Oct 16, 2021
प्रेम

अपघात

Read Later
अपघात
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अपघात

संध्याकाळची अंधेरी लोकल गर्दीने गच्च भरलेली. बांद्रा यायची वेळ झाली होती. गर्दी त्या प्रमाणे  मागे पुढे होत होती. प्रशांतला अंधेरीला उतरायचं असल्याने तो मागे मागे सरकत होता. तेवढ्यात कोणीतरी मागून ओरडल केतकी, केतकी. नक्कीच हा बंड्याचा आवाज. गाढवाला इतके वेळा सांगून झाल की चार चौघांत अशी शोभा करत जाऊ नकोस तरी हा सुधरत नाहीये. त्यानी ठरवल की मागे बघायचच नाही. इतक्यात बांद्रा आल. लोंढा बाहेर पडला. प्रशांतच लक्ष् विचलित झाल्या मुळे तो लोंढयाबरोबर बाहेर फेकल्या गेला. पाठोपाठ बंड्या पण आणि दोन मुली पण. त्यांनी बंड्याचा शर्ट पकडला होता. 
काय हो तुम्ही हिला ओळखता ?
नाही. 
मग माझ्या मैत्रिणीला का हाक मारत होता ? दिसायला तर सभ्य दिसतं आणि भर गाडीत मुलींना छेडता ? कोण  समजता कोण तुम्ही स्वत:ला ? 
अहो अस काही नाहीये मी कशाला तुम्हाला हाक मारू. ना ओळख ना पाळख, मी माझ्या मित्राला हाक मारत होतो. हा बघा इथेच आहे.

गर्दी जमायला लागली होती. ठोको सालेको छेड खानी करता है. गर्दीतून एक आवाज. बंड्या आणि प्रशांत च्या काळजाच पाणी पाणी. मुंबईच्या गर्दीच काही खरं नाही. पण गर्दी पाहून पोलिस आला. 
बाजू हटो  कया हुवा ?
ये दोनो लडकियोको छेड रहे थे . कोणीतरी बोलल.
अस ? चला साहेब प्लॅटफॉर्म 1 वर,  चौकीतच बोलू आपण आणि मुलींनो तुम्ही जावा बिनधास्त ह्यांच आम्ही बघून घेऊ.

दोघांची वरात चौकीवर. दोघही भेदरलेले. माध्यम वर्गीय माणूस, पोलिस म्हंटल्यांवरच घाम फुटतो. इथे तर चक्क  चौकीवर. पोलिसांच्या गराड्यात.
दोघेही खाली मान घालून उभे होते. 
आधी दोघांच्या कानफाटात आवाज काढल्यावर मग 
हं बोला काय विचार आहे. 
विचार कसला साहेब सगळा गैरसमजाचा भाग आहे. त्या मुलीला मी ओळखत सुद्धा नाही. अहो आम्ही सरळ नाकासमोर चालणारी माणस आहोत. खाजगी कंपनीत नोकरी करतो आणि संध्याकाळी घरी जातो. आम्ही वेडा वाकडा विचार पण करू शकत नाही.

छेडखानी कराले वळख लागते ? ये तो नयाच फंडा सून रहा हूं. पुन्हा एक कानाखाली. 

हवालदार साहेब मला उगीच का मारता आहात? मी सांगतो आहे की काहीच केल नाही म्हणून. 

मारत नाहीये तुला मुंबईची पब्लिक कशी आहे ते तुला माहीत नाही. कपडे फाटलेल्या अवस्थेत सरळ हॉस्पिटल मध्ये पोचवल असत तुम्हाला. मी वेळेवर पोचलो म्हणून वाचले तुम्ही लोक. शिवराम इकडे ये. एक भला भक्कम आडदांड पोलिस आला. त्याला पाहूनच बंड्या गर्भगळीत झाला. सून, काय आहे ते खरं खरं बोल नही तो ये शिवराम तेरी घंटी बजा देगा. फिर मत बोलना की कासारे ये तूने  कया कीया आणि ख्या ख्या करून भेसूर हसला.

बंड्या मरणाच्या वाटेवर, पण नशिबाने वाचला कारण इंस्पेक्टर साहेब आले. त्यांनी शांतपणे चौकशी करायला घेतली.

साहेब हा माझा मित्र, केतकर याच आडनाव. आम्ही कॉलेजचे मित्र. तेंव्हा पासून आम्ही याला केतकी म्हणून चिडवतो. आज पण दिसल्यावर अशीच हाक मारली. दुर्दैवाने त्या दोन मुलीं पैकी  एकीच नाव केतकी होत. आणि इथेच सगळा घोळ झाला साहेब. पण साहेब माफ करा. आता यापुढे अस याला चिडवणार नाही. झाली तेवढी शोभा पुरे झाली. I promise. 

साहेबांच्या लक्षात सगळा प्रकार आला. हसले आणि म्हणाले आता फक्त warning देऊन सोडतो आहे. पुन्हा जर अस काही घडल तर तुमच काही खर नाही. मग शिवराम ला मी थांबवू शकणार नाही. कळतय ना ?

हो साहेब अस पुन्हा कधीच होणार नाही. 

बंड्या तुझ्या मुळे पोलिस स्टेशनच दर्शन झाल आणि प्रसाद पण मिळाला धन्यवाद. मित्र असावा तर असा. कृतकृत्य झालो  मी जीवनात. 

सॉरी यार प्रशांत. एका साध्या गोष्टीच इतक रामायण होईल अस स्वप्नात देखील वाटल नव्हत. चांगलच अंगलट आलं. माफ कर यार. कान पकडतो.

घरी पोचायला बराच उशीर झाला होता. प्रशांत ची आई दारतच उभी होती वडील येरझाऱ्या घालत होते. 

का रे एवढा उशीर ? सकाळी बोलला नव्हतास उशीर होईल  म्हणून.
अग अचानक काम आल मग ते पूर्ण करूनच याव लागल.

रात्री प्रशांत बराच वेळ जागाच होता. संध्याकाळचा प्रसंग डोळ्यांसामोरून हलत नव्हता. केंव्हातरी झोप लागली पण स्वप्नात सुद्धा पोलिस स्टेशन दिसल आणि दचकून जागा झाला. असे सात आठ दिवस झाले. प्रशांत आता सावरला होता. ऑफिस च रुटीन काम सुरू झाल. त्या दिवशी दुपारी साहेब केबिन मधून बाहेर आले. 

घळगी दिसत नाहीयेत, आज आले नाहीत का ?

नाही साहेब त्यांचा मुलगा जिन्यांवरून पडला त्याला घेऊन ते हॉस्पिटलला गेले आहेत. 

चेकर्स अँड चेकर्स कंपनी मधून फोन आला होता की चेक तयार आहे म्हणून. घळगी नाहीत तर केतकर आता तुम्ही निघा आणि तो चेक ताब्यात घ्या. आणि उद्या सकाळी मालपाणी साहेबांना द्या. ते मग तो जमा करतील.

ठीक आहे साहेब. हातातल काम संपवतो आणि निघतो. 

प्रशांत प्रथमच चेकर्स अँड चेकर्स कंपनीत जात होता म्हणून त्यांनी रीसेप्शनिस्ट ला विचारल की चेक कोणा कडे असतात. 

सरळ जा डाव्या बाजूला तीसर टेबल, चितळे नावाची मुलगी आहे तिच्याकडे असतात. 

डाव्या बाजूच तिसर टेबल आणि आकाशच कोसळल. उलट्या पावली धूम ठोकायची जबरदस्त इच्छा झाली. पण शकय  नव्हत. चेक घ्यायचा होता. 
टेबलावर तीच केतकी नावाची मुलगी. आता काय करायच ? प्रशांत किंकर्तव्यमूढ अवस्थेत. आता पुन्हा काय होणार या विचारांनी प्रशांत तिथेच उभा राहिला. केतकीचं  त्यांच्याकडे लक्ष गेल. आणि ती संतापली. 

काय हो इथवर आलात माझा माग काढत ? स्वर टिपेचा होता. प्रशांत 
गर्भगळीत. तिचा आरडा ओरडा ऐकून स्टाफ भोवती गोळा झाला. 

काय झाल केतकी ? हा माणूस कोण आहे ? काय केल यांनी ?

कोण आहे मला माहीत नाही पण सारखा माझ्या मागे मागे फिरतो आहे. माग काढत ऑफिस मध्ये पण आला. 

काय रे इथवर मजल गेली तुझी ? दोघा जणांनी प्रशंतला धरल आणि तिसरा त्याला मारण्याच्या अवेशात आला होता. तितक्यात साहेब आले. 

अरे काय चालू आहे ? कसला गलका आहे आणि तू कोण ?

साहेब मी चेक घ्यायला आलो आहे. घाटगे सॉफ्ट सोल्यूशन मधून. तुमच्याच ऑफिस मधून फोन आला होता की चेक तयार आहे घेऊन जा, म्हणून आलो.

चेक घ्यायला आलाहेस मग हा आरडा ओरडा कशाला ? केतकी काय प्रकार आहे हा सगळा ?

मग केतकी नी पूर्ण स्टोरी रीपीट केली. 

अस आहे. ठीक, केतकी तू याला चेक देवू नकोस. मी आत्ताच घटग्याना फोन करतो. 

साहेब मला पण दोन मिनिट द्या ना. हा सगळं गैरसमजुतीतून उद्भवलेला घोटाळा  आहे. प्लीज. 

बोला पण मला जर पटल नाही तर फोन नक्की करणार सोडणार नाही. 

चालेल. पण मला खात्री आहे की तुमचा सर्वांचा गैरसमज दूर होईल. मग प्रशांत नी सर्व कहाणी सांगितली. वर कंपनी च id card पण दाखवल. आधार पण दाखवल. तेंव्हा सर्वांचा विश्वास बसला. तरी पण साहेब म्हणालेच केतकर तुम्हाला कोणी पाठवल मुरकुटयांनी ?

हो.

पण नेहमी घळगी येतात आज तुम्ही का ?

त्यांच्या मुलांचा पाय मोडला ते त्याला घेऊन हॉस्पिटलला गेलेत. 

ओके, केतकी तू मुरकुटयांना फोन करून विचार की कोणाला पाठवल ते,  त्यांनी जर याच नाव घेतल तर चेक देऊन टाक आणि मिटवा हे सगळ. आणि कामाला लागा. 

चेक घेऊन बाहे पडतांना प्रशांतच्या चेहऱ्यावर भलत्याच कटकटीतून मोकळ झाल्याचा आनंद दिसत होता. त्याच खुशीत टपरी वर जाऊन चहा घेतला बंड्याला लाखोली वाहिली. आणि मगच घराच्या वाटेला लागला. 

काही दिवस छान गेलेत. बंड्या भेटला नाही म्हणून आनंदात होता. 

एक दिवस ऑफिस मधून येतांना प्रशांतला जाणवल की कोणीतरी हाक मारली म्हणून. हाक अगदी हलक्या स्वरात होती. तो थबकला मग अस वाटल की भास झाला म्हणून चालू पडला. 

अहो केतकर थांबा ना. 

आता प्रशांत थांबला. मागे वळून पाहिल तर केतकी. प्रशांत जागच्या जागीच थिजला. 
अहो थांबा. केंव्हा पासून तुम्हाला हाका मारते आहे पण तुम्ही आपले पुढे 
पुढेच.  कसल्या तंद्रीत होता ?

अजून तुमच समाधान झाल नाही का ? आता काय शिल्लक आहे. ?

भरपूर आहे. पण आपण रस्त्याच्या मधोमध उभे आहोत साइड ला जाऊया ?

जेवढा शिल्लक आहे तेवढा अपमान करून टाका एकदाचा. पण मग यानंतर नको. 

अहो अपमान नाही तुमची क्षमा मागायला तुम्हाला थांबवल. अहो माझ खरंच चुकल. कुठलीही शहा निशा न करता तुम्हाला वेठीला धरल. मी काय करू म्हणजे तुमचा राग जाईल ? 

आता प्रशांतच्या चेहऱ्यावर तरतरी आली. 

अहो राग नाही आला. मनस्ताप झाला. त्यात माझ्यामते तुमची काहीच चूक नव्हती. चूक बंड्याची पण नव्हती. तो सगळं योगायोगाचा भाग होता.  तुम्ही नका त्रास करून घेऊ.

तुम्ही किती समजूतदार आहात हो. आणि ती माझी मैत्रीण तिनेच राई चा पर्वत केला. 

ती आत्ता तुमच्या बरोबर आहे ? प्रशांत सगळ आठवून पुन्हा घाबरला.

नाही,नाही ती केंव्हातरी असते. त्या दिवशी होती. ती नसती तर एवढ काही झालच नसत. 

तुम्हाला खरंच अस वाटत ?

हो म्हणजे मी एकटी असते तर लक्षच दिल नसतं.
थॅंक गॉड माझी गाठ एका सुस्वभावी मुलीशी पडली आहे तर. आता चिंता नाही. 

कसली चिंता ?

नाही, काही नाही. चला सर्व मोहोळ दूर झाल आहे आपण समोर टपरीवर चहा घ्यायचा का ? दोघंही टपरीवर. मग केतकीच  म्हणाली की 

चहाच्या अगोदर पाणी पुरी खाऊ. दोघ तिकडे. चहा पिता पिता केतकीने विचारलं तुम्ही कुठे राहता. मी अंधेरी वेस्टला  राहते

मी ईस्ट ला. रोज याच वेळेस निघता ? माझी हीच वेळ आहे. - प्रशांत 

लोकल मध्ये खूप गर्दी असते या वेळेस. तो समोर बस स्टॉप दिसतोय ना तिथे 4 लिमिटेड थांबते. थेट अंधेरी. त्यांनी जायच का ?

उशीर होईल. आई वाट पाहिल पण तुमचं काय ? आई वडील काळजी करतील ना ?

ती हसली. मला कळल. आणि आई बाबांना सांगेन की लोकल मध्ये या वेळेस खूप गर्दी असते म्हणून. 

तुम्हाला काय कळल ?

काही नाही असच. चला. 

मग रोजच बसने जाणे सुरू झाल. अहो वरुन अग वर केंव्हा आले ते कळलंच नाही दोघांना.

एक दिवस पाणी पुरी च्या स्टॉल वर असतांना बंड्या आला. केतकी तेंव्हा स्टॉलच्या मागे पाणी प्यायला गेली होती. थाप मारून म्हणाला 
गाढवा एकटा एकटा पाणी पुरी खतोस लाज नाही वाटत ? 

आणि केतकी समोर आली. तिला पाहून बंड्या चपापला. मागे वळून चालायला लागला. प्रशांत नी थांबवल. म्हणाला अरे थांब. तुझे आभार मानायचे आहेत. 

आभार ? कशाकरता ? 

अरे त्या दिवशी तू जो घोळ घातला, तो नसता  घातला तर मला केतकी कशी मिळाली असती. म्हणून तुला लाख लाख धन्यवाद. अपघातानेच केतकी मला मिळाली. अपघात सुद्धा कधी कधी सुंदर असतो हे मला माहीत नव्हत. आणि त्यांची जाणीव तू मला करून दिलीस म्हणून आभार. 

बंड्या वेडाच झाला. तो बावचळल्यासारखा पाहतच राहिला. 

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired