्या आईला मी समजावतो.. किती वाजता निघायचंय तुला?”

“उद्या पहाटे सहाची फ्लाइट आहे आणि उद्याच रात्री साडे अकराच्या फ्लाईटने परतही येईन पण माझं जाणं महत्वाचं आहे बाबा.. खूप महत्वाची मिटिंग आहे. कंपनीला खूप मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे..”

प्रभाकरने कशीबशी कुसुमची समजूत काढली आणि वैदेहीला दिल्लीला जाण्याची परवानगी मिळाली.

“करा तुम्हाला काय करायचं ते? दोघे बापलेक मिळून गोंधळ घाला.. दोन दिवसांत नक्की परत येशील नां?”

“हो गं आई, मी लवकरात लवकर मीटिंग संपवेन आणि लगेच परत येईन.. माझ्या आवडीची पुरणपोळी बनवून ठेव हं.. अँड थँक्यू सो मच आई.. मला समजून घेतलंस..”

वैदेही आईच्या पोटाला घट्ट मिठी मारत म्हणाली.

“हं पुरे आता लाडीगोडी लावणं.. जा तयारी करा.. उद्या लवकर जायचंय नां?”

कुसुम हसून म्हणाली.

दुसऱ्या दिवशी पहाटे वैदेही दिल्लीला जाण्यासाठी निघाली. दिल्लीत पोहचल्यावर तिने आईबाबांना कॉल करून कळवलं होतं. त्यामुळे कुसुम आणि प्रभाकर निश्चिन्त मनाने आपल्या कामाला लागले. मित्रामैत्रिणींना, नातेवाईकांना वैदेहीची लग्नपत्रिका देऊन आमंत्रणं करायची म्हणून दोघेही सकाळीच घराबाहेर पडले होते. संपूर्ण दिवस त्यातच निघून गेला. रात्री एअरपोर्टला जाण्याआधी वैदेहीने घरी प्रभाकरला कॉल केला.

“बोल वैदू.. कशी झाली मीटिंग आणि तू कधी येतेस बाळा?”

“बाबा, मीटिंग छान झाली. कंपनीला या क्लाईंटकडून खूप मोठी ऑर्डर मिळालीय. आता एमडी पण खूप खूष होतील. आणि बाबा, आता माझं प्रमोशन पक्कं.. बरं ऐका नां.. मी आता घरी येण्यासाठी निघालेय. कॅब बुक केलीय येईल इतक्यात. अर्ध्या तासात एअरपोर्टला पोहचेन. मुंबईत पोहचले की कॉल करते हं.. आईला सांगा काळजी करू नकोस.. मी ठीक आहे..”

“हो बाळा, सांगतो तिला.. तू सावकाश ये हं.. बाय..”

असं म्हणून प्रभाकरने फोन ठेवून दिला.

“कुसुम, ऐकलंस का? वैदू, दिल्लीहून घरी यायला निघालीय. एअरपोर्टला पोहचण्याआधी तिने कॉल करून कळवलंय. फ्लाईटने इथे मुंबईत यायला कितीसा वेळ लागतो? फक्त तीन चार तासात घरी येईल ती.. आता काळजी करू नको बरं..”

“पोरीची जात आहे ओ.. थोडी भीती वाटणारच नां?

कुसुम वैदेहीच्या काळजीपोटी म्हणाली.

“अगं काय बोलतेस! पोरीची जात? अगं माझा वाघ आहे तो.. आपण तिला मुलासारखंच वाढवलंय नां? आपण तिला मुलगी म्हणून नाजूक बनवलं नाही.. मोठी धाडसी लेक आहे माझी.. दहा जणांना पुरून उरेल.. काय समजलीस?”

आपल्या लाडक्या लेकीचं कौतुक करताना प्रभाकरची छाती अभिमानाने फुलून आली होती.

पुढे काय होतं पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all