स्वीकार.. द ॲक्सेप्टन्स भाग २

स्वीकार.. द ॲक्सेप्टन्स


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
पहिली फेरी :- कथामालिका
कथेचे नाव :- स्वीकार.. द ॲक्सेप्टन्स

स्वीकार.. द ॲक्सेप्टन्स- भाग दोन


रविवारी संध्याकाळी कुसुम वैदेहीला पहायला पाहुणे येणार म्हणून काहीशी चिंतीत होती. तिने घर छान आवरलं. कांदेपोहे बनवत असताना मधेच तिचं प्रभाकरला सूचना देण्याचं काम सुरू होतं.

“अहो, भावोजीना कॉल करून पहा नां.. कुठे आलेत पाहुणे? अचानक आले तर आपलाच गोंधळ उडेल.. आणि तुमची लाडकी कन्या कुठेय? अजून घरात तपास नाहीये तिचा? काय म्हणावं या पोरीला! मैत्रिणीकडे जाऊन येते असं सांगून गेली होती अजून आलेली नाहीये.. इतकं सांगूनही आपलंच खरं करायची सवय दुसरं काय..”

“अगं कुसुम, किती टेन्शन घेशील. माझा मघाशीच भावोजीना फोन झालाय. पाहुणे घरून निघालेत. येतीलच थोड्या वेळात आणि वैदूही तिच्या मैत्रिणीच्या घरून निघालीय. ही बघ आलीच..”

दारातून आत येणाऱ्या वैदेहीकडे बोट दाखवत प्रभाकर म्हणाला.

“वैदू, चल आवरून घे बाळा, पाहुणे निघालेत कधीही येतील. साडी नेसायचीय तुला.. थांब मी तुला मागे तुझ्या बाबांनी माझ्यासाठी घेतलेली साडी नेसायला देते. ती नेस तू.. छान दिसेल तुला..”

कुसुम पोहे करता करता वैदेहीकडे पाहून म्हणाली.

“नाही आई, मी साडी नेसणार नाही. फार फार तर जीन्स टीशर्ट ऐवजी सलवार कुर्ता घालेन. मी जशी आहे तशीच समोर जाईन.. स्वतःला सजवायला मी काही शोभेची बाहुली नाही.. त्यांना मी जशी आहे तशीच आवडायला हवी नां.. आहे तसंच ॲक्सेप्ट करायला हवं ना?”

कुसुमने कपाळावर हात मारून घेतला. ती काही बोलणार इतक्यात प्रभाकरने तिला नजरेनेच शांत राहण्यास खुणावलं. कुसुम शांत बसली. वैदेही तयार होण्यासाठी तिच्या खोलीत निघून गेली.

“अजून कसे आले नाहीत ओ? संध्याकाळ उलटून चाललीय..”

कुसुम खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली.

“येतच असतील गं.. ट्राफिकमध्ये अडकले असतील. तुला तर माहित आहे ना, संध्याकाळी आपल्या भागात किती ट्राफिक असतं ते?”

इतक्यात दारावरची बेल वाजली.

“आले वाटतं पाहुणे? थांब मी पाहतो..”

असं म्हणत प्रभाकर पटकन जागेवरून उठला आणि दार उघडलं.

समोर कुसुमचे भावोजी पाहुण्यामंडळींसोबत दारात उभे होते.

“या भावोजी.. या नां आत या..”

प्रभाकरने हसून सर्वांचं स्वागत केलं. सर्वजण जागेवर विराजमान झाले. कुसुमच्या भावोजीनी पाहुण्यांकडे पाहून बोलायला सुरुवात केली,

“हे आमचे प्रभाकर भावोजी आणि या त्यांच्या पत्नी कुसुमताई..”

कुसुमने सर्वांना नमस्कार केला.

“आणि हे आहेत समर केळकर आणि या त्यांच्या मातोश्री प्रतिभाताई केळकर..”

प्रभाकरने मुलाकडे पाहिलं. आकाशी रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची कॉटन जीन्स घातलेला साधारण सत्तावीशीचा, अंदाजे सहा-साडे सहा फूट उंचपुरा, गव्हाळ वर्ण, रुबाबदार, शांत पण तेजस्वी मुद्रा, करारी डोळे, मानेपर्यंत रूळणारे काळेभोर केस असलेला एक देखणा तरुण सोफ्यावर बसला होता. पाहताक्षणी प्रभाकर आणि कुसुमला मुलगा आवडला होता. एकमेकांच्या ओळखी झाल्या. गप्पा सुरू झाल्या. कुसुमने टेबलवर नाष्टाचा ट्रे आणून ठेवला. कुसुमचे भावोजी कांदेपोह्यांची डिश समीर आणि त्याच्या आईच्या हातात देत म्हणाले,

“मुलीला बाहेर बोलवून घेऊया का?”

समरच्या आईने होकारार्थी मान डोलावली तसं कुसुम जागेवरून उठून उभी राहिली आणि हसून म्हणाली,

“आलेच हं.. वैदूला घेऊन येते..”

कुसुम वैदेहीच्या खोलीत आली आणि वैदेहीकडे पाहतच राहिली.

“वैदू आवरलं का? अरे हे काय! साडी नेसलीस?”

“मग काय करणार? माझ्या आईला मी नाराज करू शकत नाही नां..”

वैदेही स्मित हास्य करत म्हणाली.

“किती गोड दिसतेय माझी लेक.. कोणाची नजर नको लागायला..”

असं म्हणत कुसुमने आपल्या डोळ्यातला काजळाचा काळा तीट वैदेहीच्या कानामागे लावला आणि तिला बाहेर घेऊन आली. वैदेही बाहेर आली तशी समर आणि त्याची आई तिच्याकडे पाहतच राहिले. नाजूक बांधा, नितळ गोरी कांती, काळेभोर टपोरे गहिरे डोळे, तरतरीत नाक, गुलाबी ओठ, गळ्यात मोकळे सोडलेले रेशमी केस.. वैदेही खूपच सुंदर दिसत होती. तिने मरून रंगांची शिफॉनची साडी नेसली होती. हातात गोल्डन कलरच्या नाजूक नक्षीच्या बांगड्या, गळ्यात सोन्याचा नाजूक नेकलेस, कानात सोन्याचे इअरिंग्स तिचं सौन्दर्य खुलवत होते.. वैदेहीने आईच्या सांगण्यावरून सर्वांना वाकून नमस्कार केला. कुसुमने तिला एका खुर्चीत बसवलं. भावोजीनी बोलायला सुरुवात केली.

“प्रतिभाताई ही आमची मुलगी वैदेही.. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा.. समर तुही बघून घे रे..”

समरचं नाव ऐकताच वैदेहीने समोर एक कटाक्ष टाकला. पाहता क्षणीच वैदेहीला समर आवडला होता आणि समरलाही वैदेही.. प्रतिभाताईनी काही जुजबी प्रश्न विचारले. वैदेहीने शांतपणे उत्तरं दिली.

“आम्हाला तुमची वैदेही पसंत आहे. खूप गोड आहे तुमची मुलगी.. आता मुलांची पसंती काय म्हणतेय ते पाहूया?”

प्रतिभाताई आनंदाने म्हणाल्या. वैदेही प्रतिभाताईंना पसंत पडली हे ऐकून प्रभाकर आणि कुसुमला खूप आनंद झाला.

“हो बरोबर बोललात.. मुलांची पसंती पण हवीच ना? त्यांच्या होकाराशिवाय का आपण लग्न करू शकणार आहोत? कोणताही निर्णय घेण्याआधी त्या दोघांना एकत्र बसून बोलायचं असेल तर आमची काहीच हरकत नाही. जा बाळा वैदू, समररावांना तुझी खोली दाखव..”

प्रभाकर पाहुण्यांकडे पाहत हसून म्हणाला आणि वैदेहीला तिची खोली दाखवायला सांगितलं. वैदेही समरला घेऊन तिच्या खोलीत आली. समरने एक नजर खोलीभर फिरवली. छोटीशी, नीटनेटकी, भिंतीवर छान पेंटिंग असलेली, एका कोपऱ्यात पुस्तकांचं छोटंसं शेल्फ, त्याच्या शेजारी एक टेबलखुर्ची, टेबलवर काही अभ्यासाची पुस्तके मांडली होती. समरला ती छोटीशी नीटनेटकी खोली फार आवडली. त्याने बोलायला सुरवात केली,

“छान आहे खोली.. स्वच्छ, नीटनेटकी..”

“आईने ठेवलीय ती.. मला स्वच्छतेची तशी फारशी आवड नाही.. आणि ते कांदेपोहे आणि चहा तेही आईनेच बनवलं होतं. मला चांगला स्वयंपाक करता येत नाही..”

समर गालातल्या गालात हसला.

“हसायला काय झालं? मी हे तुम्हाला आधीच सांगून ठेवतेय कारण उगीच तुमचा अपेक्षाभंग नको नं व्हायला.. दुसरी गोष्ट मी लग्नानंतरही जॉब करणार आहे. माझा मार्केटिंगचा जॉब असल्याने मला घरी यायला उशीर होईल.. कामानिमित्त मला आठ पंधरा दिवस बाहेरगावी जावं लागतं. त्यामुळे मी ‘रांधा वाढा उष्टी काढा..’ यात अडकून राहणार नाही.. म्हणजे मी घरातलं काही करणारच नाही असं म्हणत नाही. माझा जॉब सांभाळून मला जमेल तितकी मी मदत करेन.. तुमच्या आईची काळजी घेईन पण सक्तीने तुला घरातलं करावंच लागेल असं म्हणाल तर ते मला जमणार नाही.. आता इतकं सगळं ऐकल्यावर तुमचा नकारच असणार हे मला माहित आहे. तुम्ही खुशाल तुमचा निर्णय बाहेर सांगू शकता पण मी माझ्या शब्दावर कायम आहे.. ”

तिच्या स्पष्टोक्तीपणाचं समरला कौतुक वाटलं.

“तुला मला काही विचारायचंय?”

“नाही, माझ्या आई बाबांकडून मला तुमच्याबद्दल समजलंय..”

“तुला मी आवडलोय का?”

“हं.. म्हणजे नकार द्यावा असं काही खास कारण नाहीये माझ्याकडे..”

ती किंचित हसून म्हणाली. तो पुन्हा हसला आणि म्हणाला,

“चल बाहेर जाऊ.. माझा निर्णय त्यांच्यासमोरच सांगतो नं..”

“हं.. ठीक आहे चला..”

वैदेही आणि समर बाहेर येऊन बसले. समरने त्याच्या आईकडे पाहिलं.

“आई मला वैदेही पसंत आहे आता तिलाही विचार ती माझ्याशी लग्न करायला तयार आहे का?”

त्याच्या वाक्यासरशी सर्वांना खूप आनंद झाला आणि सर्वांनी आपल्या नजरा वैदेहीकडे वळवल्या. वैदेहीने लाजून मान खाली घातली आणि मान डोलावून होकार दिला.

“अरे व्वा! हे तर छानच झालं.. मग पुढच्या बोलाचाली आणि साखरपुड्याची तारीख काढूया. चांगला मुहूर्त बघून उडवून देऊ बार.. काय वैदू?”

कुसुमचे भावोजी आनंदाने हसून म्हणाले तशी वैदेहीने लाजून मान खाली घातली.


पुढे काय होतं? पाहूया पुढच्या भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all