स्वयंपाक
" अगं रूपाली, आज स्वयंपाकात काय बनवणार आहेस?" बघ मी भरपूर भाज्या आणल्या आहेत. शिवाय मटारच्या शेंगाही घेऊन आलो आहे.
मॉर्निंग वाॅक वरून आल्या आल्या दारातूनच रुपेशने रूपालीला आवाज दिला.
"मटार च्या शेंगा म्हणजे तुमची काही स्पेशल रेसिपीची ऑर्डर असणार नक्की."
"हो नक्कीच."
तू या दाण्यांची छान कचोरी बनवतेस नां. ती बनव आज.
हो बनवते नां.
पण लगेच नाही. आताच मी मोबाईल मध्ये बघितलं, ईरावर लघुकथा उपक्रम सुरू आहे नां, त्यात एक विषय आहे "स्वयंपाक" आणि स्वयंपाक तर माझा आवडीचा विषय. आधी मी त्यावर थोडं लिहिणार आणि मगच स्वयंपाक.
असं होय, म्हणून अलीकडे तू सारखी मोबाईल घेऊन बसली असतेस. रुपेशने टोमणा मारला.
रूपालीच्या लक्षात आले, म्हणजे मोबाईल घेऊन बसण्यावर लगेच भाष्य.
पण काय हो, मी सारखी बघते आहे, रिटायर्ड झाल्यापासून अगदी छान निवांत चाललं असतं तुमचं. सकाळी उठून फिरायला जाणे. मित्रांसोबत गप्पा टप्पा,टूरला जाणे. मी कधी म्हटलं कां तुम्हाला याविषयी? आणि आता माझ्या हातात मोबाईल दिसला तर लगेच तुमचे टोमणे.
तसं नाही गं "तुझा डोळ्यांचा त्रास वाढला नां अलीकडे म्हणून म्हटलं."
ते काही नाही. मी नेहमीच ऐकते तुमचे असले डायलॉग. यावर्षी रिटायर्ड झाल्यापासून आता तर कुठे मला थोडा निवांत वेळ मिळत आहे. म्हणून केली मी डिजिटल लेखणी सुरू. ईरावर वेगवेगळे उपक्रम असतात, स्पर्धा असतात. छान वाटतं लिहायला आणि वेळही अगदी छान जातो माझा.
रूपाली याच वर्षी रिटायर्ड झाली होती. आतापर्यंत लेखणाची आवड असूनही फारसा वेळ मिळत नसल्यामुळे तिला तिची आवड बाजूला ठेवावी लागे, पण आता मात्र तिने छानपैकी लिहायला सुरुवात केली होती.
अहो, या मटारच्या शेंगांचे दाणे काढा नां तोपर्यंत. मला थोडं सोपं जाईल.
रूपालीला स्वयंपाकाची भारी आवड. रोज वेगवेगळे पदार्थ करायला तिला आवडत आणि रुपेश ला खाण्याची आवड. त्यामुळे रुपेश ही एकदम खुश.
पण काय हो, एक प्रश्न विचारु कां?
आम्हा स्त्रियांना कधीच रिटायर्डमेंट नसते कां? तिकडे निवृत्ती मिळाली तरी इकडे घरी मात्र घरी सारखी कामं, तुमची खाण्याच्या वेगवेगळ्या पदार्थांची फर्माईश.
अगं रुपा, एक सांगू कां. तरीसुद्धा तू किती प्रेमाने करतेस सर्व. मला खरंच तुझं नेहमीच कौतुक वाटतं.
बघ बोलता बोलता दाणे पण काढून झालेत. आता बनव तू याची रेसिपी .आणि हो, आज आपण दोघे छान पैकी एखादा चित्रपट पाहायला जाऊ आणि तिकडेच जेवणही करू. म्हणजेच तुला तेवढीच स्वयंपाकाला सुट्टी.
कधी नव्हे ते आज आपले एवढे कौतुक ऐकून रूपाली सुखावली. आणि स्वयंपाक घराकडे वळली.
सौ.रेखा देशमुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा