Feb 23, 2024
चॅम्पियन्स ट्रॉफी 2023

अबोल मैत्रीची गोड गोष्ट

Read Later
अबोल मैत्रीची गोड गोष्ट
संबंध सेतू

कधी कधी एखाद्या व्यक्तीशी आपली क्षणिक ओळख ही कायम स्वरूपी बनते किंबहुना ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येण्यासाठीच ती क्षणिक ओळख झालेली असते. माझी आणि सीमाताईची ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 च्या निमित्ताने अशीच ओळख झाली. खरं सांगायचं तर सीमाताई आमच्या टीम मध्ये आली ती योगायोगानेच. आमच्या टीम मधील एक सदस्य काही कारणास्तव टीम सोडून गेला म्हणून सीमाताई आमच्यात आली.

सुरुवातीला ती थोडी बुजल्यासारखी होती. पटकन काही कमेंट करायची नाही. आमच्या वयामध्ये अंतर आहेच परंतु आता ती आमच्यातलीच एक झाली आहे. आमच्या ग्रुपमध्ये मी जरा अवखळ आहे. पटकन काही बोलते तरी माझ्यावर कोणी रागावत नाही. स्टँडअप कॉमेडी साठी जेव्हा माझा व्हिडिओ फेसबुकवर आला नाही तेव्हा मी आमच्या कॅप्टन महेश सरांना म्हटलं, " एक व्हिडिओ की कीमत तुमच्या जानो महेश बाबू ?" त्यावेळी पहिल्यांदा सीमाताईने माझ्या या कमेंटवर हसून दाद दिली.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फेऱ्या जशा जशा पुढे जात होत्या तसं तसं मला आणि ग्रुपमधील इतर सदस्यांना आपली टीम कुठे आहे याचे टेन्शन यायचं तेव्हा उज्वलाताई महेश सरांना म्हणायच्या, " कैलाशपती महेश्वरा जरा तिसरा डोळा उघडा आणि जगाला दाखवून द्या आपली टीम पण काही कमी नाही." पण आमचे महेश बाबू मात्र अगदी भोळ्या शंकरासारखे शांत असायचे. संतोष सरांनी तर माझ्या प्रत्येक कमेंट वर एखाद्या अनुभवी बुजुर्ग माणसासारखा अभिप्राय दिला की, मी त्यांना म्हणायची ' धन्यवाद आजोबा ' आणि ते म्हणायचे, 'कार्टे वेळेत फेरी पूर्ण कर.' आमच्या या सगळ्या संवादामध्ये सीमाताई मात्र शांत असायच्या. शगुफ्ता तर मला 'धूमकेतू' म्हणते, "कुठल्याही फेरीच्या आधी तुझं अगदी नाही नाही असतं आणि ती फेरी संपायच्या आदल्या दिवशी तू दिलेला टास्क पूर्ण करते आणि ॲपवर टाकते."
आमच्या ग्रुप मधल्या भाग्यश्रीचं तर माझ्यावर खूप प्रेम आहे. कविता चारोळीच्या फेरीमध्ये ती म्हणाली मॅडम तुम्हाला कविता जमत नसेल तर मी लिहून देते तुम्ही अभिवाचन करा, निदान चारोळी तरी लिहा. जमत नसेल तर मी चारोळी लिहून देते तुम्ही त्याचा व्हिडिओ बनवा. पण मी अशी बहाद्दर की कविता आणि चारोळीच्या वाट्याला गेले नाही ती नाहीच.

आमच्या ग्रुप वर सहज गप्पांमध्ये कोणी एखादी काही कमेंट केली की मी त्या कमेंटवर स्टिकरचा पाऊस पाडते. अगदी सुरुवातीला तर माझ्या या स्टिकर प्रकरणामुळे उज्वलाताई अगदी वैतागून जायची, तिला स्टिकर सेव्ह करणे आणि आवश्यक तिथे कसं वापरायचं याचं अगाध ज्ञान मीच दिलं. माझ्या या खोडकर स्वभावामुळे सीमाताई तर मला चुलबुली राखी म्हणते.

ग्रुप वर सेतुबंधासाठी जेव्हा सीमाताईचं नाव मला सुचवण्यात आलं तेव्हा मी जरा थबकले. त्याला कारणही तसंच होतं ग्रुपमधले महेश सर, भाग्यश्री, शगुफ्ता यांना मी आधीपासून ओळखत होते. नेहा ताई आणि उज्वला ताईचं लिखाण मी दुसऱ्या एका प्लॅटफॉर्मवर वाचलं होतं, पण सीमाताई माझ्यासाठी अगदीच नवीन होती. ती स्वभावाने जरा शांतही असल्याने तिच्याविषयी काय लिहावं ? कस लिहावं ? हा एक मोठाच प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला, पण तरीही सीमाताईबद्दल एक अनामिक ओढ मात्र होती त्याला कारणही तसंच आहे माझ्या सगळ्यात मोठ्या ताईचं घरचं नावही सीमाच आहे. त्यामुळे मनात कुठेतरी या दोघींची तुलना होत गेली आणि जाणवलं की अरे या दोघींमध्ये तर खूप साम्य आहे. संबंध सेतुसाठी मग मी तिने लिहिलेलं तिचं आत्मचरित्र वाचलं आणि तिच्याविषयी काय लिहावं हे मला सहज सुचत गेलं. सीमाताई बद्दल आणखी एक प्रचंड आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांनी माझे आवडते लेखक व. पु. काळे यांच्या सोबत सुद्धा काही दिवस काम केलं आहे.


सीमाताई लहानपणापासूनच अभ्यास, वक्तृत्व, खेळ सगळ्यात हुशार होती. शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना तिने बऱ्याच पार्टटाइम नोकऱ्या केल्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षेनंतर मोठ्या सुट्टीमध्ये अनेक पुस्तके वाचून काढली. तिची वाचनाची आवड इतकी प्रबळ होती की ती बस स्टॉप, ट्रेन कुठेही उभे राहून सुद्धा पुस्तक किंवा मासिक वाचत असायची.

तिने चाळीस वर्ष बँकेत नोकरी करून संसार आणि नोकरी अशी दुहेरी कसरत केली आहे. लग्नानंतर चौतीस वर्ष इतका प्रदीर्घकाळ ती तिच्या आईंबरोबर ( सासुबाईंबरोबर) एकत्र राहिली. इतकी प्रेमळ सासू-सुनेची ही जोडी पाहून मला तर एक क्षण मनात हेवाच वाटला. त्या तिच्यासाठी 'आधारवड' होत्या. सीमाताई आता निवृत्त झाली आहे. पूर्वी तिला लेखनाची आवड असून वेळ मिळायचा नाही आता मात्र ती 'आम्ही साहित्यिक', 'अक्षरधन', 'संवाद मंच',' माझ्यातली मी' आणि आता ईरा मंचावर लेखन करत असते. ईरा स्पर्धेमध्ये विविध फेऱ्यांमध्ये तिने आपला सहभाग नोंदवला आहे

आमच्या टीम मध्ये कोणालाही बरं नसलं किंवा दुखापत झाली असेल तर ती लगेच सर्वांना प्रेमाने ' काळजी घ्या ' असं सांगते. वयात अंतर असलं तरी आमच्या विचार लहरी जुळलेल्या आहेत आणि त्या कायम अशाच राहतील याची मला खात्री आहे.

सीमाताईचा स्वभाव प्रेमळ आणि सगळ्यांना समजून घेणारा आहे. तिने आता भरभरून लिहित रहावं आणि तिच्या वेळेचा सदुपयोग करावा. तिच्या लेखनाला आता कोणतीही सीमा असू नये अशी मी तिला शुभेच्छा देते.

©® राखी भावसार भांडेकर, नागपूर.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//