आठवणींच्या लडी

Sweet memories of child wood

आठवणींच्या लडी..

बालपणी माझ्या व समवयस्कांच्या आवडीचे दोन वार म्हणजे शनिवार व रविवार. शनिवारी सकाळची शाळा असायची. आम्ही उठायचो तेंव्हा बाहेर अंधारघुडुप असायचं. बाबा आदल्यादिवशी ब्रेड व अमुल बटर आणून ठेवायचे. आईने वातीच्या स्टोव्हवर पाण्याचा टोप तापत ठेवलेला असायचा. त्याच्या झाकणावर एका प्लेटीत बटरचा तुकडा काढून ती वितळवत ठेवायची. एकेकाच्या अंघोळ्या व्हायच्या. पेटीफ्रॉक,व्हाईट शर्ट,ब्लु युनिफॉर्म चढवला जायचा. कंबरेला पट्टा असायचा. केसांना लाल कापडी हेअरबँड. तसंच मग सॉक्स नि शूज घालण्याचं एक लफडं असायचं पण थंडीत ते उबदार वाटतं. आई आमच्या हातापायांना खोबरेल तेल लावायची.

 चेहऱ्यासाठी विको टरमरिक व पाँड्सची पावडर ठरलेली. त्यांचा तो चिरपरिचित गंध आणि हो गंधकाची उभी बाटली. त्यातल्या काडीने दोन भुवयांच्या मधोमध जरा वरती एक ठिपका काढला की झाली तयारी.

 बाजुला हॉटेल होतं. रामक्रुष्ण हिंदु हॉटेल. सकाळीसकाळी तिथून शिऱ्याचा घमघमाट यायचा. बऱ्याचदा शनिवारी मी तिथून पिवळा शिरा आणायचे.  हिरव्या पानांच्या आड दडलेला तो पिवळा शिरा अफलातून लागायचा. जीभेवर अजुनही चव रेंगाळते त्या शिऱ्याची. 

बस यायची वेळ झाली की एका सलुनच्या समोर जाऊन उभं रहायचो. बस येईस्तोवर त्या सलुनमधेही बसायचो. अशोक काकांच्या खुर्च्यांवर बसून तिथल्या पाण्याच्या बाटलीतून केसांवर पाणी फवारायचो. पावडरचा पफ घेऊन गालांवर फिरवायचो. ते काकाही गंमती होते. बरं जमायचं आमचं. 

हॉटेलच्या बाजूला एक हारवाला बसायचा. त्याच्याकडची ती हारातली पांढरी मोठी फुलं..काय सुगंध असायचा त्यांचा. त्याच्या पाठीला भलमोठं पोक होतं. केस कुरळे,रंग सावळा. अगदी सराईतपणे तो हार करत बसलेला असायचा. हार बनवणं एवढंच त्याचं आयुष्य असावं असंही वाटून जायचं. 

शनिवारी दप्तर फारसं जड नसायचं. शाळेत गेल्यावर कवायत व्हायची. सामुहिक प्रार्थना व्हायची. भलंमोठं ग्राऊंड होतं शाळेचं. कधी तिथे सरावासाठी समुहगीतंही म्हणून घ्यायचे. सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा, आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ही सामुहिक गीतं म्हणताना देहात आपसूक देशप्रेम,वीरश्री संचारायची. 

डब्यात पोळीभाजीऐवजी ब्रेड बटर,शीरा असं काही आवडीचं असे. कधीकधी तर खरवस असायचा. मला प्रचंड आवडायचा. गोरेगावमधून भैये चीक घेऊन यायचे. सँपल द्यायचे. त्या सँपल चीकमधे जरा साखर घालून आई लगेच बनवून बघायची मग लीटरभर चीक त्याच्याकडून घेतला जायचा. आई तो गाळून त्यात दूध,गुळ,वेलची घालून उकडत ठेवायची पण मला तो साखर घातलेला पांढराशुभ्र मलईसारखा जास्त आवडायचा.

शाळा अर्ध्या दिवसांनी सुटायची. शनिवारी आईने वीस पैसे किंवा चाराणे दिलेले असायचे म्हणून खिसा गरम असायचा. पावलं टोपलीवाल्या आजोबांकडे वळायची. सगळंच हवं असायचं त्या टोपलीतलं. सुकी लाल बोरं,यांना चुण्याचुण्या असतात. मोठी बोरं,लहां चण्याएवढ्या आकाराची बोरं,तोतापुरी आंब्याच्या पातळ भेसी,हिरवी बडिशेप,स्टारफ्रुट,आंबटगोड चिंच,विलायची चिंच, आणि बरंच काही. ते आजोबा कागदाची पुंगी करुन त्यात ऐवज भरायचे. वरतून मीठ मसाला टाकायचे. बसेस रांगेत लागलेल्या असायच्या. त्यातल्या आपल्या बसमधे जाऊन बसायचं नि आरामात तो खाऊ खायचा. हिंदु कॉलनीत अगदी निरव शांतता असायची. आमची शाळा भरण्याची नि सुटण्याची वेळ एवढाच काय तो गलका असायचा. गाडीत गाण्याच्या भेंड्या रंगायच्या. गाणी बरेचदा तीच ती असायची. रमया वसतावया,ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे,एक था गुल और एक थी बुलबुल वगैरे. बस पार भोईवाडा वगैरे फिरुन जायची मग भूक लागायची. 

घरी आईने स्टीलच्या डब्यात साबुदाण्याची खिचडी भरुन ठेवलेली असायची. ती खायचो. मग केस धुण्याचा सोहळाच असायचा.

 चढत्या दुपारी युनिफॉर्म, शुज,सॉक्स धुवायला बाहेरच्या नळावर जायचो. शुज अगदी घासून लख्ख करुन वाळवले की त्याला पांढरा खडू जो गोलसर मिळायचा तो ओला करुन लावायचो. कसले भारी दिसायचे शूज! बाजुचा अभी त्याचा पोपटाचा पिंजरा धुवायला आणायचा. पोपटाची वाटी,आतली बसण्याची जागा स्वच्छ करायचा. पोपटाला अंघोळ घालायचा. 

दुपारी बाबा चारपर्यंत ऑफिसातून घरी यायचे. भरपूर फळं आणायचे. कधी लालबागच्या गल्लीत मिळणारा ताजा फरसाण नि त्यासोबतची पपईची कोशिंबीर आणायचे. काय भन्नाट लागायचं ते कॉम्बिनेशन!

 शनिवारी टिव्हीवर कसलंतरी कारटून असायचं जे आम्ही चवीचवीने बघायचो. शनिवारी दुपारच्या जेवणाचा मेन्यू ठरलेला असायचा. गोडीडाळ,भात व सफेद वाटाण्याची उसळ. कितीतरी वर्ष हाच मेन्यू असायचा. ते जेवण भारी लागायचं. आमची गोडीडाळ वेगळी असते. यात ओला नारळ व जिरं यांच वाटण फोडणीला घालतात. डाळीला रवीने घोटत वगैरे नाहीत. वाटण रटमटलं की त्यात हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या व हळद टाकून उकडलेली तुरीची डाळ ओततात व जरा उकळी आणतात. 

शनिवारी संध्याकाळी मराठी चित्रपट बघायला मज्जा यायची. ते क्रुष्णधवल चित्रपट,त्यातल्या त्या खणाच्या चोळ्या नि लुगडं नेसलेल्या बाया नि फेटे घातलेले पुरुष भारी वाटायचे. शनिवारी रात्री काही टेंशन नसायचं डोक्याला कारण दुसऱ्या दिवशी रविवार असायचा. आम्ही लहान असताना दर रविवारी बाबा आम्हाला म्हातारीचा बुट,राणीचा बाग,हँगिंग गार्डन अशा ठिकाणी घेऊन जायचे. रविवारी आंबोळ्या,कांदेपोहे ,इडलीचटणी असा नाश्ता असायचा. बाबा लालबागच्या मार्केटमधून बाजार घेऊन यायचे. भाज्या निवडून फ्रीजमधे भरुन ठेवायचे. 

नालवा,मोरी,सुरमई,हलवा,असे मोठे मासे आणायचे शिवाय कुर्ल्या,कोलंबी आणायचे. एकंदरीत दुपारी खाण्याची रेलचेल असायची. दुपारी मी बाबांसोबत कोडी सोडवायचे. त्यातून शब्दांचा साठा वाढत गेला. महाभारत,शक्तीमान हे जोडीला असायचंच. अथश्री महाभारत कथा हे प्रत्येक घराच्या टिव्हीतून एका वेळेला वाजायचं,समुहगीतासारखं. संध्याकाळी हिंदी सिनेमा असायचे. शशीकपूर,शम्मी कपूर,अमिताभ बच्चन,देवानंद,शत्रुघ्न सिन्हा,अमोल पालेकर,रेखा,जया भादुरी या़चे पिक्चर भान हरपून बघायचो आणि मग आठवण यायची ते उरलेल्या ग्रुहपाठाची,पुनश्च उगवणाऱ्या सोमवारची. हा शनिवार रविवार म्हणजे लोणीसाखरच असायच.

------सौ.गीता गजानन गरुड.