नारळीभात

Recipe


गेल्या आठवड्यात एका मैत्रिणीनं व्हाट्सअप ग्रुपवर गोड भाताची रेसिपी विचारली.

लगेच सगळ्या सुगरण सख्या तिच्या मदतीला सरसावल्या.

एका मैत्रिणीनं विचारलं देखील की कुठल्या प्रकारचा गोड भात करायचाय तिला -नारळीभात, साखर भात की आंध्रचा पर्वान्नम!

गोड भाताचे इतके सारे प्रकार असतात!!

असो, पण मैत्रिणीला नारळी भाताची कृती हवी होती.

ग्रुपमधल्या सगळ्या सुगरणीच्या सहवासात राहून राहून मी पण थोडी थोडी हुशार झालेच्चे ना!

पण हुशार झाले म्हणून आळशीपणा गेला थोडाच! आपल्याला लंब्या-चौड्या रेसिपी काही झेपत नाहीत.

अपून बोले तो शॉर्टकट एक्सपर्ट... सगळ्यात सोप्या पद्धतीने आणि कमीतकमी वेळात पदार्थ बनवायचा...नो चिकचिक नो झिगझीग!!!

तर ह्या मैत्रिणीला मी पण एक रेसिपी सुचवलीच... नारळीभाताची....

कसा बनवायचा झटपट नारळीभात? तेच सांगतेय ना तुम्हाला पण -

भात शिजवून एका परातीत मोकळा करून घ्यायचा. नंतर ओलं खोबरं, साखर, वेलचीपूड/जायफळ, काजू किसमिस, केशरी रंग त्यात नीट मिसळून घ्यायचं...

स्टीलच्या जाड बुडाच्या कढईत भात आणि साखरेचं मिश्रण एकत्र करून त्यात दोनेक चमचे साजूक तूप सोडायचं आणि मंद गॅसवर साखर विरघळेपर्यंत एक दोन वाफ काढून घ्यायच्या.

आजकाल बाजारात स्टीलच्या ठोक्याच्या जाड बुडाच्या छान कढया मिळतात. पदार्थ करपत नाही आणि स्टीलमध्ये पदार्थावर धातूची रिऍकशन होत नाही.

स्टीलची कढई नसेल तर स्टीलचं जाड बुडाचं पातेलं घेऊ शकता.पण कढईमध्ये हे मिश्रण छान परतल्या जातं.

एव्हाना नारळीभाताचा सुगंध घरभर पसरलेला असतोच. लागल्यास वरून आणखी ड्रायफ्रूट्स घालून नारळीभाताची एका वाटीने किंवा मूद पाडण्याच्या साच्याने छान मूद पाडून सर्व्ह करायची.

एक आयडियाची कल्पना सांगू? जर ओलं खोबरं उपलब्ध नसेल.. म्हणजे आमच्याकडे विदर्भात ओलं खोबरं सहजरित्या नाही मिळत.. अश्यावेळी सुक्या खोबऱ्याचा कीस त्यात भिजेल एव्हढं दूध घालून तासभर ठेवायचा. ओल्या नारळाचा फील येतो अगदी!

तर मैत्रिणीला ही शॉर्टकट रेसिपी फार फार आवडली आणि तिनं लग्गेच ह्या पद्धतीने नारळीभात करून बघितला.

तिला आणि तिच्या घरच्यांना तो खूप आवडला... तिनंच सांगितलं तसं दुसऱ्या दिवशी!

तर तुम्ही पण करताय ना...

पण मला जेवायला बोलवायला विसरू नका हं!!!