गोडवा

A story of sweetness in relations .

मुग्धा एक सुंदर, हुशार मुलगी. एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करत होती. साहजिकच त्यानुसार तिची वेशभूषा असे. तिला मुख्यत्वे करून साधे सुटसुटीत कपडे जसे फॉर्मल शर्टस आणि ट्राउजर्स, कुर्ते, इत्यादी घालण्याची सवयही होती आणि तशीच आवडही होती. फार भरजरी , वजनदार कपडे तिला तेवढे आवडायचे नाहीत. रोज ऑफिसमध्ये जाण्याच्या दृष्टीने केशभूषाही साधीच असायची. छानशी हेअरकट केलेले लहानच खांद्यापर्यंत ठेवलेले केस. एक कंगवा फिरवला, एखादी क्लिप लावली की तयार. नाजूकसेच दागिने तिला आवडायचे. त्यामुळे कानात नाजूकसे इअरिंग्स आणि गळ्यात नाजूकसे पेंडंट. हातात एक नाजूकसे ब्रेसलेट इतकेच दागिने ती घालत असे .  मुग्धा आई वडिलांची एकुलती एक असली तरी योग्य संस्कारात वाढलेली होती. स्नेहाताईंनी तिला वेळोवेळी चांगली शिकवण दिली होती.


सात आठ महिन्यांपूर्वी तिचे सुजयशी लग्न झाले होते. तेव्हापासून नव्या संसारात रुळत होती. सुजयसुद्धा एका इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये होता. दोघेही सोबतच ऑफिसमध्ये जात . सुजय तिला ऑफिसमध्ये सोडून मग पुढे त्याच्या ऑफिसमध्ये जात असे. मुग्धाच्या सासूबाई वर्षाताई या आपल्या सुनेला शक्य तितके सांभाळून घेत होत्या. अर्थातच नोकरी करणाऱ्या मुलींचे लग्नाआधी स्वयंपाक घराशी जितके नाते असते तितकेच मुग्धाचेही होते. तरीही गरजेपुरते पदार्थ स्नेहाताईंनी हट्टाने तिला शिकवले होते. सुरवातीला वर्षाताईंनी स्वयंपाकातील काही गोष्टीही मुग्धाला शिकवल्या होत्या.  त्या थोडीफार मदतही करत असत.

वर्षाताई अतिशय हौशी होत्या. त्यांना कलाकुसरीची आवड आणि जाण दोन्हीही होते. कधी कधी फावल्या वेळी त्या काहीतरी कलाकुसरीचे काम करत बसत. वर्षाताईंना पारंपरिक, भरजरी, जरीकाठाच्या साड्या आवडत आणि दागिनेसुद्धा ठसठशीत उठून दिसणारे त्यांना जास्त आवडत.

आवडीनिवडी जरा वयातील आणि इतर फरकामुळे वेगवेगळ्या जरी असल्या तरी दोघी सासू-सून एकमेकींशी जुळवून घेण्याचा प्रयत्न मात्र पूर्ण करत असत.

नुकताच जानेवारी महिना सुरू झाला होता. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी वर्षाताईंना सोसायटीमध्येच राहणाऱ्या दाते वहिनींचा दुपारी फोन आला.

"वर्षा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा बरं का तुला. "

"दाते वहिनी, तुम्हांलासुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा. "

"वर्षा, या वेळी तुझ्या सुनेची पहिली संक्रांत ना ग? "

"हो ना वहिनी. हां हां म्हणता संक्रांत येईल आता, नाही का?"

"अग हो ना, काय स्पेशल करणार आहेस मग सुनेसाठी या वेळी संक्रांतीला?"

"आज सकाळीच मनात आलं ते माझ्या. ठरवते काय करायचं ते."

"हं, ठरव. तुझ्या हातात कला आहे ग छान. अन हौसही आहे तुला. " दाते वहिनी.


थोडा वेळ बोलून त्यांनी फोन ठेवला आणि वर्षाताई विचारात पडल्या.

'काय करावे? पहिल्या संक्रांतीला हलव्याचे दागिने घालतात ना. ते घेऊन यावे का? नको , विकत आणण्यापेक्षा घरीच बनवू या. आणि तेही तिच्या नकळत. मग संक्रांतीला तिला साडी आणि हे दागिने असे एकदम सरप्राईज देऊ या. हळदीकुंकवाच्या वेळेला घालेल ती दागिने. बस्स ठरलं. मुग्धाची पहिली संक्रांत थाटात झाली पाहिजे.' वर्षाताईंचा चेहरा खुलला होता.

त्या दिवसापासूनच त्या तयारीला लागल्या. वर्षाताईंनी लहानमोठ्या, गोल, पाकळीसारख्या इत्यादी वेगवेगळ्या आकाराचा  हलवा करायला घेतला. मुग्धा ऑफिसमध्ये गेली की त्या त्यांचे काम सुरू करत. थोडावेळ हलवा करीत . मग उभे राहून थकवा आला, तरी वेळ न घालवता, खाली बसून वेगवेगळ्या लाल , सोनेरी चमचमणाऱ्या कागदाचे दागिन्यांचे आकार कापून ठेवत. असे त्यांनी मुकुट, कंबरपट्टा, बाजूबंद इत्यादींसाठी आकार कापून ठेवले. काही दिवसांनी हलवा बनवून झाल्यावर वर्षाताईंनी तो वेगवेगळ्या आकाराचा हलवा घेऊन दागिने बनवायला सुरवात केली. त्या रोज मुग्धा येण्याच्या वेळेआधी सगळे आवरून ठेवत, जणूकाही काही केलेच नाही.


इकडे मुग्धा मात्र रोजचा सकाळी स्वयंपाक, नाश्ता, दोघांचे डबे आणि सोबतच ऑफिसमध्येही खूप काम असल्याने घरी येईपर्यंत दमून जाई. त्यात हा एवढ्यातच आलेला नवीन बॉस. अगदी काटेकोरपणे ऑफिसमध्ये येण्याची वेळ पाळायचा त्याचा आग्रह असे.

कालच तर त्याने मुग्धाला रागावले होते.

"मॅडम तुमचे आता लग्न झालेय त्यात ऑफिसची काय चूक आहे?  स्त्री आहे म्हणून अशा सवलती मिळत नसतात. तुम्हाला वेळेवर यायला जमत नसेल तर नोकरी सोडून घरी बसा." बॉस.

आपल्या डेस्कवर येऊन बसल्यावर ती विचार करत होती,

'काय चुकले माझे? एक सांभाळायला जावं तर दुसरीकडे बिनसते.' 

'दिली असती एक दिवस सुजयला ती भाजी तर नसतं चाललं का यांना? पण नाही, आई पण ना. मुलाच्या आवडीप्रमाणेच सगळं झालं पाहिजे. गवारीच्या शेंगा किती छान, कोवळ्या मिळाल्या म्हणून घेतल्या होत्या मी. उशीर होऊ नये म्हणून रात्रीच निवडून, तोडून ठेवल्या . सकाळी भाजी केली . सगळा स्वयंपाक केला .' तिला काल सकाळचा प्रसंग आठवला.

अगदी डबे भरताना वर्षाताईंनी सांगितलं ,

"अग, सुजयला ही भाजी आवडत नाही. खाणार नाही तो. दुसरी कर त्याच्यासाठी. आपण सगळे खाऊ ही भाजी. " वर्षाताई.

"अहो आई , आता उशीर होईल ना मला . काल सांगितलं असतं तर जमलं असतं, एक आणखी भाजी चिरून ठेवली असती मी. " मुग्धा.

"अग त्याला आवडत नाही म्हणून तर ही भाजी फारशी होत नाही आपल्या घरी. मला वाटलं माहिती आहे तुला ते. तर तू केलीच असेल दुसरी भाजी. "

मुग्धाची खरं तर मनातून खूप चिडचिड झाली होती. पण आईने लग्नाआधी सांगितलेले तिला आठवले.

" मुग्धा, राग आल्यावर माणूस रागाच्या भरात जास्त बोलतो आणि त्याने मने दुखावली जातात. राग आला असेल तरी त्यावेळी शक्यतो जास्त बोलू नकोस. जरा शांत झाल्यावर तुझा मुद्दा आणि दृष्टिकोन शांत स्वरात समजावून सांग. चांगल्या स्वभावाच्या आहेत तुझ्या सासूबाई. ऐकतील त्या. एकमेकींना सांभाळून घेत पुढे जा. जसा तुला कधीकधी माझा राग येतो, पण तो तेवढ्यापुरता असतो, कायम मनात ठेवून राहत नाहीस, विसरून जातेस ना? मनातून प्रेमच करतेस ना माझ्यावर? तसेच त्यांच्याही बाबतीत राग मनात धरून ठेवू नकोस. तिथल्या तिथेच सगळे विसरून जायचे. आपण प्रेम दिले की समोरचाही प्रेम देत असतो बाळा." स्नेहाताईंनी सांगितले होते.


त्यामुळे काही न बोलता तिने शक्य तितक्या पटकन दुसरी भाजी करायला घेतली. चिरली.

तोवर वर्षाताई आल्याच. म्हणाल्या,
"मी फोडणी देते भाजीला, जा तू तयार हो. "

त्यांनी भाजीला फोडणी दिली आणि थोड्या वेळाने भाजी झाल्यावर मुग्धा आणि सुजय निघाले. मुग्धा मनात प्रार्थना करतच होती की आता बॉसने ओरडू नये . पण जे होणार होते तेच झाले होते.

मुग्धाचा तर पूर्ण दिवस खराब गेला होता. तिची चूक नसताना तिला ऐकून घ्यावे लागले होते.

तेरा तारीख उजाडली होती. सकाळी स्वयंपाक झालाच होता, तेवढ्यात वर्षाताईंनी साधारण पाऊण किलो तीळ मुग्धासमोर ठेवले.

"मुग्धा , हे जरा पाहून घे आणि मग भाजून ठेव एवढे."

मुग्धाच्या पोटात गोळाच आला.

"आई, संध्याकाळी आल्यावर केले तर नाही का चालणार? नाहीतर येताना विकत आणू का मी वड्या? "

"छे ग, विकत नको. घरच्याच वड्या, लाडू छान वाटतील , तेच करू या. दोघी आहोत ना, होतील करून. मुद्दामच तर आणायला लावलेत मी बाबांना घाईने. अग संध्याकाळी तुम्हाला आधीच उशीर होतोय यायला. संध्याकाळी त्याचे लाडू वळायचे आहेत. आता भाजून ठेवलं तर संध्याकाळी जरा लवकर आटपेल. उद्या संक्रांत आहे ना , तर संध्याकाळी हळदीकुंकू ठेवलंय आपल्याकडे. कालच बायकांना निमंत्रण देऊन ठेवलंय मी." वर्षाताई.

"काय? उद्याच आहे हळदीकुंकू आपल्याकडे? "

"अग हो, तुझी पहिलीच संक्रांत ना यावर्षी. मग त्या दिवशी केलं तर जास्त छान वाटतं. उद्याचा दिवस थोडं लवकर येशील घरी." वर्षाताई.

'अहो आई, लवकर येण्याचे कसे मॅनेज करू? किती दमलेय मी आठवडाभर घाईघाईने ऑफिसचे , घरचे सगळे काम उरकताना. काय सांगू तुम्हाला. एकतर बॉसने कालच एवढं रागावलंय. अन एवढं सगळं आता करत बसले तर आजही उशीर होणार .' मुग्धा मनातच विचार करत होती. रागच आला होता जरा तिला.

"मला विचारायचं तरी असतं ना आई एकवेळ. ", ती जरा घुश्श्यातच म्हणाली. आणि फणकाऱ्याने तिने तीळ निवडायला घेतले.

काही वेळात ते निवडून भाजून ठेवले. आज तिला नाश्ता करायला वेळच उरला नव्हता. तोवर वर्षाताईंनी दोघांचेही डबे भरले होते. मुग्धासाठी एका डब्यात उपमा भरून दिला .

"गाडीत बसल्यावर, जाताना हे खाऊन घे बेटा. उपाशी नको राहू हं. " त्यांनी प्रेमाने सांगितले.

पण मुग्धा अजूनही थोडी घुश्श्यात आणि बरीचशी वेळेत पोचण्याच्या टेन्शनमध्येच होती. तिला ते प्रेम कळलेच नाही. रागात असताना माणसाला समोरच्याचे प्रेमही कळत नाही ना, तसेच काहीसे. तिने डबे घेतले अन काही न बोलता फक्त एक कटाक्ष टाकला आणि निघाली. वर्षाताईंचे डोळे क्षणभर भरून आले. पण त्यांनी लगेच मनात येऊ घातलेल्या विचारांना झटकून टाकले.'यांना काय जातंय भाजून ठेव, करून ठेव म्हणायला. इथे धावपळ , तडफड माझी होतेय. कशाला हवंय एवढं सगळं. एवढंच आहे तर स्वतः करायचं असतं.' तिला वाटत होतं.पण वर्षाताईंचे तर दागिन्यांचे थोडेसे काम राहिले होते. एक शेवटचा हात त्यावरून फिरवायचा होता. मार्केटमध्ये जाऊन साडी तर त्यांनी आणली होती पण तिला फॉल पिको करायला, ब्लाऊज शिवायला टाकलेले होते , तिथून आणणे , रांगोळी वगैरे आणणे इत्यादी कामे त्यांना होती. आणि हे सगळे मुग्धा परत यायच्या आत व्हायला हवे होते. त्यामुळे त्यांना तसा वेळ मिळणार नव्हता.

वर्षाताईंनी अत्यंत नाजूकपणे आणि कलात्मकतेने हलव्याचे दाणे लावून सुंदर डिझाईन असलेले गळ्यातील नेकलेस, मोठे हार,  हलव्याच्या बांगड्या, भांगात लावायची बिंदी, कंबरपट्टा, मुकुट, बाजूबंद इत्यादी सगळे दागिने स्वतःच्या हाताने बनविले होते.  तेरा तारखेला, संक्रांतीच्या आदल्या दिवशी सगळा सेट तयार झाला, तशा वर्षाताई स्वतःशीच खूष होत हसल्या.

"झाला बाई सेट. झालं सगळं पूर्ण. " त्या मनाशी म्हणाल्या. त्यांना आनंदात बघून विवेक म्हणजे सुजयचे बाबा हसून म्हणाले,

"झालं का बाईसाहेबांच्या मनासारखं. किती ही खुषी दिसतेय चेहऱ्यावर. फार लाडाची आहे बुवा सूनबाई!"

"हो मग, आहेच ना. " वर्षाताई हसून म्हणाल्या.
"पण अहो ती घालेल ना हे?"

"घालेल ग." विवेक म्हणाले.

ऑफिसमध्ये गेल्यावर काही वेळाने मुग्धा शांत झाली. तिला थोडे वाईटही वाटले. राहून राहून तिच्या डोळ्यासमोर वर्षाताईंचे भरून आलेले डोळे दिसत होते. त्यांच्याजागी आपली आई असती तर, आपण असेच वागलो असतो का? तिने विचार केला. मनाशी काहीतरी ठरवले. संध्याकाळी ती घरी आल्यावर दोघींनी तिळगुळाचे लाडू बनविले.

संक्रांतीच्या दिवशी तिने लवकर उठून  सकाळीच हॉल आवरून घेतला. बैठकीची तयारी करून ठेवली.  फुले आणून फुलदाणीत छानशी रचना करून ठेवली, चांदीच्या तबकात वाट्या ठेवून तिळगुळाचे डबे टेबलावर काढून ठेवले. अत्तरदाणी ठेवली. रांगोळी काढली. स्वयंपाक करून डबा घेऊन ऑफिसमध्ये गेली. दुपारी अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली आणि बाजारात जाऊन वर्षाताईंसाठी एक सुंदरशी साडी घेऊन मग घरी आली.

ती घरी आली तर वर्षाताईंनी फराळाची तयारी सुरू केलेली होती. त्यात मदत करत ती तिने पूर्ण केली. त्यांनी तिला खोलीत बोलावले आणि तिच्या हातावर त्यांनी आणलेली काळी लाल भरजरी काठापदराची सुंदर साडी आणि एका मखमली बॉक्समध्ये छान मांडून ठेवलेले हलव्याचे दागिने ठेवले.

'मला माहिती आहे की तुला नाजूक दागिने आवडतात. पण आजच्या दिवशी हे दागिने घालशील ना?' त्या मनातच म्हणाल्या.

मुग्धा सगळे घेऊन आपल्या खोलीत गेली. भरजरी प्रकार फारसे आवडत नसतानाही तिला ही चटकदार दिसणारी सिल्कची साडी मात्र फारच आवडली.

पण मुग्धा दागिने घालेल की नाही, वर्षाताईंचे मन साशंक होते. मनात एक धाकधूक ठेवूनच वर्षाताई स्वतः तयार होऊन हॉलमध्ये तिची वाट बघत बसल्या होत्या.

'थोडया वेळात बायका यायला लागतील आता.' त्या मनाशी म्हणाल्या.

साडी नेसून ते सर्व दागिने घालून मुग्धा सासूबाईंच्या जवळ गेली. 

"आई, कशी दिसतेय मी? हा मुकुटसुद्धा लावून द्या ना." ती उत्फुल्ल चेहऱ्याने अगदी उत्साहाने त्यांना विचारत होती.

तिच्याकडे बघताच वर्षाताईंना खूप आनंद झाला.

"तू ... घातलेस हे दागिने... मला वाटलं घालतेस की नाही. तुला आवडतील की नाही." त्या आनंदाने तिच्याकडे बघत म्हणाल्या.

"हो ऽऽऽ, अगदी सगळे दागिने घातलेत मी. खूप सुंदर आहेत दागिने. फक्त मुकुट तेवढा माझा मला लावता येईना. सांगा ना मी कशी दिसतेय."

"अग सूनबाई, एकदम लक्ष्मीसारखी सुंदर आणि गोड दिसते आहेस ग. तुला सांगतो , बघ आज तुझी सासू एवढी आनंदात आहे ना की गेल्या कित्येक दिवसात मी तिला असे पाहिले नव्हते. तुला माहिती आहे? गेले दोन आठवडे अथक मेहनत करून तिने हे दागिने तुझ्यासाठी स्वतःच्या हाताने तयार केले आहेत आणि म्हणते कशी,

"अहो, मी मुग्धाला सरप्राईज देणार आहे. तिला आवडेल ना? ती घालेल ना?"  " विवेक म्हणाले.

मुग्धाने वर्षाताईंना मिठी मारली.

"तुम्ही स्वतः बनवलेत हे? वॉव! कित्ती सुंदर झालेत! आई, सॉरी मी तुम्हाला दुखावले." तिने कान पकडला.

"तुम्हाला एक गंमत सांगू? मी सुद्धा तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलं आहे. डोळे बंद करा बघू. " 

तिने त्यांचा हात आपल्या हाताने पुढे करत त्यावर तिने आणलेली साडी ठेवली. तिळगुळाचा एक लाडू आपल्या हाताने त्यांना भरवला आणि नमस्कार केला. वर्षाताईंचे डोळे पुन्हा भरून आले.

"हे काय आई? मी सॉरी म्हणाले ना. आता विसरून जा ना ते प्लीज. "

"अग वेडे, ते तर मी कधीच विसरले होते. हे आनंदाचे अश्रू आहेत. तुला नाही कळणार आताच. खूप सुंदर दिसते आहेस तू."

तेवढ्यात दाते वहिनी आणि सोसायटीतल्या काही इतर बायका आल्या.

"अगबाई, किती सुंदर दिसते आहेस मुग्धा! लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीच्या शुभेच्छा बेटा." दाते वहिनी खुल्या दिलाने कौतुक करत होत्या.

"थँक यू काकू. खरं म्हणजे आईंनीच ही साडी आणि हे दागिने दिलेत. दागिने तर त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेत. सुंदर झालेत ना?" मुग्धा तिळगुळाचे लाडू सर्वांना देत म्हणाली.

"अगबाई, खरच की काय? नशीबवान आहेस बरं का पोरी. भाग्य लागतं अशी सासू मिळायला." दुसऱ्या एक काकू म्हणाल्या.

"आणि अशी सून मिळायला देखील भाग्यच लागतं बरं का! नोकरी करूनसुद्धा आजची सगळी तयारी, हे तिळगुळाचे लाडू हे सर्व तिनेच केलंय. हे बघा, तिनेही मला हे सरप्राईज दिलंय. तिच्या स्वतःच्या पैशातून स्वतः जाऊन साडी आणली संक्रांतीची माझ्यासाठी." वर्षाताईही कौतुक करताना थकत नव्हत्या.

"अहो वहिनी, काय सांगू तुम्हाला, मी हे दागिने बनवायला तर घेतले, पण सारखी धाकधूक होती हो, की हिला आवडतील की नाही, ती घालेल की नाही?" वर्षाताई.

"आई, अहो मला इतके आवडलेत की मी फक्त आजच नाही तर मम्मीकडे आणि ताईंकडे हळदीकुंकू होईल ना तेव्हाही घालणार आहे हे दागिने आणि दिमाखात सांगणार की माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी प्रेमाने स्वतःच्या हाताने बनवलेत म्हणून."

सर्वांचे उखाणे वगैरे घेऊन झाल्यावर, फराळ वगैरे करून सगळ्या घरी निघाल्या. जात जाता दाते वहिनी म्हणाल्या,

"सुरेख झाला ग कार्यक्रम! असाच तिळगुळासारखा गोडवा कायम राहू देत हो तुम्हा दोघींच्या नात्यांमध्ये. "

वर्षाताई आणि मुग्धा दोघीही समाधानाने हसल्या.

तिळगुळाने नात्यातला गोडवाही वृद्धिंगत केला होता.समाप्त.

© स्वाती अमोल मुधोळकर

सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.


तर बघितलेत ना? दोघीही आपापल्या ठिकाणी, आपापल्या परिस्थितीत योग्य होत्या. नात्यात जरी मतभेद झाले तरी फार काळ ताणून न धरता दोघांनीही एकमेकांना समजून घेत , मतभेदाचे मनभेद न होऊ देता वेळीच मतभेद मिटवले , त्या दिशेने दोघांनीही प्रयत्न केले, की नात्यातला गोडवा कायम राहतो.

कशी वाटली ही कथा? आवडली असेल तर एक लाईक, कंमेंट करून नक्की कळवा.

सर्वांना संक्रांतीच्या तिळगुळासारख्याच गोड गोड शुभेच्छा.